Showing posts with label दैनंदिनी. Show all posts
Showing posts with label दैनंदिनी. Show all posts

Wednesday, November 29, 2023

हे ही आपलेच !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोगदातज्ञ श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत प्रेम का आहे?

त्यांचे बोगद्या वाचवण्यात बाहेर देवाला नमस्कार करतानाचे फोटो प्रकाशित झाले होते. पण फक्त म्हणून? एक परदेशी गोरा ख्रिश्चन आपल्या धर्माच्या देवासमोर नतमस्तक झाला म्हणून? की अर्नोल्ड धर्मांतर करुन हिंदू झालेत अशी समजूत झाली आहे म्हणून? आणि त्यामुळे हिंदूंचा अहं सुखावला म्हणून?

अजिबात नाही.



फसलेल्या कामगारांना वाचवायला यश मिळावं म्हणून या बोगद्याजवळ काहीच दिवसांपूर्वी बाबा भौखनाग यांचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आलेलं आपण अनेक छायाचित्रांतून बघितलं असेलच. त्या आधी त्याची पालखी काढून पूजा आणि आरती करण्यात आली. परमेश्वर कुपित झालेला आहे असं समजून देवाला साकडं घालण्यात आलं आणि हे छोटं मंदिर उभारण्यात आलं.

श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत आदर आणि प्रेम याकरता आहे की ते मोकळ्या मनाने या देशाच्या, धर्माच्या अनुभूतींना सामोरे गेले म्हणून आणि स्थानिक संस्कृती आणि परंपरांबद्दलचा आदर जाहीर दाखवला म्हणून. आणि हो, त्यांच्यात स्वाभाविक काळजी, जिव्हाळा, आणि मानवता दिसली म्हणूनही.

हिंदुत्व म्हणजे दुसरं काय असतं? असलेल्या श्रद्धेचा त्याग करुन दुसरी स्वीकारणे इथवर हिंदुत्व मर्यादित नक्कीच नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःत डोकावून सत्यान्वेषण करणे आणि त्यातून जे निष्पन्न होईल त्याकडे डोळसपणे बघणे आणि उघडपणे स्वीकारणे. तेच अर्नोल्ड यांनी केल्याने आता भारतीय त्यांच्यावर प्रेम करु लागले आहेत.

यापैकी काहीही न करता फक्त कर्तव्य पार पाडून आपले पैसे घेऊन निघून गेले असते तरी भारतीयांना त्यांच्याबद्दल आदरच वाटला असता. जसा तो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासारखे बाहेरुन आलेल्या आणि या मदतकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाबद्दल वाटतो आहे तसाच, मग त्यांनी यातलं काहीही केलेलं असो किंवा नसो. कारण कृतज्ञता ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

म्हणूनच श्री अर्नोल्ड डिक्स आणि या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ आहोत.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ २, शके १९४५

Tuesday, October 31, 2023

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये

माझा एक लांबचा भाऊ आहे, जॉब प्रोफाइल आयटी सपोर्ट अशी आहे. 

मी त्याला कधी फोन केला की तो नेहमीच माझी जी काही शंका असेल तिचं निरसन करायचा, अगदी कितीही क्षुल्लक असेल तरी. मी एकदा त्याला सहज विचारलं की अरे बाबा तुला डिस्टर्ब होत नाही ना? तुला नक्की वेळ असतो ना?

मग एकदा त्याने त्याची प्रोफाइल मला समजावून सांगितली. मला वाटलं बऱ्यापैकी रिलॅक्स काम आहे. तो म्हणाला की अरे हे जे तुला रिलॅक्स वाटतं तेच मुळात प्रमुख काम आहे. एखादी घटना (incident) घडली की त्याला प्रतिसाद (response) देणं हे तुलनेने सोपं आणि तितकं स्ट्रेसवालं नाहीये. कारण काय करायचं हाच माझा विषय असल्यानं मला आधीपासूनच माहीत आहे किंवा नंतर मार्ग काढता येतो.  

पण आता काय घडेल, आता काही घडेल का, कधी घडेल, याची वाट बघत बसणं आणि त्या दडपणाखाली राहणं हेच सगळ्यात ताण देणारं असतं. 

नेहमीच्या आयुष्यात पण असंच असतं, वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध घडली की आपलं मन त्याला त्या त्या पध्दतीनं प्रतिसाद देतं. पण तीच गोष्ट गॅसवर असली म्हणजे अनिश्चित असली की तो कालावधी भयंकर कठीण असतो. 

अशा वेळी मला नेहमीच रामरक्षा फार मोठा आधार वाटत आलेली आहे. त्यामुळे काही घडत नाही तोवर...

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥

जय श्रीराम मित्रों 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. २, शके १९४५

Monday, October 9, 2023

प्राजक्त

लहानपणी आईला पूजेला लागायची तेव्हा सोसायटीच्या कम्पाउंडमध्येच असलेल्या प्राजक्ताच्या झाडाची फुलं भरपूर मिळायची म्हणून आणायचो, आणि इतर पर्यायही कमी होते.

प्राजक्त

पण मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. असं वाटतं की सडा पडला असेल तिथे उभं रहावं, तो गंध नाकावाटे मनात भरून घ्यावा. नुकताच पाऊस पडून गेला असेल तर अत्युत्तम.

जसं आपण अथर्वशीर्षात "त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं‌ चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्" म्हणत असताना तंद्री लागते, किंवा आरती संपल्यावर भान हरपून "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नमः पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!" अशी अनेक देवतांची आणि संतांची नावे एकत्र घेताना आपण जी दैवी अनुभूती येते, अगदी तशीच भावना मृदगंध मिसळलेला प्राजक्ताच्या फुलांचा सुवास नाकावाटे थेट नेणिवेत पोहोचतो तेव्हा निर्माण होते.

म्हणूनच कदाचित, मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. बास बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १०, शके १९४५

Saturday, April 15, 2023

दुर्लक्षं सदासुखी

काल फेसबुकवर या चित्रासह एक पोस्ट बघितली आणि त्यातल्या विचारांत थोडी भर टाकणारे काही विचार मला सुचले. हे एक प्रकारचे note to self म्हणायला हरकत नाही.



रिकामा वेळ असणाऱ्यांना आणि तो घालवायला वाट्टेल ते करणाऱ्या लोकांना आपण सरसकटपणे रिकामटेकडे म्हणतो. पण हे वर्गीकरण रिकामटेकडे आणि रिकामचोट असं असायला हवं.

सर्वसाधारणपणे:
रिकामटेकडे लोक गाणी ऐकतात, टीपी जोक्स सांगतात, उगाचच घर आवरतात, इकडेतिकडे फेरफटका मारतात, चकाट्या पिटतात, मधेच तुम्हाला नर्मविनोदी चिमटा काढतात, गॉसिप करतात, वगैरे. असे लोक तसे निरुपद्रवी असतात.

रिकामचोट लोक या चित्रातील पक्षासारखे असतात. उगाचच एखादं भडक विधान करणे आणि मजा बघत बसणे, आपला संबंध नसताना इतरांच्या व्यवहाराबद्दल नकारात्मक टिप्पणी करुन समोरच्याला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडणे, काड्या घालणे आणि नंतर तिखट उत्तर मिळालंच तर victimhood छाप कांगावा करणे, इत्यादी प्रकारच्या कारवाया हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण असते.  कुठल्याही प्रकारची रचनात्मक बौद्धिक किंवा तात्विक चर्चा करण्याची यांची कुवत तरी नसते किंवा स्वभाव तरी.

रिकामचोट लोक वेळ घालवायला जरी हे करत असले तरी तो त्यांचा मूळ स्वभाव असतो, जो इतर कामाच्या वेळी त्यांना बाहेर काढणे परवडणारे नसते. मग रिकामा वेळ मिळाला की उपरोल्लेखित प्रकार सुरू होतात.

तुमचा वेळ आणि तुमची बुद्धिमत्ता आणि शक्ती मौल्यवान आहेत, त्या अशा लोकांवर खर्च करू नका. अशा लोकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हाच उपाय असतो. संपूर्ण म्हणजे संपूर्ण. हे बोलायला सोपं असलं तरी व्यवहारात अगदीच अशक्य नाही. थोडी साधना लागते इतकंच. माझी साधना सुरू आहे, तुमचं काय?

© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ. दशमी, शके १९४५ | विक्रम संवत २०८०

Saturday, January 7, 2023

धन्यवाद मिस्टर बुधकर

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील सुधीर जोशी यांची विश्वास सरपोतदार ही भूमिका लांबी कमी असूनही त्यांच्या दमदार अभिनयाने गाजली, इतकी की आज बाकी कलाकारांच्या बरोबरीने त्या भूमिकेची आठवण काढली जाते. हल्लीच्या ट्रेंड अनुसार या भूमिकेचे stills वापरून केलेल्या Meme सुद्धा भरपूर आहेत.

त्यांची दुसरी एक भूमिका आहे पण ती तितकीशी गाजली नाही. कदाचित गंभीर आणि कटू सत्य मांडणारी होती म्हणून असं असू शकेल. ती भूमिका म्हणजे 'तू तिथे मी' या चित्रपटातली मिस्टर बुधकर ही अशीच लहान पण महत्वपूर्ण भूमिका. नुकतेच निवृत्त झालेले, एकुलता एक मुलगा कॅनडात अत्यंत सुस्थितीत, घरात म्हातारी आई त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाहीत, इथे रिकामा वेळ खायला उठतो म्हणून ऑफिसच्या वेळात घरून निघतात, बसने ऑफिसला जातात आणि गेट बाहेर सिक्युरिटीवाल्याशी गप्पा मारतात.

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, त्यामुळे जनरलायझेशन करणे योग्य नाही. तरीही एक उदाहरण देतो. इथे म्हणजे फेसबुकवरच एका निवृत्त गृहस्थांची ओळख झाली. म्हणजे ही माहिती वैयक्तिक संपर्क झाल्यावरच कळली की ते निवृत्त आहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणात्मक (strategic) आणि साम्यवादी, डावे यांच्याबद्दलच्या लिखाणाने प्रभावित होऊन त्यांना रिक्वेस्ट पाठवली होती. ते हिंदीत लिहितात. सगळीच मते पटतात असं नाही पण त्यांना गुरू केलेलं आहे. त्यांच्यापासून सगळ्यांनीच शिकण्यासारखं आहे. अक्षरशः २४ तास ते या विषयांत डोकं चालवत असतात. असो, त्यांची स्तुती खूप झाली.

प्रत्येकाने काही राजकीय लिखाण करून ज्ञानकण वाटावेत अशी अपेक्षा नाही, पण आज हिंदू समाजापुढे ज्या लग्नसंस्था, शिक्षण, धर्मशिक्षण, धर्माचरण, आपल्या गावाकडची माहिती, उत्सव, प्रथा, परंपरा इत्यादी अनेक समस्या आणि विषय आहेत. त्यावर उपाय म्हणून अनेक कार्ये हातात घेणे आवश्यक आहे आणि त्यातले महत्वाचे कार्य म्हणजे प्रबोधन आणि मार्गदर्शन.

काही गोष्टी फक्त हुशारी आणि तरुण रक्ताने जमत नसतात तर त्याला अनुभवातून आलेल्या विचारांची जोड लागतेच. त्यामुळे निवृत्त आयुष्य जगणाऱ्यांनी तरुण पिढीला नावे ठेवण्यात आणि मालिका बघून डोक्यात कचरा भरून घेण्यात अर्थ नाही, आणि व्हाट्सपवर निरर्थक फॉरवर्ड टाकून वेळ घालवण्यातही. यात पूर्णवेळ घर सांभाळणाऱ्या व्यक्तीही आल्याच. त्यामुळे उपरोल्लेखित म्हणजे या आधीच्या परिच्छेदातील विषयांवर चिंतन, मनन, आणि जमल्यास प्रबोधन आणि मार्गदर्शन अवश्य करावे.

टीप:
(१) हे कुणा एकाला/एकीला उद्देशून हे नाही. त्यामुळे स्वतःवर ओढवून घेऊ नका. घेतलंत तरी माय फादर्स व्हॉट गोज?
(२) फेसबुकवर एका पोस्टवर एक भंकस टीपी जोकवजा कमेंट केली आणि त्यावरून 'तू तिथे मी' सिनेमा त्यातले मिस्टर बुधकर आठवले. ओशोवाले संभोगातून समधीकडे म्हणतात तसं भंकसकडून चिंतनाकडे असं झालं.
(२) (अ) म्हातारपणी 'डेक्कन क्वीन' बघायची असेल तर तिला कसं धावायचं याचं मार्गदर्शन करण्याचीही धमक ठेवा.
(३) मी फक्त एक समाजोपयोगी उपाय सांगितला. बाकी ज्याला जे करायचं त्याने ते करावं.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष कृ १, शके १९४४

Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Wednesday, November 30, 2022

डोंबलाचे शेळीब्रिटी

शुक्रवारी २६ तारखेला सकाळी दापोलीला गाडीने चाललो होतो. मुर्डीचा चढ चढत असताना एके ठिकाणी गाडी डावीकडे घेऊन त्या निमुळत्या आणि खड्डेयुक्त रस्त्यावर एका गाडीला जायला जागा करून देताना अचानक त्या गाडीवाल्याने माझं लक्ष वेधून घ्यायला जोरात हॉर्न वाजवला. मी काच खाली केली तर त्याने विचारलं, "मंदार जोशी ना?"

मी दचकून म्हटलं हो.

"हांsssss मला वाटलंच, फेसबुक फोटो वरून ओळखलं मी!"

हे कमाल आहे, आता लोक चालत्या गाडीतून पण ओळखू लागले 😁

पण कसं आहे, की आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन सेलिब्रिटी आहोत, आपल्याला चार लोकं ओळखतात, अशा समजुतीत राहून डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नये.

फार पूर्वी धर्मेंद्रची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्याने एक किस्सा सांगितला होता तो जसा आठवेल तसा सांगतो. तो एकदा एकटाच गाडी चालवत आपल्या गावाकडे चालला होता. वाटेत त्याला एक खेडूत रस्त्याने चालत असलेला दिसला. आपण त्याला लिफ्ट देऊ, मग तो आपल्याला धर्मेंद्रने कशी लिफ्ट दिली हे सगळ्यांना सांगेल वगैरे मनात मांडे खाऊ लागला. धर्मेंद्रने गाडीत बसायला सांगितल्यावर तो बसला, पण गाडीत तो काहीच बोलेना. धर्मेंद्रने बळंच विचारलंन तेवढ्या प्रश्नांची त्याने थोडक्यात उत्तरे दिली इतकंच. त्याचं ठिकाण आल्यावर त्या खेडुताने मला इथे उतरवा असं सांगितलं.

धर्मेंद्रने गाडी थांबवल्यावर त्या खेडुताने खिशातून दोन रुपयाची नोट काढली आणि धर्मेंद्रच्या हातात ठेऊन शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेला.

माझ्याही बाबतीत असंच एकदा झालं होतं. एकदा केळशीच्या उत्सवाला बाहेरगावाहून आलेल्या एक बाई मला शोधत असल्याचं समजलं, ब्लॉग लिहिणारे मंदार जोशी आलेत का असं विचारत होत्या. एका काकांनी आमची भेट घालून दिली. पुढचा काही वेळ मी हवेत होतो.

उत्सवात जो गोंधळ असतो त्यात एकाचा आवाज आणि उच्चार मला फार आवडतात म्हणून मी नेहमी पहिल्या रांगेत समोर बसत असे. त्यामुळे तो गाववाला मला ओळखतो असा माझा समज होता. एकदा प्रसादाचं जेवण आटपल्यावर तो जरा टेकला होता तिथे जाऊन मी ओळखीचं हास्य केल्यावर त्या व्यक्तीने मला विचारलं,

"कुणाकडे उतरलात?" 😁

तस्मात, फार हवेत उडू नये. ब्रह्मांडात जिथे आपली सूर्यमाला एवढूशी आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, September 13, 2022

वाहवत जाण्याआधी - २: केरळ मॉडेलचे अनाठायी कौतुक

तर मेहेरबान, कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

 आज फेसबुकवर एक गंमत वाचली. त्या <पोस्टचा गोषवारा तपशील न गाळता आधी देतो>

देशांत सगळीकडे झाले तसे कैनाकारी, जि. अलाप्पुळा, केरळ येथेही लॉकडाऊनमुळे अकरावीचे बोर्डाचे पेपर रद्द करावे लागले (कैनाकारी म्हणजे छोटं बेटंच असल्याने कुठेही जायला फेरीबोटी व्यतिरिक्त पर्याय नाही.). नंतर पेपरच्या नव्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा लक्षात आलं की लॉकडाऊनमुळे शाळेत तिथे राहणारी सतरा वर्ष वयाची सॅन्ड्रा बाबू ही मुलगी परीक्षा देऊ शकणार नाही. तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर. त्यांनी 'स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट'ला विनंती केली, आणि शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी केरळ स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनं बंदी असताना पण अलप्पुळाच्या MN ब्लॉक ते कोट्टायमच्या कांजीराम पर्यंत (जवळजवळ ३० किमी) एका मुलीच्या परीक्षेसाठी चक्क ७० जणांची फेरी बोट सर्व कर्मचार्‍यांसह चालवली. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता पेपर संपेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची, आणि तिला परत घेऊन यायची. जाण्या-येण्याचं तिकीट ₹१८. परतीची फेरी करायला चार हजार खर्च येतो. पण केरळ सरकारनं एका मुलीसाठी हा खर्च सोसला. दुसरीकडं महाराष्ट्रात १० लाख मुलांच्या परीक्षा रद्द केल्यात. म्हणूनच केरळची साक्षरता भारतात सगळ्यात जास्त आहे. कोरोना त्यांनाही होता, अडचणी त्यांनाही होत्या. पण मार्ग काढता येणं गरजेचं असतं.

जपानमध्ये एक मुलगी एका स्टेशनवरून रेल्वेनं शाळेत ये-जा करत होती. जपान सरकारनं त्या मुलीसाठी ते स्टेशन तीन वर्षं सुरू ठेवलं होतं...

देश असे घडत असतात.

केरळ मध्ये सॅन्ड्रा ला शाळेपर्यंत नेण्यात ज्या कोणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता, त्या सगळ्यांना प्रणाम... 


<पोस्टचा गोषवारा संपला.>

देशातलं उदाहरण देऊन भागलं नाही म्हणून पोस्टमधे जपानला घुसवलंय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे, मग एका मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय जपान करु शकलं नसतं का? का अशा शेंड्या लावायला जातात कय माहित. असो, पण आपण फॉरेनपेक्षा केरळच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करु.

विल स्मिथने क्रिस रॉकला मारलेली झापड 'बायकोच्या सन्मानार्थ' होती या भाकडकथेवर ज्यांचा विश्वास बसतो त्यांचा या भावनिक गोष्टींनी भारावून जाऊन व्यावहारिक कंगोर्‍यांकडे दुर्लक्ष होणार यात शंका नाही. पण त्यापलीकडे जाऊन माझ्या काही शंका व मुद्दे आहेत त्या मांडतो. 

(१) एवढा हजारोंचा खर्च करण्यापेक्षा त्या मुलीची परीक्षेच्या कालावधीसाठी परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करता आली असती ना? सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ओळखीने (कोण रे तो दहशत म्हणतोय? लब्बाड!) कुठेही सुरक्षित जागी स्वस्तात, खरं तर फुकटातही, रहायची सोय झाली असती. 

तर, अशा प्रकारे सोय झाली असती तर सरकारचा, म्हणजे पर्यायाने करदात्यांचा खर्च पण कमी झाला असता आणि आणि जाण्यायेण्याचा वेळही वाचला असता. तोच वेळ तिला अभ्यासाला मिळाला असता आणि परीक्षा केंद्र जवळच असल्यामुळे कोरोनाकाळात रोज बोटीने जाण्यायेण्याचा ताण तिला सोसावा लागला नसता. तिची परीक्षा ताणविरहित पार पडली असती.

(१) (अ) खरं म्हणजे चर्चनेच आपल्या लेकराची परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करुन द्यायला हवी होती. पण त्यांची भूमिका फक्त  धर्ममत परिवर्तन करण्यापुरती असावी, बाकी 'सारी प्रभूची लेकरे' वगैरे वचने नंतर विसरायची असतात असं त्यांना वाटतं का? शंका घ्यायला जागा आहे.

(२) सकाळी अकरा वाजल्या पासून दुपारी पेपर संपेपर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची कारण बाकी फेर्‍या मारायला परवानगीच नव्हती. मग थांबून राहिली यात कौतुक कसलं?

(३) रिकामी बोट असली तरी तिकीट काढायला कंडक्टर लागतोच, तसेच निघताना आणि पोहोचताना जी काळजी घ्यावी लागते आणि कामे करावी लागतात ती करायला आणि चालकाला सहाय्य करायला माणसे लागतातच. मग संपूर्ण क्रू होता यात आश्चर्य काय?

यातल्या मुद्दा क्रमांक एक अ सकट दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्यांकडे "असेल काही कारण" म्हणून दुर्लक्ष केलं तरी पहिला मुद्दा उरतोच. पण... पण... पण...

  • तशी सोय केली असती तर "बघा बघा आम्ही एका मुलीच्या परीक्षेसाठी किती खर्च सोसला!" आणि "बोट कशी थांबून राहिली" हे रोमँटिसाईझेशन कसं करता आलं असतं? (माणसाने किती narcissistic असावं याला काही मर्यादा?)
  • तशी सोय केली असती तर करदात्यांच्या पैशाने प्रसिद्धी कशी करता आली असती? (कुणाला रे केजरीवालची आठवण झाली? लब्बाड!)
  • बाकी ठिकाणी परीक्षा रद्द केली आणि केरळच्या कम्युनिस्ट सरकारने एका मुलीसाठी बोट चालवली असा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना असं संधीसाधू शरसंधान कसं करता आलं असतं?

तेव्हा, खर्च टाळता येणे सहज शक्य असताना मुद्दाम भरमसाठ खर्चं करुन वर "शिक्षणाला आम्ही कित्ती कित्ती महत्त्व देतो" म्हणून केरळची साक्षरता भारतात जास्त आहे ही मखलाशी करण्यात काय अर्थ आहे? (बरं, ती मुलगी आधीच साक्षर होती हं. साक्षर असण्यासाठी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं हे अजब तर्कट आहे).

यावरुन एक आठवण झाली. जॉर्ज फर्नांडीस यांनी संरक्षणमंत्री असताना कुणालाही बंगल्यात प्रवेश करण्यास धाक वाटू नये म्हणून बंगल्याचे गेट पाडून टाकले होते म्हणेपण एक पाटी लावून कायम गेट उघडून ठेवलं असतं तरी चाललं असतं, आहे ते पाडून आर्थिक नुकसान करणं हे समाजवादी आणि डावेच जाणोत.

कारे भुललासी वरलिया अंगा? दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. तृतिया, शके १९४४

Saturday, May 28, 2022

पॉर्नः समाजस्वास्थ्य पोखरणारी कीड

सेक्स, मैथून, कामप्रेरणा, अशी विविध नावे आणि विशेषणे असणारी ही भावना पोटाच्या भुकेइतकीच आदिम आणि नैसर्गिक आहे. पण इतर कुठल्याही भुकेसारखी किंवा भावनेसारखीच ही भावना अनिर्बंध होऊन चालत नाही. आयुष्याच्या व्यवस्थापनात कामेच्छेचेही नियमन एक अविभाज्य अंग आहे. कामभावनेची कमतरता किंवा अभाव आयुष्याचे, शुष्क वाळवंट करते तर कामेच्छेचा अतिरेक ही व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर वादळे घेऊ येतो, तसेच त्याची न झालेली पूर्तता फक्त त्या व्यक्तीलाच नव्हे तर इतरांनाही त्रासदायक ठरते. 'अती तिथे माती' ही म्हण इथे चपखल लागू होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अर्थातच वाईट, म्हणूनच टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती होणे यापेक्षा मध्यममार्ग साधणे हे अर्थातच आवश्यक आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक संस्कृतीने मनुष्याच्या कामवर्तन नियंत्रित करायचा सल्ला दिला आहे. विशेषतः भारतीय संस्कृती कामभावनेचे अनैसर्गिक दमन किंवा स्वैराचार ही दोन्ही टोके टाळून नियमन करण्यावर भर देते. वात्स्यायनापासून ते डॉ सिगमंड फ्रॉइडपर्यंत अनेकांनी या विषयावर संशोधन, लेखन केलेलं आहे. मानवाला पुढे घेऊन जाणारी ही भावना आहे. तथापि, लैंगिक जीवनाचा उहापोह इतका व्यापक विषय या लेखाचा नाही.   

आपण या लेखात वाचणार आहोत ते जगात सर्वाधिक उलाढाल असलेल्या आणि सामाजिक आरोग्याला पोखरून टाकत असलेल्या एका 'इंडस्ट्री' बाबत. ती इंडस्ट्री आहे पॉर्नोग्राफी अर्थात पॉर्न म्हणून ओळखले जाणारे मनोरंजनाच्या क्षेत्रातले आघाडीचे क्षेत्र. रेल्वे/बस स्थानकांवर मिळणारी बारीकशी पिवळी पुस्तके असोत वा मोबाईलच्या एखाद्या 'लपलेल्या कप्प्यात' ठेवलेल्या क्लिप्स. आज पॉर्न व्यवसाय जगात जवळपास सर्वदूर पसरला आहे. इंटरनेटवरील वरील विविध संकेतस्थळे याबाबत आघाडीवर आहेत. फार कशाला? 'सनी लिओनी' या नावाचा गुगलवर सगळ्यात जास्त धांडोळा घेतला जातो ही सत्यपरिस्थिती आहे. बहुतांशी या संकेतस्थळांचा उपयोग स्व-समाधानासाठी केला जातो. 

Pornhub

अमेरिकन फिल्म इंडस्ट्री अर्थात हॉलीवूडपेक्षाही तिथल्या पॉर्न क्षेत्राची कमाई जास्त आहे. इतकंच नव्हे, तर गुगलची 'सेवा' घेणार्‍या लोकांपेक्षा पॉर्नहब (Pornhub) आणि xvideos या आघाडीच्या दोन पॉर्न संकेतस्थळांना भेट देणारे लोक संख्येने जास्त आहेत. या संकेतस्थळांच्या दर्शकांची संख्या नेटफ्लिक्स वा अन्य तत्सम ओटीटी प्लॅटफॉर्महुन अधिक आहे यावरुन याची व्याप्ती लक्षात यावी. आपल्याकडे अनेक गोष्टींची सुरवात ही युरोप आणि अमेरिकेतून आलेल्या अनेक गोष्टींच्या अंधानुकरणाने होते. मनुष्यस्वभाव हा स्खलनशील असल्याने प्रामुख्याने सामाजिक व नैतिक अधःपतन घडवून आणणार्‍या गोष्टींचे इथे झटपट अनुकरण होत असल्यास नवल नाही. जगभरात लोकप्रिय (?) होत असलेल्या या क्षेत्राचे चाहते भारतातही मुळीच कमी नाहीत. गुगल ट्रेन्ड्सचा मागोवा घेतला, तर जागतिक स्तरावर पॉर्न साईट्स बघण्यात भारताचा तिसरा क्रमांक असून शहरांचा विचार केला तर संपूर्ण जगात नवी दिल्ली, मुंबई, आणि पुणे ही शहरे पॉर्न कंटेंट आणि साईट्स शोधण्यात (highest search volume) शिखरावर आहेत. पॉर्नहब या पॉर्न संकेतस्थळाच्या एका अहवालानुसार या साईटचे भारतातले अर्धे वापरकर्ते ही साईट प्रामुख्याने आपल्या मोबाईलवर बघतात, आणि या संकेतस्थळाचा वापर करणार्‍या भारतीयांपैकी महिलांची संख्या लक्षणीय, नेमकं सांगायचं तर ३०% आहे. मात्र केवळ नेटवर पॉर्न पाहण्यापर्यंतच आता भारतीय मर्यादित राहिलेले नसून तसा कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा आपल्या देशात एक मोठा व्यवसाय बनला आहे. 

याच संदर्भात शोध घेत असता People vs Larry Flynt हा एक अप्रतीम इंग्रजी चित्रपट बघायला मिळाला. याच चित्रपटामुळे माझा हा लेख लिहीण्याआधी प्रचंड गोंधळ झाला होता. आधीच वूडी हॅरलसनच्या अभिनयाच्या प्रेमात असल्याने आणि त्याचं यातलं मधलं जबरदस्त काम मनात कोरलं गेल्याने या चित्रपटाचा बर्‍यापैकी प्रभाव मनावर होता. त्याच बरोबर मूळ विषय खूप गंभीर असल्याने लेख हा चित्रपटाचं समीक्षण वाटू नये याची काळजी घ्यायला लागणार होती. लिहीत गेलं की गोंधळ दूर होईल असे वाटले आणि झाले देखील तसेच. असो, पुन्हा विषयाकडे वळूया. 

Playboy Penthouse Hustler

या चित्रपटाचा 'नायक' लॅरी फ्लिन्ट हा अमेरिकन पॉर्न क्षेत्रातील एक आघाडीची असामी होती. नेमकं सांगायचं तर लॅरी फ्लिन्ट हा पॉर्नच्या दुनियेत नेहमीच पहिल्या ५० च्या यादीत असायचा. आपण पॉर्न क्षेत्रातल्या पैशाबाबत बोलत आहोत तर याच्या कमाईकडे पाहूया. एकट्या १९९८ या वर्षी फ्लिन्टनं ५१,११२ मासिकं आणि ७,८१२ पॉर्न चित्रपट यातून एका वर्षात १३ कोटी डॉलर्स कमावले होते. "प्लेबॉय" आणि "पेंटहाऊस" या मासिकांशी स्पर्धा करण्यासाठी "हसलर" (Hustler) मासिक काढणारा, “हस्टलर एंपायर”चा सर्वसर्वा फ्लिंट प्रौढांसाठी असलेल्या अनेक वेबसाईटसचा गर्भश्रीमंत मालक होता. या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. १० फेब्रूवारी २०२१ रोजी तो मरण पावला तेव्हा तो सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेला. कहर म्हणजे या माणसाची व्हीलचेअर सोन्यानं मढवलेली होती [मार्च १९७८ मधे ग्विनीट काऊंटी न्यायालयाबाहेरच (Gwinnett County Courthouse) एकानं त्याला गोळी घातल्यावर त्याचं कमेरपासून खालचं शरीर लुळं पडलं आणि लॅरीला कायमचं अपंगत्व आलं).

पुढे वाचण्याआधी आपल्याकडे काही वर्षांपुर्वी पेप्सी आणि कोकाकोला या शीतपेयंच्या कंपन्यांत रंगलेलं जाहीरात युद्ध आठवा. तर, खास अमेरिकन शौकीन पण उच्चभ्रू वर्ग डोळ्यांसमोर ठेऊन ह्यू हेफनर (Hugh Hefner) या प्रकाशकाने १९५३ साली प्लेबॉय मासिक सुरु केलं. बॉब गुचिओनी (Bob Guccione) याने 'प्लेबॉय' ला स्पर्धा म्हणून १९६९ साली 'पेंटहाऊस' हे मासिक काढलं. 'प्लेबॉय' चा लोगो होता 'बनी'. पेंटहाऊसची जाहीरात अशी होती की एका रायफलच्या निशाण्यावर असलेलं एक 'बनी' आणि “आम्ही सशाच्या शिकारीला निघालो आहोत” हे घोषवाक्य. ही जाहीरात खूप गाजली. या दोन्ही मासिकांची लोकप्रियता शिखरावर असताना लॅरी फ्लिन्ट या धन्य पुरुषाने १९७४ साली “हस्टलर” हे मासिक सुरु केलं तेव्हा त्याने घोषवाक्य वापरलं - “एनीवन कॅन बी अ प्लेबॉय अ‍ॅन्ड हॅव अ पेंटहाऊस बट इट टेकस अ मॅन टू बी अ हस्टलर” (Anyone can be a playboy and have a penthouse but it takes a man to be a hustler!). प्लेबॉयचा बनी, आणि बनीची शिकार करु बघणारं पेंटहाऊस या दोन्हींची एकाच वाक्यात शिकार करणारं हे घोषवाक्य शौकिनांनी डोक्यावर घेतलं यात नवल नाही. इथेही लॅरीचा मनुष्यस्वभावाचा दांडगा अभ्यास म्हणा किंवा पैसा कुठून ओढता येईल याबाबतची हुशारी म्हणा, हे नक्कीच दिसून येतं. एक जण घसरला तर मी त्याही पेक्षा जास्त कसा घसरू शकतो हे दाखवण्यातही आजही अहमहमिका लागलेली दिसते त्याचा मुकुटमणी हा लॅरी होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अश्लीलतेच्या उंबरठ्यावर रेंगाळणारी अनेक इन्स्टा रील्स आठवून बघा. हा सगळा इतिहास संक्षिप्त स्वरूपात बघायचा असेल तर “पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिंट” हा चित्रपट अवश्य पहावा. 

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे पॉर्न कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा भारतात आता एक मोठा व्यवसाय बनला आहे. नजिकच्या भूतकाळात डोकावलं तर या क्षेत्राकडे लोकांचं लक्ष जाण्याचं कारण राज कुंद्राला अटक झाली ही घटना होय,. आर्थिक गुन्हेगारीत प्रतिष्ठित असामी गुंतल्या असण्याचे आता लोकांना नवीन नाही पण या क्षेत्रात असं काही घडलं की देशातल्या भोळ्या(!) जनतेला आजही आश्चर्य वाटतं, आणि यावर जनसामान्यांत होणार चर्चा विनोद आणि मीम आणि अर्थातच ट्रोलिंग इथवर मर्यादित राहते. प्रत्यक्षात ही पाळेमुळे किती खोल गेली आहेत आणि कोण कोण लोक यात सहभागी आहेत याचा अंदाजही लावणे अवघड आहे. तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर उठलेल्या धुरळ्यात या क्षेत्राकडे आणि सहभागी व्यक्तींकडे अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निर्देश केला होता. चित्रपट क्षेत्रातील पैसा मोठ्या प्रमाणात पॉर्न आणि त्यानंतर देहविक्रयाच्या क्षेत्रातून येत असल्याचे संबंधित व्यक्तींकडून खाजगी चर्चेत आणि युट्यूबवर असलेल्या मुलाखतींतून अनेकदा कळतं. चित्रपट क्षेत्रात असलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हे सारे नित्यनेमाचं असतं. अचानक राज कुंद्रासारखी मोठी नावे समोर आल्यावर सामान्य वाचक/नागरिकाला धक्का बसतो इतकेच काय ते अप्रूप! आधीपासूनच पॉर्न क्षेत्रात कार्यरत असूनही कुंद्रा प्रकरणात आपल्याला गोवले गेल्याचा आरोप झोया राठोड आणि शर्लिन चोप्रा नामक दोन नट्यानी केला होता ही मोठी गंमतच आहे. कहर म्हणजे गहना वसिष्ठ नामक नटीने तर यात काहीच गैर होत नसल्याची बतावणी केली होती! पॉर्न क्षेत्र हे इंटरनेटच्या आणि कॅमेरा असलेल्या मोबाईलच्या महापुरामुळे आता फार वेगळ्या पातळीवर आणि घराघरांत पोहचलं आहे.

टिकटॉकसारख्या एपवरून जे काही दाखवलं जाऊ लागलं ते अती होऊन पाणी डोक्यावरुन चालल्यामुळेच त्यावर शासनाकडून बंदी आणली गेली, आणि एका जनहित याचिकेचा परिणाम म्हणून २०१५ साली ८५७ पॉर्न वेबसाईट्सवरदेखील बंदी आणायचा निर्णय झाला. आता मोदी सरकारने बंदी घातल्यावर त्याला विरोध हा झालाच पाहीजे हा अलिखित नियम असल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात कडाडून विरोध झाला. अनेक 'वापरकर्ते' तर पूर्वसूचना न देता अशी बंदी घातलीच कशी म्हणून बाह्या सरसावून सरकारला जाब विचारू लागले. एकीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सरकार पुरेशी कारवाई करत नसल्याचं सांगत सरकारला झापणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने संविधनाच्या २१व्या अनुच्छेदाकडे (वैय्य्क्तिक स्वातंत्र्याचा हक्क - right to personal liberty) बोट दाखवत बंदी कायम ठेवण्याबाबत अंतरिम आदेश द्यायलाही नकार दिला. पॉर्न साईट्स बघता येणे हा आपला हक्क आहे हे सांगत एका इसमाने या बंदीच्या निर्णयाला चक्क हिटलरशाही, एड्स किंवा कॅन्सर किंवा एखाद्या साथीच्या रोगहून वाईट अशा विशेषणांनी संबोधलं. 

अशी बंदी अस्तित्वात जरी आली तरी प्रत्यक्षात मात्र अशी बंदी केवळ कागदोपत्री राहते आणि हे गैरप्रकार सुरूच असतात. पूनम पांडे वा गुंजन अर्स यांसारख्या नट्या त्यांच्या वैयक्तिक एपवरून या प्रकारचे व्हिडीओ शेयर करत असतात. यात कित्येकदा अधिकचे पैसे मोजून 'प्रायव्हेट कॉल'चा पर्याय दिला जातो. आपल्या मेहनतीचे पैसे अशा गोष्टींवर उडवणाऱ्यांची संख्या पाहता पॉर्न हे मोठे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

वैद्य परीक्षित शेवडे म्हणतात, की "अगदी रोजच्या रुग्णांतही या व्यसनाची चटक लागलेले आणि त्यामुळे एकीकडे मानसिक-शारीरिक आरोग्य हरवत असलेले तरुण हे आमच्यासाठी नित्यअनुभव होऊ लागले आहेत." त्यातच लॉकडाऊनकाळात या क्षेत्राला भरपूर झळाळी आल्याचे चित्र आहे. विशेषतः उत्तर भारतातील गावांतील जोडपी विविध मंचावरून 'Pay per view' तत्वाने आपल्या प्रणयक्रीडेचा बाजार मांडण्याची संख्या या काळात लक्षणीयरीत्या वाढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. कॅमेरा असलेला मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन या मूलभूत सुविधा असल्या की घराघरांतून असे कंटेंट तयार होऊ लागले आहेत. यात थेट पॉर्न यात मोडणारं कंटेन्ट जसं आहे तसंच सॉफ्ट पॉर्न आणि नैतिकतेची ऐशीतैशी करणारे व्हिडिओ देखील आहेत. कित्येकदा पौगंडावस्थेतील किशोर-किशोरीदेखील यात आपला सहभाग नोंदवत असल्याचे चित्र आहे. कंटेन्ट बनवणार्‍यांना पैसे कमावण्याचे तर बघणार्‍यांना स्वस्तात 'देशी पॉर्न' बघण्याचे अगदी सहजसोपे साधन सापडल्याची भावना आहे! 

कोणत्याही सूज्ञ समाजासाठी हे हितकारक लक्षण नव्हे. या क्षेत्रात बराच काळ काम करून त्यातून बाहेर पडलेल्या जगभरातील कित्येक कलाकारांनी यामागचे भयाण अनुभव कथन केले आहेत. वर्षाला ९७०० कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या पॉर्न इंडस्ट्रीमागचं वास्तव किती भीषण आहे याची आपण कल्पनाही करु शकत नाही. या कलाकारांच्या पॉर्न कारकीर्दीचा कालखंड फक्त सुमारे ३ महिने ते १ वर्ष इतकाच असतो. पौगंडावस्थेतल्या एका वर्षात त्या मुलीचं आयुष्य भकास झालेलं असतं. तिला व्यसनाधीनतेपासून नैराश्यापर्यंत अनेक त्रास सतावत असतात. थोडक्यात, अशा मुली (आणि मुलंही) शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झालेली असतात. औषधे, शस्त्रक्रिया यांचा वारेमाप आणि घातक वापर या क्षेत्रात सर्रास होतो. पडद्यावर पाहत असलेली चित्रे ही सर्वसामान्य असल्याचा गैरसमज डोक्यात भिनल्याने सामान्य तरुण तरुणीदेखील त्याच संकल्पनांना बळी पडून आपल्या आरोग्याचे नुकसान करतात ही वस्तुस्थिती आहे. प्रजननसंस्था वा संबंधित अवयवांबाबतचे गैरसमज, त्यांचा आकार वाढवण्यासाठीची व्यर्थ धडपड इथपासून ते आत्मघातकी व्यसनाधीनता; इतकी की त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही विचार डोक्यात नाही, स्त्रीदेहाला केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे हे प्रकार तरुणांत लक्षणीयरीत्या वाढत आहेत. या विकृतीला वाट मिळवून देण्यासाठी कोणता थर गाठला जाऊ शकतो/जातो याची कल्पनाही न केलेली बरी. केवळ तरुणच नव्हे तर वयस्क व्यक्तींतही हे वेड जोर पकडू लागले आहे. एका डीसीपीने महिला अधिकाऱ्यासोबत तिचा सहा वर्षांचा मुलगाही सोबत असताना केलेले चाळे पुष्कळ गाजले होते. विवाहबाह्य संबंध हाही याच प्रश्नाचा उपप्रश्न झाला आहे. आपल्या पैशांच्या जोरावर वयाने आपल्या स्वतःच्या मुलीएवढ्या असणाऱ्या मुलींना नादी लावून त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश करण्याचे प्रकारही समाजात वाढलेले दिसतील. विशेष म्हणजे या प्रकारांत नेहमी मुली अगदी निष्पापच असतील असेही नाही! घडत असलेल्या प्रकाराची पूर्ण जाणीव असूनही काहीतरी खूळ डोक्यात भरवून घेऊन त्यादेखील आपले नुकसान आपल्या हातांनी करून घेत असतात. यातील कित्येकजणी अगदी कळत नकळत ड्रग्स आणि वेश्याव्यवसायात खेचल्या जातात. पर्यटन अधिक असलेल्या भारतातील राज्य/ठिकाणांमध्ये अशा बाबी अगदी मध्यमवर्गीयांच्या घरातून घडत असल्याचे चित्र आहे.

Billie Eilish

जेम्स बाँड चित्रपट मालिकेतल्या ताज्या 'नो टाईम टू डाय' या चित्रपटाचं शीर्षक गीत गाणारी बिली एलिश (Billie Eilish) हिने गेल्याच वर्षी म्हणजे ती फक्त एकोणीस वर्षांची असताना दिलेल्या  एका मुलाखतीत वयाच्या अकराव्या वर्षी पॉर्न चित्रफिती बघायची सवय लागल्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगितलं होतं. आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाकडे वळून बघताना बिली म्हणते, "पॉर्न हे स्त्रियांसाठी अत्यंत अपमानास्पद प्रकार आहे. मी तेव्हा खूप पॉर्न बघत असे आणि त्या प्रकाराने माझ्या डोक्यावर बर्‍यापैकी परिणाम झाला. पॉर्न बघितल्याची आणि त्यात गुंतल्याची मला लाज वाटते." स्त्रियांच्या शरीराचं अवास्तव चित्र उभं करणार्‍या पॉर्न चित्रपटांवर टीका करताना बिली पुढे म्हणते की "पॉर्नची लोकप्रियता पाहून मला अनेकदा माझा राग आवरणं अवघड होऊन बसतं. पॉर्न बघणं हे ठीक आहे असं मला एकेकाळी वाटायचं हे आठवलं की अनेकदा स्वतःचाच राग येतो. स्त्रीची योनी ज्या प्रकारे या चित्रपटांत दाखवली जाते ते साफ खोटं आहे. कुठल्याही स्त्रीची योनी अशी दिसत नाही. स्त्रीचे शरीर असं दिसत नाही." 

आपले अनुभव सांगताना बिली म्हणाली की पॉर्न बघण्याच्या सवयीमुळे तिचं भावविश्व उध्वस्त झालं आणि याचा तिच्या खाजगी संबंधांवरही परिणाम झाला. "संभोग करण्याच्या सुरवातीच्या काही वेळा मी अशा गोष्टींना नाही म्हणू शकले नाही की ज्या मला आतून कळत होतं की अनैसर्गिक आहेत, चूक आहेत, पण पॉर्न बघण्याचा परिणाम म्हणून मला असं वाटत असे की या गोष्टींचं मला खरं तर आकर्षण वाटलं पाहीजे. बराच काळ कुणी आवडणं आणि त्याच्याशी प्रेमाचं नातं जोपासणं हे माझ्यासाठी अवघड होऊन बसलं होतं. यामुळे एकटीनेच आयुष्य काढावं लागतं की काय असंही अनेकदा वाटत असे. पण मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आहे." 

घराघरांत अगदी लहान वयापासूनच हातात मोबाईल देण्याची सवय असल्याने नेमके कोणत्या वयात काय पाहिले जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पर्यायस्वरूप हे प्रकार आणखीच खोलवर पसरत राहतात. शृंगाराचे भारतीय संस्कृतीला कधीही वावडे नव्हते. याच देशात कामशास्त्राचा पुरातन इतिहास आहे, हलेबीड-खजुराहो आहे, शृंगार रस हा साहित्यातील नवरसांतील एक असून महाकवी कालिदासाच्या लिखाणात त्याची पुरेपूर पखरण आहे. मात्र हा शृंगार उत्कट आहे; उत्तान नव्हे! त्यालाही स्थल-काळाची बंधने आहेत. विवाहयोग्य झालेल्या स्त्री-पुरुषांनी कामशास्त्र अभ्यासावे असे स्वतः वात्स्यायनांनी लिहून ठेवले आहे. थोडक्यात वयाचा विचारही तेथे आहे. शृंगार आणि बीभत्सपणा यांतील सीमारेषाच पुसून टाकणारे क्षेत्र म्हणजे पॉर्न असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच हा विषय चर्चेला घेण्यापासून टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. मात्र सुरुवातीलाच योग्य लक्ष दिल्यास पिटीकेचा भगंदर होणे टळू शकते. समस्या आणि तिचा विस्तार लक्षात घेतला तरच त्याचे उपचार सापडू शकतात. 

ही समस्या मुळात सुरू कुठून होते माहित आहे? उत्तर तुमच्यापैकी अनेकांना आवडणार नाही. आज उद्भवणार्‍या अनेक लैंगिक समस्यांचे आणि पसरलेल्या विकृतींचे मूळ हे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे हे आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सपवर अनेक जणी आपले फोटो टाकत असतात. अनेक वेळा फिल्टर वापरून मूळ सौंदर्यात भरच पडत असते. नित्यनूतन प्रोफाईल फोटो टाकण्या पुरुषही मागे नाहीत. व्यायामशाळेत जाणारे काही शरीरसौष्ठवपटू आपले सिक्स पॅक्स दाखवत बनियनमधले फोटो टाकत असतातच. याचा पॉर्नशी काय संबंध असं संतापून विचारण्याआधी लक्षात घ्या, की सुरवात वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या गोष्टीतून आणि कृतीतूनच होत असते. हे उदाहरण देण्यामागचं कारण पुढच्या काही परिच्छेदात सांगतोच. आज या गोष्टी व्यक्तीस्वातंत्र्यात मोडत असल्या तरी याचे परिणाम अतिशय हळू होत जात पुढे अनेक लहानमोठ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी होण्यापर्यंत जाऊ शकतात. 'अति तिथे माती' ही म्हण आपल्याला काही नवीन नाही. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर टाळा. बदाम खाऊन फायदा आहे, चांगल्या फोटोंवर रेंगाळून ते वाटण्यात नव्हे.

तर, स्त्रीपुरुषांमधला मानसिक व शारीरिक भेद लक्षात घेता आज वैवाहिक जीवनात भेडसावणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्यांचा विचार करताना इथे फक्त 'स्त्रीदर्शन' याबाबतीत इथे विचार करणार आहोत. आजच्या घडीला वैवाहिक आयुष्यात आढळणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्या पुढीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे वैवाहिक आयुष्यात 'शरीरसंबंध ठेवताना प्रत्यक्ष मीलन होण्यापूर्वीच वीर्यस्राव होणे (premature ejaculation)'. आणि दुसरी म्हणजे सतत पॉर्नचा वापर केल्याने उदभवणारी पुरुष नपुंसकता!! दोन्ही समस्यांचा एकत्रित विचार करुया.

कारणे अनेक असली तरी विस्तारभयास्तव आज आपण यातील केवळ एका अतिशय महत्त्वाच्या कारणाकडे पाहूया. ते कारण म्हणजे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे. आयुर्वेद वा योगशास्त्रासह कित्येक भारतीय शास्त्रांनी निव्वळ दर्शनच नव्हे तर 'स्त्रीस्मरण' हे देखील शुक्रस्खलन होण्याचे कारण सांगितले आहे. 'शरीराबाहेर पडणे' ही शुक्राची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, मात्र शरीरातील अखेरचा आणि सर्वोत्तम धातू असल्याने असे सतत होत राहणे आरोग्यास हितकर नसल्याचे आयुर्वेदाचे मत आहे. सध्याच्या काळात समयपूर्व वीर्यस्राव ही समस्या वेगाने वाढत असल्याचा वैद्यांचा प्रत्यक्ष उपचार करत असतानाचा अनुभव आहे. सतत शरीरसंबंधांचा विचार करत राहणे या गोष्टीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कामेच्छा चाळवणाऱ्या गोष्टींचे वाढते प्रमाण हे यामागील महत्वाचे कारण. पॉर्न फिल्म्सपासून ते आजकाल साबण वा अगदी चहाच्या जाहिरातींपर्यंत सर्वत्र स्त्रियांचे उपभोग्य वस्तू म्हणून अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने केले जाणारे प्रदर्शन हेदेखील यास कारणीभूत आहे. वैद्यपंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांसारखे ज्येष्ठ वैद्य आपल्या ग्रंथात म्हणतात की "ही परिस्थिती पुढे इतके गंभीर स्वरूप प्राप्त करते की काही रुग्णांत केवळ स्त्रीचा आवाज ऐकून वा अगदी पैंजणांचा आवाज ऐकूनही वीर्यस्राव होऊ लागतो." वैद्यांनी अशा प्रकारच्या कित्येक केसेस हाताळल्यावर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लहानपणापासून कळत नकळत झालेला चुकीच्या जाहिरातींचा मारा आणि ही अडचण सांगण्यासाठी योग्य वेळी कोणीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसणे. प्रसारमाध्यमांतील आक्रमक जाहिरातींबाबत इथे मांडलेले मत ज्यांना मान्य होणार नाही त्यांनी याबाबत मानसशास्त्र या विषयातील नामवंत वैज्ञानिक नियतकालिकांतील संशोधने जरूर अभ्यासावी. 'परदेशात असं काही का होत नाही?' असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यांना बापड्यांना कदाचित परदेशातील एकंदरीत सांस्कृतिक रचना आणि त्यांच्या समस्या यांबद्दल माहितीच नसावी. अर्थात या समस्येकरता केवळ प्रसारमाध्यमे दोषी आहेत असे माझे मत नसून आपले हरवत चाललेले नियंत्रण हे सर्वाधिक कारणीभूत आहे. वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असल्यास, आणि एकंदरच शरीर व मनाचा विचार करताना वैय्यक्तिक आयुष्य आरोग्यपूर्ण ठेवायचं असल्यास आपला सोशल मिडियात असणारा अतिरेकी वावर (आणि वापर), भडक जाहिराती, आणि साहित्य यांपासून दूर राहणे तसेच आवश्यकता भासल्यास वंध्यत्व विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने आयुर्वेदीय उपचार व ध्यान इत्यादींची मदत घेणे हे लाभदायक उपाय आहेत हे कायम लक्षात ठेवावे.

पुरुष नपुंसकतेचा विचार करताना आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार तेरा शारीरिक प्रक्रियांचा उल्लेख 'अधारणीय वेग' यांमध्ये केलेला आहे. अधारणीय वेग म्हणजे अडवू नयेत अशा शारीरिक क्रिया. उदा. लघवी वा शौचाची भावना. शुक्राचा समावेशदेखील या तेरा वेगांत केलेला आहे. थोड्क्यात; शुक्रवेगाची इच्छा झाल्यास ती टाळू नये. मात्र असे सांगतानाच 'वेगान् न उदीरयेत।' म्हणजेच या क्रिया बळजबरीनेदेखील करू नयेत असेही आयुर्वेद बजावतो. खरी गोम इथेच आहे!

बहुतांशी वेळेस उत्तेजना मिळवण्यासाठीच पॉर्नचा वापर होतो. थोडक्यात; इथे शुक्रवेग 'उत्पन्न केला जातो'. स्वाभाविकपणे या क्रियेचे दूरगामी दुष्परिणाम होत असतात. यातील सगळ्यात प्रमुख दुष्परिणाम म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रियाचे कार्य योग्य पद्धतीने न झाल्याने उद्भवणारे नपुंसकत्व. स्त्रियांमध्येही कामेच्छा कमी होण्यासारखे दुष्परिणाम या सवयीमुळे होऊ शकतात. आयुर्वेदाचे मत पटत नसेल तर 'सायकॉलॉजी टुडे' हे नामांकित मनोवैज्ञानिक नियतकालिक काय सांगते पहा. [Robinson, Marnia, and G. Wilson. "Porn induced sexual dysfunction: A growing problem “, í." Psychology Today, July 11 (2011).]. बिनवैद्यकीय संदर्भ म्हणून पॉर्नलँड हे गेल डाईन्स लिखित पुस्तक वाचण्यासरखे आहे. 

या संशोधनानुसार आज जगभर या समस्येने गंभीर रुप धारण केलेले असून; वयाच्या २० व्या वर्षांपासूनच पुरुष जननेंद्रियाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याने नैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यास अशा व्यक्तींमध्ये असमर्थता दिसून येते. आयुर्वेदीय सिद्धान्त आज जगभरात आपले महत्व दाखवत आहेत त्याचा आणखी एक पुरावा. याशिवाय आजकाल 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च' आहे का? असं विचारण्याचं फॅड असल्याने हे उदाहरण सहज नमूद करत आहे.

यावर उपाय काय? पॉर्न बघणे या व्यसनापासून दूर जाण्यासाठी पुन्हा आयुर्वेदही फायदेशीर आहे. आयुर्वेद व्यसन सोडवण्याची जी प्रक्रिया सांगतो तीच यासाठी उपयुक्त आहे. ती म्हणजे अपथ्याचा क्रमाक्रमाने त्याग करणे. हा क्रम पादांश अर्थात एक चतुर्थांश असा असतो. १/४ - १/४ या क्रमाने हे व्यसन सोडवावे लागते. (ही संकल्पना शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांकडून नीट समजावून घ्यावी.) सोबत ध्यानधारणा, योग आणि व्यायाम यांचा आधार घ्यावा. एकदम सोडायला गेल्यास चिडचिड, अन्य व्यसनांकडे ओढ अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.

आपल्या आंबटचवीच्या शौकाचा अतिरेक करून आयुष्याची माती करून घेऊ नका इतकीच प्रामाणिक इच्छा.

----------------------------------------------------------------

संदर्भ श्रेयः'या लेखातील वैद्यकीय संदर्भ वैद्य परीक्षित शेवडे यांच्या सौजन्याने' इतकंच श्रेय मर्यादित ठेवू इच्छित नाही. कारण इतक्या संवेदनशील विषयावरचे वैद्यकीय आणि तत्सम संदर्भ गोळा करा, मग ते तपासून घ्या, आणि तदतर ते टंकलिखित करा हे आणि इतके माझे कष्ट वाचवण्याचं मोठं काम डॉ शेवडेंच्या लेखनाने करुन ठेवलंच होतं. मी फक्त ते वेळोवेळी जमवत गेलो आणि ते संदर्भ लेखाच्या प्रवाहीपणाला धक्का लागू न देता योग्य ठिकाणी बसवले इतकंच. 

----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ, १३, शके १९४४

Thursday, March 31, 2022

वाहवत जाण्याआधी - १: ऑस्करचा फज्जा

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

थोडक्यात पार्श्वभूमी अशी की ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक विनोद केला आणि मग विल स्मिथने स्टेजवर जाऊन क्रिसला ठोसा मारला. हे झाल्या झाल्या अखिल सेंटीमेंटल जगताला पान्हा फुटला आणि या गोष्टींवर चर्चा लगेचच सुरु झाल्या: (१) विल स्मिथभोवती बायकोच्या सन्मान रक्षणार्थ दिवे ओवाळणे [बघा शिका काहीतरी असे टोमणे बोनस म्हणून] (२) कशावरही विनोद करता काय, मग अस्संच पाहीजे बरी अद्दल घडली छाप पोस्ट आणि ट्विट (३) मिसेस स्मिथ यांना असलेला आणि केस गळण्यासाठी/कापण्यासाठी कारणीभूत ठरलेला अ‍ॅलोपेसिया एरेटा नामक रोग. 

ज्यांना स्त्री सन्मान वगैरे वगैरे वरुन फार पुळका आलेला होता त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही पोस्ट आहे, आणि इतरांसाठीही. इथे मी मिस्टर व मिसेस स्मिथ यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे लग्न, लफडी यात अजिबात जात नाहीये. काही संवेदनशील भावनिक मुद्दे (Emotional trigger points) असतात. त्यात 'स्त्रियांचा सन्मान' म्हटलं की खेळण्याला चावी दिल्यागत सगळ्यांचे व्हर्च्युअल अश्रू वाहायला लागतात तसे ते इथेही वाहू लागले. म्हणूनच म्हणतो, विल स्मिथने हे बायकोच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्तपणे केलं आणि सगळं खरोखरच घडलं असं मनापासून वाटणाऱ्यांना साष्टांग दंडवत आहे. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

गेली अनेक वर्ष ऑस्कर सोहळा हा गोरे विरुद्ध काळे, मग ट्रम्प विरुद्ध बाकी सगळे या Wokeपणा आणि भंपकपणाने ओसंडून वाहत असल्याने तो सोहळा बघणं सोडून कित्येक वर्ष झाली. म्हणूनच ऑस्कर सोहळा कधी आहे वगैरे माझ्या गावीही नसतं तसं यंदाही नव्हतं. या वर्षी ठोसा कांड झाल्याने विलने क्रिसला मारलेल्या ठोशाचे फोटो आणि त्यावरच्या भावनिक भाष्याने ओथंबून वाहणार्‍या पोस्ट सगळीकडे दिसू लागल्याने सगळे कळलं की आज ऑस्कर सोहळा आहे म्हणजे तेव्हा, २७ मार्चला होता. मात्र सिनेक्षेत्राचा नीचपणा ठावूक असल्याने आणि अशा गोष्टींच्या बाबतीत 'लॉजिकल' विचार करायला शिकल्याने हा स्टंट आहे हे लगेच लक्षात आलं होतं पण कारण हे ऑस्करची घटती लोकप्रियता असावं असं आधी वाटलं. नंतर एकाने आणखी एक कारण सांगितलं आणि ते जास्त संयुक्तिक वाटलं. आज तर त्याचे पुरावेच मिळाले. कारण कोणतं ते सोबतच्या चित्रांतून दिसेलच, त्यामुळे वेगळं सांगायला नको.

क्रिस रॉकला ठोसा मारल्यावर कळवळायच्या ऐवजी तो अजिबात न बिचकता पुढे डायलॉगबाजी पण करतो (याला लोकांनी अभिनय म्हटलं, पण खरा ठोसा खाल्ल्यावर काय होतं ते अमिताभ बच्चनला जाऊन विचारा), त्यामुळे खरं तर सिनेमा ऐवजी याच सीनला ऑस्कर द्यायला हवा होता.

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान पेश है अनेकांच्या फुग्याला टाचणी. यातल्या दोन लिंक म्हणजे फायझरची स्वतःची त्यांच्याच संकेतस्थळावरची प्रेस रिलीज आहे आणि दुसरी एक ट्विट आहे.

पुन्हा ठळक मुद्दे देतो:
(१) फायझर ट्रायल घेत असलेले एक औषध अ‍ॅलोपेसिया एरेटाच्या औषधोपचारांसाठी असणे

















(२) फायझर ऑस्करच्या स्पॉन्सर्स पैकी एक असणे




(३) क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक अप्रत्यक्ष विनोद करणे

(४) मग विल स्मिथने क्रिसला ठोसा मारणे (क्रिस अजिबात न कळवळणे वगैरे पुनरुक्ती करत नाही)


(५) नेमकं विल स्मिथच्या बायकोला अ‍ॅलोपेसिया एरेटा असणे आणि त्यावर समाजमध्यमांवर भावनिक पूर येणे

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. चतुर्दशी, शके १९४३


ता.क. कुठल्याही रोगाचा अशा रीतीने जाहीर वापर करुन घेणार्‍या हॉलीवूड आणि फायझरसकट सर्व संबंधितांना माझा सविनय आक् थू!

Monday, February 14, 2022

आधुनिक पंचतंत्रः चार मित्रांची गोष्ट - एक बोध कथा

लहानपणी पंचतंत्र की इसापनीतीत एक गोष्ट वाचली होती. त्या कथेची आजच्या काळासाठी सुसंगत आवृत्ती अशी:

चार पंडित मित्र गुरुंच्या आश्रमातून विद्या संपादन करुन आपल्या घरी परतत असतात. चौदा वर्ष अनेक गूढ विद्या आत्मसात केल्यानं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो.

वाटेत एक जंगल लागतं, या जंगलाच्या पलिकडेच त्यांचं गाव असतं.

चालता चालता अचानक एकाला हाडांचा ढीग दिसतो. पहिला म्हणतो, माझ्याकडे असणाऱ्या सिध्दीनं मी ही हाडं जुळवून सापळा तयार करु शकतो, जेणेकरुन हा कोणता प्राणी आहे ते कळेल तरी.

तो मंत्र म्हणतो आणि आश्चर्य! समोर एका प्राण्याचा सापळा तयार होतो.

दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, मी या प्राण्याला मांस आणि त्वचा देऊ शकतो. त्यानं मंत्र म्हणताच समोर साक्षात सिंह तयार होतो.

आता तिसरा म्हणतो, माझ्याकडे तुमच्यापेक्षा महान सिध्दी आहे मी त्याला जिवंत करु शकतो!

हे ऐकताच चौथा मित्र, जो सारासार विचार करत असे व वेळोवेळी योग्य सल्ले देत असे, तो हादरतो आणि त्याला तसे न करण्याबद्दल विनंती करू लागतो. उरलेले तिघे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोर पुरस्कर्ते असतात. ते तिसऱ्याने आपल्या प्रगाढ ज्ञानाचा व विद्येचा उपयोग करून सिंहात प्राण फुंकून त्याला जिवंत करावेच या मताचे असतात. चौथा फारच आग्रह करू लागतो तेंव्हा ते त्याला 'टोकाचा विचार करणारा', 'आततायी', 'कट्टर', 'तुझ्या मनात द्वेष आहे,' 'तालीपंडित' अशी दूषणे देतात. शेवटी तो चौथा मित्र म्हणतो, "तुम्हाला सिंहाला जिवंत करायचे तर करा, पण त्या आधी मला थोडा अवधी द्या, मी त्या समोरच्या उंच झाडावर चढून बसतो. मग याला मंत्र म्हणू दे.

पण तिघे ऐकत नाहीत. असं कसं, तुला आवरायला झालेलं आहे. इतका कट्टरपणा चांगला नाही. आम्ही सिंहाला जिवंत करताना त्याने हिंसक होऊ नये अशीही प्रार्थना करणार आहोत. त्यामुळे त्यात सहिष्णुता स्थापन होऊन तो इतर सिंहांनाही सहिष्णू बनवेल. चौथा मित्र म्हणाला, अरे असं काही नसतं, सिंह हा सिंह असतो. त्याची नैसर्गिक वृत्ती तो का सोडेल? मी काही तुम्हाला सिंहाचे तुकडे तुकडे करा असे सांगत नाही, त्याला दगड तलवारी घेऊन हाणा असे सांगत नाही, फक्त त्याला जिवंत करु नका. तरीही त्या तिघांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी त्या चौथ्या मित्राला झाडाला बांधलं आणि म्हणाले, "बघ आमचं पांडित्य, बघ आमची विद्या, बघ आमची सहिष्णूता!"

तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि सिंह जिवंत झाला. बराच काळ भुकेलेला असल्याने त्याने पटकन आधी सैरावैरा पळणाऱ्या त्या तिघा मित्रांना पकडून खाल्ले आणि मग शेवटी चौथ्या मित्रालाही गट्टम केलं.

तात्पर्य:
(१) कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
(२) संधी मिळाली की पळ काढा आणि संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

टीप: यात एक पाचवे पात्र पण आहे, जे तिघांतल्या कुणाचाही सारासार विचार जागृत होऊ लागल्यास मैत्री तोडण्याची धमकी देतं. आजच्या भाषेत अनफ्रेंड करेन असं सांगतं. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तोवर हा व्हिडिओ बघा. मोठमोठ्या लेखांतून जमणार नाही ते जेमतेम एका मिनिटात समजावलं आहे. 


© मंदार दिलीप जोशी
माघ शुक्ल त्रयोदशी, शके १९४३




Thursday, February 3, 2022

अजून जीव आहे!

इथे चूक की बरोबर यात मला पडायचं नाही. पण हल्ली नातेवाईकांमध्ये कुणी गेलं, तरी फोनवर निरोप आल्यावर जेमतेम त्या शहरात असलेलीच माणसं जमतात. अगदी पुणे, मुंबई, असं जवळपासच्या शहरात कुणी असेल तरी आपल्याला सांगितलं जातं की लगेच नेतोय, तुम्ही येण्याची घाई करु नका. मग आता नेलंच आहे तर कशाला नंतर तरी जा, असं म्हणत जसे संबंध असतील तसं एक फोन करुन काम भागवलं जातंं किंवा मग ते ही नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागली, तसं संपर्काची साधने वाढल्यापासूण नियमित संपर्क उरलेला नाही. थोडक्यात, नातेवाईक म्हणजे आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे झाले आहेत. त्यातला एखादा निखळल्याची बातमी आपल्याला कळते, पण तो 'सोहळा' बघायला न मिळाल्याने क्लोजर मिळत नाही. आणि अनेकांना ते नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही. 

कोविडकाळात आणि नंतरही लग्नेही पटापट उरकली गेली, जात आहेत. अर्थात तुम्ही त्या ५० निमंत्रितांच्या यादीत नसणे यावरुन असलेले फेसबुकीय विनोद सोडले तर किमान 'आमचे येथे आमचे चिरंजीव / कन्या यांचे लग्न अमुक अमुक यांच्याशी ठरले असून श्रींच्या कृपेने व अत्यंत मर्यादित निमंत्रितांसह हा सोहळा पार पडेल. तुम्हाला बोलावणे शक्य झाले नाही तरी तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद नवदांपत्याच्या पाठीशी असू देत." असं दोन ओळींचं पत्र पाठवायला काय होतं? 

Ships that pass in the night, and speak each other in passing,
Only a signal shown and a distant voice in the darkness;
So on the ocean of life we pass and speak one another,
Only a look and a voice, then darkness again and a silence
– Henry Wadsworth Longfellow

तुमच्यापैकी किंवा ओळखीपाळखीच्यांपैकी नौदलात (सशस्त्र किंवा मर्चंट) कुणी असेल, किंवा अगदी सामान्य ज्ञानाचा भाग म्हणूनही, तर तुम्हाला जवळपास असणार्‍या बोटी, मग त्या विरुद्ध दिशेला जात असोत किंवा एकत्र, एकमेकांशी संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी भोंगे आणि दिवे यांचा प्रयोग करतात हे माहित असेल (सिग्नल). हल्ली नातेवाईकांचं त्या बोटींपेक्षा बेक्कार झालंय. आयुष्याच्या प्रवासात इकडून तिक्डे जाताना सिग्नलही देण्याचेही कष्ट कुणी घेत नाही. आजवर लग्न झाल्याचं थेट न कळवायची पद्धत सुरु झालीच होती, इकडून तिकडून कळत असे. काही काळाने कुणी गेल्यावरही कळवण्याचे कष्ट कुणी घेणार नाही. ते ही असंच, इकडून तिकडून कळेल. 

 

पण हल्ली कशाचं काही न वाटण्याचा काळ आहे. त्याचंही काही वाटणार नाही. त्याचीही मनाची तयारी झालीच आहे. 

How still,
How strangely still
The water is today,
It is not good
For water
To be so still that way
–  Langston Hughes 

पण हे बरोबर आहे का? असं सारखं का वाटतं? कदाचित मनातलं पाणी तितकं स्तब्ध नसावं. आहे, थोडक्यात, 'माझ्या मना बन दगड' ही अवस्था प्राप्त व्हायला आणखी थोडा वेळ आहे... अजून जीव आहे!

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. ३, शके १९४३













Wednesday, October 13, 2021

माझिया रक्‍तात थोडा ईश्वराचा अंश आहे

सृष्टीचा कुणीतरी एक निर्माता असला पाहीजे हा तर्क अनेकांना भावतो. याच्या समर्थनार्थ मुलांचा तोंडावळा आईबाबांसारखा कसा, किंवा राईहूनही  लहान असलेली एखादी बी पेरली तर त्याचा विशाल वटवृक्ष कसा होतो असे तर्क दिले जातात.  सर्वसाधारणपणे सरासरी आणि त्याहून कमी बुद्धीमत्ता असलेल्या लोकांना ते तत्काळ पटतातही कारण त्यांच्या मते कुणीतरी एक सर्वशक्तिमान जगड्व्याळ  विचारसरणी असलेला असेल तरच हे सगळं (सृष्टीची रचना) शक्य आहे. याचं एक कारण हे आहे की सर्वसामान्यपणे मनुष्याला अनेक प्रश्नांची उतरे हवी असतात पण त्याची उत्तरे शोधण्याचे कष्ट तो घेऊ इच्छित नाही. बहुतेक वेळा माणूस न्यूनगंडापायी हा विचार करतो की त्याची स्वतःची असा शोध घेण्याची किंवा विचार करण्याची क्षमता नाही.  अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला आयुष्यही कमी पडतं म्हणा अनेकदा. पण तो भाग वेगळा.

सर्व प्राणीमात्रांना जीव प्रिय असतोच, पण माणसाला त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूपश्चात आपलं काय होईल हे जाणून घेण्याची ओढ नेहमीच अस्वस्थ करते आणि त्याला असहाय्य वाटू लागतं. याच असहाय्यतेची परिणिती उत्तराची आवश्यकता निर्माण होण्यात होते. 

जिथे मागणी आहे ती प्रत्येक जागा एक प्रकारे बाजारच असते आणि जिथे बाजार आहे तिथे व्यापारीही आलेच. मात्र, बाजारात उतरणारी प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकच असेल असं नाही. जिथे हे प्रश्न आहेत तिथे तर उत्तरांचा व्यापार करणारेही असतातच आणि अनेकदा ते विधीनिषेधशून्य,  अर्थात ज्याला इंग्रजीत unscrupulous charlatan म्हणतात तसे असतात. असे लोक लोकांच्या असहाय्य मानसिक स्थितीचा फायदा घेऊन वाट्टेल त्या थापा उत्तर म्हणून फेकतात आणि स्वतःचा फायदा करुन घेतात. आध्यात्मिक क्षेत्रात असे अनेक गुरू आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मार्केटिंग गुरू म्हणून असे लोक प्रसिद्धी पावतात. कधी कधी मात्र दोघांत फरक उरत नाही. कसा ते पुढे पाहूच.

सृष्टीचा एक निर्माता असणं हे साधारण बुद्धीमत्तेच्या मानवांसाठी एक epistemological मर्यादा आहे, कारण सरासरी किंवा त्यापेक्षा कमी बुद्धीमत्तेच्या मानवांच्या विचारांची झेप त्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण सर्वसाधारण समाजाच्या नैतिकतेची परिमाणे ठरवण्यासाठी हा विचार, किंवा आपण ही  म्हणूया, खूप उपयुक्त ठरते.  

पण जेव्हा एखादा दुष्ट आणि धूर्त माणूस स्वतःला त्या सर्वशक्तीमान सृष्टीनिर्मात्याचा एकमेव आणि स्वयंघोषित अधिकृत एजंट म्हणून यात शिरतो आणि त्या जोरावर त्या निर्मात्याच्या नावावार पैसे उकळायला सुरवात करतो, आपल्या अनुयायांना त्या निर्मात्याला किंवा स्वतः त्या स्वयंघोषित एजंटला न मानणार्‍या लोकांच्या स्थावर जंगम मालमत्तेची,  त्यांच्या महिलांच्या अब्रूची लूट करायची संपूर्ण मोकळीक देतो, आणि यावर कडी म्हणजे या सर्व अनैतिक कृत्यांना त्या सर्वशक्तिमान निर्मात्याचंच नाव वापरून पापमुक्ती देतो, किंबहुना अशा कृत्यांना पुण्यकर्मांचेच लेबल लावतो तेव्हा मात्र मात्र या व्यवस्थेला आणि संपूर्ण जगालाच भयानक स्वरूपाच्या विकृतीची लागण होते. 

सत्याच्या शोधात मार्गाक्रमणा करत असताना घोळ झाला तो "कसं" (how) चं रुपांतर "कोण" (who) करण्यात आलं तेव्हा.  ज्ञान जिज्ञासा how विचारत विचारत पुढे घेऊन जाते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नसतं. पण या प्रकारे शोध घेताना कमीतकमी याची शाश्वती असते की उत्तराच्या नावाखाली धादांत असत्य तरी आपल्या गळ्यात मारलं जाणार नाही. पण मनुष्यस्वभाव असा असतो की काहीही करुन त्याला उत्तर हवंच असतं. प्रवासाचा आनंद न घेता काही लोकांना लवकरात लवकर गंतव्यस्थानाकडे पोहोचण्याची घाई असते त्याप्रमाणेच माणूस उत्तरांचा शोध घेता घेता मिळणारे ज्ञानकण वेचण्याऐवजी तत्काळ उत्तरं हवी म्हणून घायकुतीला येतो. अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अशा स्वयंघोषित दलालांच्या नादी लागून त्यांच्या खोट्या उत्तरांवरही विश्वास ठेवतो.  

या अशा खोटारड्या दलालांकडे एक क्लुप्ती अशी असते की ते तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे अमुक अमुक याचं उत्तर आहे का? तुमच्याकडे ते नसतं, म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता की बाबा नाहीये आमच्याकडे उत्तर. यावर त्यांच्याकडे उत्तर असल्याचं ते ठणकावून देतात. हाच तो क्षण असतो जिथे intelligent creationism नावाचा महाघोटाळा जन्म घेतो. याचा आधार म्हणजे एक निराधार प्रश्न असतो - हे सगळं कुणी निर्माण केलं? Who created all this? खरं तर प्रश्न असा हवा, "हे सगळं कसं निर्माण झालं?" प्रश्न चुक(व)ल्याने how ऐवजी whoच्या घोटाळ्याचा खेळ इथेच सुरु होतो. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत जाणून घ्यायची जी ओढ असते त्या भावनेला साद घातली जाते आणि त्यांना भीती घातली जाते की तुम्ही अमुक केलं नाहीत आणि तमुक असे वागला नाहीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे भयानक हाल होतील. आता काय हाल होतील त्याच्या थापा त्या स्वयंघोषित दलालाच्या मर्जीनुसार ठरतात.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे समाजाचा गाडा योग्य पद्धतीने सुरु रहावा म्हणून काही एक प्रमाणात श्रद्धेची आवश्यकता असते कारण मनुष्यप्राणी हा स्वभावतःच नैतिक वृत्तीचा नसतो. कुठल्याही श्रद्धेविना, आधिभौतिक शक्तीच्या भीती विना नैतिक आचरण असणारी व्यक्ती विरळाच असते. म्हणून श्रद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक धर्म/रिलिजन वगैरेंत मृत्यूनंतर मिळणार्‍या 'गती' विषयी भीती घातलेली आपल्याला दिसेल. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आपला एक ना एक दिवस मृत्यू होणार हे पक्कं ठाऊक असतं, म्हणूनच प्रत्यक्ष मृत्यूचं भय तितकं वाटत नसलं तरी मृत्यूनंतर आपलं काय होईल याची त्याला जास्त चिंता असते कारण त्याला किमान एवढी खात्री असते की मेल्यावर आपण अगदीच असहाय्य असणार आहोत. आणि याच भीतीला तो आपल्या वर्तमान अस्तित्वाशीच जोडतो. 

विचार करुन बघा, इनकम टॅक्समध्ये सवलत मिळेल म्हणून कुणी दान-पुण्य करत नाही. हा माणसाच्या मृत्यूपश्चात अस्तित्वासाठी काढलेला विमा असतो;[रत इंग्रजीत सांगायचं तर After Life Insurance असतो.

प्रत्येक रिलिजनची 'शिकवण'/तत्त्वप्रणाली बनल्याला आता काही हजार वर्ष उलटून गेलेली आहेत. तेव्हाचं विज्ञान आणि आज त्याच स्वरुपात नाही. भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे – आजचं विज्ञान हे तेव्हाच्या विज्ञानासारखं उरलेलं नाही – आणि खिलजी सारख्या क्रूर अडाण्यांमुळे प्राचीन काळी काही गोष्टी कशा बनल्या याचं ज्ञान त्या जळून खाक झालेल्या नालंदा विद्यापीठाबरोबरच काळाच्या उदरात अदृश्य झालं. म्हणूनच त्या गोष्टींच्या बाबत आज अनेक अविश्वसनीय गोष्टी पसर(व)ल्या गेल्या आहेत आणि त्यावरुन आज चेष्टा केली जाते. 

रिलिजन्सची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की सगळ्याच धर्मात/रिलीजनमध्ये काही ना काही तर्काच्या आणि वैज्ञानिकतेच्या कसोटीवर अजिबात न पटणाऱ्या बाबी आढळून येतील.  म्हणूनच रिलीजनना वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बघण्याऐवजी मानवतेच्या कसोटीवर तपासले पाहिजे की ते त्या त्या रिलीजनच्या अनुयायांना किती प्रमाणात विचारस्वातंत्र्य देतात, काळानुसार परिवर्तन होण्यास काही वाव आहे की नाही, आणि इतर समाजांशी कसा व्यवहार करावा याबाबत काय मार्गदर्शन केले आहे. 

या सगळ्यां धर्ममतांत सनातन धर्म सगळ्यांत कल्याणकारी  (benign) आहे कारण इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवल्या तर धर्माची दहा लक्षणेदेखील कुणाही मनुष्याला योग्य मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करायला पुरेशी आहेत. त्यात इश्वराची कल्पना असली तरी ती अत्यावश्यक नाही आणि धर्मात गुरु करण्याची परंपरा असली तरी कुठलाही गुरू स्वतःला इश्वराचा एकमेव एजंट म्हणवून घेत नाही. आस्तिकता आणि इश्वरावर श्रद्धा असणे श्रेयस्कर असल्या तरी 'मी नास्तिक आहे' हे एखादा मनुष्य फक्त हिंदू धर्मातच निर्भयपणे म्हणू शकतो. प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. एक कर्मकांड आणि सामाजिक भाग (इतर धर्मीयांशी कशी वर्तणूक ठेवावी याची शिकवण). आणि हाच सामाजिक भाग प्रत्येक रिलिजनला स्वतंत्र अस्तित्व बहाल करतो. दुसरा महत्त्वाचा भाग हा की कर्मकांड ही सामाजिक भाग कसा असावा यासाठी मार्गदर्शक ठरतात आणि यातही हिंदू धर्मातली मार्गदर्शक तत्त्वे त्याला श्रेष्ठ ठरवतात.

आणि सगळ्यांत घातक (malignant) रिलिजन ते आहेत जे 'खतरे में' है ची घोषणा करत सतत घाबरवत ठेवण्याची आणि ऐकलं नाही तर हिंसा करण्याची शिकवण आणि वृत्ती राखून असतात, आणि दुराचारालाही इश्वराची आज्ञा म्हणतात - बाकी सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.


© मंदार दिलीप जोशी (मराठी संस्करण)
मूळ हिंदी लेख इथे असेपर्यंत वाचता येईल.

अश्विन शु. ८, दुर्गाष्टमी

Saturday, July 3, 2021

मर्यादा/लिमिट

दोन गोष्टींना सीमा नाही: विश्व आणि मूर्खपणा; पण मला विश्वाबद्दल तितकीशी खात्री नाही - अल्बर्ट आईन्स्टाईन (Two things are infinite: the universe and human stupidity; and I’m not sure about the universe. –Albert Einstein).

लहान मुलांना हात लावणार्‍यांना (बॅड टच) काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही काय म्हणत आहात ते इथे ऐकून येतंय मला, कुठलीही दिव्य शक्ती नसताना. पण तुम्हाला आम्हाला वाटून काय उपयोग? कायद्याच्या रक्षकांना तसं वाटत नाही ना! पण त्या आधी अमेरिकेतली एक गोष्ट सांगतो. बराच वामपंथी मूर्खपणा अमेरिकेत सुरु होऊन आपल्याकडे झिरपतो म्हणून अमेरिकेचंच उदाहरण देतो. काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात संमत झालेल्या कायद्यानुसार तुम्ही साधारण साडेनऊशे डॉलरच्या आत उचलेगिरी केली (Shoplifting) तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही. तुमच्यावर खटला दाखल करण्यासाठी सरकारी वकीलांना दुकानात शिरताना तुमचा हेतू चोरी करण्याचा होता हे सिद्ध करावं लागेल (जे जवळपास अशक्य आहे). थोडक्यात, दुकानात नेहमीसारखं शिरा, तुम्ही उचललेल्या वस्तूंची एकंदर किंमत साडेनऊशे डॉलरच्या वर जात नाही ना याची खात्री करा, आणि खुशाल बाहेर पडा. या व्हिडिओत हा माणूस आरामात चोरी करुन पळून जातोय आणि त्याला कुणीही रोखत नाहीये कारण जीवापेक्षा आणि नंतर होणार्‍या मनस्तापापेक्षा साडेनऊशे डॉलरचा चुना परवडला.


आहे की नाही गंमत. इंग्रजीत ज्याला extrapolation म्हणतात ते वापरून एक काल्पनिक उदाहरण पाहूया. उपरोल्लेखित कायदा म्हणजे असं झालं की तुम्ही कुठेतरी जात आहात आणि तुम्हाला एखादी मुलगी दिसली आणि (१) तुम्ही कोणत्याही वावग्या हेतूने तिथे जात नाही आहात आणि ती (२), मुलगी दिसल्यावर अचानक तुमच्या मनात इच्छा निर्माण होऊन तुम्ही तिची छेडछाड (eve-teasing) आणि विनयभंग (molestation) केलात, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकणार नाही. पण अगदीच बलात्कार नको हं, नेमकं काय केलं की 'चलता है' च्या सीमेचं उल्लंघन होतं तिथवर अजून कायदा पोहोचला नाही आहे अमेरिकेतही हे सुदैवच म्हणायला हवं.

एखादी गोष्ट आक्षेपार्ह होण्याची मर्यादा नेमकी काय असते? एखाद्या गोष्टीची लिमिट आपण कशी ठरवायची? ज्याची त्याची वेगळी असं आपण म्हणू शकतो का, हल्ली नैतिकतेची व्याख्या वेगवेगळी असू शकते का? इथे एका मैत्रिणीची पोस्ट आठवली ज्यात तिने तिच्या एका मित्राशी झालेल्या संभाषणाबद्दल लिहिलं होतं. त्या मित्राने 'लिमीट' अर्थात 'मर्यादा' या शब्दाचे, संकल्पनेचे अत्यंत सुंदर विवेचन केलं आहे. तो म्हणतो की की मर्यादा किंवा लिमिट ही सर्वांसाठी एकच असते. आपण जसे जसे एक एक पाऊल पुढे टाकतो, तसतसे आपणच म्हणू लागतो की माझी ही इतकीच लिमिट आहे. सुरुवातीला दारूला स्पर्शही न करणारा ज्या दिवशी पितो, तिथेच लिमिट ओलांडलेली असते. "मी फक्त मित्रांबरोबर/ फक्त ऑफिस पार्टीमध्ये/ फक्त एकच पेग/ फक्त दोनच बाटल्या घेतो वगैरे हे काय खरं नाही...म्हणजे एकदा एक पायरी ओलांडली की मग त्याची सवय होई पर्यंत पुढची पायरी ही लिमिट असते असे आपल्याला वाटते!"

त्याचं म्हणणं खरंच आहे. म्हणजे असं पहा, की जी मुलगी/मुलगा म्हणते/म्हणतो की मी फक्त रात्री १० पर्यंत बाहेर असतो. १० ही आपली लिमिट. मग कधीतरी ते वाढून ११ होतात मग १२...तो ठाम असतो प्रत्येक वेळी की हीच आपली लिमिट!! गेल्या कित्येक वर्ष कॉलेजमध्ये, मग नोकरी करताना सामाजिक स्थित्यंतरे अनुभवली. मुलामुलींच्यात होणारे वैचारिक/सांस्कृतिक बदल पाहिले; 'ओझरता स्पर्श केला तरी चालतो' इथवरुन 'आता अफेअर असेल तर किस वगैरे चालतं'... आपली लिमिट आहे ती असं म्हणू लागले आणि तसं म्हणणारे हळू हळू 'प्रीकोशन' घेऊन करायचं इथवर आले होते. आणि आता लिमिट वाढली...पार्टनर स्वाईप पण चालू लागलं!!

माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. 

मला नेहमीच याचा विषाद वाटतो जेंव्हा पेपरमध्ये किंवा टीव्हीवर दर काही दिवसांनी अशा बातम्या येतात की नोकरीच्या आमिषाने दोन वर्ष बलात्कार केला, लग्नाच्या आमिषाने संबंध ठेवायला भाग पाडले (या प्रकारांना सरसकट लैंगिक शोषण, बलात्कार म्हटलं जातं. पण माफ करा पण मला हे यातलं काहीही वाटत नाही.) किंवा सिनेमात काम मिळावं म्हणून दिग्दर्शक, निर्माता, सहकलाकार वगैरेंनी अत्याचार केला.

यात पहिल्या प्रकारच्या बातम्या जास्त वाचनात येतात. इथे क्राईम पॅट्रोलमधे दाखवलेली एक गोष्ट आठवली. एक मुलगा एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो आणि मग आईवडील तयार नाहीत असं सांगून काही काळाने तिच्याशी संबंध तोडून टाकतो. ती मुलगी पोलीसात जाते, मग त्याचा बाप पोलीसच असतो तो त्याच्या ओळखी वापरुन तिचा खून करवतो, वगैरे वगैरे. थोडेफार तपशील सोडले तर "प्रेम"संबंध जुळणे, मग त्यातल्या मुलाने मुलीकडे शरीरसंबंधांची मागणी करणे, मग काही दिवसांनी हौस फिटल्यावर मुलाने संबंध तोडून टाकणे आणि मुलीने बलात्काराची केस टाकणे हा एकच पॅटर्न दिसून येतो. क्राईम पॅट्रोलमधल्या कथेत खूनही झाला इतकाच काय तो वाढीव फरक. आता हल्ली यात भर पडली आहे ती नेहमीच्या मथळ्यांना जोडून "इंटरनेटच्या माध्यमातून/फेसबुकवर जुळलेल्या प्रेमातून" या उपसर्गाची (prefix). अगदी आम्ही पेपर बंद केला म्हटलंत तरी आपण ऑनलाईन वर्तमानपत्र वाचतोच. त्यातून दृकश्राव्य मिडिया आहेच या बातम्यांना मसाला लावून सांगायला. मला एकच वाटतं, तुम्ही वाव का दिलात?? तुम्ही पहिल्याच स्पर्शाला ठाम विरोध का नाही केलात? एकदा मी ही फिल्म केली किंवा हा जॉब मिळाला की बास असे म्हटलं तरी लिमिट क्रॉस झालीच होती! आणि जर खरच कोणी सक्ती केली तर त्याच वेळी कायद्याचा आधार का नाही घेतलात? मिडिया ट्रायल होण्याची वाट का बघत बसलात? किंवा त्या मुलाच्या आईवडिलांकडे किंवा पोलीस तक्रार करुन तो मुलगा सुधारेल अशी खुळचट आशा ठेवून का होतात? अगदी त्या मुलाला शिक्षा जरी झाली, तरी त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून त्याला शिक्षा दिल्याचं मानसिक समाधान मिळेलही, पण त्या आधी या मुलींना त्यांनी स्वतःचं नुकसान करुन घेतलेलं आहे हे लक्षात का येत नाही? 

खरोखर अत्याचार होतो तेंव्हा चीड येतेच, आणि गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. 

प्रलोभनाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण त्या क्षणी डोकं शाबूत ठेवून ठाम पणे ज्यांनी नाही म्हटलं त्यांना माझा साष्टांग नमस्कार. कारण तसं ठामपणे नकार द्यायला संस्कारांबरोबरच प्रचंड धीर आणि आत्मबळ लागतं. आपण कमकुवत असून चालत नाही. तुम्हाला नाही म्हणता आलं असेल, त्याचा अभिमान बाळगा. मला आहे अभिमान, अगदी दारू पिणार्‍यांबरोबर बारमध्ये जाऊन थम्प्सप पिऊन बाहेर येण्याचाही. जिथे आपण एकदा हो म्हटलं, तिथे आपण संपतो!! मग एकापाठोपाठ एक प्रलोभनं येऊ लागतात. आपलं लिमिट वाढू लागतं. तडजोड (कोंप्रोमाईज), करून आयुष्यात काही मिळवायचं म्हणून जर मूळ लिमिट तोडली असेल तर नंतर इतरांकडे बोट दाखवून त्यांना दोष देण्यात काय अर्थ उरतो? मुळात जिथे असे कोंप्रोमाईज करावे लागतात तिथे तुम्ही जाऊ नका, गेलात तर 'नाही' म्हणायचे बळ अंगी बाळगा, आणि मग तुम्हाला जे हवं ते आयुष्यात मिळालं नाही तरी पश्चात्ताप होऊ देऊ नका! 'या ना त्या मार्गाने' (By hook or crook) मध्ये आपलं ही नुकसान होत असतंच!! एक लाख ट्विट्स तुम्हाला समर्थन देणारे असतील तरी एकदा स्वतःच लिमीट ओलांडली की ती घसरण यांना कुठे घेऊन जाईल आणि काय भोगायला लावेल याची कल्पनाही करवत नाही! 

इंग्रजीत एक वाक्य आहे: Politics is the downstream of culture - Andrew Breitbart (राजकारण हा संस्कृतीचा परिपाक आहे - अँड्र्यू ब्राईट्बार्ट). असं मी अचानक का म्हणतोय. कारण त्या विचारांचे लोक कायदा करण्याच्या आणि अंमलबजावणीच्या क्षेत्रात शिरले की काय होतं याचा परिपाक असणारा सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आजच वाचला

  

२०११ साली शेख अहमद नावाच्या रिक्षाचालकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने सेंट मेरी हायस्कूलच्या इयत्ता सहावीच्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचे अपहरण केले होते आणि तिच्या वडिलांकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मुलीचे वडील खंडणी देण्यासाठी गेले असता पोलिसांनी मुलीला वाचवले होते.

जर अपहरणकर्त्याने अपहरण केलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला नाही, त्याला जिवे मारण्याची धमकी दिली नाही आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले तर अपहरणकर्त्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४-अ नुसार जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. "कलम ३६४ अ (अपहरण आणि खंडणी) अंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यासाठी तीन गोष्टी सिद्ध करणे आवश्यक आहे. या तीन गोष्टी म्हणजे- एखाद्या व्यक्तीचे अपहरण करणे किंवा त्याला ओलिस ठेवणे, अपहरणकर्त्याला जिवे मारण्याची धमकी देणे किंवा मारहाण करणे, अपहरणकर्त्याकडून असे काही करणे की ज्यामुळे सरकार, इतर कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही पीडित व्यक्तीला धोका होऊ शकते किंवा ठार मारले जाऊ शकते अशी भीती व्यक्त होणे. सरकारी संस्थेवर किंवा दुसर्‍या व्यक्तीवर खंडणी देण्यासाठी दबाव आणला गेला हे सिद्ध करावे लागेल" असे कोर्टाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या आदेशाला आव्हान देत तेलंगाना येथील रहिवासी शेख अहमद याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेण्यात आली. या शिक्षेविरूद्ध अहमदची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावत त्याला आयपीसीच्या कलम ३६४ अ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कलम ४६४ अ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा ठोठावताना पहिल्या अटी व्यतिरिक्त दुसरी किंवा तिसरी अटदेखील सिद्ध करावी लागेल, अन्यथा एखाद्याला या कलमान्वये दोषी ठरवले जाऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी कोर्टात सांगितले होते की अपहरणकर्त्याने मुलीला कधी इजा करण्याची किंवा जिवे मारण्याची धमकी दिली नव्हती. इथे एक लहानशी शंका अशी की पैसे मिळाले नाहीत तर ठार मारायची शक्यता किंवा इच्छा नसेल, किंवा इतर अपाय करण्याचा इरादा नसेल, तर माणूस कुणाचं अपहरण का करेल? "तुमची मुलगी माझ्याकडे आहे, मला दोन लाख द्या" याचा अर्थ काय होतो? तर्क आणि एकंदर डोकं शाबूत असलेला कुठलाही माणूस अपहरण झाल्यावर खंडणीसाठी फोन आला की त्याचा, "तुझ्या मुलीला मी पळवलं आहे, जर तू मला दोन लाख दिले नाहीस तर तिचा खून करेन. आणखी काय काय करेन याची कल्पना करा" असा घेईल. थोडक्यात अपहरण करण्यातच  'शारिरिक व मानसिक शोषण' तसेच 'जीवाला इजा होण्याचा धोका असणे' या गोष्टी अध्याहृत आहेत. पण या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाला तसे वाटत नसावे. आपली पितृसुलभ भावना शमवण्यासाठी शेख अहमदने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि ती मुलगी आपल्याकडे ठेवण्याचा दोन लाख रुपये खर्च तिच्या जन्मदात्याकडे मागितला असा त्यांचा समज झाला होता की काय हे सांगता येणार नाही. इथे पीडित मुलीच्या वडिलांनी काय सांगितलं यापेक्षा 'अल्पवयीन मुलीचे अपहरण' हाच सगळ्यात मोठा गुन्हा ग्राह्य धरून त्यात 'शारिरिक व मानसिक शोषण' तसेच 'जीवाला इजा पोहोचवण्याचा इरादा' हे गृहित धरायला हवं. इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आलोचना योग्य ठरेल की नाही कल्पना नाही, पण  कायदा कितीही गाढव असला तरी त्याचा कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचे (interperetation) काम हे त्या खुर्चीत बसलेली हाडामांसची माणसेच करत असतात आणि त्यांच्याकडून असा विचित्र निर्णय अपेक्षित नाही. 

पण... पण... पण... वर म्हटल्याप्रमाणे राजकारणाबरोबरच कायद्याचे क्षेत्र हे देखील संस्कृतीचा परिपाक असावा. There is no reason why the judiciary has also not become a downstream of culture. 

जाता जाता एकच सांगतो, की मला कायद्याचे ज्ञान नाही, पण शक्य असल्यास यावर कुणीतरी पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे. त्याचे फलित काही येईल अशी आशा नाहीच, पण या गोष्टी अशाच वार्‍यावर सोडल्या, तर ही 'लिमीट' पुढे किती ओलांडली जाईल याची शाश्वती नाही. एका जुन्या लेखात म्हटल्याप्रमाणे If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून, आणि एक समाज म्हणून आपणच एकदा लिमिट ओलांडली की पुढे जाऊन कोर्टाने असा निर्णय दिला तर कायद्याला आणि कोर्टाला दोष देण्यात काय अर्थ? अपहरण केल्यावर रावणाने सीतेला हात लावला नाही म्हणून तो चांगला हा युक्तिवाद करणारे लोक कायद्याचं शिक्षण घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले की असं होत असावं. अधिक टिप्पणी करणे धोकादायक आहे म्हणून इथेच थांबतो.

कसं आहे, की एक व्यक्ती, एक कुटुंब, एक समाज म्हणून आपणच एकदा मर्यादा लवचिक केली की पुढे जाऊन न्यायालयाने असा निर्णय दिला तर कायद्याला आणि न्यायालयाला दोष देण्यात काय अर्थ?

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ९, शके १९४३

टीप: ही माझी वैयक्तिक मतं आहेत. मी अनेकांच्या दृष्टीने मागास विचारांचा असू शकेन, पण माझा तत्त्व, मूल्य, संस्कार, संस्कृती, आणि लग्नसंस्था यावर विश्वास आहे. मला तो टिकवावा अस वाटतं आणि मी प्रयत्न करतो. इतरांना माझी मतं बंधनकारक आहेत असं समजू नये!




Saturday, May 22, 2021

टाइम्स हॅव चेंज्ड अर्थात कालाय तस्मै नमः

नुकताच कोकणात गावी गेलो होतो काही कामानिमित्त. आमच्या आणि शेजारच्या घराभोवती फेरफटका मारताना एक गोष्ट एकदम अंगावर आली. त्या निमित्त त्या क्षणी हे वाटलं ते मांडतोय. ते चूक की बरोबर यापैकी काहीच नाही. फक्त ते वाटलं, ते आहे इतकंच. 

जुनी खिडकी नवी खिडकी

जुना काळ म्हणजे नेमका किती वर्षांपूर्वीचा? काळ बदलला असं कधी म्हणता येतं? Age is just a number अर्थात वय हा फक्त एक आकडा आहे या वाक्याचा नक्की अर्थ काय? 

शारिरीक वयावर आपलं नियंत्रण नाही पण मनाने आपण म्हातारे होता कामा नये असं म्हणतात पण काही गोष्टी बघितल्या की अचानक मनाने आपण एकदम वीसेक वर्ष तरी मोठे झालोय की काय असं वाटत राहतं. 

डावीकडची खिडकी जुन्या पद्धतीच्या घराची तर उजवीकडची खिडकी पडझड व्हायला आलेल्या जुन्या घराला पाडून नव्याने बांधलेल्या घराची. 

आधुनिकतेला कधीच विरोध नाही पण अशा गोष्टी बघितल्या की कुठेतरी गलबलतं हे नक्की. अशाच खिडकीत बसून आजी/पणजी आम्हा मस्तीखोर मुलांना ओरडत असे, शेजारच्या घरातील अशाच खिडकीत बसलेल्या समवयस्क सखीशी सुखदुःखाच्या, शिळोप्याच्या गप्पा मारत असे. त्यांच्या गप्पा सुरु असताना घरातली सून पलीकडच्या खिडकीतल्या आजीला आपल्या आजेसासूच्या "बघा ना, या मुंबईहून पाठवलेलं औषध वेळेवर घेतच नाहीत" अशा प्रेमळ तक्रारी सांगत असे. लपाछुपी खेळताना पटकन लपायला आमच्यापैकी एखादा या गवाक्षातून आत जायचा प्रयत्न करत असे.

असो, काय काय आठवेल सांगता येत नाही. त्या आज्या, त्या पणज्या कधीच गेल्या. त्यांच्या नातसुना आता त्यांच्या सारख्या दिसू लागल्या. हे बदल घडतानाही काही विशेष वैषम्य वाटलं नाही, जसा काळ पुढे सरकेल तसं हे होणारच असं म्हणून मनाने स्वीकारलं. मग या दोन खिडक्यांकडे पाहून एकदम भावुक व्हायला का व्हावं? 

विचार करता करता अचानक डॉ राजीव मिश्रा यांची एक पोस्ट आठवली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की माणसं महत्वाची नाहीत, संस्कृती आणि सभ्यता (civilization) महत्वाच्या आहेत, आणि ही गोष्ट मानवी मनात पिढ्यानपिढ्या कोरलेली आहे. डाव्या फोटोतली जुन्या घराचा अविभाज्य भाग असलेली खिडकी ही याच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. कदाचित म्हणूनच माणसांच्या मर्त्य असण्यापेक्षा गावाकडच्या अशा घरांचं हे असं आधुनिक होणं अपरिहार्य असलं तरी कुठेतरी मनाला झटका देऊन अचानक वीसेक वर्ष पुढं ढकलतं असं वाटतं.

उजवीकडची खिडकी नव्याने बांधलेल्या घराची. या खिडकीतून आता आजी, पणजी डोकावणार नाही. फार फार तर तिचा खापरपणतू किंवा पणती मोबाईलला रेंज येते आहे की नाही बघायला येतील खिडकीत, गावाकडे कधी आलेच तर. असाही हल्ली अनेकांचा फक्त मालमत्तेवर दावा कायम ठेवण्यापुरता संबंध असतो गावाशी. त्यांच्या लेखी ते आपलं घर, आपली वाडी नसते, तर सतत सोयीनुसार आधुनिक करत राहण्यायोग्य आणि आपला क्लेम ठेवण्यायोग्य 'प्रॉपर्टी' असते. पण विषयांतर नको.

काळ पुढे सरकला, बदलला असं नेमकं कधी म्हणता येतं हे नाही ठाऊक, पण असे बदल बघितले की माझ्या तरी अंगावर येतात हे नक्की. आपण "शहरातून" "गावाकडे" येतो ते "गावात" रहायला. आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांकडे आकर्षिले जात असतो. पण गावच आता शहर (खरेतर शहरी!) बनत चाललं आहे हे झेपत नाही.

गोष्टी घडल्या म्हणून काहीच बिघडत नाही, पण बघवतही नाही. गोष्टी आधीही बदलत होत्या, पण आता त्यात भावुकतेला स्थान नाही. 

खरंच आहे, टाइम्स हॅव चेंज्ड.

🖋️ मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९ (सीता नवमी), शके १९४३

Friday, December 4, 2020

कोटीच्या कोटी उड्डाणे

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) काल जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.

ज्या स्टिफन फ्राय मार्फत हा पुरस्कार दिला गेला, तो अभिनेता असण्याबरोबरच इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचा (Labour Party) चा सक्रिय सदस्य आहे. 

थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

स्टिफन फ्रायच्या विकीवर अधिक "रोचक" माहिती वाचायला मिळेल.

वार्की फाउंडेशन ही सनी वार्की या नॉन रेसिडेंट दुबईस्थित भारतीयाने स्थापन केलेली संस्था आहे. हा केरळी ख्रिश्चन आहे. ही संस्था अंडरप्रिविलेज्ड मुलांना मिळणाऱ्या "शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरता" काम करते. जगभरातल्या विकसनशील देशातील शेकड्यानी शिक्षक या संस्थेत प्रशिक्षण घेतात. 

याच सनी वार्कीने काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिल क्लिंटन यांच्या क्लिंटन फाउंडेशनला सहा मिलियन डॉलर्सची देणगी जाहीर केली

सद्ध्या याच डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन आणि कमला हॅरीस राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष कुठलाही असो, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण फारसं बदलत नाही. पण डेमोक्रॅटिक पक्ष हा जरा जास्त पाकिस्तान धर्जिणा आहे आणि हॅरीस यांची काश्मीरबद्दलची मते गुगल करू शकता.

हा पक्ष थोडक्यात थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

आता पुरस्काराबद्दल जरासे. या पुरस्काराचे काही विजेते व्हॅटिकनला पोप महाशयांना भेटायला गेले. आता पोप महाशयांचा आणि शिक्षण क्षेत्राचा काय संबंध?


आता बिंदू जोडा. केरळी ख्रिश्चन > दुबई > प्रचंड रकमेचा पुरस्कार > जाहीर करणारा डाव्या विचारांचा अभिनेता > डाव्या विचारांच्या क्लिंटन फाउंडेशनशी लागेबांधे >  व्हॅटिकन-पोप.

सहज एक विचार आला. आधी अचानक भारतीय ललना जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरू लागल्या, आता अचानक गेली काही वर्षे बौद्धिक क्षेत्रांतील पुरस्कार मिळू लागलेत. गंमतच आहे एकूण. 

पुन्हा एकदा डिसले सरांचे अभिनंदन. हिंदू संस्कृती व भारतीय हितसबंधांना कुठेही धक्का न लावता ते या पुरस्काराच्या रकमेचा विनिमय करतील अशी भाबडी आशा बाळगायची का? 

©️ मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ ४, शके १९४२


Friday, September 25, 2020

तुम्हीही जेक गार्डनर

जेक Gardner ही व्यक्ती कोण होती? तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं का आवश्यक आहे? 

जेक गार्डनरचा अमेरिकेतील ओमाहामध्ये एक बार होता. मे महिन्यात एकदा त्याच्या बार मध्ये ब्लॅक लाईवज मॅटर (Black Lives Matter) वाले घुसले आणि नासधूस करायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली. 

तो मागच्या खोलीतून बाहेर आला आणि ओरडून सांगितलं की आत्ताच्या आत्ता थांबा आणि चालते व्हा. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातून पिस्तुल काढली आणि हवेत दोन बार उडवले. आता लोकांनी त्याला खाली पाडलं. तो ओरडू लागला की मला सोडा, मला सोडा. आता जीवावर बेतणार असं वाटल्याने त्याने त्याला खाली पाडून दाबणाऱ्या एकावर गोळी झाडली, त्यात तो माणूस मेला.

CCTV मध्ये पूर्ण घटना चलचित्रमुद्रित झाली होती. पब्लिक प्रोसिक्युटरने ते पाहून निर्णय घेतला की जेकने स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली असल्याने केस होऊ शकत नाही.



BLM वाल्यांनी बोंबाबोंब केली आणि एक नवाच प्रोसिक्युटर आणला गेला. त्याने एका न्यायाधीशाकडून जेकच्या अटक वॉरंटवर सही करून घेतली.

जेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.


जेकने कायदेशीर कारवाईत त्याला लोकांकडून पैशाची मदत व्हावी  म्हणून GoFundMe वर खातं  उघडलं होतं, जे BLM वाल्यांनी बंद करायला लावलं. 

तुम्ही तुमचा जीव देऊन सुद्धा डाव्यांचं समाधान करू शकत नाही.

एकदा स्वतःलाच पीडित घोषित करायचं म्हणजे सहानुभूती मिळते, आणि डावे म्हणतात की जे पीडित असतात त्यांना कायदा पाळायची गरज नसते. हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (उदा. गरीब बिचारा भाडेकरू, कुठे जाईल)

डावे म्हणतात तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करायचा अधिकार नाही, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (कारखाना जाळला कामगारांनी, पण शोषक आहे कारखाना मालक!).

आता डावे म्हणू लागलेले आहेत की त्यांच्यातल्या पीडितांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करायचाही अधिकार नाही. 

आणि त्यांच्या मते पीडित कोण आहेत? ज्यांना त्यांनी पीडित असल्याचं सर्टिफिकेट वाटलं आहे ते.

दंगलखोर, अतिरेकी यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी पैसे कुठून येणार? तर तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करांवर डल्ला मारून. पण तुम्हाला कायदेशीर मदत लागली त्यासाठी तुम्ही लोकांकडून दानमार्गाने पैसे गोळा करायचे ठरवलेत तर तुम्हाला ते ही करू दिलं जाणार नाही.

तुम्ही तुमची नैतिकता इतरांना ठरवू दिलीत, तर तर तुमची जीवनकथा एक दिवस तुमचा नरबळी घेऊनच संपेल हे नक्की. 

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे ही व्यवस्था तुम्ही मान्य केलीत, तर 'त्यांना' हवा म्हणून तुमच्याविरुद्ध काय कायदा निर्माण होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 

मागे घरकाम करणार्‍या एका बाईंचा व्हिडीओ फिरत होता, ज्यात तिला तीन पाचशेच्या नोटा म्हणजे पंधराशे हे कळत होतं, पण वर तीनशे म्हणजे एकूण अठराशे हे कळत नव्हतं म्हणे. त्या व्हिडिओत ती सरळ सरळ जास्त पैसे उकळायला बघत होती, आणखी पाचशे असं काहीतरी म्हणत. त्या बाईबद्दल अनेकांना सहानुभूतीचा पुळका आला  होता. तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या बाईंची कटकट बंद व्हावी म्हणून त्या तरुणांनी तिला अठराशे पेक्षा एक रुपयाही जास्त दिला असेल, तर त्यांनी उद्या आपल्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायला तयार रहावं.

कारण वामपंथ हा एक असा साप आहे की ज्याला कितीही दूध पाजलंत तरी तो एक दिवस तुम्हाला डसणारच आहे, गिळणारच आहे. 

If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

आता तुम्हाला जेक गार्डनरचं नाव ठावूक असणं का आवश्यक आहे?

कारण तुम्हीही जेक गार्डनर आहात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ९, शके १९४२