सृष्टीचा कुणीतरी एक निर्माता असला पाहीजे हा तर्क अनेकांना भावतो. याच्या समर्थनार्थ मुलांचा तोंडावळा आईबाबांसारखा कसा, किंवा राईहूनही लहान असलेली एखादी बी पेरली तर त्याचा विशाल वटवृक्ष कसा होतो असे तर्क दिले जातात. सर्वसाधारणपणे सरासरी आणि त्याहून कमी बुद्धीमत्ता असलेल्या लोकांना ते तत्काळ पटतातही कारण त्यांच्या मते कुणीतरी एक सर्वशक्तिमान जगड्व्याळ विचारसरणी असलेला असेल तरच हे सगळं (सृष्टीची रचना) शक्य आहे. याचं एक कारण हे आहे की सर्वसामान्यपणे मनुष्याला अनेक प्रश्नांची उतरे हवी असतात पण त्याची उत्तरे शोधण्याचे कष्ट तो घेऊ इच्छित नाही. बहुतेक वेळा माणूस न्यूनगंडापायी हा विचार करतो की त्याची स्वतःची असा शोध घेण्याची किंवा विचार करण्याची क्षमता नाही. अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला आयुष्यही कमी पडतं म्हणा अनेकदा. पण तो भाग वेगळा.
सर्व प्राणीमात्रांना जीव प्रिय असतोच, पण माणसाला त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूपश्चात आपलं काय होईल हे जाणून घेण्याची ओढ नेहमीच अस्वस्थ करते आणि त्याला असहाय्य वाटू लागतं. याच असहाय्यतेची परिणिती उत्तराची आवश्यकता निर्माण होण्यात होते.
जिथे मागणी आहे ती प्रत्येक जागा एक प्रकारे बाजारच असते आणि जिथे बाजार आहे तिथे व्यापारीही आलेच. मात्र, बाजारात उतरणारी प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकच असेल असं नाही. जिथे हे प्रश्न आहेत तिथे तर उत्तरांचा व्यापार करणारेही असतातच आणि अनेकदा ते विधीनिषेधशून्य, अर्थात ज्याला इंग्रजीत unscrupulous charlatan म्हणतात तसे असतात. असे लोक लोकांच्या असहाय्य मानसिक स्थितीचा फायदा घेऊन वाट्टेल त्या थापा उत्तर म्हणून फेकतात आणि स्वतःचा फायदा करुन घेतात. आध्यात्मिक क्षेत्रात असे अनेक गुरू आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मार्केटिंग गुरू म्हणून असे लोक प्रसिद्धी पावतात. कधी कधी मात्र दोघांत फरक उरत नाही. कसा ते पुढे पाहूच.
सृष्टीचा एक निर्माता असणं हे साधारण बुद्धीमत्तेच्या मानवांसाठी एक epistemological मर्यादा आहे, कारण सरासरी किंवा त्यापेक्षा कमी बुद्धीमत्तेच्या मानवांच्या विचारांची झेप त्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण सर्वसाधारण समाजाच्या नैतिकतेची परिमाणे ठरवण्यासाठी हा विचार, किंवा आपण ही म्हणूया, खूप उपयुक्त ठरते.
पण जेव्हा एखादा दुष्ट आणि धूर्त माणूस स्वतःला त्या सर्वशक्तीमान सृष्टीनिर्मात्याचा एकमेव आणि स्वयंघोषित अधिकृत एजंट म्हणून यात शिरतो आणि त्या जोरावर त्या निर्मात्याच्या नावावार पैसे उकळायला सुरवात करतो, आपल्या अनुयायांना त्या निर्मात्याला किंवा स्वतः त्या स्वयंघोषित एजंटला न मानणार्या लोकांच्या स्थावर जंगम मालमत्तेची, त्यांच्या महिलांच्या अब्रूची लूट करायची संपूर्ण मोकळीक देतो, आणि यावर कडी म्हणजे या सर्व अनैतिक कृत्यांना त्या सर्वशक्तिमान निर्मात्याचंच नाव वापरून पापमुक्ती देतो, किंबहुना अशा कृत्यांना पुण्यकर्मांचेच लेबल लावतो तेव्हा मात्र मात्र या व्यवस्थेला आणि संपूर्ण जगालाच भयानक स्वरूपाच्या विकृतीची लागण होते.
सत्याच्या शोधात मार्गाक्रमणा करत असताना घोळ झाला तो "कसं" (how) चं रुपांतर "कोण" (who) करण्यात आलं तेव्हा. ज्ञान जिज्ञासा how विचारत विचारत पुढे घेऊन जाते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नसतं. पण या प्रकारे शोध घेताना कमीतकमी याची शाश्वती असते की उत्तराच्या नावाखाली धादांत असत्य तरी आपल्या गळ्यात मारलं जाणार नाही. पण मनुष्यस्वभाव असा असतो की काहीही करुन त्याला उत्तर हवंच असतं. प्रवासाचा आनंद न घेता काही लोकांना लवकरात लवकर गंतव्यस्थानाकडे पोहोचण्याची घाई असते त्याप्रमाणेच माणूस उत्तरांचा शोध घेता घेता मिळणारे ज्ञानकण वेचण्याऐवजी तत्काळ उत्तरं हवी म्हणून घायकुतीला येतो. अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अशा स्वयंघोषित दलालांच्या नादी लागून त्यांच्या खोट्या उत्तरांवरही विश्वास ठेवतो.
या अशा खोटारड्या दलालांकडे एक क्लुप्ती अशी असते की ते तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे अमुक अमुक याचं उत्तर आहे का? तुमच्याकडे ते नसतं, म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता की बाबा नाहीये आमच्याकडे उत्तर. यावर त्यांच्याकडे उत्तर असल्याचं ते ठणकावून देतात. हाच तो क्षण असतो जिथे intelligent creationism नावाचा महाघोटाळा जन्म घेतो. याचा आधार म्हणजे एक निराधार प्रश्न असतो - हे सगळं कुणी निर्माण केलं? Who created all this? खरं तर प्रश्न असा हवा, "हे सगळं कसं निर्माण झालं?" प्रश्न चुक(व)ल्याने how ऐवजी whoच्या घोटाळ्याचा खेळ इथेच सुरु होतो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत जाणून घ्यायची जी ओढ असते त्या भावनेला साद घातली जाते आणि त्यांना भीती घातली जाते की तुम्ही अमुक केलं नाहीत आणि तमुक असे वागला नाहीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे भयानक हाल होतील. आता काय हाल होतील त्याच्या थापा त्या स्वयंघोषित दलालाच्या मर्जीनुसार ठरतात.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे समाजाचा गाडा योग्य पद्धतीने सुरु रहावा म्हणून काही एक प्रमाणात श्रद्धेची आवश्यकता असते कारण मनुष्यप्राणी हा स्वभावतःच नैतिक वृत्तीचा नसतो. कुठल्याही श्रद्धेविना, आधिभौतिक शक्तीच्या भीती विना नैतिक आचरण असणारी व्यक्ती विरळाच असते. म्हणून श्रद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक धर्म/रिलिजन वगैरेंत मृत्यूनंतर मिळणार्या 'गती' विषयी भीती घातलेली आपल्याला दिसेल. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आपला एक ना एक दिवस मृत्यू होणार हे पक्कं ठाऊक असतं, म्हणूनच प्रत्यक्ष मृत्यूचं भय तितकं वाटत नसलं तरी मृत्यूनंतर आपलं काय होईल याची त्याला जास्त चिंता असते कारण त्याला किमान एवढी खात्री असते की मेल्यावर आपण अगदीच असहाय्य असणार आहोत. आणि याच भीतीला तो आपल्या वर्तमान अस्तित्वाशीच जोडतो.
विचार करुन बघा, इनकम टॅक्समध्ये सवलत मिळेल म्हणून कुणी दान-पुण्य करत नाही. हा माणसाच्या मृत्यूपश्चात अस्तित्वासाठी काढलेला विमा असतो;[रत इंग्रजीत सांगायचं तर After Life Insurance असतो.
प्रत्येक रिलिजनची 'शिकवण'/तत्त्वप्रणाली बनल्याला आता काही हजार वर्ष उलटून गेलेली आहेत. तेव्हाचं विज्ञान आणि आज त्याच स्वरुपात नाही. भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे – आजचं विज्ञान हे तेव्हाच्या विज्ञानासारखं उरलेलं नाही – आणि खिलजी सारख्या क्रूर अडाण्यांमुळे प्राचीन काळी काही गोष्टी कशा बनल्या याचं ज्ञान त्या जळून खाक झालेल्या नालंदा विद्यापीठाबरोबरच काळाच्या उदरात अदृश्य झालं. म्हणूनच त्या गोष्टींच्या बाबत आज अनेक अविश्वसनीय गोष्टी पसर(व)ल्या गेल्या आहेत आणि त्यावरुन आज चेष्टा केली जाते.
रिलिजन्सची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की सगळ्याच धर्मात/रिलीजनमध्ये काही ना काही तर्काच्या आणि वैज्ञानिकतेच्या कसोटीवर अजिबात न पटणाऱ्या बाबी आढळून येतील. म्हणूनच रिलीजनना वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बघण्याऐवजी मानवतेच्या कसोटीवर तपासले पाहिजे की ते त्या त्या रिलीजनच्या अनुयायांना किती प्रमाणात विचारस्वातंत्र्य देतात, काळानुसार परिवर्तन होण्यास काही वाव आहे की नाही, आणि इतर समाजांशी कसा व्यवहार करावा याबाबत काय मार्गदर्शन केले आहे.
या सगळ्यां धर्ममतांत सनातन धर्म सगळ्यांत कल्याणकारी (benign) आहे कारण इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवल्या तर धर्माची दहा लक्षणेदेखील कुणाही मनुष्याला योग्य मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करायला पुरेशी आहेत. त्यात इश्वराची कल्पना असली तरी ती अत्यावश्यक नाही आणि धर्मात गुरु करण्याची परंपरा असली तरी कुठलाही गुरू स्वतःला इश्वराचा एकमेव एजंट म्हणवून घेत नाही. आस्तिकता आणि इश्वरावर श्रद्धा असणे श्रेयस्कर असल्या तरी 'मी नास्तिक आहे' हे एखादा मनुष्य फक्त हिंदू धर्मातच निर्भयपणे म्हणू शकतो. प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. एक कर्मकांड आणि सामाजिक भाग (इतर धर्मीयांशी कशी वर्तणूक ठेवावी याची शिकवण). आणि हाच सामाजिक भाग प्रत्येक रिलिजनला स्वतंत्र अस्तित्व बहाल करतो. दुसरा महत्त्वाचा भाग हा की कर्मकांड ही सामाजिक भाग कसा असावा यासाठी मार्गदर्शक ठरतात आणि यातही हिंदू धर्मातली मार्गदर्शक तत्त्वे त्याला श्रेष्ठ ठरवतात.
आणि सगळ्यांत घातक (malignant) रिलिजन ते आहेत जे 'खतरे में' है ची घोषणा करत सतत घाबरवत ठेवण्याची आणि ऐकलं नाही तर हिंसा करण्याची शिकवण आणि वृत्ती राखून असतात, आणि दुराचारालाही इश्वराची आज्ञा म्हणतात - बाकी सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
© मंदार दिलीप जोशी (मराठी संस्करण)
मूळ हिंदी लेख इथे असेपर्यंत वाचता येईल.
अश्विन शु. ८, दुर्गाष्टमी
कर्म सिद्धांत अगदी अचूक आहे. फक्त त्याचं वेळापत्रक टाइमटेबल मनुष्याला माहिती नसतं. सगळा हिशोब चोख होणारच असतो. वेळापत्रक आपल्याला माहिती नसतो.
ReplyDelete