Showing posts with label क्रिकेट. Show all posts
Showing posts with label क्रिकेट. Show all posts

Wednesday, June 15, 2011

रमण लांबा आणि हेल्मेट


क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेता राजा गोसावी यांना आलेला मृत्यू हा एका वेगळ्या अर्थाने सगळ्यात सुदैवी मृत्यू म्हणता येईल. राजा गोसावी यांना तर मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला. पण ही झाली वयोवृद्ध लोकांची गोष्ट.

पण वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी मृत्यू आला तर, आणि ते ही मैदानावरच्या घटनेमुळे? ते मात्र दुर्दैवीच. अशीच गोष्ट आहे भारताचा फलंदाज रमण लांबा याची.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रमण लांबाचे आगमन झाले ते दणक्यातच. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९८६-८७ सालच्या मालिकेत धडाकेबाज कामगिरी करून तो सगळ्यांच्या नजरेत भरला. पण पुढच्या काही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला. बी.सी.सी.आय. च्या निवड समितीने रमण लांबाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी नंतर अनेक सामन्यांत खेळण्याची संधी दिली, पण त्याचं तो सोनं करु शकला नाही. भारतातील स्थानिक स्पर्धात धो धो धावा करुनही तो पुन्हा संघात स्थान काही मिळवू शकला नाही. त्याची पुन्हा राष्ट्रीय संघात कधीच निवड झाली नाही.
राष्ट्रीय संघातून बाहेर फेकले गेल्यावर आजकाल कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या वृत्तवाहिन्यांवर 'क्रिकेट तज्ञ' म्हणून चमकोगिरी करण्याची सोय त्याकाळी नसल्याने त्याने मग अनेक स्थानिक पातळ्यांवर क्रिकेट खेळायला सुरवात केली. रमण लांबा काही काळ आर्यलंडच्या क्लब क्रिकेटमध्ये काही काळ चमकला. तिथल्याच एका तरुणीशी (किम) त्याचे प्रेमाचे सूर जुळले आणि दोघे लवकरच विवाहबद्ध झाले.



काही काळाने त्याने बांगलादेशातून क्लब क्रिकेट खेळायला सुरवात केली. वंगबंधू स्टेडियम मध्ये अशाच एका क्लब पातळीवरच्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग या संघाविरुद्ध ढाका येथील अबहानी क्रिडा चक्र या संघातर्फे खेळत असताना सैफुल्ला खान या गोलंदाजाच्या एका षटकादरम्यान रमण लांबाला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण करण्यात आलं. खालीद मसूद या त्याच्या यष्टीरक्षक-कर्णधाराने त्याला हेल्मेटबाबत विचारलं, पण त्या षटकात फक्त तीन चेंडू बाकी असल्याने रमणने हेल्मेट घालायचा कंटाळा केला. आणि त्याच्या ह्याच निर्णयाने घात केला. सैफुल्लाने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला. त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाज मेहराब हुसेनने पुलचा एक सणसणीत फटका हाणला. चेंडू फार उंचावर उडून झेल पकडला जाऊ नये म्हणून त्याने चेंडू जमीनीवर पडेल अशा बेताने मारला पण तो सरळ रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. फटका इतका जोराचा होता की चेंडू लांबाच्या डोक्यावर आदळून उंच उडाला, इतका की खालीद मसूदला तो काही अंतर मागे जाऊन झेलावा लागला. फलंदाज बाद झाल्याने सगळे क्षेत्ररक्षक जल्लोष करत खालीदकडे धावले.

त्याच वेळी सगळ्यांचं रमण लांबाकडे लक्ष गेलं तेव्हा तो डोकं धरुन खाली पडलेला दिसला, आणि सगळे त्याच्याकडे धावले, पण लांबा एव्हाना त्या धक्क्यातून सावरला असावा. तो आरामात उठून उभा राहिला आणि "मी बरा आहे" असं क्षेत्ररक्षकांना सांगून ड्रेसिंग रूमकडे आरामात चालत गेला. संघाच्या डॉक्टरने त्याला पाणी पाजले, पण काही वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला इस्पितळात हलवण्यात आलं. तिथे नेलं जात असताना वाटेतच त्याची शुद्ध हरपली. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूतली गाठ काढून टाकण्यात आली. प्रकृती खालावल्याने दिल्लीहून एका तज्ञाला पाचारण करण्यात आलं पण तो "आता रुग्ण बरा होण्याची काहीही आशा नाही" असं सांगून जवळ जवळ आल्यापावलीच परत गेला. अखेर उपरोल्लेखित घटनेच्या तीन दिवसांनंतर त्याच्या कुटुंबाच्या परवानगीने त्याचा लाईफ सपोर्ट काढून टाकण्यात आला. बायको किम आणि पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी त्यावेळी लांबाच्या अखेरीचे साक्षीदार होते.

ब्रॅडमनच्या काळात हेल्मेट कसं नव्हतं आणि आज सचिन तेंडुलकर कसं हेल्मेट, आर्म गार्ड, चेस्ट गार्ड पासून कसं सगळं घालून खेळतो याबद्दल उहापोह करणारा (आणि आजकालच्या फ्याशनीप्रमाणे सचिनला नावं ठेवणारा) एका इंग्रजाचा लेख नुकताच वाचनात आला. अनेक कारणांनी त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली, पण त्याला लांबाचा मृत्यू कसा झाला ते अर्थातच ठावूक नसावं. किकेटमधे हेल्मेट हा प्रकार प्रचलित झाल्याला साधारण तीसेक वर्ष झाली असतील. या शिरस्त्राणाने असंख्य फलंदाज आणि क्षेत्ररक्षक जायबंदी होण्यापासून वाचलेले आहेत. जवळजवळ सगळे फलंदाज हल्ली हेल्मेट वापरताना दिसत असले, तरी फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करणारे अनेक खेळाडू आजही एकनाथ सोलकरी थाटात हेल्मेट घालायचा कंटाळा करतात. अशांनी रमण लांबाची दुर्दैवी गोष्ट आठवावी आणि हेल्मेट घालायला सुरवात करावी.

शेवटी 'शीर सलामत तो कॅच पचास' हेच खरं, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः विविध वृत्तपत्र कात्रणे, क्रिकइन्फो डॉटकॉम, स्पोर्टस्टार.
रमण लांबाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वर्षा विशेषांक ’ऋतू हिरवा २०११’ इथे पूर्वप्रकाशित.

Saturday, May 22, 2010

क्रिकेट: पळा पळा, कोण पुढे पळे तो... - एका धावचीतची कहाणी

क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज आपल्या आचरटपणामुळे धावचीत झाल्याच्या अनेक मजेशीर घटना ठासून भरल्या आहेत, पण त्यातल्या एकालाही ओव्हल मैदानावर ८७ वर्षांपुर्वी घडलेल्या ह्या घटनेची सर नाही.

अनेक फलंदाजांनी अत्यंत वाईट 'धाव'पटू म्हणुन 'नाव कमावलं' असलं तरी डेनिस कॉम्पटन आणि इंझमाम-उल-हक यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. आणि हो, आपले गांगुली महाराज सुद्धा आहेत की. पण जून १९२२ मधे त्या दिवशी ओव्हल वर जे काही झालं ते पाहिलं असतं तर त्यांनाही 'आपण तितके काही वाईट नाही' असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं!

वार्सिटी मॅचच्या साधारण एक पंधरवडा आधीची ही गोष्ट आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कमकुवत सरे विरुद्ध ८ बाद २२१ अशी मजल मारली होती, त्यावेळी दुपारच्या सुमारास एकोणीस वर्षांचा टॉम राईक्स (Tom Raikes) हा नवीन फलंदाज आर.सी. रॉबर्टसन-ग्लास्गो (RC Robertson-Glasgow) याला साथ द्यायला खेळपट्टीवर आला. विन्चेस्टर सोडल्यानंतर राईक्स याचं हे पहिलंच वर्ष होतं तर त्याच्याहून एक वर्ष जेष्ठ असलेला रॉबर्टसन-ग्लास्गो हा ऑक्सफर्ड इलेव्हन मधील त्याच्या तिसर्‍या मोसमात खेळत होता. या जोडीने संघाच्या धावसंख्येत चार धावांची भर घातली असताना रॉबर्टसन-ग्लास्गोने चेंडू लाँग-ऑनकडे हलकेच तटवला आणि एक सोपी धाव घ्यायला सरसावला. पहिली धाव संथपणे घतल्यानंतरही दोघांनी दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला. राईक्स आधी तयार नव्हता पण जरा का-कू केल्यावर दुसरी धाव घ्यायला तयार झाला. "तेव्हा", रॉबर्टसन-ग्लास्गोच्या शब्दात सांगायचे तर "आक्रीत घडलं".

ते दोघं खेळपट्टीच्या मध्यावर एकमेकांना सामोरे आले झाले असता (टाईम्स अनुसार) रॉबर्टसन-ग्लास्गोचा किंवा (रॉबर्टसन-ग्लास्गोच्या मते) राईक्सचा विचार बदलला, आणि ह्या दोघा सदगृहस्थांनी पेव्हिलियन एंडकडे एकत्र धाव घेतली.

असेच काही यार्ड धावल्यावर राईक्सला आपली घोडचूक लक्षात आली आणि त्याने वळून उलट दिशेला वॉक्सहॉल एंडकडे सुरक्षित पोहोचायच्या उद्देशाने धावायला सुरवात केली. त्याच वेळी रॉबर्टसन-ग्लास्गोने राईक्सचाच कित्ता गिरवला आणि अशा तर्‍हेने ऑक्सफर्डचे हे दोघे विद्वान पुन्हा म्हणजे दुसर्‍यांदा एकाच दिशेने धावू लागले!! यावर रॉबर्टसन-ग्लास्गोने आपल्या लेखात लिहिलंय की "मी त्याचं अनुकरण केलं, पण क्रीजवर अंमळ गर्दी आहे असं वाटल्याने मी उलट दिशेने धाव घेतली". यानंतर फारच धम्माल झाली. टाईम्स ने वर्णन केल्याप्रमाणे "उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या प्रेक्षकवर्गाला" आणखी एक धक्का बसायचा होता. रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोन दुर्दैवी(!) जीव जवळ जवळ एकाच वेळी पुन्हा वळले आणि "आपापल्या" क्रीज मध्ये "सुरक्षित" पोहोचण्यासाठी एकाच दिशेने तिसर्‍यांदा धावले.

या दोघांच्या चाळ्यांनी वेड लागायचे तेवढे शिल्लक राहिलेल्या सरे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी या विनोदनिर्मिती मध्ये आपल्या भयानक क्षेत्ररक्षणाने हातभार लावला. लाँग-ऑन कडून येणारा थ्रो नीट नव्हता आणि चेंडू मिड-ऑनच्या हातात विसावला. मिड्-ऑन क्षेत्ररक्षकानेही चेंडू हाताळण्यात चूक केली. त्याच्या गोंधळात गोलंदाज आणि विकेटकीपर यांच्याकडून येणार्‍या "इकडे टाक" "इकडे फेक" च्या असंख्य हाकांनी भर घातली. यामुळे त्याच्या हातून चेंडू दुसर्‍यांदा पडला. एकदाचा त्याने गोलंदाजाकडे चेंडू फेकला आणि गोलंदाजाने बेल्स उडवल्या. पण हाय रे कर्मा! त्याला रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही तिथेच क्रीजमध्ये धापा टाकत उभे असलेले दिसले! गोलंदाजाने तत्परतेने दुसर्‍या टोकाला चेंडू विकेटकीपर हर्बर्ट स्ट्रडविक (Herbert Strudwick) याच्याकडे फेकला आणि हर्बर्टने बेल्स उडवल्या.

अजूनही गोंधळ संपला नव्हता. कुणीतरी धावबाद झालंय हे नक्की होतं, पण नेमकं कोण याबद्दल कुणालाच खात्री नव्हती कारण रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही पॅव्हिलियन एंडला "सुरक्षित" उभे होते.

त्यात दोन्ही पंच इतरांसारखेच गोंधळलेले होते. दोघेही येडबंबू सारखे हसत चेहेर्‍यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे होते. एका (दंत)कथेनुसार तर फलंदाजांनी कोणाला बाद ठरवावे यासाठी चक्क नाणेफेक (टॉस) करण्याचा निर्णय घेतला होता, पण तेवढ्यात उलट दिशेने धावण्याचा पहिला निर्णय राईक्सचा असल्याचं रॉबर्टसन-ग्लास्गोच्या लक्षात आलं, आणि राईक्सने मैदान सोडलं.

बिली हिच हा सरे संघातील एक जेष्ठ खेळाडू नंतर रॉबर्टसन-ग्लास्गोच्या कानात हळुच कुजबुजला "तुला माहित्ये नं खरंच कोण बाद होतं ते?"

पण खरी गोष्ट अशी होती की खरंच कुणालाच माहीत नव्हतं हो!!!
-------------------------------------------------------------------------------------संदर्भ: 46 Not Out by RC Robertson-Glasgow (Sportsman's Book Club 1954) आणि क्रिकइन्फो डॉट कॉम.
प्रेरणस्थान: जेष्ठ पत्रकार श्री. द्वारकानाथ संझगिरी आणि माझं क्रिकेटवेड.