Saturday, May 22, 2010

क्रिकेट: पळा पळा, कोण पुढे पळे तो... - एका धावचीतची कहाणी

क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज आपल्या आचरटपणामुळे धावचीत झाल्याच्या अनेक मजेशीर घटना ठासून भरल्या आहेत, पण त्यातल्या एकालाही ओव्हल मैदानावर ८७ वर्षांपुर्वी घडलेल्या ह्या घटनेची सर नाही.

अनेक फलंदाजांनी अत्यंत वाईट 'धाव'पटू म्हणुन 'नाव कमावलं' असलं तरी डेनिस कॉम्पटन आणि इंझमाम-उल-हक यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. आणि हो, आपले गांगुली महाराज सुद्धा आहेत की. पण जून १९२२ मधे त्या दिवशी ओव्हल वर जे काही झालं ते पाहिलं असतं तर त्यांनाही 'आपण तितके काही वाईट नाही' असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं!

वार्सिटी मॅचच्या साधारण एक पंधरवडा आधीची ही गोष्ट आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कमकुवत सरे विरुद्ध ८ बाद २२१ अशी मजल मारली होती, त्यावेळी दुपारच्या सुमारास एकोणीस वर्षांचा टॉम राईक्स (Tom Raikes) हा नवीन फलंदाज आर.सी. रॉबर्टसन-ग्लास्गो (RC Robertson-Glasgow) याला साथ द्यायला खेळपट्टीवर आला. विन्चेस्टर सोडल्यानंतर राईक्स याचं हे पहिलंच वर्ष होतं तर त्याच्याहून एक वर्ष जेष्ठ असलेला रॉबर्टसन-ग्लास्गो हा ऑक्सफर्ड इलेव्हन मधील त्याच्या तिसर्‍या मोसमात खेळत होता. या जोडीने संघाच्या धावसंख्येत चार धावांची भर घातली असताना रॉबर्टसन-ग्लास्गोने चेंडू लाँग-ऑनकडे हलकेच तटवला आणि एक सोपी धाव घ्यायला सरसावला. पहिली धाव संथपणे घतल्यानंतरही दोघांनी दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला. राईक्स आधी तयार नव्हता पण जरा का-कू केल्यावर दुसरी धाव घ्यायला तयार झाला. "तेव्हा", रॉबर्टसन-ग्लास्गोच्या शब्दात सांगायचे तर "आक्रीत घडलं".

ते दोघं खेळपट्टीच्या मध्यावर एकमेकांना सामोरे आले झाले असता (टाईम्स अनुसार) रॉबर्टसन-ग्लास्गोचा किंवा (रॉबर्टसन-ग्लास्गोच्या मते) राईक्सचा विचार बदलला, आणि ह्या दोघा सदगृहस्थांनी पेव्हिलियन एंडकडे एकत्र धाव घेतली.

असेच काही यार्ड धावल्यावर राईक्सला आपली घोडचूक लक्षात आली आणि त्याने वळून उलट दिशेला वॉक्सहॉल एंडकडे सुरक्षित पोहोचायच्या उद्देशाने धावायला सुरवात केली. त्याच वेळी रॉबर्टसन-ग्लास्गोने राईक्सचाच कित्ता गिरवला आणि अशा तर्‍हेने ऑक्सफर्डचे हे दोघे विद्वान पुन्हा म्हणजे दुसर्‍यांदा एकाच दिशेने धावू लागले!! यावर रॉबर्टसन-ग्लास्गोने आपल्या लेखात लिहिलंय की "मी त्याचं अनुकरण केलं, पण क्रीजवर अंमळ गर्दी आहे असं वाटल्याने मी उलट दिशेने धाव घेतली". यानंतर फारच धम्माल झाली. टाईम्स ने वर्णन केल्याप्रमाणे "उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या प्रेक्षकवर्गाला" आणखी एक धक्का बसायचा होता. रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोन दुर्दैवी(!) जीव जवळ जवळ एकाच वेळी पुन्हा वळले आणि "आपापल्या" क्रीज मध्ये "सुरक्षित" पोहोचण्यासाठी एकाच दिशेने तिसर्‍यांदा धावले.

या दोघांच्या चाळ्यांनी वेड लागायचे तेवढे शिल्लक राहिलेल्या सरे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी या विनोदनिर्मिती मध्ये आपल्या भयानक क्षेत्ररक्षणाने हातभार लावला. लाँग-ऑन कडून येणारा थ्रो नीट नव्हता आणि चेंडू मिड-ऑनच्या हातात विसावला. मिड्-ऑन क्षेत्ररक्षकानेही चेंडू हाताळण्यात चूक केली. त्याच्या गोंधळात गोलंदाज आणि विकेटकीपर यांच्याकडून येणार्‍या "इकडे टाक" "इकडे फेक" च्या असंख्य हाकांनी भर घातली. यामुळे त्याच्या हातून चेंडू दुसर्‍यांदा पडला. एकदाचा त्याने गोलंदाजाकडे चेंडू फेकला आणि गोलंदाजाने बेल्स उडवल्या. पण हाय रे कर्मा! त्याला रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही तिथेच क्रीजमध्ये धापा टाकत उभे असलेले दिसले! गोलंदाजाने तत्परतेने दुसर्‍या टोकाला चेंडू विकेटकीपर हर्बर्ट स्ट्रडविक (Herbert Strudwick) याच्याकडे फेकला आणि हर्बर्टने बेल्स उडवल्या.

अजूनही गोंधळ संपला नव्हता. कुणीतरी धावबाद झालंय हे नक्की होतं, पण नेमकं कोण याबद्दल कुणालाच खात्री नव्हती कारण रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही पॅव्हिलियन एंडला "सुरक्षित" उभे होते.

त्यात दोन्ही पंच इतरांसारखेच गोंधळलेले होते. दोघेही येडबंबू सारखे हसत चेहेर्‍यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे होते. एका (दंत)कथेनुसार तर फलंदाजांनी कोणाला बाद ठरवावे यासाठी चक्क नाणेफेक (टॉस) करण्याचा निर्णय घेतला होता, पण तेवढ्यात उलट दिशेने धावण्याचा पहिला निर्णय राईक्सचा असल्याचं रॉबर्टसन-ग्लास्गोच्या लक्षात आलं, आणि राईक्सने मैदान सोडलं.

बिली हिच हा सरे संघातील एक जेष्ठ खेळाडू नंतर रॉबर्टसन-ग्लास्गोच्या कानात हळुच कुजबुजला "तुला माहित्ये नं खरंच कोण बाद होतं ते?"

पण खरी गोष्ट अशी होती की खरंच कुणालाच माहीत नव्हतं हो!!!
-------------------------------------------------------------------------------------संदर्भ: 46 Not Out by RC Robertson-Glasgow (Sportsman's Book Club 1954) आणि क्रिकइन्फो डॉट कॉम.
प्रेरणस्थान: जेष्ठ पत्रकार श्री. द्वारकानाथ संझगिरी आणि माझं क्रिकेटवेड.

1 comment:

  1. सही आहे. चांगलीच करमणूक झाली माझी वाचताना. :-)

    ReplyDelete