Saturday, May 22, 2010

कोकण यात्रा - १: केळशी – दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी

कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता येणार्‍या या गावाला पर्याय नाही.

स्वतःचे वाहन घेऊन जायचे असल्यास छानच, पण घाटात वाहन चालवण्याचा अनुभव असणारा चालक बरोबर असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. पु.लंच्या 'म्हैस' ह्या कथेत म्हटल्याप्रमाणे "गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या अर्थाने लागायला लागली" असा प्रकार ज्या लोकांच्या बाबतीत होतो त्यांनी आधीच औषधे घेतलेली बरी.



गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणार्‍या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या आहेत. इथे पडणार्‍या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून ह्या पाखाड्या तयार केल्या आहेत. पवसाळ्यात बिदीवर असणार्‍या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.




वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको, कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही. त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची!





केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे. गावात काही घरात गावकर्‍यांनी गोबर गॅसची सोय करून घेतली आहे व इतरही अनेक घरात तशी सोय करायचं घाटत आहे.


कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड.






नियोजित मुंबई-गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला जरा डाग लागल्यासारखं झालं असलं, तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा टिकवून ठेवला आहे.

रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे.

या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात. टेकडीवर बसून दिसणार्‍या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेट
दिलेल्या पर्यटकांचा अनुभव.

सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती. तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही सहकार्‍यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या:

किनार्‍यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले.

या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या
दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७" असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्‍यांनी बांधकाम केलेली शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.

पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी. यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या कामावर न्यायालयाने बंदी आणली.

गावात अनेक देवळे आहेत, पण त्यातली प्रमुख दोन – एक रामाचे देऊळ आणि दुसरे महालक्ष्मीचे.



याच दोन देवळांशी गावातले दोन प्रमुख उत्सव निगडीत आहेत – रामनवमी आणि महालक्ष्मीची यात्रा. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या  स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी
खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. ह्या दोन देवळांची माहिती एकत्रित देण्यामागचा हेतू हा, की रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत. महालक्ष्मीच्या उत्सवाचे वर्णन एका कवीने पुढीलप्रमाणे केले आहे, त्यातूनच आपल्याला कल्पना येईल.

देवीचे गाणे - श्री महालक्ष्मी केळशी
उत्सवाचा काल सत्वरी जवळी तो आला
प्रेमभराने ग्रामस्थांसी मोद बहु झाला || धृ ||
चैत्रमासी आनंद होतो मातेच्या सदनी
पाडव्याच्या दिनी जातसे ढोल गृहवरुनी
जमती सारे मानकरी नी ग्रामस्थ दोन्ही
श्रावण करिती वर्षफळाचे अनन्य चित्तानी
नूतन वर्षी समाराधना घालीतसे कोणी
वारी नेमुनी चूर्ण सेविती गंधाची वाटणी
ऐशी रिती उत्सावासी प्रारंभ केला || प्रेमभराने _ _ _ १ ||

दुसरे दिवशी जमती सारे वारी एकत्र
गृहागृहांतून पट्टी गोळा करण्याचे सत्र
तक्रारीला जागा नाही ऐसे ते तंत्र
नियमबद्ध तो केला ऐसा उत्सव सुयंत्र
साक्ष देतसे शिक्षा करुनी त्यासी अपवित्र
सरसावे जो फुट पाडण्या देऊनी कानमंत्र
ऐशा रीती सहा दिवस तो काळ त्वरे गेला || प्रेमभराने _ _ _ २ ||

अंगणात तयार केला मंडप भोजना
सप्तमीच्या दिवशी कामे असती ती नाना
आकडी घेउनी फिरती वारी केळीच्या पाना
दोन डांगा ओढा ऐशी आज्ञा हो त्यांना
हक्काचा तो फणस द्यावा त्वरित महाजना
सायंकाळी भाजी चिरण्या भगतांच्या ललना
पातवड्याचे खोरे झाले तयार सेवेला || प्रेमभराने _ _ _ ३ ||



अष्टमीच्या दिवशी चाले भोजन जोरात
प्रसाद भक्षण करा यथास्थित गोडी बहु त्यात
साठे-आखवे-परांजपे हे वाढती पंक्तीत
प्रसादाचे खोरे जाती इतर ज्ञातीत
फणस भाजी, वांगी हरभरे पातळ भाजीत
पुरण लोणचे यांची गोडी नाही वर्णवत
सारच तो दिमाख चाखुनी जीव बहु धाला || प्रेमभराने _ _ _ ४ ||



कलमदानी मंडपात सहा बैठका
हरिदासाची मध्ये आणि समोर बैदिका
उजवी बाजू असे राखिली ग्रामस्थ लोकां
डावे बाजूस मानकर्‍यांची बसते मालिका
लामणदीप आणि समया तेवती चंद्रिका
दोन बैठका वाढून दिधल्या इतर त्या लोकां
कीर्तनासी प्रारंभला रंग बहु आला || प्रेमभराने _ _ _ ५ ||

गोंधळाची वेळ जाहली ऐका वृतांत
मधे गोंधळी वामभागी पुजारी तिष्ठत
चांदीची ती दिवटी बुधली विलसे हस्तात
सभोवताली साथ चालते इतर चौघांत
गोंधळगीत चालले ते ऐसे रंगात
पूजा जाहली तेव्हा केले दीप प्रज्वलीत
गीत संपले दीप समूह तो पारावर गेला || प्रेमभराने _ _ _ ६ ||

एकदिशी उत्सवात दिवस भाग्याचा
कामे असती बहु त्या दिनी वेळ महत्वाचा
दागदागिने घातलेला नवीन झिलईचा
मुखवास तो नेऊन ठेविती पेटीत अंबेचा
अबदागीर वाजंत्री नी डंका बाराचा
वारा चवर्‍या उष्मा होतो प्रवास लांबीचा
वार्षिक राज्या पाहुनी भाविक मानस गहिवरला || प्रेमभराने _ _ _ ७ ||

हंड्या ग्लासे छते लावुनी करिती तो छान
कलमदानी मंडप होतो शोभायमान
मखरताटी रथपुतळीची मूर्ती ठेऊन
आत राणी राज्या करीतसे जणू संस्थान
श्री निसबत कारभारी सही संपूर्ण
रुप्या ताटी चांदीची ती समई ठेऊन
धामधुमीचा दिवस ऐसा वेगे तो गेला || प्रेमभराने _ _ _ ८ ||

द्वादशीला लिखिते जाती तेरा ग्रामात
अजरालय मुळवट वेळवट यांत
त्रयोदशीला अमुची यात्रा त्वरे पार पडत
भालदार विडेवाटणी सेवक लोकांत
प्रातःकाली बहिरी दर्शन जन संघ निघत
चांदीचा मुखवास लागला मूर्तींना आत
पावलीची ओढ लागली ढोल्या गुरवाला || प्रेमभराने _ _ _ ९ ||

चतुर्दशीला जेवणवाडी तयार ती केली
रथ स्थापना करुनी मंडळी सत्वर परतली
भोई जेवणकीस तयारी देवळात गेली
उभाघर, तिठ्ठे आळी वाढू लागली
त्रयोदशी नी चतुर्दशी या दोन्ही दिनकाळी
चीरकदान दिवल्याचे ते मंडप भवताली
चांदीचा मुखवास लागला मंडप स्वमिनीला || प्रेमभराने _ _ _ १० ||

आज बलुते जाति सर्वही सेवक लोकांत
जोशी, खरवळे, शिधये, गद्रे ब्राह्मण ते त्यांत
क्षेत्रपाल नी रथपुतळीला केळवण होत
वेळातटीचे लोक उतरती गद्रे गृहात
चतुर्दशीचे शुभ्र चांदणे पडले प्रशांत
आजारालययिचे लोक तळ्यावर बसुनी हवा खात
डोळांभरुनी पाहुनी घ्याहो सत्वर मूर्तीला || प्रेमभराने _ _ _ ११ ||

वेळ जाहली मंडपी आले परके ग्रामस्थ
आदर सत्कारांची त्यांच्या धावपळ ती होत
ठायी ठायी उभे राहुनी वृद्ध जाणिस्त
गुलाब अत्तर वार्‍यांकरवी त्यांस देववीत
हजार त्यांचे मानकरी जे विडा उचलीत
भालदार हो प्रवेश करिती वाजत गाजत
चकित व्हावे पाहुनी ऐशा कडक शिस्तीला || प्रेमभराने _ _ _ १२ ||

पहाटेची वेळ जाहली गोंधळ उतरला
सोनियाचा कळस, आरसा, रथ सज्ज झाला
चांदीचा तो दीप लागे आज आरतीला
मंडपात ताटामधुनी गुलाल उधळीला
"आई जगदंबे अंबाबाई" भजन घोष झाला
रथाभोवती चंद्रज्योती पुष्पनळा फुलला
रथयात्रेचा पौर्णिमेचा दिवस उजाडला || प्रेमभराने _ _ _ १३ ||



पौर्णिमेच्या मंगल आणि रम्य प्रातःकाळी
रथाभोवती जमते ब्राह्मण तरुणांची टोळी
"दुर्गे दुर्गट वारी" ऐशी आरती ती सगळी
घाईघाईने खांदी घेती तेव्हा रथपुतळी
रेटारेटी कौतुक पाहे जनता ती भोळी
"हर हर महादेव" ऐशी उठे आरोळी
हौस फिटली ह्या वर्षीची रथ पुढे गेला || प्रेमभराने _ _ _ १४ ||

पाखाडीशी भोई ज्यात तयार ते असती
ब्राह्मण जाऊनी डुंगवाले रथ पुढे नेती
मिरवत मिरवत आठ वाजता गद्र्यांच्या पुढती
डेल्यावरती घेत बसला तेव्हा विश्रांती
पीठाचे ते दिवे लाउनी स्त्रिया पूजा करिती
दही पोहे थंडगारसे भोई सेविती
प्रसाद खाता "भले ग भोई" शब्द तदा स्फुरला || प्रेमभराने _ _ _ १५ ||



महाजन सदनी प्रसाद आज पुरणपोळीचा
वारी त्यांना लाभ देती आपल्या पंक्तीचा
वेळ असतो तब्बल तेथे तीन तासांचा
उपाध्याय पूजा सांगण्या हक्क स्त्रियांचा
प्रवास संपे ऐशा रीती सर्व उभागराचा
साठे आळी फिरुनी आला उलटा रथ साचा
नवागरसि भोई आले आता सेवेला || प्रेमभराने _ _ _ १६ ||

नापित पूजा घेउनी फिरला परांजपे वाडी
हक्क पुजेचा जुना स्त्रियांच्या फडक्यांच्या फेडी
होळी बहिरी पेठ आणि पिंपळ पिछाडी
दोन भाया तेकुनी तेथे कुंभार वाडी
त्वरे घेउनी इतर स्थळे आला आघाडी
शेतामध्ये पुतळादेवी त्वरे रथ सोडी
इकडे म्हणती आता रथ जड आला || प्रेमभराने _ _ _ १७ ||

गावाच्या दक्षिणेस व देवीच्या देवळाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी
सोळाव्या शतकात बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे. महाराजांनी यांना
गुरुस्थानी मानले होते व आपल्या कोकण दौर्‍या दरम्यान केळशीस येऊन
त्यांचे आशीर्वादही घेतले होते असे म्हटले जाते.

केळशीला कधी जावे: अक्षरशः वर्षातून कधीही जावे. तरीही सांगायचे झाल्यास महालक्ष्मीच्या यात्रेदरम्यान व डिसेंबर-जानेवारी ह्या थंडीच्या महिन्यांत जाणे सगळ्यात चांगले.

जवळची गावे: आंजर्ले - इथलीही यात्रा पाहण्यासारखी असते; आडे, उटंबर, दापोली, करडे, आसूद, हर्णै, मंडणगड, वेळास,
बाणकोट, श्रीवर्धन.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि केळशी:
  • कॅम्लिनचे संस्थापक श्री. नानासाहेब दांडेकर हे केळशीचे.
  • लोकमान्य टिळक यांचे आजोळ.
  • आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे.
  • मध्यप्रदेशात मराठी झेंडा फडकत ठेवणार्‍या माजी मंत्री व खासदार
    सुमित्रा महाजन यांचं सासरघरचं गाव हे केळशी.
राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.

१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी .

२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.

३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.

४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय
होऊ शकते.

५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.

५) आनंदी निवास (प्रोप्रा. प्राची प्रसाद विद्वांस)
    भ्रमणध्वनी: ९९२१ ६७७ ०९०
    पुणे: ०२०-२४२५ ४४ ७५
   
६) सुरभी (प्रोप्रा. नरेश वर्तक)
    केळशी:०२३५८-२८७२४०
    भ्रमणध्वनी: ९६२३ ११३ १६२; ९८२० ४४१ ९८५



पुण्याई व एन्-गुलमोहर समोरासमोर आहेत.

तर मग, येताय नं आमच्या केळशीला ?

संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:




आभार प्रदर्शनः माझी आजी श्रीमती कल्पना जोशी, जिच्या संग्रहात देवीच्या उत्सवाची ती कविता सापडली.

संदर्भः
टेकडीबद्दल: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.

11 comments:

  1. Laiieech Bhhaaaarrriii
    Avadla kelshi...
    Pavsalyatch jayla avdel :-)

    ReplyDelete
  2. मंदार, अप्रतिम लिहिलं आहेस रे.. आणि फोटोज अर् सुंदरच. शीर्षकही मस्त दिलं आहेस. अजून येउदे.

    ReplyDelete
  3. झ्याक आहे लेख. फोटो खूप आवडले. मजा आली वाचताना. :-)

    ReplyDelete
  4. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8613089.cms

    कोकणात ८००० वर्षांपूर्वीची सागरी भिंत
    म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी

    हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशी संस्कृती कोकणात वसत होती, याचे पुरावे पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपर्यंत अनेक ठिकाणी समुदतळाशी बांधलेल्या भिंती आढळल्या आहेत. त्या सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील विभागप्रमुख डॉ. अशोक मराठे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. ही भिंत सुमारे २२५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. ती दगडी असून, सलग नाही. त्या काळी समुद किनाऱ्यावर ही भिंत बांधली असावी, पुढे समुदाचे पाणी किनारा ओलांडून आत घुसले असावे आणि ही भिंत पाण्याखाली गेली असावी, असा अंदाज आहे. ही भिंत का बांधली असावी, त्याचे कारण स्पष्ट होत नाही.

    या भिंतीचा शोध सहा वषेर् सुरू होता. त्यासाठी उपग्रहामार्फतही काही फोटो काढण्यात आले. त्यांच्या अभ्यासाअंती आढळले की, समुदकिनाऱ्यापासून या भिंतीचे अंतर ठिकठिकाणी एक ते चार किलोमीटर आहे. श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्रॉन जेटी, वेळणेश्वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणी भिंतीचे अस्तित्व दिसले आहे. समुदातील धूपप्रतिबंधक बंधारा असे कदाचित या भिंतीचे स्वरूप असण्याची शक्यता आहे. ३१ जुलैला केंदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालयाकडे हा प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे. मोहेनजोदडो संस्कृती चार हजार वषेर् जुनी असल्याचे मानले जाते. त्या भिंंतींचे वयोमान आठ हजार वर्षे आहे. याचा अर्थ त्या काळीही कोकणात प्रगत मानवी संस्कृती नांदत होती, असेही डॉ. मराठे म्हणाले.

    ReplyDelete
  5. आणखी दोन काही हॉटेलांची नावे टाकली आहेत.

    ReplyDelete
  6. chhan mahiti milali.dhanyavad.

    ReplyDelete
  7. chhan mahiti milali.dhanyavad.

    ReplyDelete
  8. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल तर मुक्काम ठोकून.....खरोखर!
    लेख खूप छान लिहिला आहेस....वाचता वाचता महालक्ष्मीची यात्रा डोळ्यासमोर उभी राहिली... फोटो अप्रतिम... केळशीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी :)

    ReplyDelete
  9. फार मस्त ब्लॉग

    ReplyDelete
  10. फारच सुंदर लिखाण आणि फोटो

    ReplyDelete
  11. जबरदस्त... Proud To Be A Kelshikar

    ReplyDelete