Tuesday, February 1, 2022

क्लिंट इस्टवूडचा 'ग्रॅन टॉरिनो': मेक अमेरिका ग्रेट अगेन समजून घेताना

आमच्या लहानपणी सोशल मीडिया नव्हता आणि माहिती मिळवण्याचे दोन-तीनच मार्गच उपलब्ध होते ते म्हणजे सरकारी दूरदर्शन व आकाशवाणी आणि शाळेतली क्रमिक पुस्तकं. या दोन्ही माध्यमांनी असा समज करून दिला होता की कम्युनिस्ट रशिया अर्थात युएसएसआर हा भारताचा खरा मित्र. लहानपणी याच भारावलेल्या मनाने मुंबईत आलेल्या रशियन फेस्टिव्हला हजेरी लावली होती, या पातळीपर्यंत देशवासीयांचे मेंदू तेव्हा बधीर केले गेले होते. तेव्हा आमच्या बालमेंदूत राजकारणात, त्यातही आंतरराष्ट्रीय राजकारणात, कुणीही मित्र नसतो, असतात ते फक्त हितसंबंध (interests) हा प्रकाश पडायचा होता. आमचं बहुतेक लहानपण आणि तारुण्यातली काही वर्ष अमेरिकन भांडवलशाहीला नावे ठेवणारे साहित्य आणि पत्रकारितेच्या मार्फत केले गेलेले लिखाण वाचण्यात गेली नसती तरच नवल होते. 

ज्याप्रमाणे श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर आपल्यापैकी अनेकांना राजकारणात रस निर्माण झाला, त्यावर लिहावं, बोलावं, हिरीरीने चर्चा करावी, वादविवादात सहभागी व्हावं असं वाटलं, त्याच प्रमाणे २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अनेकांना अमेरिकन राजकारणातही रस निर्माण झाला. त्याची बीजे क्लिंटन आणि ओबामा यांच्या कारकिर्दीत रोवली गेली होतीच, मात्र प्रामुख्याने भारतीय जनता अमेरिकन अध्यक्ष निवडीची पद्धत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यातली साठमारी, अमेरिकन डावे आणि उजवे, अमेरिकन राष्ट्रवाद इत्यादीत रस घेऊ लागली ती ट्रम्प अध्यक्ष झाल्यावरच.  

२०१६ साली आपल्या राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा करताना निवडणुक प्रचारात एक घोषवाक्य वापरलं, जे खूप लोकप्रिय झालं, ते म्हणजे Make America Great Again (अमेरिकेला पुन्हा महान बनवा). हेच घोषवाक्य पुन्हा २०२० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळीही वापरण्यात आलं. या घोषवाक्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अभिप्रेत असलेला अर्थ नेमका कोणता जे जाणून घेण्यासाठी विकीपिडिया आणि आंतरजालावर अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. या लेखातून मात्र आपण तो अर्थ एका सिनेमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुढे लिहीण्याआधीच सांगतो, हा लेख वाचून सिनेमा बघायला गेलात तर कदाचित तुम्हाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन सिनेमा म्हटल्यावर तुम्हाला अभिप्रेत असलेला मसाला त्यात नाही. दुसरी गोष्ट अशी की हा लेख थोडासा वरातीमागून घोडं या प्रकारात मोडतो, कारण आता ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, आणि पुन्हा निवडणुक लढवायची त्यांची इच्छा असली तरी २०२४ साली रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार कोण असेल हे आज छातीठोकपणे कुणालाच सांगता येणार नाही. 

MAGA

हा सिनेमा म्हणजे लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेता क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शित केलेला व त्याचीच प्रमुख भूमिका असलेला Gran Torino हा २००८ साली आलेला चित्रपट.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------

डाव्यांनी गेली सत्तर वर्ष अमेरिका पोखरण्याकडे विशेष लक्ष दिल्याने अमेरिका त्यांच्या जीवनमूल्यांना आव्हान देत असलेल्या एका सांस्कृतिक संकटाचा सामना करत आहे. अनेक वर्ष "ह्या ह्या, अमेरिकेला कसली आलीये संस्कृती" या समजाखाली असल्याने मला याबद्दल वाचन करताना अनेक गोष्टी ध्यानात आल्या. तसं बघायला गेलं तर Gran Torino हा एक अत्यंत सामान्य कथा असलेला चित्रपट आहे, पण लक्षपूर्वक बघितल्यास अमेरिकन जीवनमूल्यांवर एक उत्तम भाष्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. सिनेमातले अनेक घटक अमेरिकन जीवनमूल्यांचे दर्शन घडवत असतानाच त्यांवर घोंघावणार्‍या संकटांकडेही लक्ष वेधते. हा सिनेमा २००८ साली आला तेव्हा क्लिंट इस्टवूड ७८ वर्षांचे होते. हे म्हातारबुवा आजही तितक्याच तडफेने चित्रपटक्षेत्रात सक्रीय आहेत आणि अजूनही अनेक वर्ष काम करण्याची खुमखुमी राखून आहेत. दुसरं विश्वयुद्ध आणि कोरियन युद्ध अमेरिकेच्या ज्या पिढीने अनुभवलं त्या पिढीचं क्लिंट प्रतिनिधित्व करतात. स्वतः क्लिंट हे कोरियन युद्धात लढलेले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका ज्या पिढीचे क्लिंट हे जिवंत उदाहरण आहेत. अस्सल अमेरिकन मातीने बनलेले आहेत.

Clint Eastwood in Gran Torino

क्लिंट इस्टवूडच्या या सिनेमातले त्यानेच साकारलेले प्रमुख पात्र आहे कोरियन युद्ध लढलेला एक माजी सैनिक वॉल्ट कोवाल्स्की. वॉल्ट फोर्ड कंपनीतून निवृत्त झालेला आहे आणि एकेकाळी अमेरिकन चारचाकी उद्योगाचा पाठीचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेट्रॉइटमधे राहत असतो. आता तिथे फारसे अमेरिकन राहत नाहीत. आता तिथे व्हियतनाम युद्धात लाओसच्या कम्युनिस्ट कब्जानंतर विस्थापित झालेले आणि अमेरिकेत स्थलांतर केलेले हमोंग जमातीचे लोक राहतात. चित्रपट सुरु होतानाच आपल्याला दिसतं की वॉल्टच्या बायकोचं नुकतंच निधन झालं आहे आणि वॉल्ट त्या घरात एकटाच डेझी या आपल्या म्हातार्‍या लॅब्रेडॉर कुत्रीसोबत राहतो. वॉल्ट आणि त्याच्या मुलांचे एकमेकांशी पटत नाही आणि त्याची मुले त्याच्याशी एक अंतर राखूनच वागतात. वॉल्टची नातवंडे आजोबाकडे असलेल्या वस्तू कशा मागायच्या या चिंतेत. कडवा अमेरिकन असलेल्या वॉल्टचे सगळे शेजारी आशियायी हमाँग जमातीचे लोक आहेत. वॉल्टला ते अजिबात आवडत नाहीत आणि तसं तो अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवतो; त्यांच्यापैकी त्याच्या सख्ख्या शेजारी असलेल्या हमोंग कुटुंबातील ताओ हा किशोरवयीन मुलगा त्याच्याकडे त्याच्याकडे जंपर केबल मागायला येतो तेव्हा वॉल्ट त्याची zipperhead म्हणून संभावना करतो. ताओची एक बहीण आहे (सू). कोमल हृदयाच्या लिबरंडू मंडळींनी हा सिनेमा बघूच नये कारण संपूर्ण चित्रपटभर वॉल्टच्या तोंडी अशी वांशिक शेरेबाजी आहे आणि त्याला येणारी उत्तरेही मजेशीर आहेत. आणखी एक पात्र आहे ते म्हणजे त्याच्या बायकोचे 'अंत्यसंस्कार' करणारा एक तरूण पाद्री. वॉल्टच्या बायकोची वॉल्टने चर्चमध्ये कन्फेशन बॉक्समधे एकदा तरी जावं अशी इच्छा होती असा दावा तो करतो. अर्थातच वॉल्ट त्याला हाडतुड करुन हाकलून लावतो. वॉल्टला अधुनमधून खोकला येतो आणि त्याला असलेला आजार वॉल्ट जगापासून लपवतोही. एकंदर वॉल्ट कोवाल्स्की हा जगाला कावलेला तिरसट म्हातारा म्हणून आपल्यापुढे येतो.

Walt and Tao

ताओ हा साधाभोळा, जवळपास बावळट आहे. तिथल्या हमाँग मवाल्यांपैकी काही गुंड त्याला आपल्या टोळीत सामील करुन घ्यायला नेतात आणि वॉल्टची १९७२ सालची मॉडेल असलेली फोर्ड ग्रॅन टोरिनो (Gran Torino) चोरायला सांगतात. नवखा असलेला ताओ गाडी चोरताना बावचळतो, वॉल्टला त्याच्या आवाजाने जाग येते आणि तो आपली भलीथोरली रायफल घेऊन त्याला तिथून हुसकावून लावतो. नंतर त्याच ताओला मारहाण करायला आलेल्या त्याच गुंडांपासून वॉल्ट त्याला वाचवतो आणि चक्क त्याच्या कुटुंबाचा जवळचा माणूस होतो. हळूहळू वॉल्ट थाओला आपल्या पंखांखाली घेतो. वॉल्ट त्याला टोळीत जाण्यापासून रोखतो, त्याला लहानमोठी मॅकेनिकची आणि प्लंबरची कामे करायला शिकवतो, लोकांशी कसं बोलावं वागावं याचे धडे देतो, आपला बावळटपणा दूर करुन त्याच्या आवडीच्या मुलीला डेटवर कसे न्यावे याच्या टिप्स देतो, आणि तिला फिरवता यावं यासाठी वॉल्ट एरवी कुणाला हातही लावू देत नसे अशी त्याची प्राणप्रिय Ford Gran Torino गाडी देतो.  या सगळ्या गोष्टी त्या हमाँग टोळीला आवडत नाहीत आणि चित्रपटाची पुढची कथा ही याच संघर्षाची आहे. 

Walt teaches Tao to fix his roof

गंमत म्हणजे वॉल्ट स्वतः पोलिश स्थलांतरित आहे... पण आतून पूर्णपणे अमेरिकन आहे. अर्थात अमेरिका हा जवळपास अख्खाच स्थलांतरितांचा देश आहे पण जसेजसे ते तिथल्या जीवनमूल्यांना आत्मसात करत जातात तसे तसे ते अमेरिकन होत जातात. वॉल्ट ज्या भागात राहतो तिथे सगळेच स्थलांतरित आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपटभर वांशिक आणि इतर तिरकस  शेरेबाजी दिसते (politically incorrect innuendo). वॉल्ट पोलिश आहे, त्याचा न्हावी इटालियन आहे, आणि दोघे एकमेकांना शिव्या देण्याच्या आवेशात पोलॅक (पोलिश  लोकांसाठी वापरला जाणारा पर्यायवाची अपमानजनक शब्द) आणि 'ज्यू' म्हणतात. शेजारच्या हमाँग मुलीला म्हणजे सू ला तो म्हणतो माझ्या कुत्र्याला खाऊ नका त्यावर ती चेष्टेतच पण ताडकन उत्तरते की नाही आम्ही फक्त मांजरंच खातो. कुणीही या वांशिक शेरेबाजीचं वाईट वाटून घेत नाही आणि कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. हळूहळू आपल्याला कळत जातं की स्थलांतरितांप्रती असलेला वॉल्टचा राग हा वांशिक नसून त्यांच्यात त्याला जो अमेरिकन जीवनमूल्यांचा अभाव दिसतो त्यावर आहे. तो लोकांना जशी जशी आपल्यात अमेरिकन जीवनमूल्ये आत्मसात करताना बघतो, वॉल्टच्या मनात त्यांच्याबद्दल तशी तशी स्वीकृतीची भावना वाढत जाते. समोरच्या घरातल्या एका बाईच्या हातून गाडीतून पिशव्या काढताना भाजी/फळं पडतात तेव्हा तिची चेष्टा करणार्‍या तीन मवाल्यांना पाहून 'काय ही आजची पिढी' असे निराशाजनक उद्गार काढणारा वॉल्ट तिच्या मदतीला जाणार तोच तो ताओला तिच्या मदतीला धावून जाताना पाहून चमकतो. ताओ मग तिच्या घरापर्यंत सामान पोहोचवतो आणि इकडे वॉल्ट हे बघत आपला आधीचा समज खोटा ठरल्याचे पाहून सुखावतो. वॉल्ट ताओला आपल्या हाताखाली घेऊन निरनिराळी कामे शिकवतो. त्याला आपली बाग साफ करायला लावतो, त्याच्याकडून आपले घर रंगवून घेतो, आपल्या घराचे छत त्याच्याकडून दुरुस्त करुन घेतो आणि स्वतः ताओच्या घराचं तुंबलेलं ड्रेनेज साफ करुन देतो. हळूहळू ही सगळी कामे शिकवल्यावर त्याला आपल्या एका बिल्डर मित्राकडे कामाला लावतो... बिल्डर मित्राशी बोलतानाही वॉल्ट तो आयरिश आहे यावर शेरेबाजी करायला विसरत नाही. अशा तर्‍हेने तो जवळजवळ गँगमधे सामील होण्याच्या बेतात असलेल्या एका तरुणाचा गुरू होतो, त्याला योग्य मार्गावर आणतो आणि त्याला एक कर्तव्यपरायण नागरिक म्हणून जगायला शिकवतो. अमेरिका घडवणार्‍या प्रमुख जीवनमूल्य 'आपल्या हाताने आपली कामे करावीत आणि स्वतःसाठी मेहनतीने कमवून जगावे' आहे आणि वॉल्ट त्याचे मूर्त रूप आहे.

Irish builder

Italian barber

दुसरीकडे त्याच्यासमोर आणखी एक अमेरिका आहे जी पुढच्या पिढीला गिळंकृत करायला उभी आहे. सामाजिक न्यायाअंतर्गत (social welfare) वेगवेगळ्या भत्त्यांवर जगणारे बेरोजगार स्थलांतरित तरुण गुन्हेगारीकडे वळलेले त्याला दिसतात. एकेकाळी आपल्या कुशीत भरभराटीला आलेला अमेरिकन कार उद्योग बघितलेले डेट्रॉईट आज अमेरिकन जीवनमूल्यांच्या र्‍हासाचा साक्षीदार असलेले एक उद्ध्वस्त शहर आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ऑटॉमोबाईल उद्योग लोकांना भत्ताजीवी करुन ठेवणार्‍या सामाजिक न्याय योजना, कामगार संघटना, आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेपुढे तग धरू शकला नाही, आणि त्या वॉल्टच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला ज्याने फोर्ड मोटर कंपनीत तीस वर्ष काम केलं होतं आणि ज्या वॉल्टची सर्वात मौल्यवान प्रॉपर्टी म्हणजे १९७२ची चमकदार मॉडेल ग्रॅन टोरिनो होती. 

मी नेहमी सांगतो तसं हा चित्रपटही बघण्यात मजा आहे, इथे सगळे सांगून तुमची मजा घालवू इच्छित नाही. पण आपला मुख्य विषय सिनेमाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांची Make America Great Again या घोषणेतून नेमकं काय अभिप्रेत होतं हा आहे, तेव्हा त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगणे अत्यावश्यक आहे.

चित्रपट संपता संपता वॉल्ट त्या तरुण पाद्र्याला, फादर जॅनोविचला जाऊन भेटतो आणि मला कन्फेशन मधे जायचे आहे असे सांगतो. वारंवार मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तुसड्यागत वागून आपल्याला हाकलणारा वॉल्ट आज  अचानक कन्फेशनमध्ये जायला कसा काय तयार झाला असे फादरला साहजिकच आश्चर्य वाटते. वॉल्ट कोरियन युद्धात लढलेला माजी सैनिक आहे आणि युद्धाच्या अनेक अत्यंत क्लेशकारक स्मृती तो बाळगून आहे. युद्धात त्याने अनेक शत्रूसैनिक इत्यादी लोकांना ठार केलेले आहे. पण वॉल्टच्या कन्फेशनमधे कोरियन युद्धाचा उल्लेखही येत नाही. वॉल्ट कोवाल्स्की ज्या तीन गोष्टींचीव कबूली देतो त्या असतात:

(१) १९६८ सालच्या एका क्रिसमस पार्टीत त्याने एका परस्त्रीचं चुंबन घेतलेलं असतं.
(२) एकदा एक बोट आणि तिची मोटर विकून आलेल्या ९०० डॉलर रकमेवर कर भरलेला नसतो; ही एक प्रकारे चोरीच झाली.
(३) आपल्या दोन्ही मुलांशी त्याचे कधीच घट्ट नाते तयार होऊ शकलेले नसते, त्यांना तो कधीच समजून घेऊ शकला नाही ही त्याची खंत असते. का कोण जाणे पण असे झालेले असते खरे. 

वॉल्ट जे कन्फेस करतो, आणि जे करत नाही, त्यातून अमेरिकन कोअर वैय्यक्तिक जीवनमूल्ये कोणती हे आपल्याला कळतं. ज्या तीन गोष्टींची त्याला खंत असते, ज्या गोष्टी 'कन्फेस' करणे त्याला आवश्यक वाटले ती त्याच्या लेखी पापं असतात. नात्यात एकनिष्ठ असणे, व्यवसायिक आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता, आणि कुटुंबाची, मुलांची प्रेमळपणे काळजी घेणे ही ती जीवनमूल्ये होत. युद्धावर जाणे आणि माणसे मारणे हे दु:खद असले तरी पाप समजली जात नाहीत, वॉल्टही तसं समजत नाही.  

Walt in confession

हां, ही एक गोष्ट वेगळी की आपल्यासमोर येणारे अमेरिकेचं चित्र अगदी वेगळे आहे ज्याच्याशी या तीन मूल्यांची कुठेही सांगड घालता येत नाही. पण अमेरिकेला मोठे करण्यात, जगाचे नेतृत्व करावे इतक्या पातळीवर आणून ठेवण्यात याच मूल्यांचे कसोशीने पालन करणार्‍या पिढीचा मोठा वाटा आहे. आज समाजवादी वेलफेअर स्टेट बनलेल्या डेमोक्रॅट अमेरिकेत याच मूल्यांचे वेगाने पतन होताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची आज अनेकांवर वेळ आलेली आहे. याचमुळे अफगाणिस्तान सारख्या सटरफटर देशातून मार खाऊन परतलेल्या अमेरिकेची सदसद्विवेकबुद्धी इतकी सडलेली आहे की सत्ताधार्‍यांचा कसल्याही प्रकारचं विचारमंथन करण्याकडे कल उरलेला नाही. याचमुळे आज भारतीयांना अमेरिकेच्या घेण्याजोग्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत; दिसतं काय तर दारू ढोसून नाचणारा आणि अर्धनग्न पोरींच्या मागे धावणारा अमेरिका नावाचा देश, आणि त्याचीच नक्कल करावीशी वाटते. या समाजवादी डेमोक्रॅट संकटतून अमेरिका बाहेर येईल का, ट्रम्प यांच्या स्वप्नातली अमेरिका, Make America Great Again ही घोषणा सत्यात येईल का, हे मात्र तिथल्या जनतेवरच अवलंबून आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

श्री नरेन्द्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे या कडव्या राष्ट्रवादी मानसिकतेच्या त्रयीचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणखी काही काळ राहिला असता तर कदाचित आजचे चित्र थोडे वेगळे दिसले असते. पण दुर्दैवाने २०१६ मध्ये प्रकृतीच्या कारणास्त्व शिंजो अ‍ॅबे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि २०२१ साली झालेल्या वादग्रस्त निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. आज जागतिक राजकारणाच्या पटलावर फक्त आपल्या देशात पंतप्रधान नरेन्द्र मोदीच घट्टपणे पाय रोवून उभे आहेत. जागतिक घडामोडींचा ज्याप्रमाणे भारतावर प्रभाव पडतो, त्याचप्रमाणे भारतीय ध्येयधोरणांचाही आंतरराष्ट्रीय राजकारणात पडसाद जाणवतात. म्हणूनच राष्ट्रीय चरित्र निर्माण करायचे असेल, भारतीय जीवनमूल्ये जपायची असतील, हिंदू संस्कृतीचा र्‍हास रोखायचा असेल तर आज आपण सगळ्यांनी त्यांच्या लहानमोठ्या चुका, आपापसातले क्षुल्लक मतभेद, आणि भाषा/प्रांतवाद, यांच्या पलीकडे विचार करत श्री नरेन्द्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यकच नव्हे तर अनिवार्य आहे.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ १५, शके १९४३