Thursday, March 28, 2019

सबद सबद हर कोई कहे

अधूनमधून कधीतरी ऑनलाईन वैफल्याचा किंवा वैराग्याचा झटका येतो आणि असा विचार येतो की आपण जे फेसबुकवर राजकीय, धार्मिक, विनोदी पोस्ट करत असतो किंवा Meme टाकत असतो, किंवा क्वचित कौटुंबिकही पोस्ट करत असतो, ते टाकू नये, काय फायदा?

अशाच मनस्थितीत असताना एका व्यक्तीच्या वॉलवर काहीतरी विपरीत घडल्याचं वाचलं जातं. इनबॉक्समध्ये चौकशी केल्यावर कळतं त्या व्यक्तीच्या बाबांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ती व्यक्ती म्हणते की माझे बाबा आजारी असताना मी काही वेळा तुझ्या राजकीय आणि विनोदी दोन्ही पोस्ट त्यांना मी वाचून दाखवत असे. तुझ्या विनोदी पोस्ट ऐकून आणि Meme त्यांना दाखवल्यावर ते माझ्याबरोबर खूप हसायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायचं श्रेय तुला जातं. तुझ्याच एका पोस्टमुळे बाबा गेल्यावर आईच्या चेहर्‍यावरचं लोपलेलं हसू परत आलं आणि आई पुन्हा आनंदी दिसू लागली (तिचे शब्द - she became jovial). त्याबद्दल तुझे खरंच आभार आहेत.

गंमत म्हणजे या व्यक्तीला मी कधी भेटलोही नाहीये आणि ऑनलाईन वगळता ओळखही नाही. पण बोलून दाखवणारी ही पहिलीच व्यक्ती भेटली आहे. असा आनंद नकळत किती जणांना वाटला गेला असेल ते त्या गजाननालाच माहीत. तो सुखकर्ता तो दु:खहर्ता. तोच कर्ता तोच करविता.

संत कबीरांचे शब्द आहेत:
सबद हर कोई कहे
सबद के हाथ न पांव
एक सबद औषध करे
एक सबद करे घांव

किती खोल अर्थ भरलेला आहे या दोह्यात!  बाहेरून घरी आलेल्या नवरा, बायको, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, दीर, सासू, सासरे, मित्र, मैत्रीण, किंवा अगदी शेजार्‍यालाही अशा कुणालाही तो एकदम ताजातवाना दिसत असला तरी "कसे आहात? दमलेले दिसता? आराम करा जरा." असं म्हणालात तर ती व्यक्ती आणखी प्रसन्न होईल आणि दमलेली असेल तर खरंच ताजेतवाने वाटू लागेल. अर्थात, "एक सबद औषधि करे". एक शब्द औषधासारखा काम करतो. मात्र हे औषध एकदाच लावून भागत नाही. ते वारंवार लावावं लागतं. हेच मनाचं औषध.

एक सबद करे घाव...पण घाव घालायला मात्र एखादाच शब्द पुरतो. गजाननाकडे प्रार्थना आहे की माझ्याकडून वापरले गेलेले सबद 'एक सबद औषध करे' असे आनंद देणारेच असूदेत.  आणि चुकूनही स्वतःहून 'एक सबद करे घांव' होऊ नये.

आणि अशा रीतीने ऑनलाईन वैफल्य, वैराग्य चुलीत घालून मी परत फेसबुकवर, सोशल मिडीयावर तुम्हाला 'पिडायला' हजर!




© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ ८, शके १९४०