Monday, August 1, 2022

खर्रा इतिहास: सिलसिला ए मुरब्बा

विकेंड हिस्टोरियन लोकांच्या नादाला लागू नका. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला याचा आमच्याकडे पुरावा आहे. एकदा काय झालं की साधूवृत्तीच्या जिल्लेइलाही औरंगजेब सरांच्या सैन्य अभ्यासात लाडके थोरले बंधू दारा शिकोह अपघाती मरण पावल्यापासून औरंगजेब सर फार म्हणजे फार दु:खात होते. त्यांचं चित्र काढायला छानसा चित्रकारही मिळेना. मग शहेनशहा औरंजेब सरांनी एक आयडीया केली. ती काय ते पुढे कळेलच.

असेच काही दिवस गेल्यावर, आणि दिवस गेल्यावर, बेगम साहेब गच्चीत फेरफटका मारत असताना त्यांना महालातल्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीच्या खिडकीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. नीट लक्ष देऊन ऐकले असता एक लहान मुलगा  "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे रडता रडता म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरं म्हणजे बेगम पहिल्या मजल्यावर जायला घाबरायच्या. त्याचं काय झालं की एकदा जिल्लेइलाही औरंगजेब सरांचे मरहूम अब्बाहुजूर.... असो. तो विषय पुन्हा केव्हातरी. 

तर धीर एकटवून त्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीत डोकावल्या. तिथे दारा शिकोहचा थोरला सुलेमान एका बरणीकडे पाहून मोठमोठ्याने "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे म्हणत रडत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन बघतात तो काय, त्या बरणीत मरहूम भाऊजींचे शिरकमल...नको कमळ नको...आपण डोकं म्हणूया. तर मरहूम भाऊजींचं डोकं एका रसायनात घालून ठेवलेलं दिसलं. ते पाहताच बेगमना परवाच कोकण सुभ्यातून सरदार जोशुद्दीन आणि सहस्त्रबुद्दीन यांनी पाठवलेल्या कैर्‍यांचे गोड काय करायचे या प्रश्नावरचा उपाय सापडला.  

"कोण आहे रे तिकडे?" असा चारपाच वेळा आवाज देऊनही कुणी ओ देत नाही म्हणून भडकलेल्या बेगमसाहेबांना आपण अजून पहिल्या मजल्यावरच आहोत याचं भान आलं आणि त्यांनी सुलेमानलाच ती बरणी घेऊन बावर्ची खान्यात पाठवलं. तिथेही लोक "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे किंचाळू लागले. बेगम मागोमाग तिथे पोहोचल्या आणि खानसाम्याला नेमकं काय करायचं आहे ते समजावून सांगितलं. 

आणि अशा रीतीने "म्म्म्म्म्म्म अब्बा" या उद्गारांचा मुरांबा असा मुघली अपभ्रंश होऊन तो शब्द मान्यता पावला. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला असल्याचे या गोष्टीवरुन सिद्ध होते. हा खरा इतिहास तुम्हाला कुणीच सांगणार नाही. 

#म्हैत_नसलेला_औरंग्या #सिलसिला_ए_मुरब्बा #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास

मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ८४०, ओळ ८

© मंदार दिलीप जोशी