Thursday, September 19, 2013

हे आणि ते - २: सुशिक्षित आणि सुसंस्कृत


 लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.

पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्‍याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.

- मंदार
१९.०९.२०१३
भाद्रपद शु. १५. पौर्णिमा, शके १९३५

--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार
--------------------------------------------------------------------------------------

Saturday, September 7, 2013

काही मनातले


मी नुकतंच एका नास्तिक इसमास फेसबुकवर मित्रसूचीतून काढून टाकलं. नाही. मी त्याला तो नास्तिक आहे म्हणून काढलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात माझा मित्र तो कधीच नव्हता. पण त्याचं थोबाड रोज बघणं हा माझा नाइलाज आहे. तर कारण असं घडलं की गोकुळाष्टमीच्या काही दिवस आधी रस्त्यावरची पोस्टर बघून त्याच्या मुलाने म्हणे त्याला विचारलं राधा कृष्णाची कोण? तर त्याला म्हणे अवघडल्यासारखं झालं आणि म्हणे राधा कृष्णाची जवळची मैत्रिण. तो म्हणतो awkward mythology. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्याचसारखी सडलेली विचारसरणी असलेल्या त्याच्या फेसबुकी मित्रांच्या घाणेरड्या पोस्टी वाचल्या. मी त्याला आणि त्या पोस्टवर आलेल्या काही खोडसाळ पोस्टींना प्रतिउत्तर दिल्यावर त्याला मी भगवी चड्डी घातली असल्याचा साक्षातकार झाला आणि त्याने आणखी काही तारे तोडले. त्याचं पर्यावसान मी त्याला माझ्या मित्रसूचीतून काढून टाकण्यात झालं.

माझं इतकंच म्हणणं आहे, की तुम्ही नास्तिक आहात, देव मानित नाही....त्या मताचा, त्या भावनेचा मी आदर करतो. मी तुम्हाला देव माना म्हणून समजवायला कधीच जाणार नाही, तसेच तुमच्या मताचा कधीही जाहीर कुचेष्टा किंवा अनादर करणार नाही. परंतु या नाण्याला अर्थातच दुसरी बाजू आहे अशी की तुम्ही माझा धर्म, देव, उत्सव, संस्कृती व तिचे अनेक पदर, त्या संदर्भातल्या असंख्य गोष्टी याबद्दलच्या माझ्या भावनांचाही आदर राखलाच पाहिजे. चिकित्सा म्हणून चर्चा करणे ठीक, पण वरील गोष्टींबद्दलची कुचेष्टा, अनादर, आणि त्या गोष्टींविषयीच्या कुचाळक्या मला चालणार नाहीत. तसे तुम्ही करणार असाल, तर फेसबुकावरुन तुम्ही स्वतःच मला तुमच्या मित्रसूचीतून काढून टाका. फेसबुकावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातूनही माझे मित्र राहू नका. न काढल्यास मला अशी फालतूगिरी केलेली दिसल्यास मीच काढून टाकेन. फेसबुकावरुन आणि प्रत्यक्ष आयुष्यातही. गणपतीबाप्पा तुम्हाला इतरांपेक्षा जास्तच सदबुद्धी देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. लवकर बरे व्हा. गेट वेल सून.

धन्यवाद.

- मंदार

ता.क. आणि हो, मी उद्या आणि परवा तुमच्यासारख्यांच्या नाकावर टिच्चून नारळही फोडणार आहे, बरं का!!