Thursday, September 19, 2013

हे आणि ते - २: सुशिक्षित आणि सुसंस्कृत


 लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.

पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्‍याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.



त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.

- मंदार
१९.०९.२०१३
भाद्रपद शु. १५. पौर्णिमा, शके १९३५

--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार
--------------------------------------------------------------------------------------

13 comments:

  1. chhan lihilayas Mandar! yach karanastav me pustaka share karana lahanpanich band kelay.

    ReplyDelete
  2. मंदार विचार... मंदार सुविचार....
    सुंदर..... !!!!

    ReplyDelete
  3. chanach lihale tasehi shikshnacha susanskrut panashi kahi sambadh nahi shikalele lokhee kase kevha kase vagatil hyacha nem nahi ..barech anubhav aale aahet ashya lokanche fakt swataha purate jagatat he lok....

    ReplyDelete
  4. ९२-९३ मधली गोष्ट... माझ्याकडे असलेलं शेलारखिंड पुस्तक मागे एका मित्राने वाचायला नेलेलं... तो, त्याच्या घरातले सगळे मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेले... आई संस्कृतची - वडील मराठीचे प्राध्यापक... म्हटलं चांगल्या मुलाला देतोय वाचायला.... पुस्तक चांगल्या अवस्थेत परत येईल... ते पुस्तक स्वतः बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना त्यांच्या स्वाक्षरीनिशी सप्रेम भेट दिलेलं... पुस्तक घेऊन गेला वाचायला मित्र... ६ महिने झाले पुस्तक दिला नाही म्हणून मी त्याच्याकडे मागितलं... त्याने देतो देतो केलं.... ८ महिने- १० महिने- १ वर्ष........ शेवटी मीच त्याच्या घरी एकदा जाऊन बसलो.... म्हटलं आता पुस्तक मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही.... शेवटी नाईलाजाने त्याला ते पुस्तक मला परत करावं लागलं.... पण त्या पुस्तकाची अवस्था पाहून मला एकदम रडायला- चिडायला झालं..... प्रत्येक पान अन पान सुट केलेलं.... तसाच निघालो.... बाईंडर शोधले.... पण कोणीच ते पुस्तक बाईंडिंग करून देईना... खूप जुनं होतं पुस्तक.... पहिली आवृत्ती.... अजून ते तसच आहे.... पत्रावळ्या झालेलं.... प्लास्टिक मध्ये बांधून ठेवलेलं... आता ते त्याच्या सुट्या अवस्थेमुळे कोणीच वाचू शकत नाही.....

    ReplyDelete
  5. चांगला लेख आहे. मी जर त्या मुलाच्या जागी असतो तर मंदारच्या पुस्तकात कागदी चिठ्ठ्या खुपसल्या असत्या. हवे ते शब्दार्थ लगेच मिळाले असते आणि पुस्तकाचं नुकसानही झालं नसतं.

    -गा.पै.

    ReplyDelete
  6. Khup diwas zale. Apan samparkat nahi. Uttam lekhanala Shubhecchya

    ReplyDelete
  7. पोस्ट छानच!

    पुस्तकांची घडी घालून, तिरकी तारकी दुमडून, जेवताना सांडून ते पुसल्यासारखे करताना अजूनच पिवळे करणारी लोकं डोक्यात जातात अगदी.

    मुळात नीटनेटकेपणा, गोष्टींची काळजी हा स्वभाव असावा लागतो. नसेल तर तो अंगी बाणवता येतो पण तितकी कळकळ हवी नं.

    ReplyDelete
  8. मस्त...! खूप आवडला.

    ReplyDelete
  9. शिक्षित असणं वेगळं आणि सुशिक्षित असणं वेगळं

    ReplyDelete