Tuesday, December 21, 2010

चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट

अमेरिकेत एक चावट विनोद प्रसिद्ध आहे.........

प्रश्न: Why are most hurricanes named after women?
उत्तरः When they come, they're wild and wet; and when they go, they take your house and your car.

आता यातला द्वैअर्थी भाग माफ केला तरी वरचं वाक्य शंभर टक्के खरं आहे. लग्न हा एक करार असतो असं आपण म्हणतो, पण अंकल सॅमच्या देशात ते शब्दशः अंमलात आणलं जातं आणि याचंच प्रतिबिंब हॉलिवुडच्या असंख्य चित्रपटांत आपल्याला अनेकदा दिसतं. प्रिनुप्टिकल अ‍ॅग्रीमेंट उर्फ प्री-नप म्हणजेच विवाहेच्छूक जोडप्याने(!!) लग्नाआधी केलेला एक कायदेशीर करार. या करारात असणारी कलमं, अटी वगैरे गोष्टी प्रत्येक करारागणिक बदलत असल्या, तरी प्रामुख्याने त्यात घटस्फोट झाल्यास स्थावर व जंगम मालमत्तेची वाटणी आणि पोटगी यासंदर्भात सविस्तर विवेचन केलेलं असतं.

हा करार करण्याचं प्रमाण प्रचंड वाढण्याचं - आणि मग ओघाने त्या संदर्भात अनेक वकिलांची या विषयात 'सुपर स्पेशालिटी' तयार होण्याचं - कारण असं की अशा कराराअभावी जर घटस्फोट झाला (आणि विशेषतः जोडप्यापैकी श्रीमंत पार्टीचे म्हणजेच बहुतेक वेळा नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले), तर नवर्‍याच्या मालमत्तेला साधारण पन्नास टक्के हिस्सा बायकोला मिळतो. तो हिस्सा इतका मोठा असू शकतो की आंधळ्या प्रेमापोटी किंवा निव्वळ हलगर्जीपणामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करुन अनेक नवरोबा स्वतःचे सर्वस्व गमावतात, तर काहींवर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ येते. लेखाच्या सुरवातीला मी जो विनोद सांगितला त्याला ह्याच कायदेशीर धुलाईचा संदर्भ आहे.

घटस्फोट म्हटलं की नवरा-बायकोची दुखावलेली मनं, मुलांचं उध्वस्त झालेलं भावविश्व, एक मोडलेलं घर, अशा असंख्य गोष्टी आपल्या (म्हणजे निदान माझ्या तरी भाबड्या भारतीय) मनात येतात. अमेरिकेला मात्र ही गोष्ट नवीन नाही. तिथे हे सर्रास चालतं (आता इथेही ते 'सर्रास' या पातळीवर होऊ लागलंय म्हणा...असो). पण म्हणतात ना, अती झालं आणि हसू आलं. अमेरिकेतली ढासळलेली विवाहसंस्था व विचित्र कौटुंबिक कायदे आणि त्यांचा संधीसाधू वकिलांच्या (ही द्विरुक्ती आहे!!) सहाय्याने पदोपदी घेतला जाणारा गैरफायदा यांच्यावर उत्तम मार्मिक भाष्य करणारा आणि त्याबरोबरच खो खो हसवणारा कोएन बंधूंचा 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' हा चित्रपट हा या लेखाचा विषय.




धमाल तरीही सकस कथा आणि मोठे 'स्टार्स' असलेला कलाकारांचा संच ही या चित्रपटाची प्रमुख जमेची बाजू. मी मागील दोन लेखात म्हटल्याप्रमाणे असले वेगळे सिनेमे आपल्याकडे प्रदर्शित होत नाहीत, आणि समजा झाले तरी कधी आले कधी गेले समजत नाहीत. तसा 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' आपल्याकडे लागल्याचंही मला समजलं नाही. जॉर्ज क्लूनी हा माझ्या आवडत्या नटांपैकी एक. त्याचा 'बर्न आफ्टर रीडींग' (२००८) हा ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट अगोदरच पाहिला असल्याने आधीच आलेल्या 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' (२००३) बद्दल अधिकच उत्सुकता होती, आणि एक झकास विनोदपट म्हणून लोकप्रिय झालेल्या या चित्रपटाने आणि क्लूनीने त्यांच्याकडून असलेल्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या.

माईल्स मॅस्सी (जॉर्ज क्लूनी) या घटस्फोट तज्ञ वकिलाने मॅस्सी प्री-नप म्हणून ओळखल्या जाणारा कराराचा विवाद-प्रूफ मसूदा तयार केलेला असतो. या मेस्सी प्री-नप मध्ये कोणीही एखादी पळवाट किंवा अन्य काही कायदेशीर खुसपट काढू शकलेलं नसतं याचा त्याला सार्थ अभिमान असतो. मॅस्सी प्री-नपमध्ये अशी कलमं असतात की घटस्फोट झाल्यास लग्न करताना तुम्ही जे आणाल आणि लग्न टिकेपर्यंत कमवाल तेच तुम्हाला स्वतःबरोबर नेता येईल, बाकी काहीही नाही - मग घटस्फोट कुठल्याही कारणाने का झाला असेना. त्यामुळे ह्या प्रि-नप करारावर जे जोडपं सही करेल त्यांनी काहीही झालं तरी आपल्या संपत्तीच्या दृष्टीने निश्चिंत रहावं असा त्या मसुद्याचा लैकिक. हाच मॅस्सी प्री-नप नामक लग्नपूर्व करार या चित्रपटात अनेकदा प्रमुख भूमिका बजावताना दिसतो.

तर, माइल्स मॅस्सी हा आपल्या वकिली हुशारीबरोबरच खाजगी गुप्तहेरांच्या मदतीनं तसंच जमेल ते भले-बुरे मार्ग वापरून अशक्यप्राय भासणारे अनेक खटले जिंकून एक यशस्वी आणि अजिंक्य डिव्होर्स लॉयर म्हणून प्रस्थापित झालेला असतो. अशाच एका खटल्यात लफडेबाज बायकोचं वकीलपत्र घेतलेला मॅस्सी तिचे विवाहबाह्य संबंध पुराव्यासकट सिद्ध होण्यासारखे असूनही शिताफीने बाजी उलटवून तिला खटला जिंकून देत तिच्या डोनोवन डोनॅली (जेओफ्री रश) या टि.व्ही. प्रोड्युसर नवर्‍याला या खटल्यातून संपूर्णपणे कफल्लक बनवतो, तर अन्य एका खटल्यात बायकोचं लफडं शोधून काढून तिच्या नवर्‍याला वाचवतो.

एके दिवशी त्याच्याकडे एक 'पकडला गेलेला' नवरोबा येतो. एका टवळी बरोबर मोटेलमध्ये मजा करताना अचानक त्याच्या बायकोने, म्हणजेच मॅरिलिन रेक्सरॉथने (कॅथरिन झेटा-जोन्स) नेमलेला खाजगी गुप्तहेर त्या जागी येऊन त्या दोघांच्या चाळ्यांचं चक्क व्हिडीओ चित्रिकरण करतो. ही खरं तर एक आपण ज्याला ओपन-अ‍ॅन्ड-शट केस म्हणू तशी असते. त्यामुळे खटला सुरू होण्यापूर्वी झालेल्या भेटीत समेटाचे आणि समेट मान्य नसल्यास दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवावा अशा अर्थाचे प्रस्ताव मॅस्सी मांडतो. मॅरिलिन आणि तिच्या वकिलाने आडमुठेपणा दाखवल्यामुळे मिटींगमधून काही फलित निघत नाही. यामुळे वैतागलेला मॅस्सी त्याच खाजगी गुप्तहेरामार्फत मॅरिलिनच्या पत्त्यांच्या वहीचे फोटो काढून घेतो, आणि त्यात त्याला संशय असलेल्या अशा एका माणसाला साक्षीदार म्हणून उभं करतो की ज्यानं मॅरिलिनची तिनेच केलेल्या विनंतीवरून तूफान पैसा असलेल्या पण इतर बाबतीत मूर्तीमंत बावळट असणार्‍या माणसाशी (अर्थातच लग्न करण्याच्या इराद्याने) ओळख करुन दिलेली असते. या साक्षीदाराने ही गोष्ट न्यायालयात उघड करताच नवरोबा रेक्स रेक्सरॉथ (एडवर्ड हर्रमन) ऐवजी मॅरिलिन कपर्दिकही न मिळता हा खटला हरते.

आयुष्यातली पाच वर्ष ज्या वैभवाच्या लालसेने फुकट घालवली त्या श्रीमंतीचा आणि पर्यायाने स्वयंपूर्णतेचा असा हातातोंडाशी आलेला घास मॅस्सीमुळे हिरावून घेतला गेल्याने मॅरिलिन सुडाने पेटून उठते. यापुढची कथा सांगण्यात मजा नाही. एखाद्या गूढपटाची कथा फार सांगू नये म्हणतात, पण तोच न्याय या सिनेमालाही लागू आहे.

कॅथरिन झेटा-जोन्सचे जे काही मोजके चित्रपट मी या आधी बघितले होते, त्यावरून तिच्या अभिनयकौशल्याबाबत माझं मत फारसं चांगलं झालं नव्हतं, मात्र या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाने हे माझं मत संपूर्णपणे बदलून टाकलं. वर उल्लेख केलेल्या मॅरिलिन आणि तिचा वकील यांच्याबरोबरच्या भेटीत मॅस्सीच्या मनात मॅरिलिनविषयी प्रथमदर्शनीच प्रेम वाटू लागतं. त्या मिटिंग मधला जॉर्ज क्लूनी आणि झेटा-जोन्स या दोघांनीही अप्रतिम मुद्राभिनय केला आहे. विशेषतः झेटा-जोन्सचा अभिनय संयत तरीही प्रसंगाला साजेसा परिणामकारक झाला आहे. झेटा-जोन्सने असाच अभिनय कोर्टात मॅस्सीच्या उलटतपासणीला उत्तर देताना केला आहे. क्रूर कारस्थानी संपत्तीलोलूप स्त्री ते तिच्याही नकळत मॅस्सीच्या प्रेमात पडून त्याच्याबाबतीत हळवे होणे हा मॅरिलिनच्या व्यक्तिरेखेचा प्रवास तिने फार समर्थपणे सादर केला आहे.

चित्रपटातल्या जॉर्ज क्लूनीच्या अभिनयाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुपारी घेऊन खून करणार्‍या दमेकरी गुंडाला भेटायला गेल्यावर त्याच्या तब्येतीकडे पाहून गोंधळून जाऊन क्षणाक्षणाला झपाट्याने बदलणार्‍या भावमुद्रा सादर करताना क्लूनीने कळस गाठला आहे. मॅरिलिन आणि तिचा वकिल फ्रेडी बेंडर यांच्या बरोबरच्या भेटीत मॅस्सी जेव्हा फ्रेडीचं मानसिक खच्चीकरण करतो तेव्हाचा त्याचा अभिनय निव्वळ अप्रतिम.

चित्रपटातल्या बड्या कलाकारांनी त्यांच्या नावाला साजेसा तगडा अभिनय तर केलाच आहे, पण यातले छोट्यातली छोटी भूमिका करणारे कलाकारही तितकेच लक्षात राहतात. अगदी तोळामासा प्रकृतीचा कधीही दम्याचा झटका येऊन कोसळेल असं वाटणारा पण चक्क पेशाने कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजेच सुपारी घेऊन खून करण्याची कामे करणारा गुंड व्हीझी जो (अर्विन केय्स), काहीही चांगली घटना घडली की भावनावश होऊन लगेच रडू कोसळणारा मॅस्सीचा सहकारी व्रिग्ली (पॉल अ‍ॅडल्स्टीन), सगळा सिनेमाभर चेहर्‍यावर बारा वाजल्यासारखे पराभूत भाव घेऊन वावरणारा मॅरिलिनचा वकील फ्रेडी बेन्डर (रिचर्ड जेन्किन्स), 'I'm gonna nail your arse' हे घोषवाक्य असल्याच्या थाटात सतत बोलून दाखवणारा खाजगी गुप्तहेर गस पेच (सेड्रिक द एंटरटेनर), मॅरिलिनच्या विरोधात कोर्टात साक्ष देणारा आणि अत्यंत भयानक फ्रेंच उच्चारात बोलणारा हाईन्झ द बॅरन क्राउस वॉन एस्पी (जॉनाथन हॅडरी), आणि मॅरिलिनचा अखंड बडबड करणारा दुसरा नवरा हॉवर्ड डॉयल (बिली बॉब थ्रॉन्टन) यांचीही कामे झकास झाली आहेत.

हाईंझ द बॅरन क्राउस वॉन एस्पी आणि मॅस्सीचा सहकारी वकिल व्रिग्ली
       
 खाजगी गुप्तहेर गस पेच - मॅरिलिनचा वकील फ्रेडी बेंडर - हॉवर्ड डॉयल

"Oyez, oyez. Family Court of the Fifth District of Los Angeles County now in session. The Honorable Marva Munson presiding. All rise!" हे वाक्य एका दमात म्हणणारा आणि त्याच पद्धतीनं साक्षीदारांना शपथ देणारा कोर्टातला बेलीफ (पॅट्रिक थॉमस ओ'ब्रायन) आपल्या चांगलाच लक्षात राहतो. अर्ध्याच नव्हे तर शंभरातल्या नव्व्याण्णव गोवर्‍या मसणात जाऊनही उत्साहाने सळसळत इतरांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेऊन असणारा मॅस्सीच्या फर्मचा जेष्ठ भागीदार म्हणजेच सिनिअर पार्टनर हर्ब मायरसन (टॉम अ‍ॅल्ड्रिज) याची संवादफेक वाखाणण्याजोगी आहे. या दोघांच्याही वाट्याला अगदी लहानशा भूमिका आल्या असूनही त्यांनी त्या प्रभावीपणे वठवून धमाल उडवून दिली आहे.

शिवाय हाईन्झ द बॅरन क्राउस वॉन एस्पीच्या कुत्र्यामुळे साक्षीत खंड पडल्यावर "आपण कुठे होतो बरं" असं मॅस्सीने विचारताच बेलीफच्याच एकसुरीपणाची आठवण करुन देत एका दमात "She said that she required a husband. Oh, do you want some bones? Has anyone any bones? Hard, crunchy bones for the...'' असा अर्ध्या मिनिटाचीही लांबी नसलेला अवघा एक संवाद वाट्याला आलेली कोर्टातली कारकून (मॅरी गिलीस) ही सुद्धा आपली छाप पाडून जाते.

हर्ब मायरसन आणि व्हीझी जो

बेलिफ आणि कोर्टातली रिपोर्टर

चित्रपटभर प्रेक्षकांना एकही क्षण कंटाळा न येऊ देण्याचं श्रेय मात्र दिग्दर्शक कोएन बंधूंना द्यायलाच हवं. चित्रपटभर अनेक लहान-सहान गोष्टींची पेरणी अशी केली गेली आहे की आपल्या लक्षात तर येतात, पण मुद्दामून घुसवल्या आहेत असं मुळीच वाटत नाही. आपल्या दातांच्या आरोग्याविषयी अतीदक्ष माईल्स मॅस्सी आणि दात चमकते ठेवण्यासाठी त्याची सतत चाललेली धडपड ही त्यातलीच एक गोष्ट. चित्रपटात मॅस्सीच्याही आधी त्याच्या दातांचं दर्शन होतं ते तो दवाखान्यात खुर्चीवर बसलेला असताना. मग गाडी चालवताना रिअर व्ह्यु मिरर मध्ये बघताना, आपल्या ऑफिसात आल्यावर कॅबिनमध्ये जाण्याअगोदर सेक्रेटरीच्या छोट्याशा गोल आरशात दात न्याहाळताना आणि अशा अनेक प्रसंगात आपल्या दातांचं कौतुक करताना तो दिसतो. मॅस्सीच्या तोंडी वारंवार ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिरेखांचे येणारे उल्लेख आणि संदर्भ येतात. तसंच दमेकरी गुंडाच्या नावातच 'व्हीझी' (Wheezy/धापा टाकणारा) हा शब्द घालून घालून केलेला विनोद यथार्थ.


हॉटेलात मॅरिलिनची वाट बघत असताना मॅस्सीचे चमच्यात दात निरखणे


चटपटीत संवादांची जागोजागी पेरणी केलेल्या या चित्रपटातले काही विनोद हे नियमित इंग्रजी (वाचा: हॉलिवुड) चित्रपट बघणार्‍यांनाच समजू शकतात. अमेरिकन संस्कृतीत म्हणा किंवा तिकडच्या चित्रपटातील संवादात म्हणा स्वाभाविकपणे आढळणारी अश्लीलता आणि द्वैअर्थी कोट्या बर्‍यापैकी असल्या तरी या चित्रपटात अजिबात खटकत नाहीत, उलट प्रचंड हसवून जातात.

चित्रपटाचं बलस्थान म्हणजे यातले धमाल संवाद. त्यातलेच काही पुढे देत आहे:

मॅरिलिन रेक्सरॉथ: What are you after Miles?
माईल्स मॅस्सी: Well, I'm a lot like you. Just looking for an ass to mount.
मॅरिलिन रेक्सरॉथ:Well, don't look at mine.

* * *

माईल्स मॅस्सी: And to whom did you introduce that calculating woman?
हाईन्झ द बॅरॉन क्राउस वॉन एस्पी: I introduced her... [रेक्स रेक्सरॉथकडे अंगुलीनिर्देश करुन] to that silly man.
फ्रेडी बेंडर: Your Honor, objection!
माईल्स मॅस्सी: Let the record show that the Baron has identified Rex Rexroth as the silly man!

* * *

फ्रेडी बेंडर: Objection, Your Honor: strangling the witness.
न्यायाधीश: I'm going to allow it.

* * *

माईल्स मॅस्सी: How many cases has Herb Myerson won?
व्रिगली: The old man? More than anybody. He's a legend. And look at him.
He's 86 years old, he's the first one into the office in the morning.
माईल्स मॅस्सी: No home life.
व्रिगली: Who needs a home when you have a colostomy bag?

* * *

चित्रपटातली एक बाब मात्र खटकते. 'इनटॉलरेबल क्रुएल्टी'ची श्रेयनामावली तिच्या क्युपिडछाप थीममुळे चित्रपटात शेवटी काय घडणार आहे ते अप्रत्यक्षरित्या सुरवातीलाच सुचवून जाते. तेवढं सोडलं तर हा सिनेमा तुमचे पैसे आणि वेळ, दोन्ही वसूल करुन देतो. चित्रपट हटके आहे, सात मजली हास्य वसूल करणारा आहे, आणि 'एकदा तरी बघावा' असा तर नक्कीच आहे (मी तीनदा पाहिलाय. एच.बी.ओ. वर एकदा खूप आधी पाहिला होता. पण हा लेख लिहीण्यासाठी चक्क डी.व्ही.डी. विकत घेतली आणि दोनदा बघितला). तुम्हीही अवश्य बघा. आणि हो, बघितला असेल तर तुमचं मत इथे जरूर सांगा.

पुढच्या लेखापर्यंत, नांदा सौख्यभरे!!!

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

शब्दगारवा २०१० हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

संदर्भ: कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया आणि आय.एम.डी.बी.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

सर्व छायाचित्रे: सायबरलिंक पॉवर DVD सॉफ्टवेअर पॉज करून घेतलेले स्क्रीनशॉट
(आंतरजालावरून घेतलेले पोस्टरचे चित्र वगळता).

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

ह्या पोस्टचे पुरस्कर्ते:


With office and factory in Mumbai, India, Designo Lab Solutions is a young and vibrant organization involved in the manufacturing of Laboratory Fume Hoods, Lab With office and factory in Mumbai, India, Designo Lab Solutions is a young and vibrant organization involved in the manufacturing of Laboratory Fume Hoods, Lab Furniture, and special kinds of Lab Exhaust Systems.