Tuesday, October 2, 2012

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.


एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.



प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!