Wednesday, July 11, 2018

केरळ: करक्किडकम अर्थात रामायण मासम् आरंभ


येत्या मंगळवारी म्हणजेच सतरा जुलै पासून केरळ राज्यात करक्किडकम अर्थात यंदाचा रामायण मासम् सुरु होत आहे. हा मास सोळा ऑगस्ट पर्यंत चालेल.

सूर्याचा मिथुन राशीतून करक्किडक राशीत प्रवेश होताना हा महिना सुरु होतो. या महिन्यात केरळमधील लोक काही व्रतांचे पालन करुन प्रभू श्रीरामांच्या दैदिप्यमान आणि पराक्रमी आयुष्यावर आधारित 'अध्यात्म रामायण किलिप्पपटू' या ग्रंथाचे पठण व श्रवण करतात.

पण हे अध्यात्म रामायण किलिप्पपटू आहे तरी काय? किलिप्पपटू याचा शब्दशः अर्थ होतो पोपटाने सांगितलेले. तथापि त्याचा भावार्थ वेगळा आहे. ते सांगण्याआधी त्याच्या किलिप्पपटूच्या थोर निर्मात्याबद्दल बोलावे लागेल.  सुमारे ४५० वर्षांपूर्वी केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी सोळाव्या शतकात या अध्यात्म रामायणाची रचना केली आणि तेव्हापासूनच रामायण पठणाची प्रथा केरळमध्ये सुरु झाली. याच रामायणाचं वैशिष्ट्य असं की मल्याळी भाषेचे जनक म्हटल्या जाणार्‍या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी  संस्कृत आणि मल्याळम् भाषेचं एक प्रकारचं व्याकरणप्रचूर क्लिष्ट मिश्रण असलेल्या मणिप्रवळम् पद्ध्तीची  भाषा टाळून, सामान्यांतल्या सामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत सरळ, साध्या, आणि ओघवत्या मल्याळी भाषेत अध्यात्म रामायणाची रचना केली. अध्यात्म रामायणातून थुन्जथू रामानुजन यांनी मल्याळी भाषेला एक नेमकेपणा आणि प्रवाहीपणा बहाल केला जो आजही दैनंदिन वापरातील मल्याळीमधे वापरात आहे. थुन्जथू रामानुजन यांच्या कार्याची तूलना करायची झाली तर आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकृतात रूपांतर करुन ज्ञानेश्वरी रचली त्याच्याशी करता येईल.

 आपल्याकडे जवळजवळ सगळे सण आणि प्रथा या चारही ऋतूंशी निगडित आहेत. करक्किडकम महिन्यातली अतिप्रचंड पर्जन्यवृष्टी आजार, गृहौपयोगी वस्तुंचे दुर्भिक्ष्य, अपघात अशा अनेक अरिष्टांना आमंत्रण देते. या महिन्यात केरळात शेतीवर आणि शेतीशी निगडीत उत्पादनांवरही विपरीत परिणाम होतो. म्हणूनच केरळमध्ये करक्किडकम महिन्याला परंपरागत मल्याळी भाषेत "पंज मासम्" अर्थात तीव्र दुर्भिक्ष्याचा महिना म्हणतात. कदाचित याच कारणामुळे लग्न व मुंज इत्यादी मंगलकार्ये आणि नव्या उपक्रमांची सुरवात या महिन्यात केली जात नाही.

अशा या अवघड कालखंडातून तरुन जाण्यासाठी या रामायणाचे पठण व श्रवण करणे ही व्यक्ती व समाजाकरता लाभदायक असल्याची इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या मासात ओढवणार्‍या संकटांवर मात करण्यासाठी आणि अडचणीच्या निवारणार्थ करक्किडकम महिन्यातले सगळे म्हणजेच ३१ दिवस घराघरात आणि देवळांमध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे अध्यात्म रामायण किलिप्पपटूचे पठण करण्याची पद्धत आहे. समई (नीलविलक्कू)  समोर बसून त्या प्रकाशात लयबद्ध स्वरात रामायण पठण करावे आणि करक्किडकम मासाच्या शेवटाच्या दिवशी ते संपवावे(च) असा संकेत आहे. या मासात लोक कोट्टायम आणि थ्रिसूर येथे असलेल्या राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांनाही भेट देतात. याला नलम्बलम दर्शनम् असं म्हटलं जातं.



 निव्वळ अध्यात्मिक साधना किंवा उन्नती हे रामायण मास पाळण्याचं कारण नाही. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा आणि परंपरा यांचे श्रद्धापुर्वक आणि निष्ठापूर्वक पालन व्हावे हा रामायण मासाचा प्रमुख उद्देश आहे. वाढती लोकसंख्या आणि तदनुषंगाने येणारे रोजगाराचे दुर्भिक्ष्य, आधुनिक जीवनशैलीमुळे धर्मकार्याकरता उपलब्ध असणारा वेळ हा कमी होत जाणे ही गोष्ट केरळमधेही होऊ लागली आहे. दोन पिढ्यांमधला संघर्ष हा ही याला कारणीभूत ठरतो आहे. यात भर म्हणजे केरळमधल्या साम्यवादी राजवटीमुळे हिंदूंना दहशतीखाली वावरावे लागणे. या गोष्टींचा परिणाम रामायण मासावर झाला नसता तरच नवल होतं. तथापि काही परंपरेचा यथोचित आदर करणार्‍या घरांत अजूनहीं रामायण मासांतल्या प्रथा पाळल्या जातात; यात घरातील वयोवृद्ध आजीआजोबांचा पुढाकार असतो हे सांगणे न लगे. जवळजवळ सर्व  देवळात, विशेषतः विष्णू मंदिरांत, करक्किडकम  महिन्यात रामायण पठण करण्याची पद्धत अजूनही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. उत्तरेकडे ज्याप्रकारे सार्वजनिक मैदानात आणि सभागृहात रामलीला सादर केली जाते त्याच धर्तीवर काही धार्मिक/अध्यात्मिक संघटना 'रामायण पारायणम्' चे कार्यक्रम आयोजित करतात. स्थानिक प्रसारमाध्यमांतूनही अनेक वाहिन्यांवर रामायणावर उत्तम कार्यक्रम, चर्चासत्रे, पठणे इत्यादी कार्यक्रम करक्किडकम महिन्यात सादर केले जातात. आपल्याकडे कसं गणपतीत गुरुजी मिळाले नाहीत की काही घरात सीडी आणि डीव्हीडी लाऊन पूजा केली जाते तसंच हल्ली केरळातही रामायण पठणाच्या सीडी व डीव्हीडी उपलब्ध होतात.

 तथापि सीडी आणि डीव्हीडींची गरज पडू नये इतकी सोपी भाषा या अध्यात्म रामायण किलिप्पपटूची असल्याने अगदी दहा ते अकरा वर्षाचं लहान मूलही आपल्या घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली रामायणाचे पठण करु शकतं. या साध्या सरळ भाषेमुळेच काळाच्या ओघात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा टिकून राहिली आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनातही ज्यांना आपल्या प्रथा व परंपरांबद्दल आदर व श्रद्धा आणि रामायणाचे सार जाणून घेण्याची मनापासून इच्छा आहे ते या करता करक्किडकम मासात वेळ काढतातच. पूर्ण अध्यात्म रामायण पठणाकरता करक्किडकम मासाचे ३१ दिवस पुरेसे असतात. मन लावून संपूर्ण महिना लयीत रामायण वाचल्यास ते केवळ मन:शांती करताच नव्हे तर मन व शरीर अशा दोन्हींच्या शुद्धीसाठी खूप लाभकारक असते अशी तिथल्या लोकांची समजूत आणि अनुभव आहे.



पण रामायण पठणाचा एवढाच लाभ आहे का? करक्किडकम महिन्यात वाचायचा एक ग्रंथ एवढ्यापुरतं त्याचं महात्म्य मर्यादित आहे का? तर नाही. रामायणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद ही फक्त एक बाजू आहे. रामायणाचा गाभा म्हणजे रामाचं पराक्रमी आणि अद्वितीय आयुष्य आहे. एका सद्वर्तनी मनुष्याच्या असाधारणपणाची कथा आहे. त्याच्या आई-वडील आणि गुरुजन आणि सर्व मोठ्यांबद्दलचा आदर करण्याच्या, समवयस्कांचा यथोचित मान राखण्याच्या, आणि आणि लहानांसमोर आदर्श घालून देण्याच्या गुणांची अनुकरणीय गाथा आहे. मोठ्या भावाचा  असा आदर्श समोर असताना आपलंही वर्तन आदर्शवत  कसं असावं याचा वस्तुपाठ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न घालून देतात. सीतेच्या विशुद्ध पतीनिष्ठेची आणि सोशिकतेची कहाणी म्हणजे रामायण. आपल्या स्वामींप्रती असीम निष्ठा आणि भक्ती बाळगणार्‍या पवनपुत्र हनुमानाची गोष्ट म्हणजे रामायण. थोडक्यात, रामायणात बंधुता, राज्य व स्वामीनिष्ठा, मोठ्यांबद्दलचा आदर आणि आज्ञाधारकपणा, प्रचंड कष्ट, सहनशक्ती, आणि चिकाटीने अशक्यकोटीत असल्याचे भासणारे लक्ष्य गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सार्‍या गोष्टी रामायणाचा गाभा आहेत. मुलांना निव्वळ शिकवून हे गुण मुलांच्यात बाणवता येणार नाहीत. त्या करता रामायणापेक्षा उत्तम ग्रंथ नाही.

संदर्भ:
(१) 'Ramayana month' begins in Kerala
(२) Kerala’s Ramayana Masam Holds Its Own Despite Having Reached The ‘Next-Gen’ Phase

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १३, शके १९४०