Showing posts with label चीन. Show all posts
Showing posts with label चीन. Show all posts

Saturday, July 4, 2020

चीन नावाचा गोंधळ

चीनबद्दल सरकारी व वैयक्तिक पातळीवर वेगवेगळी आक्रमक पावले उचलली जात आहेत ही चांगली गोष्ट एकीकडे घडत असताना आणि चीन संदर्भात स्वाभाविक विरोध निर्माण झालेला असतानाही दुसरीकडे असंही दिसतं की एक देश म्हणून आपली चीनबद्दलची समज अजूनही पुरेशी विकसित झालेली नाही.

हत्तीला चाचपणाऱ्या चार आंधळ्यांसारखे प्रत्येकाचे चीनबद्दल आपापले समज आहेत. काही लोक चीनला पाकिस्तान सारखं समजत आहेत. काही लोक चीनला कट्टर साम्यवादी देश मानतात तर काही साम्यवादाच्या आडून भांडवलशाहीचं समर्थन करणारा देश समजतात. काहींच्या मते चीनने आपल्या प्राचीन संस्कृतीशी अजून नाळ तोडलेली नाही तर काही म्हणतात चीन साम्राज्यवादी आहे. 

काही ठिकाणी तर चीनच्या अर्थव्यवस्थेबद्दल स्तुतीपर कवने देखील वाचली. काय तर म्हणे चीनची अर्थव्यवस्था  ही ब्रिटन किंवा अमेरिकेप्रमाणे 'गुंतवणुकीच्या साधनांनी इतर देशांच्या संसाधनांचे शोषण करत' किंवा 'दहशतवादाला पक्स्ट' आणि 'डॉलर हेजीमनी' इत्यादींच्या वापराने विकसित झालेली नाही (अहाहा, किती पवित्र देश आहे नै?!). हे असले कुतर्क वापरून अजून लिबरल मीडियाने हिंदी चीनी भाई भाईचा गजर अजून कसा सुरू केला नाही याचंच आश्चर्य वाटतंय. (मला हा तर्क वाचून हसायला आलं. आफ्रिकन देशांना ते गुंतवणुकीतून दादागिरी कशी सहन करत आहेत हे जाऊन विचारा आणि आपल्याच पूर्वोत्तर राज्यांतल्या अतिरेकी संघटनांकडे पैसे कुठून येतात ते तपासा.)

आज भारतात चीनबद्दल चाललेली चर्चा आणि विचारविमर्श पाहिला तर त्याची दिशा उमगत नाही. आपली रणनीती काय असायला हवी हे आपल्याला अजून समजत नाही आहे. या नव्या शत्रूशी वागायचं कसं हे आपल्याला अजूनही पूर्णपणे कळलेलं नाही. पाकिस्तानला इतकी वर्षे निरनिराळ्या मार्गांनी झेलल्याने त्याच्याबद्दल काही निश्चित धारणा आहेत आणि त्या योग्यही आहेत. पण आपला आक्रोश फक्त चीनी उत्पादनांचा बहिष्कार इतकाच मर्यादित आहे. ही एक उत्तम सुरवात असली तरी हा एक फारच किचकट आणि भ्रामक विषय आहे. चीनची उत्पादने बाजारातून पूर्णपणे गायब होईपर्यंत बराच काळ जाणार आहे.

पाकिस्तानची कुठली नस दाबल्याने काय होतं हे आपल्याला कळतं पण चीनच्या बाबतीत पाच मुद्दे कुणाला मांडायला सांगितलं तर ते कुणालाही जमणार नाही. आपलं धोरण म्हणजे 'मोदी आणि सरकार काय ते पाहून घेतील' हे आहे. 

आज परदेशी भाषा शिकणे म्हणजे जर्मन, स्पॅनिश, जपानी इत्यादी पुरतं मर्यादीत आहे पण यात चीनी भाषा कुठेच दिसत नाही. आपल्या शत्रूला समजून घेण्यात त्याची भाषा न येणं हा एक मुख्य अडथळा आहे. हां भारतीय विदेश सेवेतील आपले काही अधिकारी चीनी भाषा शिकून कर्तृत्वही गाजवून आलेले आहेत पण बाकी सगळा उजेडच म्हणावा लागेल. भाषेची अडचण आणखी एका बाबतीत जाणवते ती म्हणजे आपल्या वृत्तसंस्था आणि पत्रकार जिथे जायला परवानगी आहे तिथे जाऊनही व्यवस्थित वृत्तांकन करू शकत नाहीत. चीनमधल्या ज्या बातम्या आपल्याकडे दिल्या जातात त्या सुद्धा चीनी मीडियाने पाठवलेल्या महितीवरच आधारित असतात. आता चीनी मीडिया कुणाच्या ताब्यात आहे हे वेगळं सांगायला नको.

याचमुळे आता गंमत अशी झालेली आगे की "चीनशी आपलं युद्ध होऊ शकतं" असा भारतीय जनतेचा समज करून देण्यात चीन यशस्वी ठरलं आहे. या भ्रमातून आपण लवकरात लवकर बाहेर येणं आवश्यक आहे, कारण चीनशी आपलं युद्ध कधीच सुरू झालेलं आहे. साडेतीन महिने झाले आज आपण घरात कोंडल्यासारखे आहोत, मुलांच्या शाळा बंद आहेत, लोकं ऑफिसला जाऊ शकत नाहीत; रेल्वे, बस आणि विमानसेवा बंद आहेत. अनलॉक करायचं की लॉकडाऊन हे अनेकांना झेपत नाहीये. देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसलेला आहे, प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोज आरोग्यविषयक बातमीपत्र प्रसारित करत आहे. चीनने बनवलेल्या एका व्हायरसमुळे इतका हाहा:कार उडालेला असताना याला युद्ध नाही म्हणायचं तर आणखी काय?

शत्रुसैन्याला प्रतिबंध म्हणून लष्करे सज्ज असतात. पण भविष्यातली युद्ध की वर उल्लेख केल्याप्रमाणेच होण्याची शक्यता  जास्त आहे. 

चीनने हा व्हायरस कसा बनवला हे आपल्याला कळो न कळो पण या जागतिक संकटाच्या वेळी एका जबाबदार देशाचं वर्तन ज्याप्रमाणे असायला हवं त्याप्रमाणे चीन नक्कीच वागत नाहीये. 

चीनशी लढायला अनेक आघाड्यांवर आपल्याला तयारी करावी लागेल. यात भूराजनीति (geopolitics), आर्थिक आघाडी, लष्करी ताकद, विज्ञान आणि प्रौद्योगिकी, ऐतिहासिक सांस्कृतिक सॉफ्ट पावर आणि इतकंच नव्हे तर लडाख, तिबेट, आणि चीनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असलेली विविध बौद्ध मते आपल्याला समजून घ्यावी लागतील.

म्हणूनच सुन जू चे एक प्रसिद्ध वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे Know Yourself, Know Your Enemy, A Hundred Battles, A Hundred Victories.

तस्मात उत्तिष्ठ!

🖋️ मंदार दिलीप जोशी व Yashark Pandey
आषाढ शु १४, शके १९४२