शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"
लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.
कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.
पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.
याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.
तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.
याला दिग्दर्शन म्हणतात.
©️ मंदार दिलीप जोशी