Tuesday, November 1, 2022

खर्रा इतिहास: फटाक्यांचा शोध

जिल्लेइलाही बादशहा जलालूद्दीन अकबर साहेब एकदा जश्न-ए-दिवटे निमित्त काय खास गोष्ट करावी असा आपल्या दिमाग-ए-मस्तिष्क मध्ये विचार करत बसले होते. ही गोष्ट त्यांना फार नवीन होती. पण वतीने विचार करणारा बिरबल काशीयात्रेला सुट्टीवर गेल्याने त्यांना हे काम करण्यास आत्मनिर्भर होणे जरुरीचे होते. या आधी मुल्क-ए-हिंदुस्थानात कुणीही केली नसेल अशी धमाल उडवून द्यावी आणि आवामचे दिल आपल्याबद्दलच्या मोहोब्बत ने भरून टाकावे असे त्यांना वाटत होते. 

काहीतरी कल्पना मिळेल म्हणून त्यांनी टीव्ही लावला. #झीट_मराठी नावाच्या वाहिनीवर कुठलीतरी आजी आपल्याच नातवाला विहिरीत ढकलून कसे ठार मारायचे असा विचार करत असलेली दिसली. बादशहा सलामतांना ती कल्पना फारशी पसंद आली नाही. मग त्यांनी चॅनल बदलला. #ठार_प्रवाह वर एक सासू आपल्या सुनेला शिऱ्यात विष घालून मारायची योजना आखत असल्याचे त्यांना दिसले. माणसं मारायचे हे असले अहिंसक प्रकार पाहून त्यांना बहुत गुस्सा आला. बादशहा सलामत जिल्लेइलाही जलालूद्दीन अकबर साहेबांच्या चौतीसाव्या बेगम साहिबांच्या वालीदा अर्थात बादशहांच्या सासूबाई #सोनी_मराठी बघत असलेल्या त्यांना दिसल्या. त्या वाहिनीवर एक इसम खोटं नाव सांगून लग्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं. "सरळ उचलायचं ना" असं उद्गारल्यावर चौ.बे.वा. दचकल्या आणि त्यांनी चॅनल बदलला. #कलर्स_मराठी वर एक वस्ताद चाळे नामक नट "मला हे पसंत नाही" "मला ते पसंत नाही" असं ओरडत सगळीकडे आग लावत सुटलेला त्यांना दिसला. ही कल्पना मात्र त्यांना आवडली. त्यांनी लगेच चॅनलला फोन लावून वस्ताद चाळेला पाठवून द्या असा हुकूम सोडला.

"ए वस्ताद, बादशहांनी तुला लाल किल्ल्यावर बोलावले आहे" असं म्हटल्याबरोबर त्याने स्वतःची दाढी कुरवाळत खर्जातला आवाज लावून "पण माझी तर आधीच लाल आहे" अशी त्याच्या स्वभावाला अनुसरून आगाऊ टिप्पणी केली. मग बादशहांच्या सैनिकांनी त्याच्या तशरीफ वर काष्ठप्रहार करून ती आणखी लाल केली आणि वस्तादला बादशहा हुजुरांसमोर घेऊन गेले. 

बादशहा ज.म.अकबर सर त्यावेळी तुडुंब खाऊन झोपले होते. अलीकडे (म्हणजे कुणाकडे असे नव्हे, पलीकडच्या उलट) त्यांचे पोट जरा नासाज राहत असे. अशातच ते कुशीवर वळले आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या सतराव्या बेगम साहिबांच्या वालीद साहेबांनी दिलेल्या हवाबाण हरड्यांनी करामत दाखवली. ते पाहून वस्ताद चाळेच्या डोक्यात किडा वळवळला. "असं अनेकदा होतंय का?" नाक मुठीत धरलेल्या सैनिकांना त्याने लगेच सवाल पुसला. "हुजुरांना असा त्रास होतो कधी कधी, झोपेतच औषधांचा परिणाम होतो". काही नतद्रष्ट मित्रांच्या नादाने वस्ताद चाळेने एकदा नॅशनल जियोग्राफिकवर बघितलेला एक रिऍलिटी शो त्याला आठवला. सैनिकांकडून मशाल मागून घेत तो बादशहांच्या तशरीफमागे स्वस्थपणे उभा राहिला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. हवाबाण हरड्यांनी लगेच पुन्हा आपला प्रभाव दाखवला, पण या वेळी जळती मशाल असल्याने ढुsssम्म असा स्फोटक आवाज होऊन मोठा जाळ झाला आणि बादशहा सलामत पटकन जागे होऊन पळत सुटले. 

आणि अशा प्रकारे कन्ट्री-ए-हिंद मध्ये फटाक्यांचा शोध लागला. पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ६७

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी