Monday, September 12, 2016

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका

- Maria Wirth

या लेखाचं मराठी भाषांतर/रूपांतर:

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका
- मारीया वर्थ

ख्रिश्चन धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही, आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांच्याकडून ही निरीक्षणे आलेली आहेत. मारीया वर्थ ख्रिश्चन धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या तरी त्या हिंदू धर्मातला स्वातंत्र्य व मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रसंशक राहिल्या आहेत. हिंदू धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ठ पर्याय असताना काही हिंदू आपल्या हिंदू असण्याची जवळ जवळ लाज बाळगल्यासारखं करतात ही बाब मारीया यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहीली आहे.

आता वाचूया मारीया यांची निरिक्षणे:
हिंदू आधी म्हणायचे, "सर्व धर्म सारखे". दुर्दैवाने हिंदूंना एक तर हे दिसत नव्हतं किंवा दिसत असलं तरी मान्य करायचं नव्हतं की जगातले सगळ्यात मोठे दोन धर्म ही समानता मान्य करायला कधीच तयार नव्हते. हे दोन्ही धर्म म्हणतात, "आमचाच धर्म खरा. आमचाच देव हाच एकमेव सर्वशक्तीमान आणि खरा परमेश्वर." "सर्व धर्म सारखे" या गोष्टीवर विश्वास ठेऊन हिंदू धर्मीय त्यांच्या धर्माला ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या पातळी पर्यंत आणू इच्छितात ही ख्रिश्चन व इस्लाम धर्मीयांच्या दृष्टीने चेष्टेचा व दया दाखवण्याचा विषय होता. अर्थातच ख्रिश्चॅनिटी व इस्लाम अशा समानतेला कधीच मान्यता देणार नाहीत हे उघड होतं.

आता हिंदूंचं वृत्ती असते, "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हे आमच्या मुलांना शिकवतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम बाबत आमच्या मुलांच्या कानावर येतं असतं की हे दोन्ही धर्म किती छान आहेत. आम्हाला कुणाला दुखवायचं नसल्याने आम्ही मुलांना हिंदू धर्माबद्दल फारच कमी शिकवतो आणि जे शिकवतो ते फारच वरवरचं असतं - म्हणजे उत्सव आणि काही प्रथा वगैरे. आम्ही अजिबात खोलात जाऊन हिंदू तत्त्वज्ञान आणि आपल्या धर्माला असलेलं वैज्ञानिक अधिष्ठान या बाबत काहीच सांगत नाही. कारण एक तर मुळात आम्हाला त्याबद्दल काही माहीत नसतं आणि असलं तरी न सांगितलेलंच बरं कारण उगाच हिंदू धर्म सगळ्यात चांगला हे त्यातून स्पष्ट झालं तर इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील ना!"

लक्षात घ्या, हिंदू धर्मीयांना मुळातून हे समजूनच घ्यायचं नसतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे हिंदू धर्माचा आदर करत नाहीत. त्या धर्मांचे मौलवी आणि पाद्री हे हिंदूंना हे उघडपणे सांगत नसले, तरी स्वधर्मीयांना सतत सांगत असतात, की "आपल्या धर्मात आले नाहीत, आपल्या देवाचं अस्तित्व कबूल केलं नाही, तर हिंदू नरकात जातील. आपण त्यांना अनुक्रमे जीझस आणि आकाशातला बाप व मोहम्मद आणि अल्लाह यांच्या विषयी सांगूनही ते इतके जिद्दी आणि मूर्ख आहेत की त्यांच्या खोट्या देवदेवतांना ते अजूनही चिकटून आहेत. ही त्यांची घोडचूक आहे. पण गॉड/अल्लाह महान आहे. तो त्यांना त्यांच्या या चुकीची शिक्षा म्हणून असह्य नरकयातना देईल."

हिंदूंच्या "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो" या मताचं एक प्रतिरूप म्हणजे "सगळे धर्म एक उत्तम आणि चारित्र्यवान माणूस कसं व्हावं हे शिकवतात आणि माणसाला त्याच्या निर्मात्याकडे नेण्याचा, म्हणजेच परमेश्वराची भेट घडवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात." म्हणून मग हिंदू सर्वधर्मीय चर्चासत्रांमधे भाग घेतात आणि सगळ्या धर्मांमधल्या समान बाबी शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच काही समान बाबी आहेतच, पण त्या सापडल्या रे सापडल्या की हे हिंदू त्यावर समानतेचे ईमले बांधत सुटतात. "हो, सगळ्या धर्मात चांगल्या बाबी आहेत. हो, सगळ्या धर्मात चांगले लोक असतात". सगळे धर्म चांगल्या गोष्टी शिकवतात ही पोपटपंची हिंदूकडून इतक्या वेळा केली जाते जणू काही ही गोष्ट ते स्वत:लाच समजावत असावेत.

पण खरं सांगायचं झालं तर हिंदूंना कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात हे ठावूक असतं की यात काहीही तथ्य नाही. हिंदूंना हे माहित असतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे केव्हाच पथभ्रष्ट होऊन वेगळेपणाचा पुरस्कार आणि हिंदूंचा द्वेष करु लागले आहेत. या दोन्ही धर्मांनी नेहमी इतर धर्मीयांचा छळ केला आहे आणि असंख्य हुशार व चांगल्या व्यक्तींचा बुद्धीभेद करुन त्यांना अशा एका काल्पनिक परमेश्वरासाठी लढायला प्रवृत्त केलं आहे की जो त्याच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा आत्यंतिक द्वेष करतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम या दोन्ही धर्मांचा इतिहास हा रक्तलांछित आहे. पण हिंदूनी आजवर याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं आहे. जवळ जवळ एक हजार वर्षांच्या दमनचक्रातून जाऊनही "उगाच का डिवचायचं कुणाला" ही घात करणारी भावनाच ते अजूनही जोपासत आहेत.

तुम्हाला असं वाटत नाही का की आता हिंदूंनी नागड्याला नागडं म्हणायला सुरवात केली पाहीजे? स्वामी विवेकानंद म्हणून गेले आहेत की एका हिंदूने त्याच्या धर्माचा त्याग करणे म्हणजे केवळ हिंदू धर्मात एक व्यक्ती कमी इतकाच त्याचा अर्थ होत नाही तर हिंदूंच्या शत्रूमधे एकाची भर असा त्याचा अर्थ होतो". स्वामीजींच्या मते ब्रिटीश राज्यात ख्रिश्चन व मुसलमान जनतेस श्रेष्ठत्वाची भावना जोपासण्यास सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जायचे.

या विरोधात हिंदूंना या विरोधात काहीही करता येईना कारण त्यांची बाजू घेऊन ब्रिटीश सरकारशी भांडायच्या ऐवजी त्यांचे अनेक आंग्लाळलेले नेते ब्रिटीशांच्या घातक शैक्षणिक धोरणामुळे जाणते किंवा अजाणतेपणाने हिंदुत्वाचा सातत्याने अपमान करण्यात गुंतलेले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही हेच नेते सत्तेवर आल्याने तेच धोरण पुढे राबवले गेले. आता स्वातंत्र्याला एकोणसत्तर वर्ष झाल्यावर मात्र हिंदू धर्म म्हणजे काय हे जगाला उच्चरवाने व निर्भीडपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.

हिंदुत्वाचा अर्थ जगावर राज्य करणे नव्हे. हिंदुत्व म्हणजे कुठलाही पुरावा न देता पुढे रेटलेल्या एखाद्या अतार्किक समजूतीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःच्या धर्म तो बाळ्या आणि इतरांचं ते कार्टं हे सुद्धा नव्हे. तर हिंदुत्व म्हणजे शरीर व मनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने आपण कोण आहोत (आत्मन) याचा घेतलेला शोध होय. या भूमीतल्या प्राचीन काळच्या ॠषीमुनींना विविधतेमधे एकता म्हणजे काय याचा अर्थ केव्हाच कळला होता, अगदी पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांच्या खूप आधी. सुखतत्वाचा शोध कुठेही बाहेर घेणे उपयोगाचे नसते, तर हे तत्त्व आपल्या सगळ्यांच्यात (इतकेच नव्हे तर चराचरात) भिनलेले असल्याने त्याचा शोध प्रत्येकाने स्वतःमधेच घ्यायचा असतो. याचाच अर्थ आपण सारे एकाच इश्वरी तत्त्वाचा अंश आहोत. आपण सगळे एका विशाल कुटुंबाचा भाग आहोत. वसुधैव कटुम्बकम् - सगळ्या विश्वाला एक कुटुंब मानणारी ही धारणा सर्वसमावेशक आणि म्हणूनच अधिक स्वीकारार्ह नव्हे काय?!

- मारीया वर्थ

ता.क. मारीया वर्थ यांचा लेख वाचत असताना मला पु.ल.देशपांडे यांच्या म्हैस या कथेतल्या बगुनाना या व्यक्तीरेखेची आठवण आली. बगुनाना हे उस्मान शेठ या मुसलमान व्यक्तीरेखेच्या डब्यातले आमलेट खाताना, "तुम्ही काहीss म्हणाss उस्मानशेssssठ, सर्व धर्म सारखे." यावर कथाकथन ऐकत असलेल्या प्रेक्षकांत हशा उसळतो. पण यातल्या कळीच्या शब्दांकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. ते म्हणजे "तुम्ही काही म्हणा". उस्मानशेठ म्हणोत की न म्हणोत, आम्ही मात्र सर्व धर्म सारखे म्हणत त्यांच्या डब्यातलं आमलेट जिभल्या चाटत हाणणार. पण उज्जैनमधले मदरसे इस्कॉन मंदिरातून पुरवल्या जाणार्‍या दुपारच्या जेवणाला 'इस्लाम खतरे में हैं' ची आरोळी देत झिडकारतात त्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करणार.

अशा हिंदूंना एकच सांगावंसं वाटतं.....

आता तरी म्हणू नका सर्व धर्म सारखे.
म्हणणारे केव्हाच झाले जीवाला पारखे

काय समजलात?

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद शु. १०, शके १९३८