Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१