Tuesday, August 23, 2016

पंडित नामा ८: प्रोफेसर के. एल. गंजू व सौ गंजू

प्रोफेसर के. एल. गंजू, सौ. गंजू
वयः दोघांचेही चाळीशीत
निवासः सोपोर
व्यवसायः अनुक्रमे व्याख्याता व शिक्षिका
हत्या: २ मे १९९०

मागील काही लेखात आपण पाहिलं की काश्मीरात दहशतवाद्यांनी सुरवातीला प्रामुख्याने समाजधुरीणांना लक्ष्य करुन सुनियोजित पद्धतीने काटा काढण्याचा सपाटा लावला होता. दुर्दैवाने यात अतिरेक्यांना मदत करणारे किंवा मख्खपणे पंडितांवरचे अत्याचार बघत बसणारे हे पंडितांचेच सख्खे शेजारी आणि कार्यालयातले सहकारी असणारे काश्मीरचे सर्वसामान्य मुस्लीम नागरिकच होते. याच मालिकेतला एक दुर्दैवी बळी म्हणजे प्रोफेसर के. एल. गंजू व त्यांची पत्नी. 

सोपोर शेतकी महाविद्यालयात व्याख्याता असणारे श्री के. एल. गंजू हे एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना काश्मीरमधल्या चिघळत गेलेल्या परिस्थितीची जाण होती. दहशतवादाची झळ आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागू शकते याचीही कल्पना त्यांना होती. मात्र आपली लोकप्रियता व काश्मीरीयत यांच्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास असलेल्या श्री गंजूंना या गोष्टींच्या जोरावर आपण या संकटातून तरून जाऊ असा आत्मविश्वास होता. आपण कुणाचं वाकडं केलेलं नाही, आपल्याकडून समाजाची सेवाच घडलेली आहे, आपल्याला अनेक मुस्लीम मित्र व चाहते आहेत - मग आपलं वाईट होणं शक्यच नाही या आदर्शवादी पण तितक्याच भोळसट विचारांनी त्यांचा घात केला. काश्मीर खोरे वेळेवर सोडण्याचा निर्णय न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ आलेल्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.

श्री. के. एल. गंजू व शिक्षिका असणारी त्यांची पत्नी हे नेपाळमधे पार पडलेल्या एका परिषदेहून परतले. त्यांच्याबरोबर त्यांचा 'पिस्ता' म्हणून ओळखला जाणारा एक नुकताच मिसरुडही न फुटलेला तरूण नातेवाईक मुलगा सोबत होता. घरी पोहोचल्यावर रात्रीचं जेवण घेत असतानाच साधारण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार अतिरेकी घरात घुसले. त्यातल्या एकाकडे अत्याधुनिक अशा कलाश्निकोव्ह रायफली आणि बाकीच्या तिघांकडे पिस्तुलं होती. (कोण म्हणतं रे काश्मीरात विकास नाही झाला? आँ?). या चौघा अतिरेक्यांनी त्या तिघांनाही भरल्या ताटावरून उठून आपल्यासोबत चलण्याची आज्ञा केली. दहशतवादाच्या कहाण्या ऐकून असलेल्या गंजू कुटुंबियांना आता आकांत करण्याचंही त्राण अंगात नव्हतं. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पूर्ण कल्पना असलेले ते तिघे मन आणि भावना दोन्ही गोठलेल्या अवस्थेत निमूटपणे त्या अतिरेक्यांसोबत निघाले.

हे सगळं घडत असताना त्यांचे शेजारी मख्खपणे बघत उभे होते. त्यातल्या काहींनी त्या अतिरेक्यांना त्याच भागातले असल्याने ओळखलंही होतं. पण कुणीही गंजू कुटुंबियांना वाचवायला दयेची भीक मागण्यापुरतंही पुढे झालं नाही. सुंठीवाचून खोकला जात असेल तर कोण उगाच बोलेल? नाही का! मग ते फक्त बघत बसले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांनी या तिघांना घेऊन गेल्यावरही कुणीही जवळच्या लष्कराच्या ठाण्यात वर्दी देण्याचीही तसदी घेतली नाही. कहर म्हणजे पोलीस स्टेशनला फोन करुन कुणी घडला प्रकार कळवलाही नाही. ज्या काश्मीरीयतवर फाजील विश्वास ठेऊन श्री गंजू यांनी काश्मीर सोडलं नव्हतं, त्याच काश्मीरीयतचे पाईक म्हणवणार्‍या शेजार्‍यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. 

श्री. के. एल. गंजू, त्यांची पत्नी, व 'पिस्ता' यांना सोपोरमधे असलेल्या झेलम नदीवरच्या पुलावर मधोमध नेऊन उभं करण्यात आलं. श्री के एल गंजू यांना अगदी जवळून सहा गोळ्या घालण्यात आल्या. पहिली गोळी झाडली जात असताना प्रतीक्षिप्त क्रियेने केलेल्या हातवार्‍यांनी गोळ्या झाडणार्‍या अतिरेक्याचं चित्तं विचलीत होऊन गोळी 'पिस्ता'च्या पायाला ओझरती निसटून गेली. का कोण जाणे पण श्री गंजू यांचा मृतदेह रात्रभर जवळच्या मशीदीत ठेवण्यात आला आणि सकाळी झेलम नदीत फेकून देण्यात आला. 

असं म्हणतात की श्री गंजूंना मारल्यावर 'पिस्ता'ला अतिरेक्यांनी दोन पर्याय दिले. "आम्ही तीन पर्यंत आकडे मोजू. एक तर प्रोफेसरसाहेबांना भेटायला नदीत उडी मार नाहीतर त्यांच्या बायकोवर आम्ही जे काही (अत्याचार) करू ते उघड्या डोळ्यांनी बघ" असा इशारा देण्यात आला. या परिस्थितीत तुम्ही आम्ही जे केलं असतं तेच त्याने केलं. त्याने एकदा सौ. गंजूंकडे शेवटचं बघितलं आणि एकदा त्यांच्याकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या त्या अतिरेक्यांकडे. मग त्या नराधमांनी "तीन" म्हणताच त्या पोराने परमेश्वराचे नाव घेत झेलम नदीत उडी मारली. 

या नंतर सौ. गंजू यांचं काय झालं हे सांगायला ना श्री गंजू जिवंत होते, ना पिस्ता हजर होता. पोलीसांकडे नोंदीत अनेक दिवस 'बेपत्ता' असलेल्या सौ गंजू यांचं काय झालं असावं हे वेगळं सांगायला नकोच. ते आधीच्या अनेक उदाहारणांवरुन स्पष्ट आहेच. काही पत्रकारांच्या मते सौ गंजूंवर आधी सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि मग त्यांना अतिशय नृशंसपणे ठार करण्यात आलं. या अतिरेक्यांपैकी एकाला नंतर अटक करण्यात आली तेव्हा त्याने सांगितलं की सौ गंजूंना मारल्यावर त्यांच्या मृतदेहाला दगड बांधून नवर्‍याप्रमाणेच झेलम नदीत फेकून देण्यात आलं. पण त्यांचा मृतदेह आजतागायत सापडलेला नाही. जिवंत माणसांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारे काश्मीरातले पोलीस दल सौ. गंजू यांचा मृतदेह शोधायचा प्रयत्न करतील अशी शक्यता शून्यच होती.

श्री गंजू यांचा गोळ्यांनी चाळण झालेला आणि सडलेला मृतदेह काही दिवसांनी झेलमच्या किनार्‍यावर मिळाला. 

सुदैवाची गोष्ट अशी, की पोहायला न येणारा 'पिस्ता' मात्र झेलम मातेच्या कृपेने हात पाय मारत कसाबसा काही अंतरावर किनार्‍याला लागला. दोन दिवस घाबरत लपत छपत खोर्‍यात काढून मग त्याने जम्मूला पळ काढला.

काश्मीरमधे दहशतवाद १९८९-९० सालापासून अचानक सुरू झाला का? नाही. त्याही अगोदर काश्मीरी पंडितांवर विविध इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेको अत्याचार केले. पण देश स्वतंत्र झाल्यावर वाटलं होतं, आता तरी हे अंतर्गत अत्याचार थांबतील. आता तरी सततचे शिरकाण थांबेल. पण नाही. स्वातंत्र्यानंतरही हे सुरूच राहिलं आणि १९८९-९० सालात त्याचा भडका उडून २००३-४ साल उजाडेपर्यंत काश्मीर खोर्‍यातून काश्मीरी पंडितांचं जवळजवळ उच्चाटन झालं. आज काश्मीर खोर्‍यात हिंदू नसल्यात जमा आहेत. पण त्याने उर्वरीत काश्मीरींचं समाधान झालं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इतकं सगळं होऊनही केंद्र सरकारने काश्मीरात ओतलेले कोट्यावधी रुपये, काश्मीरी विद्यार्थ्यांना देशभरात मिळणार्‍या सवलती, काश्मीरात राज्य सरकारी नोकर्‍यात असलेले मुबलक आरक्षण, पर्यटनाने मिळणारा पैसा याने काश्मीरी नागरीकांमधे काहीही फरक पडलेला नाही. अजूनही जिहाद आणि आझादीचे भूत डोक्यावरुन उतरलेले नाही. एक कोवळ्या वयातला मुलगा अतिरेकी होतो, चकमकीत मारला जातो, यावरुन धडा न घेता त्याचा बाप आपली मुलगी सुद्धा जिहादला द्यायला तयार होतो, तेव्हा खरंच लायकी नसलेल्या लोकांवर आपण पैसे खर्च करतो आहोत ही भावना प्रबळ होत जाते.

काश्मीरमधल्या परिस्थितीचा सुरवातीपासून तिथल्या राज्य सरकारांनी व केंद्रातील काँग्रेस सरकारांनी, इस्लामी जहाल मानसिकतेने पछाडलेली तिथली प्रशासन व्यवस्था व सर्वसामान्य मुस्लीम काश्मीरी जनता, आणि अर्थातच कीड लगलेले पोलीस दल यांना नियंत्रणात ठेवण्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज काश्मीर खोर्‍यावर आणि लाखो काश्मीरी पंडितांवर ही परिस्थिती ओढवली आहे. खुर्ची व मतांच्या हव्यास आणि त्यापोटी दिलेला असंख्य पंडितांचा बळी हे म्हणजे आपल्याच व्यवस्थेने भारतीय नागरिकांची भारताच्या घटनेवर असलेल्या श्रद्धेचा घात करत आपल्याच पाठीत खुपसलेला सुरा आहे.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. ६, शके १९३८
२३ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------