एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात एका संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. आपापसात मधेमधे यथेच्छ इंग्रजी वाक्य पेरत आणि अधेमधे अतीव कष्टाने बोललेल्या मराठी वाक्यांवरही आपल्या तथाकथित हायफाय कल्चरची इंग्रजी छाप सोडत त्यांचं आपापसात आणि सेल्सगर्लशी संभाषण सुरू होतं. त्यांचे संभाषण ऐकून मलाच जाम कानकोंडं झाल्यासारखं झालं. कारण आपल्याच कुटुंबियांना भर दुकानात किती उद्धटपणे आणि काय बोलावं याचं तारतम्य साफ सुटल्यागत झालं होतं.
आजींना नवीन चष्मा/चष्मे करायचे होते. चष्म्यांची संख्या आणि फ्रेमचा दर्जा या दोन मुद्द्यांवर तावातावाने खल चालू असताना जावई हातात जुनी फ्रेम नाचवत एक मस्त आयडीयाची कल्पना सुचल्याच्या आनंदात म्हणाला, "एक स्पेअर करायचा असेल तर यातच नवीन काचा टाकूया की".
यावर त्याची बायको, म्हणजे त्या जख्ख दांपत्याची मुलगी फटकन् म्हणाली, "तू गप्प बस, my father is paying for it." आणि मग सेल्सगर्लला उद्देशून, "तुम्ही दाखवा हो, don't listen to my husband". तो बिचारा मंत्र्यालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेला टवटवीत चेहरा एकदम महापालिकेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यासारखा करत, फॉर द एन्टायर ड्युरेशन ऑफ द खरेदी, बारा वाजलेले भाव घेऊन स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करत निमूट बसून होता.
खरं तर अशा वातावरणात मला गुदमरायला होतं. पण ही मुक्ताफळं ऐकल्या नंतर कानावर पडलेली अहंगंड, उद्धटपणा, अरेरावी, आणि श्रीमंतीचा माज यांनी ओतप्रोत भरलेली वाक्य मी एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून दिली. पण दुर्दैवाने एक वाक्य अक्षरशः कुणीतरी वितळलेलं गरम शिसं ओतावं तसं कानात शिरलं.
कुठली फ्रेम घ्यावी यावर अजूनही खल चालूच होता. आजींना जरा भारीतली फ्रेम घ्यावी असं त्यांच्या मुलीचं मत पडलं. अर्थात, तिचं काहीच जाणार नव्हतं...after all, her father was paying for it.
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे).
आता मी त्या कुटुंबाला ओळखत नव्हतो. त्यामुळे कोण जाणे, त्या म्हातारीला काही असाध्य आजारही झालेला असू शकत होता. अर्थात हा माझा त्या बाईच्या मुक्ताफळावरुन काढलेला अंदाज आहे. पण काहीही झालं असेल, कुठलाही आजार झालेला असेल, वय कितीही जास्त असेल, तरी "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा", असं जाहीर बोलणं सोडाच, मनात तरी विचार येतोच कसा? इथे मात्र आजींची एक्स्पायरी डेट माहीत असल्यागत ती मुलगी बोलत होती.
तेवढ्यात मी मागवलेला चष्मा आला, आणि तो घेऊन मी घाईने तिथून बाहेर पडलो.
घरातल्या म्हातार्या माणसांनी जरी कधी, "आता काय आमचं राहिलंय", "आता सगळं झालं आता आम्ही डोळे मिटायला मोकळे", असं सहज जरी म्हणाली तरी आपण हेलावतो, आणि असं न बोलण्याबाबत त्यांना प्रेमाने दटावतो.
कालपासून विचार करतोय, त्या आजींना असं प्रेमाने कुणी दटावत असेल का? की, "जाऊदे ना आई, आता कितीसे दिवस उरलेत तुझे" असं घरीही बोललं जात असेल?"

---------------------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७