Friday, April 27, 2018

लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट - जय श्री रामआता या दोघांचा काय संबंध? सांगतो.

लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट अर्थात प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. सीतामाईंना बघितल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांची अवस्था ही काहीशी अशीच झाली होती. आजच्या भाषेत सांगावं तर सीतामाईंना बघितल्यावर त्यांची चक्क 'विकेट पडली'. उद्यानात फिरणार्‍या प्रभू रामचंद्र व त्यांचे धाकटे भ्राता लक्ष्मण यांना बघितल्यावर गौरीपूजनाला आलेल्या सीतामाईंना सोडून उद्यानात भटकणार्‍या एका सेविकेने सीतामाईंना त्या दोघा भावांचे वर्णन सांगितल्यावर सीतामाई आपल्या सख्यांसह प्रभू रामचंद्रांना बघण्यास उत्सुक झाल्या.

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि। कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही। मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥1॥

इकडे हातली बांगड्या, कंबरपट्टा, आणि पैंजणांचा आवाज ऐकून त्या दिशेला लक्ष गेलेल्या प्रभू रामचंद्रांच्या अवस्थेचं वर्णन गोस्वामी तुलसीदास असं करतातः

अस कहि फिरि चितए तेहि ओरा। सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल। मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥2॥

सीतामाईंच्या मुखचंद्राकडे बघण्याकरता प्रभूंचे नेत्र चकोर आकार धारण केला आणि ते सीतेकडे स्थिर दृष्टीने पाहू लागले, जणू निमी (राजा जनकाचे पुर्वज) (ज्यांचा निवास मानवाच्या पापण्यात आहे असे मानतात) यांनी मुलगी आणि जावई यांच्यात हा प्रसंग घडत असताना आपण तिथे उपस्थित राहू नये असे वाटून संकोचाने पापण्यांचा त्याग केला आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या पापण्या न मिटता त्या स्थिर राहून ते सीतामाईंकडे एकटक पाहू शकले.

देखि सीय शोभा सुखु पावा। हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई। बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥3॥

सुंदरता कहुँ सुंदर करई। छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी। केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥4॥

सिय शोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥230॥

तात जनकतनया यह सोई। धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं। करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥1॥

जासु बिलोकि अलौकिक सोभा। सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता। फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥2॥

रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥3॥

जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी। नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं। ते नरबर थोरे जग माहीं॥4॥

सीतामातेच्या सौंदर्याचे वर्णन मात्र प्रभू रामचंद्र उघड बोलून दाखवत नाहीत. पण ते लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, हीच ती जनककन्या सीता जिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याची कठीण अट आहे. या सीतेला पाहून माझ्या मनात जे चालले आहे त्याचे कारण त्या विधात्यालाच ठावूक, पण हे लक्ष्मणा, माझी ऊजवी पापणी मात्र फडफड करते आहे. पण रघुवंशात जन्म घेतलेल्यांचा हा स्वभावच आहे की ते स्वप्नातही परस्त्रीवर (जी आपली नाही ती) दृष्टी ठेवत नाहीत. इथे गंमत पहा, आपल्याला विश्वामित्र ऋषींनी इथे का आणलं आहे याची या दोघांना कल्पना आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या पराक्रमाबद्दल खात्रीही आहे की आपण शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा नक्की चढवू आणि सीतेला पत्नी म्हणून प्राप्त करु. पण त्यांना आपण थोर अशा रघुकुलातले आहोत याची जाणीव आहे आणि त्या कुलाची मर्यादाशील परंपरा राखायची आहे म्हणून आपल्या भावना ते नियंत्रणात ठेऊ इच्छितात.

चितवति चकित चहूँ दिसि सीता। कहँ गए नृप किसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी। जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥1॥

आता सीतामाईंना त्यांच्या सखीने प्रभूंचे वर्णन करुन दोघांच्या दिशेने आणलं खरं पण सीतेला राम दिसेना. आपल्या लहानशा मृगनयनांनी सीतामाई प्रभूंना शोधू लागल्या.

लता ओट तब सखिन्ह लखाए। स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने। हरषे जनु निज निधि पहिचाने॥2॥

त्यांची ही अवस्था न बघवल्याने शेवटी सख्यांनी त्यांचे लक्ष प्रभू व भ्राता लक्ष्मण जिथे होत तिथे वेधून घेतलेच. वेलींच्या आडून प्रभूंचा चेहरा दिसताच सीतामाईंच्या डोळ्यांत अतीव समाधान दाटलं, की जणू त्यांना त्यांचा खजिनाच मिळाला असावा.

थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी। सरद ससिहि जनु चितव चकोरी॥3॥

लोचन मग रामहि उर आनी। दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी। कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥4॥

सीतामाईंचे डोळे आता प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहू लागले. ते रूप डोळ्यांच्या मार्गे हृदयात साठवून घेत तो खजिना बाहेर पडू नये म्हणून की काय सीतामाईंनी डोळे मिटून घेतले.

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
तकिसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाई॥232॥

(इतक्यात एकमेकांशी बोलता बोलता) दोघे बंधू वेलींच्या आडून बाहेर आले. असं वाटत होतं जणू ढगांच्या आडून चंद्रच बाहेर आला आहे.

प्रभू रामचंद्रांचे सौंदर्य व पराक्रमी व्यक्तिमत्व सीतामाईंना मोहित करुन गेले.

सकुचि सीयँ तब नयन उघारे। सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा। सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥2॥

पण त्याच वेळी आपल्या पित्याने आपल्याशी लग्न करायला ठेवलेली अट आठवून सीतामाई घाबरल्या.

परबस सखिन्ह लखी जब सीता। भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली। अस कहि मन बिहसी एक आली॥3॥

सीतामाईंची अशी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात मुग्ध झालेली अवस्था पाहून सख्या घाबरून म्हणाल्या की आता फारच उशीर झाला बाई. सीतामाईंना पाहून एका सखीला मात्र चेष्टा करण्याची हुक्की आली. ती म्हणते कशी, आपण उद्या पुन्हा याच वेळी इथे येऊ.

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी। भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने। फिरी अपनपउ पितुबस जाने॥4॥

आणि प्रभू रामचंद्रांना बघण्यात आपण खूपच वेळ घालवला हे लक्षात आल्याने आता आई काय म्हणेल या भीतीने सीतामाईंचा जीव कासावीस झाला आणि त्या प्रभू रामचंद्रांची छबी आपल्या हृदयात साठवून आपल्या राजवाड्यात परतल्या.

म्हटलं होतं ना, लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट अर्थात प्रथमदर्शी प्रेम अर्थात  प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही फार जुनी गोष्ट आहे हो!

बोला, जय श्री राम !

आणि हो, मंदिर वहीं बनाएंगे.

- मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. नवमी, शके १९३९