Saturday, May 22, 2010

राँग नंबर

वेळः कै च्या कै. राँग नंबरला वेळ असते का? साधारण आपला आराम करायची वेळ असते तेव्हाच लोकांना हवे असलेले बरोबर नंबर राँग लागतात. उदा. रविवार पहाटे आठ. हो, बरोबर वाचलंत तुम्ही. पहाटे आठ. रविवारी ह्या वेळेला पहाटच असते की.

फोन: आमचा लँडलाईन


राँग नंबर (१) - करंबेळकर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
एक स्त्री: "हॅलो, करंबेळकर का?"
मी: "नाही, राँग नंबर"
स्त्री: "ओह, सॉरी हां"

काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर आहेत का?"
मी: "नाही, राँग नंबर"
बुवा: "बर्र बर्र बर्र, सॉरी, मग कुणाचा आहे हा?"
मी: "तुम्हाला करंबेळकरांशी बोलायचंय?"
बुवा: "हो"
मी: "हे त्यांच घर नाही"
बुवा: "मग कुणाचं आहे"
मी: "माझं आहे"
बुवा: "तुम्ही त्यांचे शेजारी का?"
मी: "नाही, या नावाचं कुणीच ह्या इमारतीत राहत नाही"
बुवा: "अरे बापरे, सॉरी हां"

पुन्हा काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पुन्हा तीच स्त्री: "करंबेळकर आहेत का?"
मी: "नाहीत"
स्त्री: "कुठे गेलेत?"
मी: "माहीत नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. राँग नंबर"
स्त्री: "ओह हो! राँग नंबर लागला परत!! सॉरी अगेन हां"

मागल्या पानावरून पुढे.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर का हो?"
मी: "नाही हो"

अनेकदा असे फोन आल्यामुळे एव्हाना मी जवळ जवळ रडकुंडीला आलो होतो.
कारण पलीकडून...बुवा (बहुतेक बायकोला उद्देशून): "हें, हें, हें, अगं परत 'तिथेच' फोन लागला"

मी: "करंबेळकरांचा नंबर काय आहे?"
बुवा: "अमुक अमुक"
मी: "हा नंबर बरोबर आहे, पण इथे करंबेळकर नक्की राहत नाहीत"
बुवा (बायकोला उद्देशून): "अगं, एकदा मिसेस. करंबेळकर आहेत नं, त्यांना सरळ पत्रच पाठव"
(मला उद्देशून): "सॉरी हं"

पुढचे अनेक दिवस हे दोघं, जे नक्की नवरा-बायको असावेत, सारखे आळीपाळीने फोन करत होते. बरं ते प्रत्येक वेळी अत्यंत सौजन्याने बोलत आणि राँग नंबर आहे हे समजलं की तितक्याच नम्रतेने सॉरी म्हणत, त्यामुळे त्यांच्यावर मनसोक्त वैतागताही येत नव्हतं. त्यांनी माझं आणि मी त्यांचं नाव विचारण्याची तसदी घेतली नव्हती. आम्ही 'करंबेळकर' ह्या एकाच 'धाग्याने' बांधले गेलो होतो! मी तर त्यांना सरळ काका-काकू म्हणू लागलो होतो. एव्हाना त्या दोघांनाही माझा आवाज माहीत झाला होता बहुतेक, कारण पुढच्या वेळी:

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
काकू: "हॅलो, राँग नंबर बोलताय का?"~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (२) - यासीन भाई

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो, बोला"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
मी: "काSSSSय?"

मी प्रचंड दचकलो, चुकून जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकचा फोन माझ्या घरी लागला की काय? किंवा एखाद्या भाईचा फोन असावा काय? पण मी व्यावसायिक नाही आणि चित्रपटश्रुष्टीत नाही आणि बिल्डर तर नाहीच नाही. तेव्हा मला फोन करून जो कोण भाई असली कामं करतो त्याचे फोनचे बिल वाढून त्याचेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचं लक्षात आलं आणि जीव भांड्यात पडला. तरी म्हटलं एकदा खात्री करुन घ्यावी.

पलीकडून: "हॅलो, हॅलो, यासीन भाई है क्या?"
मी: "यासीन कौन"
पलीकडून: "यासीन शेख तारवाला"
हे आडनावाच्या शेवटी "वाला" असलेल्यांची एक गडबड असते. त्यांचं ते आडनाव आहे की धंदा समजत नाही. असो. विषयांतर नको.

मी (मनातल्या मनात, "मग ठीके"): "राँग नंबर"
पलीकडून दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

साधारण आठवड्याभराने एके दिवशी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई को बुलाव"
च्यामारी, मी काय ह्याच्या तीर्थरूपांचा....नाही, त्याला काय म्हणतात उर्दूत? हां, आठवलं, वालीद साहेबांचा नोकर असल्यासारखा मला हुकुम देत होता.
मी (साहजिकच चिडून): "नहीं बुलाउंगा"
पलीकडून: "कायकू?"
मी: "राँग नंबर"
पलीकडून आधीपेक्षाही दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

आणखी काही दिवसांनी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई कैसे हो?"

अरेच्च्या! आता हा तर आपण यासीन भाईशीच बोलत असल्याचं गृहीत धरून हा सुरु झाला की.

मी: "हॅलो, मै यासीन भाई नहीं है"
पलीकडून: "तो वो किधर है?"
मी: "मालूम नै"
पलीकडून: "कायकू मालूम नै?"
मी: "ये राँग नंबर है"
तो माणूस पब्लिक फोनवरून बोलत असावा, कारण याखेपेला फोन ठेवल्याचा इतका मोठा आवाज झाला की त्या फोनची नक्की शकलं झाली असणार.

असेच काही दिवसांच्या अंतराने फोन येत गेले. आता मी पुरता वैतागलो होतो. त्यामुळे पुढच्या वेळी फोन आला की ह्या म्लेंछांच्या अवलादीची पुरती फुलटू करायची असं ठरवलं.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
ह्म्म्म, आत्ता कसा सरळ बोलतोय.
मी: "नहीं"
पलीकडून: "किधर गये है?"
मी: "उपर"
पलीकडून: "तो निचू बुलाएंगे क्या?"
मी (आवाजात पुरेसे कारुण्य आणून): "उपर मतलब उपर नै"
पलीकडून: "उपर मतलब उपर नै? मतलब?"
मी (आणखी कारुण्य): "आपको मालूम नै क्या? कमाल है!"
पलीकडून: "क्या हुवा?"
मी: "यासीन भाई तो चार दिन पहले ही अल्ला को प्यारे हो गये"
पलीकडून: "आँ"
ह्या वेळी मीच आधी फोन ठेवला.
या नंतर मात्र मला या माणसाचा पुन्हा फोन आला नाही.


<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

राँग नंबर (३) - फूड कॉर्नर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर?"
मी: "काय कोरणार?"
पलीकडून: "कोरणार नाही हो, फू-ड कॉ-र-न-र"
मी: "नाही, राँग नंबर"
पलीकडून: "अरे" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो ये कहांका नंबर है?"
मी: "घर का है"
पलीकडून: "किसके घर का?"
मी: "मेरे"
पलीकडून: "आप फूड कॉर्नर के मालिक है क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो कायको मेरा टाईम वेस्ट किया?"
मी: "आपने किया मेरा टाईम वेस्ट"
पलीकडून: "क्या आदमी है" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

असेच फोन नियमितपणे येत गेले. कधी कधी एकच ग्राहक परत परत फोन करायचा. एक्स्चेंज मध्ये तक्रार करा सांगून काही फायदा झाला नाही. शेवटी मी त्या यासीन शेख साठी वापरलेली कल्पना वेगळ्या तर्हेने वापरायची ठरवली. आणखी काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: ""हॅलो, छे अंडे और ब्रेड भेज दो"
च्यामारी, हे जास्त होतंय. असो. मी सरळ ऑर्डर घ्यायला सुरवात केली.
मी: "किधर"
पलीकडून: "D-8 में भेज दो, कितना टाईम लगेगा?"
मी: "आधा घंटा"
पलीकडून: "आSSSधा घंटाSSS, ज्यादा से ज्यादा दस मिनिट में चाहिये"
त्या बाईने इतका मोठा हेल काढला की मला वाटलं हिला दहा मिनिटात अंडी नाही मिळाली तर हृदयविकाराचा झटका वगैरे येतो की काय!
मी: "ठीक है, भेज देता हुं" (पाठवतोय मी, घंटा! बस बोंबलत)

अशा दहा पंधरा ऑर्डर घेतल्यावर एकदा फूड कॉर्नरच्या मालकाने फोन केला. त्याला आमचा नंबर कसा मिळाला आणि आम्ही कोण कसं समजलं देव जाणे. त्याला बहुदा वाटलं त्याच्या शेजारी एक दुसरं फास्टफूड दुकान उघडलं होतं त्याचे आम्ही मालक. शेवटी सगळं रामायण सांगितल्यावर त्याने सरळ चक्क फोन नंबर बदलला आणि आमचा त्रास संपला.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (४) - कोण बोलतंय?

हा एक अशक्य प्रकार आहे. अशा फोनना इलाज नसतो. ते एकाच माणसाकडून सारखे सारखे येत नाहीत. तेव्हा त्यातला एक गावरान छाप किस्सा सांगून लेखाचा समारोप करतो.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "कोन बोलतंय?"
मी: "तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "अवो पन तुमि कोन बोलतायसा?
मी: "अहो आधी तुम्ही सांगा तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "तुजा मुडदा बशिवला, हिरामनला बलिव आधी"
मी (घरचे आजूला बाजूला असल्याने संयम राखत): "अहो, तोंड सांभाळून बोला, हा हिरामणचा नंबर नाही"
पलीकडून: "य्ये, त्ये ठाव हाय आमास्नि, त्या मुडद्याकडं चड्डी नाय सवताची, फुन काय ठेवनार XXXXचा? बोलाव त्याला."
हा माणूस स्मशानात पावती फाडण्याच्या कामाला असावा नाहीतर प्रेतागारात, जिवंत माणसांना संबोधताना सुद्धा सारखा 'हा मुडदा' 'तो मुडदा' करत होता.

याही वेळी मीच फोन ठेऊन दिला.

इति राँग नंबर कहाणी सुफळ संपुर्ण

4 comments:

  1. हाहाहा... लई भारी. एवढा चांगला लेख आणि शून्य प्रतिक्रिया? विश्वास बसत नाही! असो. मला भयंकर आवडला. अजूनही हसतोय. ऑफिसात असल्याने तोंड दाबून हसावं लागतंय.

    ReplyDelete
  2. hahaha....i had a great time reading this post...n I really agree to Sanket...How come only one comment....It was awesome post..could not stop myself from laughing (n not smiling)

    ReplyDelete
  3. ekdam masta.. couldn't stop laughing.. But this can also be serious when someone stalks you by calling repeatedly and troubling you. I had this experience in Bangalore twice!! Aso!

    ReplyDelete