काल फेसबुकवर या चित्रासह एक पोस्ट बघितली आणि त्यातल्या विचारांत थोडी भर टाकणारे काही विचार मला सुचले. हे एक प्रकारचे note to self म्हणायला हरकत नाही.
रिकामा वेळ असणाऱ्यांना आणि तो घालवायला वाट्टेल ते करणाऱ्या लोकांना आपण सरसकटपणे रिकामटेकडे म्हणतो. पण हे वर्गीकरण रिकामटेकडे आणि रिकामचोट असं असायला हवं.
सर्वसाधारणपणे:
रिकामटेकडे लोक गाणी ऐकतात, टीपी जोक्स सांगतात, उगाचच घर आवरतात, इकडेतिकडे फेरफटका मारतात, चकाट्या पिटतात, मधेच तुम्हाला नर्मविनोदी चिमटा काढतात, गॉसिप करतात, वगैरे. असे लोक तसे निरुपद्रवी असतात.
रिकामचोट लोक या चित्रातील पक्षासारखे असतात. उगाचच एखादं भडक विधान करणे आणि मजा बघत बसणे, आपला संबंध नसताना इतरांच्या व्यवहाराबद्दल नकारात्मक टिप्पणी करुन समोरच्याला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडणे, काड्या घालणे आणि नंतर तिखट उत्तर मिळालंच तर victimhood छाप कांगावा करणे, इत्यादी प्रकारच्या कारवाया हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण असते. कुठल्याही प्रकारची रचनात्मक बौद्धिक किंवा तात्विक चर्चा करण्याची यांची कुवत तरी नसते किंवा स्वभाव तरी.
रिकामचोट लोक वेळ घालवायला जरी हे करत असले तरी तो त्यांचा मूळ स्वभाव असतो, जो इतर कामाच्या वेळी त्यांना बाहेर काढणे परवडणारे नसते. मग रिकामा वेळ मिळाला की उपरोल्लेखित प्रकार सुरू होतात.
तुमचा वेळ आणि तुमची बुद्धिमत्ता आणि शक्ती मौल्यवान आहेत, त्या अशा लोकांवर खर्च करू नका. अशा लोकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हाच उपाय असतो. संपूर्ण म्हणजे संपूर्ण. हे बोलायला सोपं असलं तरी व्यवहारात अगदीच अशक्य नाही. थोडी साधना लागते इतकंच. माझी साधना सुरू आहे, तुमचं काय?
© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ. दशमी, शके १९४५ | विक्रम संवत २०८०
👌👌
ReplyDelete