Saturday, May 22, 2021

टाइम्स हॅव चेंज्ड अर्थात कालाय तस्मै नमः

नुकताच कोकणात गावी गेलो होतो काही कामानिमित्त. आमच्या आणि शेजारच्या घराभोवती फेरफटका मारताना एक गोष्ट एकदम अंगावर आली. त्या निमित्त त्या क्षणी हे वाटलं ते मांडतोय. ते चूक की बरोबर यापैकी काहीच नाही. फक्त ते वाटलं, ते आहे इतकंच. 

जुनी खिडकी नवी खिडकी

जुना काळ म्हणजे नेमका किती वर्षांपूर्वीचा? काळ बदलला असं कधी म्हणता येतं? Age is just a number अर्थात वय हा फक्त एक आकडा आहे या वाक्याचा नक्की अर्थ काय? 

शारिरीक वयावर आपलं नियंत्रण नाही पण मनाने आपण म्हातारे होता कामा नये असं म्हणतात पण काही गोष्टी बघितल्या की अचानक मनाने आपण एकदम वीसेक वर्ष तरी मोठे झालोय की काय असं वाटत राहतं. 

डावीकडची खिडकी जुन्या पद्धतीच्या घराची तर उजवीकडची खिडकी पडझड व्हायला आलेल्या जुन्या घराला पाडून नव्याने बांधलेल्या घराची. 

आधुनिकतेला कधीच विरोध नाही पण अशा गोष्टी बघितल्या की कुठेतरी गलबलतं हे नक्की. अशाच खिडकीत बसून आजी/पणजी आम्हा मस्तीखोर मुलांना ओरडत असे, शेजारच्या घरातील अशाच खिडकीत बसलेल्या समवयस्क सखीशी सुखदुःखाच्या, शिळोप्याच्या गप्पा मारत असे. त्यांच्या गप्पा सुरु असताना घरातली सून पलीकडच्या खिडकीतल्या आजीला आपल्या आजेसासूच्या "बघा ना, या मुंबईहून पाठवलेलं औषध वेळेवर घेतच नाहीत" अशा प्रेमळ तक्रारी सांगत असे. लपाछुपी खेळताना पटकन लपायला आमच्यापैकी एखादा या गवाक्षातून आत जायचा प्रयत्न करत असे.

असो, काय काय आठवेल सांगता येत नाही. त्या आज्या, त्या पणज्या कधीच गेल्या. त्यांच्या नातसुना आता त्यांच्या सारख्या दिसू लागल्या. हे बदल घडतानाही काही विशेष वैषम्य वाटलं नाही, जसा काळ पुढे सरकेल तसं हे होणारच असं म्हणून मनाने स्वीकारलं. मग या दोन खिडक्यांकडे पाहून एकदम भावुक व्हायला का व्हावं? 

विचार करता करता अचानक डॉ राजीव मिश्रा यांची एक पोस्ट आठवली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की माणसं महत्वाची नाहीत, संस्कृती आणि सभ्यता (civilization) महत्वाच्या आहेत, आणि ही गोष्ट मानवी मनात पिढ्यानपिढ्या कोरलेली आहे. डाव्या फोटोतली जुन्या घराचा अविभाज्य भाग असलेली खिडकी ही याच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. कदाचित म्हणूनच माणसांच्या मर्त्य असण्यापेक्षा गावाकडच्या अशा घरांचं हे असं आधुनिक होणं अपरिहार्य असलं तरी कुठेतरी मनाला झटका देऊन अचानक वीसेक वर्ष पुढं ढकलतं असं वाटतं.

उजवीकडची खिडकी नव्याने बांधलेल्या घराची. या खिडकीतून आता आजी, पणजी डोकावणार नाही. फार फार तर तिचा खापरपणतू किंवा पणती मोबाईलला रेंज येते आहे की नाही बघायला येतील खिडकीत, गावाकडे कधी आलेच तर. असाही हल्ली अनेकांचा फक्त मालमत्तेवर दावा कायम ठेवण्यापुरता संबंध असतो गावाशी. त्यांच्या लेखी ते आपलं घर, आपली वाडी नसते, तर सतत सोयीनुसार आधुनिक करत राहण्यायोग्य आणि आपला क्लेम ठेवण्यायोग्य 'प्रॉपर्टी' असते. पण विषयांतर नको.

काळ पुढे सरकला, बदलला असं नेमकं कधी म्हणता येतं हे नाही ठाऊक, पण असे बदल बघितले की माझ्या तरी अंगावर येतात हे नक्की. आपण "शहरातून" "गावाकडे" येतो ते "गावात" रहायला. आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांकडे आकर्षिले जात असतो. पण गावच आता शहर (खरेतर शहरी!) बनत चाललं आहे हे झेपत नाही.

गोष्टी घडल्या म्हणून काहीच बिघडत नाही, पण बघवतही नाही. गोष्टी आधीही बदलत होत्या, पण आता त्यात भावुकतेला स्थान नाही. 

खरंच आहे, टाइम्स हॅव चेंज्ड.

🖋️ मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९ (सीता नवमी), शके १९४३

No comments:

Post a Comment