एका समूहावर कुणीतरी प्रश्न विचारला होता, तो साधारणपणे असा होता की त्रागा वगैरे ठीक आहे पण या मालिकांचा मनावर आणि प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का?
तर नक्कीच होतो. या संदर्भात विचार करत असताना मला कुणीतरी शेअर केलेली प्राजक्ता कणेगावकर यांची पोस्ट आठवली. त्यात त्यांनी मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे त्यांच्या बाबतीत लिहिलेला तपशील आठवला.
"मारी कॉंडो लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. तिचं यावर एक छान पुस्तकही आहे, ज्यात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं."
"मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही जी प्रक्रिया अव्याहत चालू असते, त्याने नाद होतो, आवाज होतो, त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात (पण असतात). घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला इतकंच. त्यामुळे तिने लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं."
सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. मालिकांतून तर आपल्यावर दुहेरी अत्याचार होत असतो, दृक्श्राव्य असा. अत्यंत हीन दर्जाचे संवाद असलेल्या, ज्यांत सतत कटकट, भांडणे, कारस्थाने, कुणीतरी कुणावर तरी सतत खार खाऊन आहे, सतत अतिरेकी आणि विकृत हावभाव करणाऱ्या आणि विचित्र कपडे वापरणाऱ्या व्यक्तिरेखा ज्यांत आहेत अशा मालिकांचा भडीमार इच्छुक प्रेक्षकांवर आणि अनिच्छेने बघणाऱ्या कुटुंबियांवर सुरू असतो. अनेक जण यावर अनेक उपाय सुचवत असतात त्यातला एक की आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं... मारी कॉंडोने पुस्तकात सांगितलेला किस्सा आठवला तर यातली गडबड लक्षात येते. ती म्हणजे दुसऱ्या खोलीत बसलं तरी घरात तो नाद जाणवत राहतोच. याच नकारात्मक नादाचा परिणाम हा कळत नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांवर होतच असतो आणि त्याचा परिणाम इतरांशी त्यांच्या असलेल्या वागण्यात झाल्याचं दिसून येतं.
एका मालिकेत मामा आणि भाचीचं प्रेम प्रकरण दाखवलं होतं. आता यात एक गोम आहे. हे देशातल्या काही भागांत सामान्य आहे. पण सगळ्याच भागात नाही. पण याच्या पासून सुरवात करत हळू हळू हे इतर नात्यांपर्यंत वाढवत नेलं जाऊ शकतं. उद्या सख्खे भाऊ बहीण प्रेमात पडताना दाखवले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
कारण जवळजवळ प्रत्येक वाहिनीवर एखादी तरी मालिका अशी आहे की जिच्यात एखादी वाईट किंवा विचित्र गोष्ट (aberration) समाजात घडत असेल तर ती तशीच म्हणजे सामान्य किंवा नॉर्मल नाही हा संदेश जाण्याऐवजी त्याचं अशा प्रकारे सामान्यीकरण (normalisation) आणि त्या गोष्टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जोमाने सुरू आहे.
एका मालिकेत विवाहबाह्य संबंधांचं चित्रण होतं. मालिकेबाबत जास्त चर्चा नको, पण घटस्फोट देऊन नवऱ्याला लाथ मारून बाहेर काढायच्या ऐवजी जिच्याशी लफडं असतं त्या बाईला धडा शिकवायच्या नावाखाली तिच्याबरोबर एकाच घरात राहणारी बायको आणि तिला साथ देणारी सासू दाखवून झीने नक्की काय साधलं? विवाहबाह्य संबंध असतात समाजात, पण नवरा त्याच्या लफडयाबरोबर त्याच घरात एकाच बेडरूममध्ये राहतो आणि बायकोही मुलाबरोबर आणि सासुसासऱ्यांबरोबर त्याच घरात हळदीकुंकू, त्या लफडयाची चेष्टा करत मजा मजा करत राहतात हे काहींना बघायला विनोदी वाटत असलं तरी हे एका सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण नव्हे का?
दुसऱ्या एका वाहिनीवर उंच, गोरी आणि सुंदर मुलगी आणि बुटका आणि अत्यंत सामान्य दिसणारा, फारसा कर्तबगार नसणारा मुलगा अशी जोडी दाखवली आहे. आणखी एका मालिकेत एक लग्नाळू मुलगा घरातल्या मोलकरणीशी सूत जमवून लग्न करताना दाखवला आहे.
ज्या सुबोध मालिकेची इथे अजूनही यथेच्छ चेष्टा सुरू असते, त्यात तरी वेगळं काय दाखवलं आहे? श्रीमंत पण चाळीशी केव्हाच उलटून गेलेल्या विधुराच्या जवळजवळ गळ्यात पडून लग्न जमवणारी विशीतली तरुणी. उद्या चांगल्या घरातल्या तरुणींना आपल्या आसपास एखाद्या बऱ्यापैकी पैसेवाल्या पण वयाने पंधरा वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाला पत्नीवियोग झाल्याचं समजल्यावर त्या पुरुषात त्या मुली आपला भावी नवरा पाहू लागल्या तर त्याला जबाबदार असणाऱ्या कारणांत या मालिकांचा नंबर नक्कीच वरचा असेल.
मागे एका तरुणांच्या मालिकेत मुलं आणि मुली एकाच घरात भाड्याने राहत असल्याचं दाखवलं होतं. ही मुलं प्रामाणिक, उद्यमशील वगैरे दाखवण्याच्या आडून असं मुलामुलींनी एकत्र राहणं हे सामान्य असल्याचं किंवा सामान्य असायला हवं असं सुचवण्यात मालिकेने कोणतीही कसर सोडलेली नव्हती.
तीच तीच सासू सुनेची भांडणं दाखवून कंटाळा आला म्हणून की काय एकाच कुटूंबातले बाकीचे सदस्य पण एकमेकांच्या विरोधात उठता बसता सतत कारस्थानं करत असताना दाखवले जाऊ लागले. एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या जेवढ्या योजना दर क्षणाला त्यांच्याकडे बनत असतात तेवढ्या तर राजकारणातले लोक सुद्धा करत नसतील. एका मालिकेत तर आजी नातवाचा जीव घ्यायला तत्पर असल्याचं दाखवलं होतं. त्याच मालिकेत बहीण बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, भाऊ भावाचा, आणि बरंच काही.
संत तुकाराम हा चित्रपट पाहून कुणी संत होत नाही, आणि एखादा डाकूपट पाहून कुणी दरोडेखोर होत नाही हे वाक्य डायलॉग म्हणून तोंडावर मारायला ठीक आहे, पण दृश्य माध्यमांचा परिणाम जनमानसावर किती होतो याची प्रत्यक्ष उदाहरणे आजूबाजूला घडताना पाहिलेली आहेत.
धर्मेंद्रचा जुगनू चित्रपट दोन डझन वेळा पाहून त्यातल्या दरोड्याच्या दृष्याबरहुकूम तसाच दरोडा आपण घातल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली होती. सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यावर नुकतंच मिसरूड फुटलेल्या अनेक किशोरवयीन मुलांनी घरातून पळून गेल्याच्या बातम्यांत वाढ झालेली होती.
सिनेमाचा परिणाम जो आणि जेवढा होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक मालिकांत होतो, आणि होतही आहे. रोज त्याच गोष्टींचा मारा सुरू असतो, आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्णपणे तो यशस्वी होत नाही. दुर्दैवाने अशा मालिकांचा प्रेक्षकवर्ग अशा पिढीतला आहे की जी स्वतः कर्तबगार आहे पण मनोरंजनासाठी म्हणून सुरवात करून त्याचं व्यसन कधी झालं हे तिला कळलेलंच नाही.
समाजात संस्कृती, प्रकृती, आणि विकृती हे एका विशिष्ट प्रमाणात असतात. प्रमाण व्यस्त झालं तरी शेवटी विकृती ही विकृतीच राहते. दुर्दैवाने मालिकांत मात्र या विकृती किंवा विचित्र गोष्टींचं सामान्यीकरण सुरू असल्याचं दिसतं. याला हळूहळू प्रतिष्ठा प्राप्त होईल. एक प्रकारचं ब्रेनवॉशिंगच आहे, आणि त्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडायलाच हवं.
न्यायदेवता आंधळी असते कारण तिला निष्पक्षपणे विचार करायचा असतो, तसंच पण जरा वेगळ्या अर्थाने घराबद्दल म्हणायचं झालं तर वास्तूही आंधळ्या व्यक्तीसारखी असते, तिला हे कळत नसतं की आवाज कोणाचे आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, टिव्हीतून येत आहेत की प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून. म्हणून आपण घरात निव्वळ काय बोलतो इतकंच नव्हे तर टीव्हीवर काय बघतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं.
स्टुडिओत आठ आठ तास घोटवून घेतलेल्या गाण्याला आपण गायकांची....नव्हे स्पर्धकांची गायकी समजतो आणि अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले परीक्षक ज्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीपर स्क्रिप्टेड प्रतिक्रिया देतात त्यांना खरं समजतो, आणि कोण जिंकणार हे ही आधीच ठरलेलं असलं तरी खरोखर सुंदर गाणारा स्पर्धक जिंकला/ली नाही तर वाईटही वाटून घेतो आणि त्यावर हिरीरीने चर्चाही करतो. हा ही एक प्रकारचा नकारात्मक नादच नव्हे का?! शिवाय, आपण दर्जेदार गायनाला मुकतो आहोत आणि गेली अनेक वर्ष आपली अलिखित राष्ट्रीय पॉलिसी असलेले दोन शब्द 'चलता है' छाप गायकीचा सदोष नाद आपल्या मनात साठवत जात आहोत.
गेमिंग अर्थात कॉम्पुटर/मोबाईल गेम्समध्ये जी मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरली जाते तीच थोड्याफार फरकाने मालिकांत वापरली जाते. गेमिंगमध्ये कितीही अवघड गेम असला तरी खेळणाऱ्या व्यक्तीला अधूनमधून लहानसहान विजयांचं गाजर दाखवून सतत गेम खेळायला भाग पाडलं जातं, तसंच मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागाच्या शेवटी उद्या म्हणजे पुढच्या भागात काय होणार आहे याचं औत्सुक्य चाळवून त्यावर विचार करण्यास आणि पुन्हा पुढे बघण्यास प्रवृत्त केलं जातं.
मालिकांच्या बाबतीत एका मानसशास्त्रज्ञाचं विधान आठवलं, ते हे की मालिका या चित्रपटापेक्षा जास्त धोकादायक असतात कारण त्याने मनाला क्लोजर मिळत नाही. सिनेमात कथेचं वर्तुळ पूर्ण झाल्याने प्रेक्षकांना क्लोजर मिळतं, ते असंख्य भाग असलेल्या मालिकांतून मिळणं अशक्य असतं. क्लोजर न मिळाल्याने मानसशास्त्रीय विसंगती निर्माण होते आणि त्यातूनच सतत तोच नकारात्मक नाद मनात घेऊन आपण दिवसाचा शेवट करत असतो. काम कितीही असो किंवा नसो आजकाल जाणवणाऱ्या प्रचंड स्ट्रेस किंवा मानसिक थकव्याचं हे देखील एक मोठं कारण आहे असं वाटतं.
यातून बाहेर कसं पडायचं हा मात्र अवघड प्रश्न आणि खोल विषय आहे. मालिका नव्हत्या तेव्हा लोक जे करत होते ती परिस्थिती आणि सामाजिक वातावरण आज उरलेलं नाही आणि आज ही अवस्था आहे की मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देण्यापेक्षा, त्यांच्याशी संवाद वाढवण्यापेक्षा इतरांची आई काय करते आणि आपल्या फिटनेसची काळजी करण्यापेक्षा मालिकेतल्या वजनदार मुलीचं लग्न का ठरत नाही याची काळजी लोक जास्त करत असतात.
कणेगावकर त्यांच्या लेखात पुढे एक उदाहरण देताना म्हणतात की "सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्युसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे. Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच फार गरजेचं झालं आहे."
तर असा मार्ग शोधण्यासाठी गुढीपाडवा हा त्याची सुरवात करण्याचा दिवस ठरो अशा तुम्हाला या सणाच्या निमीत्ताने खूप शुभेच्छा.
🖋️ मंदार दिलीप जोशी
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४३ अर्थात गुढीपाडवा
No comments:
Post a Comment