लहानपणी पंचतंत्र की इसापनीतीत एक गोष्ट वाचली होती. त्या कथेची आजच्या काळासाठी सुसंगत आवृत्ती अशी:
चार पंडित मित्र गुरुंच्या आश्रमातून विद्या संपादन करुन आपल्या घरी परतत असतात. चौदा वर्ष अनेक गूढ विद्या आत्मसात केल्यानं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो.
वाटेत एक जंगल लागतं, या जंगलाच्या पलिकडेच त्यांचं गाव असतं.
चालता चालता अचानक एकाला हाडांचा ढीग दिसतो. पहिला म्हणतो, माझ्याकडे असणाऱ्या सिध्दीनं मी ही हाडं जुळवून सापळा तयार करु शकतो, जेणेकरुन हा कोणता प्राणी आहे ते कळेल तरी.
तो मंत्र म्हणतो आणि आश्चर्य! समोर एका प्राण्याचा सापळा तयार होतो.
दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, मी या प्राण्याला मांस आणि त्वचा देऊ शकतो. त्यानं मंत्र म्हणताच समोर साक्षात सिंह तयार होतो.
आता तिसरा म्हणतो, माझ्याकडे तुमच्यापेक्षा महान सिध्दी आहे मी त्याला जिवंत करु शकतो!
हे ऐकताच चौथा मित्र, जो सारासार विचार करत असे व वेळोवेळी योग्य सल्ले देत असे, तो हादरतो आणि त्याला तसे न करण्याबद्दल विनंती करू लागतो. उरलेले तिघे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोर पुरस्कर्ते असतात. ते तिसऱ्याने आपल्या प्रगाढ ज्ञानाचा व विद्येचा उपयोग करून सिंहात प्राण फुंकून त्याला जिवंत करावेच या मताचे असतात. चौथा फारच आग्रह करू लागतो तेंव्हा ते त्याला 'टोकाचा विचार करणारा', 'आततायी', 'कट्टर', 'तुझ्या मनात द्वेष आहे,' 'तालीपंडित' अशी दूषणे देतात. शेवटी तो चौथा मित्र म्हणतो, "तुम्हाला सिंहाला जिवंत करायचे तर करा, पण त्या आधी मला थोडा अवधी द्या, मी त्या समोरच्या उंच झाडावर चढून बसतो. मग याला मंत्र म्हणू दे.
पण तिघे ऐकत नाहीत. असं कसं, तुला आवरायला झालेलं आहे. इतका कट्टरपणा चांगला नाही. आम्ही सिंहाला जिवंत करताना त्याने हिंसक होऊ नये अशीही प्रार्थना करणार आहोत. त्यामुळे त्यात सहिष्णुता स्थापन होऊन तो इतर सिंहांनाही सहिष्णू बनवेल. चौथा मित्र म्हणाला, अरे असं काही नसतं, सिंह हा सिंह असतो. त्याची नैसर्गिक वृत्ती तो का सोडेल? मी काही तुम्हाला सिंहाचे तुकडे तुकडे करा असे सांगत नाही, त्याला दगड तलवारी घेऊन हाणा असे सांगत नाही, फक्त त्याला जिवंत करु नका. तरीही त्या तिघांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी त्या चौथ्या मित्राला झाडाला बांधलं आणि म्हणाले, "बघ आमचं पांडित्य, बघ आमची विद्या, बघ आमची सहिष्णूता!"
तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि सिंह जिवंत झाला. बराच काळ भुकेलेला असल्याने त्याने पटकन आधी सैरावैरा पळणाऱ्या त्या तिघा मित्रांना पकडून खाल्ले आणि मग शेवटी चौथ्या मित्रालाही गट्टम केलं.
तात्पर्य:
(१) कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
(२) संधी मिळाली की पळ काढा आणि संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.
टीप: यात एक पाचवे पात्र पण आहे, जे तिघांतल्या कुणाचाही सारासार विचार जागृत होऊ लागल्यास मैत्री तोडण्याची धमकी देतं. आजच्या भाषेत अनफ्रेंड करेन असं सांगतं. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तोवर हा व्हिडिओ बघा. मोठमोठ्या लेखांतून जमणार नाही ते जेमतेम एका मिनिटात समजावलं आहे.
© मंदार दिलीप जोशी
माघ शुक्ल त्रयोदशी, शके १९४३
>>कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
ReplyDelete-सहमत!