Wednesday, February 23, 2022

वाचनप्रेमी तालिबान - लोकशाहीचा मार्ग पुस्तकातून: एक छापण्याआधीच मागे घेतलेला एक लघु अग्रलेख किंवा संपादकांचे मनोगत

तालिबान म्हणजे विद्यार्थी असे आम्ही म्हणालो होतो तेव्हा अमानुष बहुमताने निवडून आलेल्या सद्ध्याच्या राज्यकर्त्यांच्या समस्त पाठीराख्यांनी आमच्यावर जहरी टीका केली होती. पाठीराखे हा शब्द आम्ही विचारपूर्वक वापरला त्यास कारण की भक्त शब्द वापरला तर भलतीच नामुष्की ओढवण्याची भीती. मागे घेतला तरी ते आपल्याला विसरू देत नाहीत. अग्रलेख विसरू देत नाहीत तर एखादा शब्द विसरू देण्याची शक्यता अंमळ धूसरच.

Reader Taliban

तर विषय असा की हातात बंदुका आहेत आणि त्यात हजार लानते पाठविण्यालायक गोळ्याही आहेत, आणि ज्या प्रमाणे नागपूरवरून आदेश येताच शाखांत अंमलबजावणी होते त्याच प्रमाणे वरिष्ठांचे आदेश येताच धार्मिक शिस्तीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेले हे शस्त्रसज्ज योद्धे कार्यतत्परही आहेत. मात्र, असे असतानाही आपल्या ज्ञानप्राप्तीच्या लालसेचे दमन न करता मिळालेल्या अल्प फावल्या वेळात, म्हणजे शिस्तीची अंमलबजावणी करताना डोकी उडविण्यापासून फुरसत मिळताच, वाचनालयात जाऊन स्वतःचे डोके मात्र पुस्तकात खुपसण्याची संधी सोडत नाहीत. काही खवचट लोक म्हणतीलही की हे फक्त चित्रे बघत आहेत, पण शेवटी भाषा ही चित्रांमधूनच निर्माण होते ना? आपल्या संस्कृतीत मनुष्य नेहमी विद्यार्थी असतो आणि त्याने सतत वाचन, मनन ठरत रहाणे आवश्यक आहे त्याचेच हे दुसरे रूप नव्हे काय? प्रस्तुत छायाचित्रात मागे फिरत असलेला इसम हा अशाच प्रकारे मनन करत असल्याचे आपल्याला दिसते. आपल्याला काय वाचायचे आहे हे सुद्धा विचारपूर्वकच ठरवले पाहिजे ही प्रगल्भ जाणीव त्याचे ठायी आहे हे तो आपल्या या कृतीतूनच दाखवून देत आहे. मग आपण ते आणि आपण असा भेदभाव का करावा?

पण अशा प्रकारे भेदभाव करावा असे प्रोत्साहनच सद्ध्याच्या प्रस्थापित राजवटीकडून मिळालेले दिसते. त्यातूनच मग कुणी काय पेहराव करावा इथपासून कुणी काय बोलावे हे काही मूठभर लोक ठरवू पाहतात. पण मूठभर लोकच शांततेने क्रांतीही घडवू शकतात हीच आशा आपल्याला या छायाचित्रातून दिसते. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी किंवा काही दशकांत या दोन वाचनप्रेमी जिज्ञासू युवकांसारखीच सवय आणखी काही युवकांना लागेल व संपूर्ण तालिबानी राजवट ही याच ज्ञानलालसेने रासवट शिस्तीतून बाहेर येऊन लोकशाहीवादी विचार आपल्या मनात रुजवेल अशी आम्हांस खात्री वाटते.

पुढे आपल्याकडचे मूठभर लोक सत्तेत टिकल्यास सद्ध्याच्या आपल्या प्रस्थापित राजवटीला तालिबानकडूनच अशा अभ्यासू, ज्ञानाधिष्ठित लोकशाहीची शिकवण घेण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या समाजमाध्यमांवरच्या कोलांट्याउड्या व डिलीट झालेली विचारमौत्तिके बघण्यास मात्र आपल्यासारख्या लोकशाहीप्रेमी व कन्हैया, मेवानी, व राऊत यांच्या भारतात पुरोगामी लोकांस मौज वाटणार हे निश्चित.

- पिरिष गुबेर
संपादक, ओकसत्ता

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९४३







1 comment: