शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते.
एकदा सहज विचार करत बसले असता जलालुद्दीन सरांच्या मनी आले की मुघल सलतनतीत एखादा तरी प्रेम दिवस असावा. पण आता इतक्या बायका आणि अंगवस्त्रे असताना बादशहा हुजूरांचा रोजच प्रेमदिवस असे. त्यांची अडचण त्यांनी (पुन्हा) बिरबलालाच सांगितली. बिरबलाने त्यांना अरबस्थानातील प्राचीन पीर संत वळवळताहेन या थोर इश्वरी पुरुषाबद्दल सांगितले. "शहेनशहा साहेब, आपण आपल्या वर्षातील प्रत्येक दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा करावा, पण इंग्रजी क्यालेंडरातील चौदा फेब्रुवारी हा दिवस सरजमीन-ए-हिंदूस्थानात प्रेम दिवस म्हणून साजरा करावा.
"पण चौदा फेब्रुवारीच का?" जहांपन्हांनी पुन्हा अजागळ शंका विचारलीच.
"सारख्या मालिका पाहून तुम्हाला काही सुचत नाहीसे झाले आहे झालं जहांपन्हा. मालिका सुरु असतील तेव्हा तुम्ही दीवान-ए-खास सोडून दीवान-ए-आम मध्ये बसून आवामच्या तक्रारी ऐकत चला, डोक्याची मंडई कमी होईल." बिरबल वैतागून म्हणाला.
मालिकांचा उल्लेख बिरबलाने करताच "आमच्या दुखत्या नसीवर बोट ठेवायला आम्ही तुला फर्मावलेले नाही. तेव्हा आमच्या समस्येवर तोडगा सांग पटकन", असं शहेनशहा उद्गारले.
"अहो बादशहा साहेब, चौदा फेब्रुवारी हा संत वळवळताहेन याचा स्मृतिदिन. तसेच आपल्या पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस कधी येतो सांगा बरं?"
मागच्या वेळी पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस विसरल्याने त्यांनी आख्खी "अम्मी कुठे कडमडते" मालिका सोबत बसवून बघायला लावली होती त्याची याद येऊन बादशहा कळवळले. तेव्हापासून पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस हा चौदा फेब्रुवारीला येत असल्याचे त्यांच्या मश्तिष्कच्या 'गहराईयां'त कोरले गेले होते.
बिरबलाच्या हुशारीवर बादशहा मनातल्या मनात खुष झाले आणि त्यांनी फरमान सोडून चौदा फेब्रुवारी हा इष्क-ए-हिंद-ए-दिन म्हणून घोषित केला. त्याचा पुढे अपभ्रंश शाखावाल्यांनी वळवळताहेन दिन असा केला.
हा खर्रा इतिहास हे संघी चड्डीवाले तुम्हाला कधी सांगणार नाहीत.
अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४४४४, ओळ २३
#इष्क_ए_हिंद_ए_दिन #तुझ्यायची_अकबरी
© मंदार दिलीप जोशी
Lol :D
ReplyDelete