Keep it Simple, Stupid!
तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. तुम्ही व्यवसाय करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करत असलात तर गोष्टी साध्या सोप्या ठेवा. संभाव्य गिर्हाईकांना तुम्ही तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या संकेतस्थळे किंवा अॅप वापरताना आरामात खरेदी करता आली पाहीजे.
दोन अनुभव सांगतो. माझा एक परिचिताचा सेंद्रीय शेती व शेतमाल विक्रीचा व्यवसाय आहे. आता एका शहरात व्यवसाय करायचा म्हटल्यावर अमुक ठिकाणी विक्री होणार इथवर ठीक आहे, पण आता ही ठिकाणे ठरणार कशी, तर आजूबाजूच्या लोकांचा अंदाज घ्यायचा, पुरेशी लोकं सेंद्रीय शेतमाल घ्यायला तयार असली की त्यांनी मागणी नोंदवायची, मग ते ठिकाण ड्रॉप पॉइंट ठरणार. हे किती कटकटीचं आहे! एक तर हा सेंद्रीय शेतमालाची किंमत जास्त, लोकं याकडे आकर्षीत कशी होणार? त्यापेक्षा सरळ ट्र्क घेऊन सोसायटीच्या बाहेर यायचं, ज्याला घ्यायचं तो घेईल. शिवाय भाजी घेताना समोर ज्या भाज्या दिसतील त्यापैकी माणूस ठरवतो कुठल्या घ्यायच्या ते. काही दिवस आधी यादी तयार करुन मग भाज्या नाही घेता येत.
पण नाही, आमच्या सोसायटीसाठी व्हॉट्सप ग्रूप बनवून झाला आणि एकही प्रतिसाद आला नाही. गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यावर कोण प्रतिसाद देणार? लोकांनी किंमतीची कारणे सांगून काढता पाय घेतला.
दुसरा अनुभव. तोच परिचित. कोकणी व इतर स्वदेशी उत्पादनांसाठी एक अॅप बनवण्यात आलं. म्हटलं बरं झालं आता अॅप हाताशी असेल तर उत्तम. पण हाय रे कर्मा. आधी अॅप डाऊनलोड करायचं, मग त्यात नाव, पत्ता, फोन ही माहिती भरायची. इथवर ठीक. पण मग तुम्ही राहता त्या भागातला 'प्रतिनिधी' तुमच्याशी संपर्क साधणार आणि तुम्हाला अॅपचा अॅक्टिव्हेशन कोड देणार. मग तुम्ही अॅप वापरू शकता. पण का ही गुंतागुंत पुन्हा? अॅमॅझॉन किंवा इतर अॅप्स सारखं सोपं का नाही बनवता येत? एक तर पत्ता नोंदवायचा असतोच, तिथे राज्य आणि शहरांचे ड्रॉप-डाऊन बॉक्स आहेतच (जिथे तुम्ही वस्तू पोहोचवू शकता त्याची मर्यादा तिथेच वापरकर्त्याला दिसते), त्यामुळे त्या त्या विभागातल्या प्रतिनिधीने अॅपचा अॅक्टिव्हेशन कोड देण्यात काहीही अर्थ नाही. फार फार तर अॅटोमेटीक पाठवता येणारा ओटीपी ठीक. पुढे काही समस्या आल्यास प्रतिनिधीशी संपर्क साधणे ठीक, पण अॅप अॅक्टिव्हेट करायला प्रतिनिधीने फोन करण्यात काय हंशील?
म्हणजे आधी अॅपशी मारामारी करा, मग फोन येणार तो सुद्धा वाट्टेल तेव्हा, मग अॅप अॅक्टिव्हेट होणार. मग वस्तू दिसणार. मग त्या मागवणार. कशाला हे सव्यापसव्य? सरळ अॅप डाऊनलोड करुन हव्या तितक्या डिव्हाईसेसवर इन्स्टॉल करुन एकच खातं तयार करुन हवं तेव्हा ऑर्डर करण्याची सोय देणं इतकं अवघड आहे का?
हे इतकं पोटतिडकीने लिहीण्याचं कारण म्हणजे बाबांनो संभाव्य ग्राहकांकडे ऑनलाईन खरेदी करताना वेळ आणि संयम अजिबात नसतो. त्यात तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यात तर लोक वैतागून नाद सोडून देतात.
म्हणूनच तंत्रज्ञान वापरणार असाल तर गोष्टी साध्या, सोप्या, आणि खरेदीसाठी सुलभ ठेवा. तरच लोक तुमच्या उपक्रमाकडे आकर्षित होतील.
थोडक्यात Keep it Simple, Stupid!
🖋️ मंदार दिलीप जोशी
ता.क. इथे stupid हे व्यक्तीला नसून वृत्तीला म्हटले आहे. तेव्हा राग मानू नये.
धन्यवाद खुप छान माहिती आहे.मी पन एक article लिहितो.
ReplyDeletehttp://jiomarathi.xyz