Tuesday, January 27, 2026

सारे प्रवासी सुट्टीचे

गेल्या जूनपासून वैयक्तिक तसेच कार्यालयीन व्यग्रतेमुळे कोकणात गावी नियमित फेऱ्या मारायला जमलं नव्हतं. शिवाय काही कामं होण्यासाठी प्रत्यक्ष जाणं अपरिहार्य असतं. सुट्ट्याही फारशा शिल्लक नसल्याने गर्दीचा धोका पत्करून जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गावी जायचं ठरवलं.

शनिवारी सकाळी सव्वासातला निघालो, तरी आख्खे पुणे कोकणात निघाल्यागत अक्षरशः बंपर-टू-बंपर ट्रॅफिक!  माणगाव येईपर्यंत क्लच-ब्रेक-एक्सलरेटर करता करता पायाचे तुकडे पडले. एक मित्र ठाण्याहून एसटीने निघून माणगावला भेटणार होता तो ही ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्याची वाट बघत तासभर थांबलो आणि मग जेवून निघालो तर पुढे तोच प्रकार. शेवटी मंडणगडला पुन्हा खायला थांबावं लागलं इतकी दमून भूक लागली होती. आणि "मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच" करत करत गावी पोहोचलो तेव्हा साडेतीन झाले होते.

जाताना ठिकठिकाणी सुयोग्य जागा हेरून गाड्या थांबवून गर्दी करून सेल्फ्या घेणं आणि जागोजागी असलेल्या हॉटेल्स, ढाबे, आणि टपऱ्यांची दाटी यामुळे ट्रॅफिकमध्ये भर पडली ती वेगळीच. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून घसरून पडलेल्या दुचाक्या आणि एक दोन ठिकाणी चारचाक्यांमधले प्रवासी एकमेकांच्या सत्तावीस पिढ्यांचा उद्धार करताना दिसले. त्यामुळे बघ्यांचा उत्साह दुणावून मागून येणाऱ्या गाड्यांचा आणखी खोळंबा.

आज येताना तीच गत, पण सकाळी निघाल्याने संध्याकाळचं पूर्ण भरातलं परतीचं ट्रॅफिक लागलं नाही हेच काय ते सुख.

काही काम असेल तर ठीक आहे, पण जोडून सुट्ट्या आल्या की लोक असे झुंडीने बाहेर पडतात की आपण कोकणात गेलो नाही किंवा फिरायला गेलो नाही तर भारताचा GDP खड्डयात जाईल की काय!

तीन दिवस घरी तंगड्या वर करून पडलात तर नेमकं काय बिघडणार आहे? हवं तर सुट्टी एन्जॉय करायला जे करता ते घरी करा रे! घरात राहणं इतकं नकोसं का होतं? काय तर म्हणे रिलॅक्स व्हायला जातो. तीनपैकी जवळपास दोन दिवस प्रवासात घालवून कसले डोंबलाचं रिलॅक्स होणार आहात? स्वतःच्या रिलेक्सेशनची वाट, इतरांच्या डोक्याला ताप, पोलिसांना त्रास आणि या सगळ्याचा स्ट्रेस घेऊन मंगळवारी कामाला जाणार!

लॉजिकची xx xxx.

ताम्हणी घाटातील ट्रॅफिक


यासंबंधात काही मुद्दे एके ठिकाणी वाचले ते योग्य वाटतात (अनावश्यक भाग संपादित):

आजचं धकाधकीचं, त्रस्त करणारं जीवन लक्षात घेऊनही मनात काही प्रश्न उभे राहिले.

१. मालकीचं घर घेऊन आश्वस्त जीवन जगता यावं यासाठी माणूस अविश्रांत श्रम करतो, ते घर हवं तसं सजवूनही घेतो. मग ४ दिवस सुटी मिळाली तर या घरात राहायला नाखुष का असतो? आनंद घ्यायला बाहेर का पडावंसं वाटतं? आणि त्यासाठी इतका त्रास का सहन करायचा? वर्षातून एकदा नीट नियोजन करून १०-१५ दिवस सुटी घेऊन बाहेर फिरायला जातातच माणसं. ते पुरेसं नसतं, म्हणून असं धावतात का?

२. बाहेर जाऊनही काही लोक लॉग ईन असतात असं कानावर आलं. मग घरात राहून ते करता येत नाही का?

३. बाहेर गेलं की स्वयंपाकाला सुटी मिळते, जी घरच्या बाईसाठी आवश्यक असते. पण घरी राहून बाहेरून पार्सल मागवता येतं. वेळ, शक्ती, पेट्रोल आणि पैसा खर्च करून, प्रदूषण वाढवून बाहेरच का जायचं असतं?

४. अशी ५-५ दिवस सलग सुटी मिळाल्यामुळे किती ऑफिसेसमधली किती कामं रखडत असतील आणि त्याचा एकूण कामावर कसा आणि किती परिणाम होत असेल?

५. अ. अशा वेळी स्थानिक पोलीस यंत्रणेवर किती असह्य ताण येत असेल. सुटी दूर, नेहमीच्या कितीतरी पट अधिक काम आणि मनस्ताप.

५. आ. सध्याच्या अत्यंत अस्वस्थ सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत पोलिसांवर असा ताण येणं योग्य ठरेल का?

५. इ. समाजकंटकांना घातपात घडवून आणायला ही सुसंधी आपणच देत नाही आहोत का?

५. ई. सगळेच काही स्वतःचं वाहन वापरत नसतील. मग अशा वेळी एसटी सारख्या यंत्रणांवर सुद्धा ताण येतच असेल. प्रवासाचा वेळ लांबून पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडत असेल. आणि त्यासाठी पुन्हा प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया झेलाव्या लागत असतील.

स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणं खरंच इतकं कठीण, अशक्य असतं का?

जानेवारी महिन्यात नवीन दिनदर्शिका आली की तेव्हाच सुट्या कळलेल्या असतात. थोडं नियोजन करून ही सुटी घरीच कुटुंबासह आनंदात घालवणं खरंच इतकं नकोसं, कठीण झालंय?

कुठे जातोय, काय करतोय त्याचं भान हरवलंय. “आजचा दिवस जगून घ्या, उद्या कुणी पाहिलाय?” या विचाराचा असह्य, घातकी अतिरेक होतोय.

©️🖊️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. १, शके १९४७

No comments:

Post a Comment