Sunday, January 10, 2021

शहरी नक्षलवाद आणि डाव्या पत्रकारांचा कावेबाजपणा

अजित गोगटे नामक 'जेष्ठ पत्रकारांनी' लिहिलेला कुबेरी थाटाचा एक मानवतावादी अग्रलेख आजच वाचनात आला. कुबेरांना सहसा न जमलेला प्रकार मात्र प्रस्तुत पत्रकार महाशयांनी आपल्या लेखातून करून दाखवला आहे. कुबेर आपल्या अग्रलेखात दर दोन वाक्यांनी कोलांट्याउडी मारतात, पण गोगटेंनी आपले खरे रंग शेवटच्या वाक्यपर्यंत थांबण्याची हुशारी दाखवली आहे.

कैद्यांना मिळाला सुखाने घरी मरण्याचा हक्क!

मरणासन्न कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यासंबंधी एका कोर्टाच्या मानवतावादी निर्णयावरून बेतलेला या विषयाचा उहापोह केल्याचा देखावा करणारा हा अग्रलेख असला तरी तो लिहिणाऱ्या अजित गोगोटे महाशयांचा मूळ उद्देश लेखाच्या शेवटच्या वाक्यात उघडा पडतो. 

शेवटच्या वाक्यात ते म्हणतात, "पण निदान कागदोपत्री तरी एवढी कणव आणि माणुसकी दाखविणाऱ्या त्याच केंद्रीय गृह मंत्रालयाने भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या प्रा. वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या दोन आरोपींच्या बाबतीत मात्र जी निर्दयता दाखविली ती अनाकलनीयच म्हणावी लागेल."

मरणासन्न असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना आणि वरावरा राव आणि स्टॅन स्वामी यांच्यासारख्या अत्यंत धोकादायक शहरी नक्षलवाद्यांना एकाच रांगेत बसवणे ही गोगटे साहेबांसाठी खूप सोपी व सामान्य गोष्ट असावी.

किंबहुना जगण्याची आशा नसलेल्या कैद्यांची व्यथा आपण मानवतावादी भूमिकेतून मांडत आहोत असा आव आणूनच हा लेख लिहिला असावा असा संशय येतो, नव्हे आपली खात्रीच होते. तसं करण्याच्या नादात या दोन शहरी नक्षलवाद्यांना स्वतःच मरणासन्न असल्याचे ध्वनित करून त्यांच्याबद्दल अज्ञ वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे हा मूळ हेतूच या शेवटच्या वाक्याच्या समर्थनार्थ लिहिला आहे असे वाटू लागते.

एखाद्या साध्या केसमध्ये सवलत मिळवायची आणि मग तोच न्याय या शहरी नक्षलवाद्यांना लावायला सरकारला भाग पाडायचं हा डाव्यांचा डाव असणारच आहे, त्याला समर्थन म्हणून असले लेख प्रसवणे हे कार्य कर्तव्य समजून केले असले तर त्यात आश्चर्य काय? नाहीतरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतागायत आधी घोटाळ्याची आखणी करायची आणि मग तिच्यावर सरकारी योजनेचे आवरण चढवून आपल्यासमोर सादर करण्याची परंपरा आपल्याकडे आहेच.

या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते. 

म्हणूनच मरणाच्या दारात असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना लावले जाणारे मानवतावादी निकष हे अशा प्रकारच्या वैचारिक अतिरेक्यांना लावता येत नाहीत. गोगटे साहेब शेवटच्या परिच्छेदाची सुरवात या वाक्याने करतात, "मृत्यू डोळ्यांपुढे दिसत असताना अनामिक भीतीने मनाची घालमेल होणाऱ्या माणसाला विशेष प्रेमाची व आश्वासक समुपदेशनाची गरज असते." मात्र त्यांना ज्या दोघा 'आजारी' व 'वयोवृद्ध' शहरी नक्षलवाद्यांचा पुळका आला आहे त्यांच्या विचारांनी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन हातात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेतलेल्या नक्षलवाद्यांनी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अशा निरपराध जनतेची हत्या केली व करत आहेत त्या लोकांचा विचार केला आहे काय? निव्वळ पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एखाद्या कुटुंबप्रमुखाला त्याच्या घरातून अपहृत करून जेव्हा नक्षलवाद्यांच्या 'जन अदालत' मध्ये उभं केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसतो काय? नक्षलवाद्यांच्या तावडीतून पळून गेलेल्या ताती आयतुवर राग काढायला त्याच्या चार महिन्याच्या बाळाची त्याच्या आईच्या हातातून खेचून तिच्यासमोरच त्याची लोखंडी सळ्यांनी निर्घृण हत्या होत असताना त्या माऊलीला आपल्या पोटच्या गोळ्याचा 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसेल काय? त्याला त्याला तसंच पुरलं जात असताना काय वाटलं असेल तिला? इतकेच नव्हे, तर आजवर भूक लागणे ही एकमेव वेदना अनुभवणाऱ्या त्या तान्ह्या बाळाला आपल्याला नेमकं काय होत आहे ज्यामुळे या वेदना आपल्या वाट्याला येत आहेत हे कळलं तरी असेल का? अशा हत्यांच्या कृतीला आपल्या विचारांनी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या व नक्षलवाद्यांशी असे सहकार्य मरेपर्यंत करत राहू शकणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांना गोगटे साहेब कोणत्या आधारावर घरी सोडायला समर्थन देतात हे अनाकलनीय आहे. या बळी पडलेल्या निरपराध जनतेबद्दल 'या शहरी नक्षलवाद्यांना घरी सोडावे' हे निर्लज्ज प्रतिपादन म्हणजेच यांचे 'विशेष प्रेम' व मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना द्यावयाला यांच्याकडे असलेले 'आश्वासक समुपदेशन' म्हणावे काय? मग अशा कैद्यांना घरी का सोडावे, व त्यांना सुखाने मरण्याचा हक्क तरी का मिळावा?

सबब, अशा प्रकारची पत्रकारिता ही एखाद्या न्यायालयाच्या एखाद्या स्तुत्य वाटणाऱ्या निर्णयाच्या आडून शहरी नक्षलवाद्यांची व पर्यायाने सशस्त्र नक्षलवाद्यांची व अराजकतेची आणि लोकशाही व्यवस्थेविरुद्ध हिंसक उठावाची भलामण करणारी असल्याने महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाला निव्वळ 'अजित गोगटे हे त्यांचे स्वतंत्र मत असून, त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.', असं म्हणून पळ काढता येणार नाही. एरवी उत्तमोत्तम लेखांची मनमानी काटछाट करणाऱ्या संपादकांना शेवटचे वाक्य उडवून लेखक महाशयांची व पर्यायाने स्वतःच्या डाव्या विचारसरणीची झाकली मूठ सव्वालाखाची ठेवता आली असती. मात्र जगभर होत असलेल्या घातक अशा डाव्या उन्मादात हात धुवून घेण्याची उबळ प्रस्तुत संकेतस्थळाच्या चालकांना आवरता आली नसेल तर ते समजण्यासारखे आहे.

म्हणूनच कायद्याच्या कचाट्यात पकडल्या जाणाऱ्या उपरोल्लेखित दोन्ही शहरी नक्षलवाद्यांबरोबरच विविध न्यायालयांच्या निर्णयांचा आधार घेऊन व मानवतावादी भूमिकेच्या आडून अप्रत्यक्षपणे नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या अशा विचारसरणीच्या घटिंगणांवर व त्यांच्या राष्ट्रघातक विचारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवणे व वेळोवेळी त्यांना व अशा इतरांना जरब बसेल अशी कारवाई करणे हे राज्य व केंद्र सरकारांनी गुप्तहेर व इतर योग्य त्या खात्यांमार्फत करणे हे राष्ट्रीय सुरक्षितता व देशाच्या एकटा व अखंडतेच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

©️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ. १२, शके १९४२

1 comment:

  1. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हि बेगडी लिबरलांची ठळक खूण पुन्हा एकदा अधोरेखित केली यांनी. चार महिन्यांच्या बाळाचा संदर्भ अतिशय व्यथित करणारा. जहरी मनोवृत्तीचे लोक आहेत हे. हे जेलमध्येच मेले पाहिजेत.

    --शिवानी गोखले

    ReplyDelete