Wednesday, December 30, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: कामगार युनियन हेच गरीबांचे मारकेरी

साम्यवाद गरिबांसाठी काम करण्याचं दिवास्वप्न दाखवून गरिबांनाच कसं संपवतो, त्याचं हे उदाहरण:

राजस्थानातल्या गंगानगरमध्ये पूर्वी असलेल्या थापर ग्रुपच्या जेसीटी कापड गिरणीची ही गोष्ट आहे.

एके काळी थापर ग्रुपने स्थापन केलेली ही उत्तर भारतातील सर्वात संपन्न अशी कापड गिरणी होती आणि त्यात जेसीटी नामक कापडाचा ब्रँड बनत असे. जेसीटीचे कॉटन कपडे संपूर्ण भारतात प्रसिद्धी पावले. गंगानगर जेसीटी अशी कापड गिरणी होती ज्यात पूर्ण कापड युनिट होतं, म्हणजे तिथे कापूस एकदा कारखान्यात गेला को तिथेच जिनिंग, प्रेसिंग नंतर तिथल्या युनिटमध्येच धागा बनत असे आणि त्यापासून तिथेच कापड तयार होत असे. थोडक्यात, कापूस अंदर डालो आणि कपडा बाहर निकालो असला परिपूर्ण प्रकार होता.

जेसीटी दणक्यात सुरू होती.

मग बिहार आणि बंगालमधून आलेल्या कामगारांनी तिथे कामगार युनियन स्थापन करायला सुरवात केली. रोजचा सूर्य उगवायचा तोच एखाद्या संप, आंदोलन, किंवा टाळेबंदीची परिस्थिती घेऊनच.

काॅमरेड नेता हन्नान मोल्ला सारख्या नेत्यांचा तिथे वावर, येणंजाणं सुरू झालं, आणि त्याच्या वरदहस्ताने काॅमरेड हेतराम सारख्या नेत्यांचा उदय झाला. कॉम्रेडांच्या भल्या आणि बऱ्याचशा बुऱ्या मागण्या पुरवता नाकी नऊ आलेल्या थापर ग्रूपने जेसीटीचा गाशा गुंडाळला. यात कुणाचं भलं झालंही असेल पण संप करणाऱ्या आणि 'अन्यायी' शेटजींच्या विरोधात घोषणा देणाऱ्या गरीब कामगारांची मात्र वाट लागली, ते देशोधडीला लागले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला ते वेगळंच.

जेसीटी मिल्स गंगानगर

साम्यवाद हेच करतो. नाहीतर एकेकाळी म्हणजे इंग्रजांच्या काळात भारताची प्रतिराजधानी म्हणून ओळखलले जाणारे कोलकाता शहर आज इतक्या दैन्यावस्थेत कसे?

आज शेजारचा टीचभर बांगलादेश कापडनिर्मितीत भारताच्या पुढे निघून गेला आहे. अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांत सुद्धा हेटाळणीच्या सुरांत हा होईना शेजारच्या बांगलादेशची प्रसिद्दी तिथे बनणाऱ्या कपड्यांसाठी आहे.

©️ मंदार दिलीप जोशी 
मार्गशीर्ष शु पौर्णिमा, शके १९४२

1 comment:

  1. साम्यवाद आणि समाजवाद दोन्हीही भंपक आहेत हेच खरं.

    ReplyDelete