Friday, August 27, 2010

माझी चिडचिड आणि यथा प्रजा तथा राजा

माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.

अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.

'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.

तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?

सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!

(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!

(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?

(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.

या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्‍या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.

(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!

काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.

या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...

मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्‍या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.

अ‍ॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"

जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.

"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"

उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.

"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.

"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.

"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्‍याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."

"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."

पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्‍यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्‍यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?

4 comments:

  1. खुप गोष्टी आहेत रे. सविस्तर विचार करुन मत मांडेन. तोपर्यंत जागा राखुन ठेवतोय.

    ReplyDelete
  2. मंदार, लेखाच्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत, व अश्या अनेक अजून त्रास देणार्‍या गोष्टींची प्रचंड चिडचिड.

    मिडीयाने, नको तिथे नको इतक्या वेळा तोंड घातले नाही तर अनेक गोष्टींना नेटके वळण लागेल. व योग्य तो न्याय होईल. पण नाही, हे होणे शक्य नाही.

    त्या दळभद्र्या कार्ट्याने बापाच्या नावाला कधीचाच काळीमा फासलाय आता जाहिर नाचतोय आणि सगळे तमाशा चवीचवीने पाहत बसलेत. किळस येते अगदी.

    संजय दत्त आणि सलमान विषयी काही बोलण्यासारखं राहिलेले नाही. अर्थात हे पकडले गेले म्हणून गुन्हेगार यांच्यापेक्षा शंभरपटीने भयंकर गुन्हे केलेले उजळमाथ्याने फिरत आहेतच.

    आजकाल चालू असलेले रिऎलीटी शोज पाहिले की माझी तळपायाची आग मस्तकात जाते अगदी. लहान लहान मुले अंत्यत उथळ व लंपट गाण्यावर हिडीस हावभाव करून नाचतात आणि त्यांच्या आई-बापापासून सगळे मन लावून कौतुकाने ते पाहतात... :(

    ReplyDelete
  3. म्हणूनच भारत कधी कधी माझा देश आहे...

    ReplyDelete
  4. लेखतिल चिडचिड क्र. २ बद्दल,
    पोलीसान्नि नियम पेक्षा जास्त पैसे खाने चुकिचेच आहे. त्यविशयी जन जाग्रुति झलेलि चाण्गलिच कि.
    मला तरी लोकान्नी रहदारीचे नियम पालन्याविशयी
    जाग्रूती करन्यापेक्षा पोलिस प्रामानिक असने विशयी जन जाग्रुति झलेलि जास्त महत्वाचे वाटते.

    ReplyDelete