देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.
मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.
कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.
बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?
--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:
या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.
--------------------------------------------------------------------------------------
hahahahaha, jabari
ReplyDeletehahahaha
ReplyDeletepan post la matra prachand anumodan
bus la maza kenvahi "naa" ch asato :(
मंदार, मस्त लिहीलयंस. आवडलं. पण बसला नाही म्हणणं तितकसं पटत नाही. कालच मी माझ्या मुलीला पब्लीक ट्रान्सपोर्ट वापरणे किती गरजेचे आहे हे पटवून दिलेय. मी स्वत: देखीले गेले कित्येक महिने ऒफीसला जाताना सकाळी टॆक्सी करणे सोडले आहे. एकतर आपण पैसे देऊन त्यांचा माज सहन करायचा हे सकाळी सकाळी डोक्यात जातं आणि भांडण झालं की उगाचच माझंच बी.पी. वाढतं. मुंबईत बेस्टला कितीही लोकांनी नावं ठेवोत, पण बेस्ट खरंच बेस्ट आहे. - शैलेंद्र साठे
ReplyDeleteमंदार,
ReplyDeleteचुकतील तेव्हाच शिकतील नं रे. पोस्टमधले सगळे मुद्दे मान्य पण कुठेतरी सुरुवात झालीये हे हि नसे थोडके. अर्थात ज्याकरिता हे द्राविडी प्राणायाम करायचा त्यांनीच जर पाठ फिरवली तर अपयशाचे खापर नेहेमीप्रमाणेच सामान्य माणसावरच फोडले जाणार नाही का?
मंदार, काहीप्रमाणात मीही तुझ्याच मताचा आहे. काही दिवसांपूर्वी फ़ेसबुकवर मी एक स्टेटस टाकले होते..
ReplyDelete"१ नोव्हेंबरला पुण्यात ’बस डे’ पाळला जाणार आहे. शहरातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय शोधणे असा काहीसा या ’बस डे’चा हेतु आहे म्हणे. यासाठी अक्षरश: लक्षावधी रुपये देणगी म्हणुन जमा झाले आहेत, जमा होताहेत. मला असा प्रश्न पडलाय, " की ही कल्पना जरी कितीही अभिनंदनीय असली तरी जोपर्यंत पुण्याच्या (पीएमटीच्या) बस सेवेत म्हणावी तशी वाढ, आवश्यक सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत या ’बस डे’चे प्रयोजन सफ़ल होणार आहे का?
नागरिकांनी जर जास्तीत जास्त संख्येने बसेसचा वापर करावा अशी अपेक्षा असेल तर आधी बससेवा त्या पात्रतेची असणे गरजेचे नाही का? जुन्या मोडकळीला बसेस (अपवादाबद्दल क्षमस्व), अपुरी बस संख्या, अनियमीत वेळापत्रक यावर जोपर्यंत काही पक्का उपाय शोधला आणि राबवला जात नाही तोपर्यंत नागरिक बससेवेला प्राधान्य कसे देतील?"
त्यावर एकाने दिलेले उत्तर अगदी पुर्णपणे नाही तरी काही प्रमाणात पटले मला...
<<>>
So Let's hope for the best ! :)
माझ्या प्रश्नावर पंकजने दिलेले उत्तर...
ReplyDeleteपुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्त्वात नाही हे तर जगजाहीर आहे. जेव्हा जेव्हा पीएमपी (तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटी) प्रशासनाने बसखरेदीसाठी आग्रह धरला तेव्हा आजवरच्या राज्यकर्त्यांनीही ती तोट्यात आहे आणि यामुळे नविन सक्षम "फिट" बसेस घेता येणार नाहीत अशीच अनास्था दाखवली. आणि त्यामुळे बससेवा आणखी तोट्यात चालली आहे. हे राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणणे हे चक्र भेदणे कुठेतरी आवश्यक आहे. म्हणून ज्यांनी हा initiative घेतला आहे त्यांना हेच दाखवून द्यायचे आहे की, जर पुरेशा संखेने (खाजगी वाहतूकदारांच्या सहकार्याने ~३०००) आणि "फिट" बसेस रस्त्यावर आणल्या तर वाहतुकीच्या कोंडीला वैतगलेले पुणेकर नक्कीच आस्थेने त्याचा वापर करतील. म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या भाषेत नव्या बसखरेदीसाठी That will be the valid use-case. त्यामुळे तरी राज्यकर्त्यांचे (आणि पीएमपी प्रशासनाचे) झाकलेले डोळे उघडतील अशी आपण आशा करुया. आपण पाठिंबा देणे अशासाठी गरजेचे आहे की... भोगावे आपल्याला लागतंय. तोटा तर होणार नाही, पण चांगलं झालं तर आपलंच होईल. गेंड्यांना असाही कधी फरक पडत नाही.
अवांतर: आजमितीस पुण्यातल्या रस्त्यांची आणखी गाड्या सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. उलट कमी झाल्या तर अधिक चांगले.
इन शॉर्ट, iSupport !
This comment has been removed by the author.
ReplyDeleteशैलेंद्र, मुंबईत बेस्टच बेस्ट आहे. मी फक्त या पुणे बस डे नामक नाटकाविषयी बोलत होतो.
ReplyDeleteविशाल, माझा पहिला पर्याय बसने प्रवास हाच आहे. पण पुणे बस डे नंतर काय? आणि पंकजने मांडलेला आशावाद हा अतिशय प्रामाणिक असला तरी भाबडा वाटतो. हा उपक्रम राजकारण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असता तर आधी त्यांचे लक्ष नव्हते का? नक्कीच होते. पण इच्छाशक्तीच नसली तर काय डोंबल उपयोग असल्या डे चा? आधी बस सेवा सुरळीत करा मग एकाच डे ला कशाला आम्ही सगळ्याच डेजना बसने प्रवास करु. खरंच काही करण्याची इच्छा असती तर हे वरिष्ठ पातळीवर केव्हाच केलं गेलं असतं. पण हितसंबंध गुंतलेले असले की जनता जाऊ दे लटकत ही वृत्ती बळावते आणि मग परत गाडी रुळावर....किंवा रस्त्यावर येत नाही. त्यापेक्षा कुठल्या भागात अधिक बसेसची, नवीन मार्गांची गरज आहे यावर नागरिकांची मते मागवा. सर्व्हे करा. निधी मिळवा आणि दे दणादण बसेस सोडा. मग आम्ही अवश्य बसने प्रवास करु. अगदी नियमित. त्यामुळे बसने प्रवास करण्याला माझा पाठिंबा असला तरी या नाटकी उपक्रमाला निश्चितच नाही. माझा पाठिंबा नियमित बस प्रवासाला आहे, बस डेला नक्कीच नाही.
मंदार, या " नाटकाला " पाठिंबा नकोच या तुझ्या मताला पूर्ण अनुमोदन. मात्र, आतातरी प्रशासनाने मनावर घेऊन, जाणकारांची मते, सुचना ( कमिट्या बसवण्याची नाटके न करता ) घेऊन काहीतरी ठोस उपाय करण्याची नितांत गरज आहे. गेल्या वेळी डेक्कनवरून धनकवडीला जाण्यासाठी मी अट्टाहासाने बसचा पर्याय घेतला. अशक्य कटकट झाली. :(:(
ReplyDeleteबाकी पोस्ट मात्र खुसखुशीत झालीये. :)
अवांतर : मुंबईतली बेस्ट बेष्टच आहे. अगदी अगदी !
अगदी योग्य लिहिलं आहेत तुम्ही. हल्ली सकाळी सकाळी सकाळ डोक्यात जातोय... माझाही बस डे ला मुळीच पाठींबा नाही. पीएमपी/टी चे मला आलेले अनुभव... http://purvatarang.blogspot.in/2011/10/blog-post.html
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतथाकथित पुणेकरांची सकारात्मक पुढचा विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली आहे. तसंही माझे मत विशालने इथे मांडले आहेच. पण पुणेकरांनी एका विशिष्ट पद्धतीने स्वतःचे विचार मोल्ड करुन घेतले आहेत. त्यापलीकडे विचारांना दुसरा आकार ठाऊक नाही.
ReplyDeleteCriticising this step at this point is like criticising 'Mangal Pandey' for showing "useless" courage to go against the government in 1857. Though we didn't get freedom at that very instance, that surely was the start. - Refered from one of FB comments.
अवांतर: जर पुढे काही झालं नाही तर यांचे धिंडवडे काढायला मी सगळ्यात पुढे असणार आहे. पण सध्यातरी आपण जबाबदारीचा आपला शेअर उचलून पाठिंबा द्यावा या मताचा मी आहे.