Thursday, November 5, 2026

कृष्णधवल चित्रपट आणि लहानपणीचे काही निरागस (गैर)समज

आमचे काही मित्र अजून निरागस राहिले आहेत हे वाचून आनंद होतो. आमची निरासगता लहानपणीच संपली. लहानपण देगा देवा. तर ते असो. 

पोस्ट लिहिण्यास कारण की आमच्या (आदरार्थी बहुवचन) लहानपणीचा आम्ही निरागस असतानाचा एक किस्सा सांगावा.

दूरदर्शनवर एकदा एक कृष्णधवल मराठी सिनेमा सुरू होता. त्यात नायक आणि नायिका एका देवळात देवदर्शन घेऊन आणाभाका वगैरे घेऊन बाहेर पडतात आणि बागेत जाऊन बसतात. तिथे नायक, भुंगा की मधमाशी आता आठवत नाही, त्याला मारण्याचा अभिनय करत नायिकेला त्रास दिल्याबद्दल नावं ठेवतो असे काहीतरी ड्वायलॉग होते.

मग एकदम कॅमेरा फिरला आणि दोन गुलाब एकमेकांवर आदळत असल्याचं दृश्य दिसलं. मला काही कळलं नाही. पण शेजारून मातोश्री एक डोळा माझ्यावर ठेऊन होत्या. कदाचित टिव्हीकडे कधी झेप घ्यावी लागेल याचा अंदाज घेत असाव्यात असा माझा आज अंदाज आहे. तेव्हा दूरनियंत्रक अर्थात रिमोट नव्हते त्यामुळे त्याकाळचे आईवडील अधिक चपळ होते. आता सगळे आळशी झालेत. तर ते असो.

त्यानंतर बदललेल्या दृश्यात नायिकेची आई (बहुधा इंदिरा चिटणीस किंवा तत्सम कैदाशीण. आता नक्की लक्षात नाही.) नायिकेला बदड बदड बदडत असलेलं दृश्य दिसलं. एरवी गावची खबर असणारे तिचे तीर्थरूप (बहुतेक धुमाळ असावेत. आ.न.ल.ना) आत अश्वविक्री करून निद्राधीन असतात ते "काय शिंची कटकटे" सदृश्य काहीतरी संवाद म्हणत बाहेर येतात. एकीकडे मुलीची धुलाई आणि दुसरीकडे आपण मुलीला का हाणत आहोत हे नवऱ्याला आपोआप का कळत नाही याचे आश्चर्य व्यक्त करत त्याची अक्कल काढणे असं मल्टीटास्किंग दोनेक मिनिटं करून झाल्यावर तिच्या लक्षात येतं की आपल्या नवऱ्याला कसलीही टोटल लागलेली नाही. मग ती "निसर्गाने आपलं काम केलं" वगैरे ड्वायलॉग फेकते. बाकी काही नाही पण हे मात्र म्हाताऱ्याला बरोब्बर कळतं आणि तो डोकं धरून मटकन खाली बसतो. नंतर काही संवाद होते त्यावरून त्यावरून मला कळलं की नायिकेला दिवस गेलेत. 

या क्षणाला नक्की कुणी आठवत नाही टीव्हीकडे झेप घेतली आणि टीव्ही बंद झाला. त्यानंतर भुंगा/मधमाशी म्हणजे निसर्ग आणि तो असली डेंजर कामं करतो हे काही दिवस डोक्यात बसलं होतं.

त्यानंतर काही दिवसांनी आम्ही कोकणात आमच्या गावी गेलो. काही दूरचे नातलग आम्ही कोकणातले असल्याने जवळचे होऊन मजा करायला आले होते. त्यावेळचं घर खूप जुनं म्हणजे खेड्यामधले घर कौलारू वगैरे सारखं होतं. न्हाणीघरात म्हणजे मराठीत बाथरूममध्ये कपडे ठेवायला एक बांबू वर आडवा टाकलेला असे. तर सांगायची गोष्ट अशी की आलेल्या पाहुण्यांपैको एक ताई एके दिवशी सकाळी आंघोळ करायला गेली आणि काही वेळाने न्हाणीघरातून एक गगनभेदी किंकाळी ऐकू आली. लगेचच ती ताई धावत धावत बाहेर आली. कपडे ठेवायला ठेवलेल्या बांबूमध्ये भोकं होती आणि टॉवेल काढायला गेल्यावर त्यातल्या एकातून मुक्त झालेल्या भुंग्याने तिच्या हाताला दंश केला होता.

गावाहून परत गेल्यावर त्या ताईची फार कमी वेळा भेट घडली. दर वेळी मी तिच्या तब्येतीची चौकशी करत असे, आणि मी असं का विचारतोय याचं तिला आश्चर्य वाटत असे. मग इतके महिने होऊनही ती तशीच बारीक राहिल्याचं पाहून हायसं वाटलं. नंतर राजेश खन्ना, शम्मी कपूरचे सिनेमे पाहून अधिक सूचक स्पष्टीकरण मिळालं आणि यथावकाश माझा निरागसपणा संपला.



©️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ११, शके १९४८
विक्रम संवत २०८३

ता.क. सिनेमात फडताळावर ठेवलेली दाखवतात तशी POISON असं ठळक अक्षरात लिहिलेली बाटली कुठे मिळते असं लहानपणी मला फार आश्चर्य वाटतं असे त्याबद्दल एक पोस्ट वाचून या घटनाक्रमाची आठवण झाली म्हणून म्हटलं ही कथा सांगावी.