सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग २)
एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी कुठल्याही पक्षाला आजवर त्रास दिलेला नाही (कबूतर हा वेगळा विषय आहे). उलट पक्ष्यांना अन्नपाणी नियमितपणे ठेवतो. त्यामुळे जेव्हा एक डोमकावळा सदृश्य कावळा (सदृश्य अशासाठी की डोक्याचा भाग वरुन पूर्ण काळा होता) मला त्रास द्यायला लागला तेव्हा आश्चर्य वाटलं.
बाल्कनीत झाडांना पाणी घालायला आलो असताना, कपडे वाळत घालताना, खाली फुलं वेचायला गेल्यावर, उगाचच डोक्यावर चोच मारायचा प्रयत्न करायचा. अर्थातच मी "अखंड सावधान" असल्याने तो कधी चोच मारण्यात यशस्वी ठरू शकला नाही. असं बरेच दिवस चाललं. तो त्या वेळी गेटवर असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एकाला असाच त्रास देतो, अशी मला सोसायटीतल्या एका काकांनी माहिती पुरवली. आता याचं काय करावं या विचारात असताना एकदा झालं की असाच एकदा बाल्कनीत आलो असताना हे कावळे महाशय समोर कठड्यावर येऊन तयारीत बसले.
अचानक माझी सटकली, आणि एखाद्या द्वाड मुलाला रागवावं तसं मी त्याला चक्क ओरडलो. त्याला म्हटलं की बाबा रे, मी तुमचं (म्हणजे काक जमातीचं) काहीच नुकसान केलेलं नाही. उलट, "कावळे घाण करतात काही ठेवू नका" या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तुम्हाला खायला प्यायला देतो आणि तरी तू मला असा त्रास देतोस? ठीक आहे, आता उद्यापासून कुणालाच काही खायला प्यायला ठेवणार नाही, असं म्हणून चिडून दार बंड करुन आत आलो. आणि खरोखर दोन दिवस काहीही ठेवलं नाही.
आणि त्या नंतर तो कावळा कधीच मला दिसला नाही आणि अर्थातच त्यामुळे मला त्याने कधी त्रास दिला नाही. हा शंभर टक्के योगायोग असू शकतो. कंटाळला असेल तो. माहित नाही.
मला मात्र हे विलक्षण वाटलं की मुलांना ओरडावं तसं त्या कावळ्याला सात्त्विक संतापाने ओरडल्याने त्याचं मला चोच मारण्याचा प्रयत्न करणं जसं अचानक सुरु झालं तितक्याच अचानकपणे बंद पडलं.
© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. चतुर्दशी, शके १९४८

No comments:
Post a Comment