सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग २, कावळा: भाग ३ - नेहमीच्या आजी)
मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.
Tuesday, July 28, 2026
कावळा: भाग १
Wednesday, February 25, 2026
आनंदी आनंद गडे, शक्यतो ठेवा स्वतःकडे: भाग १
मित्रयादीतील आणि हे वाचणाऱ्या सर्व प्रजननक्षम वयातील महिलांना हात जोडून नम्र विनंती. इथे तुम्ही मी तुमच्या पुढ्यात साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो आहे अशी कल्पना केलीत तरी चालेल.
मातृत्व ही स्त्रीला परमेश्वराने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. एका जीवाला जवळपास नऊ महिने उदरात हळूहळू वाढताना अनुभवणे ही गोष्ट आम्हां पुरुषांच्या नशिबात नाही. गर्भसंस्कार या गोष्टीवर विश्वास असेल तर तुम्ही नऊ महिन्यांत काय अचाट कार्य करणार आहात त्याची कल्पना करा.
इतकं पाल्हाळ लावणं आवश्यक होतं, आता पोस्टच्या मूळ मुद्द्यांकडे येतो.
(१) एखादं सत्कार्य म्हटलं की ज्याप्रमाणे ते सफल होण्यासाठी कुटुंबीय, नातलग, आणि हितचिंतक यथाशक्ती, यथामती सहाय्य करतात, त्याचप्रमाणे एखादी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आहे याची असूया बाळगणारेही अस्तित्वात असतात, ते येनकेनप्रकारेण नकारात्मक भावना प्रक्षेपित करत असतात.
(२) इतर अनेक बाबींसारखी गरोदर असणे ही बाब अत्यंत खाजगी असते. तुम्हाला झालेला कुठलाही आनंद हा सगळ्यांना कळवायची इच्छा समाजमाध्यमांच्या म्हणजे सोशल मिडीयाच्या काळात होणे स्वाभाविक आहे, तरीही काही इच्छांना मुरड घालावी अशी माझं तरी प्रामाणिक मत आहे.
(३) आम्हाला नाही बघायचे असले फोटो, तुम्ही गरोदर आहात आणि मूल जन्माला घालणार आहात याबद्दल निश्चितच आनंद आहे, पण नका दाखवू वाढलेलं पोट. मातृत्व सुंदर आहे, पण पोट दाखवत फिरणं विचित्र दिसतं. इनबॉक्समध्ये फक्त "जेवलीस का?" हा प्रश्न आला की फणकाऱ्याने सात्विक संताप दाखवता ना, मग आख्खी दुनिया आपल्या पोटाकडे कशा नजरेने बघत असेल याचा तरी विचार करा. हल्लीचा काळ हा "खाजगी है तो सेफ है" असा आहे.
मातृत्व सुंदर आहे… पण काही क्षण खाजगी ठेवलेलेच अधिक सुरक्षित.
फुकटचे सल्ले:
(१) आणखी थोडं स्पष्ट बोलायचं तर मूल झाल्यानंतरही किमान तीन महिने याची वाच्यता कुठेही करूच नये, अर्थात कार्यालयीन नियमांचे पालन करावं लागतं त्या औपचारिकता पूर्ण करायला लागतात त्या गोष्टींव्यतिरिक्त.
(२) लहान मुलांचे फोटो तर कुठेही टाकू नये, अजिबातच. (हे मी घरीही सांगत आलोय.)
या अनुषंगाने नुसते स्वतःचे तरी फोटो टाकावेत का, किती टाकावेत, इत्यादी अनेक विषय मांडता येतील, पण पोस्टचा विषय फक्त बेबी बम्प दाखवणारे फोटो न टाकण्याबद्दल आहे.
अतिशय पोटतिडकीने लिहीतो आहे, कुणी अशा पोस्ट टाकल्या असतील तर राग न मानता क्षमा करावी आणि जमल्यास पोस्ट उडवाव्या अशी वरीलप्रमाणे नमस्कार घालून विनंती.
काय आहे, की एकदा बघितलेली गोष्ट Unsee करता येत नाही. त्यामुळे, "तुम्हाला काय करायचंय, नसेल आवडत तर स्क्रोल करा!" अशी टिप्पणी करायचा मोह झाल्यास माझाही तुम्हाला तोच सल्ला असेल.
इतकं वाचल्याबद्दल अभिनंदन. जय श्रीराम 🙏🏻
🖊️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ७, शके १९४७
Tuesday, January 27, 2026
सारे प्रवासी सुट्टीचे
गेल्या जूनपासून वैयक्तिक तसेच कार्यालयीन व्यग्रतेमुळे कोकणात गावी नियमित फेऱ्या मारायला जमलं नव्हतं. शिवाय काही कामं होण्यासाठी प्रत्यक्ष जाणं अपरिहार्य असतं. सुट्ट्याही फारशा शिल्लक नसल्याने गर्दीचा धोका पत्करून जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गावी जायचं ठरवलं.
शनिवारी सकाळी सव्वासातला निघालो, तरी आख्खे पुणे कोकणात निघाल्यागत अक्षरशः बंपर-टू-बंपर ट्रॅफिक! माणगाव येईपर्यंत क्लच-ब्रेक-एक्सलरेटर करता करता पायाचे तुकडे पडले. एक मित्र ठाण्याहून एसटीने निघून माणगावला भेटणार होता तो ही ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्याची वाट बघत तासभर थांबलो आणि मग जेवून निघालो तर पुढे तोच प्रकार. शेवटी मंडणगडला पुन्हा खायला थांबावं लागलं इतकी दमून भूक लागली होती. आणि "मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच" करत करत गावी पोहोचलो तेव्हा साडेतीन झाले होते.
जाताना ठिकठिकाणी सुयोग्य जागा हेरून गाड्या थांबवून गर्दी करून सेल्फ्या घेणं आणि जागोजागी असलेल्या हॉटेल्स, ढाबे, आणि टपऱ्यांची दाटी यामुळे ट्रॅफिकमध्ये भर पडली ती वेगळीच. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून घसरून पडलेल्या दुचाक्या आणि एक दोन ठिकाणी चारचाक्यांमधले प्रवासी एकमेकांच्या सत्तावीस पिढ्यांचा उद्धार करताना दिसले. त्यामुळे बघ्यांचा उत्साह दुणावून मागून येणाऱ्या गाड्यांचा आणखी खोळंबा.
आज येताना तीच गत, पण सकाळी निघाल्याने संध्याकाळचं पूर्ण भरातलं परतीचं ट्रॅफिक लागलं नाही हेच काय ते सुख.
काही काम असेल तर ठीक आहे, पण जोडून सुट्ट्या आल्या की लोक असे झुंडीने बाहेर पडतात की आपण कोकणात गेलो नाही किंवा फिरायला गेलो नाही तर भारताचा GDP खड्डयात जाईल की काय!
तीन दिवस घरी तंगड्या वर करून पडलात तर नेमकं काय बिघडणार आहे? हवं तर सुट्टी एन्जॉय करायला जे करता ते घरी करा रे! घरात राहणं इतकं नकोसं का होतं? काय तर म्हणे रिलॅक्स व्हायला जातो. तीनपैकी जवळपास दोन दिवस प्रवासात घालवून कसले डोंबलाचं रिलॅक्स होणार आहात? स्वतःच्या रिलेक्सेशनची वाट, इतरांच्या डोक्याला ताप, पोलिसांना त्रास आणि या सगळ्याचा स्ट्रेस घेऊन मंगळवारी कामाला जाणार!
लॉजिकची xx xxx.
यासंबंधात काही मुद्दे एके ठिकाणी वाचले ते योग्य वाटतात (अनावश्यक भाग संपादित):
आजचं धकाधकीचं, त्रस्त करणारं जीवन लक्षात घेऊनही मनात काही प्रश्न उभे राहिले.
१. मालकीचं घर घेऊन आश्वस्त जीवन जगता यावं यासाठी माणूस अविश्रांत श्रम करतो, ते घर हवं तसं सजवूनही घेतो. मग ४ दिवस सुटी मिळाली तर या घरात राहायला नाखुष का असतो? आनंद घ्यायला बाहेर का पडावंसं वाटतं? आणि त्यासाठी इतका त्रास का सहन करायचा? वर्षातून एकदा नीट नियोजन करून १०-१५ दिवस सुटी घेऊन बाहेर फिरायला जातातच माणसं. ते पुरेसं नसतं, म्हणून असं धावतात का?
२. बाहेर जाऊनही काही लोक लॉग ईन असतात असं कानावर आलं. मग घरात राहून ते करता येत नाही का?
३. बाहेर गेलं की स्वयंपाकाला सुटी मिळते, जी घरच्या बाईसाठी आवश्यक असते. पण घरी राहून बाहेरून पार्सल मागवता येतं. वेळ, शक्ती, पेट्रोल आणि पैसा खर्च करून, प्रदूषण वाढवून बाहेरच का जायचं असतं?
४. अशी ५-५ दिवस सलग सुटी मिळाल्यामुळे किती ऑफिसेसमधली किती कामं रखडत असतील आणि त्याचा एकूण कामावर कसा आणि किती परिणाम होत असेल?
५. अ. अशा वेळी स्थानिक पोलीस यंत्रणेवर किती असह्य ताण येत असेल. सुटी दूर, नेहमीच्या कितीतरी पट अधिक काम आणि मनस्ताप.
५. आ. सध्याच्या अत्यंत अस्वस्थ सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत पोलिसांवर असा ताण येणं योग्य ठरेल का?
५. इ. समाजकंटकांना घातपात घडवून आणायला ही सुसंधी आपणच देत नाही आहोत का?
५. ई. सगळेच काही स्वतःचं वाहन वापरत नसतील. मग अशा वेळी एसटी सारख्या यंत्रणांवर सुद्धा ताण येतच असेल. प्रवासाचा वेळ लांबून पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडत असेल. आणि त्यासाठी पुन्हा प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया झेलाव्या लागत असतील.
स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणं खरंच इतकं कठीण, अशक्य असतं का?
जानेवारी महिन्यात नवीन दिनदर्शिका आली की तेव्हाच सुट्या कळलेल्या असतात. थोडं नियोजन करून ही सुटी घरीच कुटुंबासह आनंदात घालवणं खरंच इतकं नकोसं, कठीण झालंय?
कुठे जातोय, काय करतोय त्याचं भान हरवलंय. “आजचा दिवस जगून घ्या, उद्या कुणी पाहिलाय?” या विचाराचा असह्य, घातकी अतिरेक होतोय.
©️🖊️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. १, शके १९४७
Saturday, January 24, 2026
खर्रा इतिहास: नस्ल-ए-सायकिल
पहिली सायकल स्पर्धा अकबराने सुरू केल्याचा पुरावा. यात शहेनशहा जलालूद्दीन मो. अकबर सर जिंकल्याने या स्पर्धेत सहभागी झालेला इराणचा शहा त्यांच्यावर जळायचा. विकेंड इतिहासकार हे AI असल्याचा कांगावा करतील पण haters gonna hate.
अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
सहाय्यक विषवमन ओकरी आणि टिमटिम बकरीपांडे
पान ४२०, ओळ १२
#तुझ्यायची_अकबरी #नस्ल_ए_सायकिल
© मंदार दिलीप जोशी
Sunday, January 11, 2026
उद्यमेन हि सिध्यन्ति
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥
फक्त इच्छा असल्याने कामे होत नाहीत, ती प्रत्यक्ष उद्यमानेच (परिश्रम केल्यानेच) पूर्ण होतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे आपोआप प्रवेश करत नाहीत.
- देशांतर्गत उत्पादन वाढवणे
- पायाभूत सुविधा निर्माण करणे
- निर्यातक्षम उद्योग उभे करणे
- जागतिक गुंतवणुकीसाठी भारताला विश्वासार्ह गंतव्य बनवणे (viable and attractive investment destination)
तस्मादुत्तिष्ठ!
Tuesday, January 6, 2026
पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक
२०२४ ची लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असावी. मतदान केंद्राच्या आसपास गाड्या लावण्याची सोय नव्हती, म्हणून आम्ही काही अंतरावरच्या एका गल्लीत एका बंगल्यासमोर गाडी लावली आणि घाईघाईत मतदानाला गेलो. मतदान करून आल्यावर गाडी काढायला जाताच बंगल्याच्या बागेतून झाडांना पाणी घालत असलेल्या एका इसमाचा एक अत्यंत उर्मट स्वरात आवाज आला, "इथे कुठे गाडी लावलीत, पाटी दिसली नाही का इथे गाडी लावू नये अशी?"
आधी खरंच पाटीकडे लक्ष गेलं नव्हतं. "अरेच्या, मला खरंच दिसली नाही पाटी....सॉरी हं, चूकच झाली." असं म्हणून तिथून निघालो.
अर्धांगिनीला आश्चर्य वाटलं, "तुम्ही पटकन सॉरी का म्हणालात? कसा उद्धटपणे बोलत होता तो माणूस! तिथे गाडी लावायला अशी बंदी करता येते का?"
मी तिला म्हटलं, "त्याने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातला होता, आणि तो नळीने झाडांना पाणी घालत होता म्हणून."
सौ म्हणाली, "म्हणजे?"
"म्हणजे त्या माणसाकडे पाहून मी cost-benefit analysis केला. तो भव्य कपाळ असलेला माणूस पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून झाडांना पाणी देत होता याचा अर्थ तो पूर्णपणे निवांत होता आणि त्याच्याकडे भरपूर वेळ होता. त्याच्याशी उलट उत्तरं करायला, वाद घालायला सुरवात केली असती तर त्याचं काहीच गेलं नसतं, आपल्याला पुढे ज्या कामांना जायचं होतं ती लांबली असती. सुट्टी असल्याने आजूबाजूचे बंगलेवाले निवांत असणार, ते ही आपल्याशी भांडायला आले असते आणि आपला आणखी वेळ वाया गेला असता. आपला मूड खराब झाला असता, शिवाय त्यांचं मतपरिवर्तन झालं नसतं ते नसतंच. म्हणून त्या काकांना सरळ सॉरी म्हणून टाकलं. भांडण होईल या अपेक्षेने सरसावून पुढे आलेल्या त्या माणसाचा फुगा तिकडेच फुस्स झाला आणि तो इसम गप बसला. चरफडण्यापलीकडे त्याच्या हातात काही उरलं नाही. अर्थात नेहमीच सॉरी म्हणायचं असतं असं नाही, तर कधीकधी साफ दुर्लक्ष करून हसून निघून जायचं असतं."
मागच्या रविवारी एकाचा मेसेज आला, की "बघ रे तुझ्यावर एकाने पोस्ट लिहिली आहे. खूप पर्सनल झालाय तो माणूस. खाली कमेंट्स पण तशाच आहेत. तू उत्तर दिलं पाहिजेस!" मी त्याला टाळायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण त्याने खूप आग्रह केल्यावर मी त्याला वरचा किस्सा सांगितला.
आणि म्हटलं, त्या माणसाने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातलाय. आणि कमेंटकर्ते नळीने बागेला पाणी देतायत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, पण आधीपासूनच बाजू ठरवून टाकलेल्या आणि मला व्हिलन घोषित केलेल्या कावीळ पीडित जनतेशी मी तिथे जाऊन कितीही वाद घातला तरी उपयोग नाहीये, आणि मी यांच्याइतका रिकामXX नाहीये. तेव्हा त्याला पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून निवांत बोंबलू दे, मी हसून दुर्लक्ष करणार, I can't afford to waste time to fill their free time.
त्याला समजलं असावं.
🖊️ मंदार दिलीप जोशी
पौष कृष्ण ३/४, शके १९४७ | अंगारक संकष्ट चतुर्थी






