सेक्स, मैथून, कामप्रेरणा, अशी विविध नावे आणि विशेषणे असणारी ही भावना पोटाच्या भुकेइतकीच आदिम आणि नैसर्गिक आहे. पण इतर कुठल्याही भुकेसारखी किंवा भावनेसारखीच ही भावना अनिर्बंध होऊन चालत नाही. आयुष्याच्या व्यवस्थापनात कामेच्छेचेही नियमन एक अविभाज्य अंग आहे. कामभावनेची कमतरता किंवा अभाव आयुष्याचे, शुष्क वाळवंट करते तर कामेच्छेचा अतिरेक ही व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर वादळे घेऊ येतो, तसेच त्याची न झालेली पूर्तता फक्त त्या व्यक्तीलाच नव्हे तर इतरांनाही त्रासदायक ठरते. 'अती तिथे माती' ही म्हण इथे चपखल लागू होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अर्थातच वाईट, म्हणूनच टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती होणे यापेक्षा मध्यममार्ग साधणे हे अर्थातच आवश्यक आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक संस्कृतीने मनुष्याच्या कामवर्तन नियंत्रित करायचा सल्ला दिला आहे. विशेषतः भारतीय संस्कृती कामभावनेचे अनैसर्गिक दमन किंवा स्वैराचार ही दोन्ही टोके टाळून नियमन करण्यावर भर देते. वात्स्यायनापासून ते डॉ सिगमंड फ्रॉइडपर्यंत अनेकांनी या विषयावर संशोधन, लेखन केलेलं आहे. मानवाला पुढे घेऊन जाणारी ही भावना आहे. तथापि, लैंगिक जीवनाचा उहापोह इतका व्यापक विषय या लेखाचा नाही.
आपण या लेखात वाचणार आहोत ते जगात सर्वाधिक उलाढाल असलेल्या आणि सामाजिक आरोग्याला पोखरून टाकत असलेल्या एका 'इंडस्ट्री' बाबत. ती इंडस्ट्री आहे पॉर्नोग्राफी अर्थात पॉर्न म्हणून ओळखले जाणारे मनोरंजनाच्या क्षेत्रातले आघाडीचे क्षेत्र. रेल्वे/बस स्थानकांवर मिळणारी बारीकशी पिवळी पुस्तके असोत वा मोबाईलच्या एखाद्या 'लपलेल्या कप्प्यात' ठेवलेल्या क्लिप्स. आज पॉर्न व्यवसाय जगात जवळपास सर्वदूर पसरला आहे. इंटरनेटवरील वरील विविध संकेतस्थळे याबाबत आघाडीवर आहेत. फार कशाला? 'सनी लिओनी' या नावाचा गुगलवर सगळ्यात जास्त धांडोळा घेतला जातो ही सत्यपरिस्थिती आहे. बहुतांशी या संकेतस्थळांचा उपयोग स्व-समाधानासाठी केला जातो.
अमेरिकन फिल्म इंडस्ट्री अर्थात हॉलीवूडपेक्षाही तिथल्या पॉर्न क्षेत्राची कमाई जास्त आहे. इतकंच नव्हे, तर गुगलची 'सेवा' घेणार्या लोकांपेक्षा पॉर्नहब (Pornhub) आणि xvideos या आघाडीच्या दोन पॉर्न संकेतस्थळांना भेट देणारे लोक संख्येने जास्त आहेत. या संकेतस्थळांच्या दर्शकांची संख्या नेटफ्लिक्स वा अन्य तत्सम ओटीटी प्लॅटफॉर्महुन अधिक आहे यावरुन याची व्याप्ती लक्षात यावी. आपल्याकडे अनेक गोष्टींची सुरवात ही युरोप आणि अमेरिकेतून आलेल्या अनेक गोष्टींच्या अंधानुकरणाने होते. मनुष्यस्वभाव हा स्खलनशील असल्याने प्रामुख्याने सामाजिक व नैतिक अधःपतन घडवून आणणार्या गोष्टींचे इथे झटपट अनुकरण होत असल्यास नवल नाही. जगभरात लोकप्रिय (?) होत असलेल्या या क्षेत्राचे चाहते भारतातही मुळीच कमी नाहीत. गुगल ट्रेन्ड्सचा मागोवा घेतला, तर जागतिक स्तरावर पॉर्न साईट्स बघण्यात भारताचा तिसरा क्रमांक असून शहरांचा विचार केला तर संपूर्ण जगात नवी दिल्ली, मुंबई, आणि पुणे ही शहरे पॉर्न कंटेंट आणि साईट्स शोधण्यात (highest search volume) शिखरावर आहेत. पॉर्नहब या पॉर्न संकेतस्थळाच्या एका अहवालानुसार या साईटचे भारतातले अर्धे वापरकर्ते ही साईट प्रामुख्याने आपल्या मोबाईलवर बघतात, आणि या संकेतस्थळाचा वापर करणार्या भारतीयांपैकी महिलांची संख्या लक्षणीय, नेमकं सांगायचं तर ३०% आहे. मात्र केवळ नेटवर पॉर्न पाहण्यापर्यंतच आता भारतीय मर्यादित राहिलेले नसून तसा कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा आपल्या देशात एक मोठा व्यवसाय बनला आहे.
याच संदर्भात शोध घेत असता People vs Larry Flynt हा एक अप्रतीम इंग्रजी चित्रपट बघायला मिळाला. याच चित्रपटामुळे माझा हा लेख लिहीण्याआधी प्रचंड गोंधळ झाला होता. आधीच वूडी हॅरलसनच्या अभिनयाच्या प्रेमात असल्याने आणि त्याचं यातलं मधलं जबरदस्त काम मनात कोरलं गेल्याने या चित्रपटाचा बर्यापैकी प्रभाव मनावर होता. त्याच बरोबर मूळ विषय खूप गंभीर असल्याने लेख हा चित्रपटाचं समीक्षण वाटू नये याची काळजी घ्यायला लागणार होती. लिहीत गेलं की गोंधळ दूर होईल असे वाटले आणि झाले देखील तसेच. असो, पुन्हा विषयाकडे वळूया.
या चित्रपटाचा 'नायक' लॅरी फ्लिन्ट हा अमेरिकन पॉर्न क्षेत्रातील एक आघाडीची असामी होती. नेमकं सांगायचं तर लॅरी फ्लिन्ट हा पॉर्नच्या दुनियेत नेहमीच पहिल्या ५० च्या यादीत असायचा. आपण पॉर्न क्षेत्रातल्या पैशाबाबत बोलत आहोत तर याच्या कमाईकडे पाहूया. एकट्या १९९८ या वर्षी फ्लिन्टनं ५१,११२ मासिकं आणि ७,८१२ पॉर्न चित्रपट यातून एका वर्षात १३ कोटी डॉलर्स कमावले होते. "प्लेबॉय" आणि "पेंटहाऊस" या मासिकांशी स्पर्धा करण्यासाठी "हसलर" (Hustler) मासिक काढणारा, “हस्टलर एंपायर”चा सर्वसर्वा फ्लिंट प्रौढांसाठी असलेल्या अनेक वेबसाईटसचा गर्भश्रीमंत मालक होता. या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. १० फेब्रूवारी २०२१ रोजी तो मरण पावला तेव्हा तो सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेला. कहर म्हणजे या माणसाची व्हीलचेअर सोन्यानं मढवलेली होती [मार्च १९७८ मधे ग्विनीट काऊंटी न्यायालयाबाहेरच (Gwinnett County Courthouse) एकानं त्याला गोळी घातल्यावर त्याचं कमेरपासून खालचं शरीर लुळं पडलं आणि लॅरीला कायमचं अपंगत्व आलं).
पुढे वाचण्याआधी आपल्याकडे काही वर्षांपुर्वी पेप्सी आणि कोकाकोला या शीतपेयंच्या कंपन्यांत रंगलेलं जाहीरात युद्ध आठवा. तर, खास अमेरिकन शौकीन पण उच्चभ्रू वर्ग डोळ्यांसमोर ठेऊन ह्यू हेफनर (Hugh Hefner) या प्रकाशकाने १९५३ साली प्लेबॉय मासिक सुरु केलं. बॉब गुचिओनी (Bob Guccione) याने 'प्लेबॉय' ला स्पर्धा म्हणून १९६९ साली 'पेंटहाऊस' हे मासिक काढलं. 'प्लेबॉय' चा लोगो होता 'बनी'. पेंटहाऊसची जाहीरात अशी होती की एका रायफलच्या निशाण्यावर असलेलं एक 'बनी' आणि “आम्ही सशाच्या शिकारीला निघालो आहोत” हे घोषवाक्य. ही जाहीरात खूप गाजली. या दोन्ही मासिकांची लोकप्रियता शिखरावर असताना लॅरी फ्लिन्ट या धन्य पुरुषाने १९७४ साली “हस्टलर” हे मासिक सुरु केलं तेव्हा त्याने घोषवाक्य वापरलं - “एनीवन कॅन बी अ प्लेबॉय अॅन्ड हॅव अ पेंटहाऊस बट इट टेकस अ मॅन टू बी अ हस्टलर” (Anyone can be a playboy and have a penthouse but it takes a man to be a hustler!). प्लेबॉयचा बनी, आणि बनीची शिकार करु बघणारं पेंटहाऊस या दोन्हींची एकाच वाक्यात शिकार करणारं हे घोषवाक्य शौकिनांनी डोक्यावर घेतलं यात नवल नाही. इथेही लॅरीचा मनुष्यस्वभावाचा दांडगा अभ्यास म्हणा किंवा पैसा कुठून ओढता येईल याबाबतची हुशारी म्हणा, हे नक्कीच दिसून येतं. एक जण घसरला तर मी त्याही पेक्षा जास्त कसा घसरू शकतो हे दाखवण्यातही आजही अहमहमिका लागलेली दिसते त्याचा मुकुटमणी हा लॅरी होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अश्लीलतेच्या उंबरठ्यावर रेंगाळणारी अनेक इन्स्टा रील्स आठवून बघा. हा सगळा इतिहास संक्षिप्त स्वरूपात बघायचा असेल तर “पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिंट” हा चित्रपट अवश्य पहावा.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे पॉर्न कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा भारतात आता एक मोठा व्यवसाय बनला आहे. नजिकच्या भूतकाळात डोकावलं तर या क्षेत्राकडे लोकांचं लक्ष जाण्याचं कारण राज कुंद्राला अटक झाली ही घटना होय,. आर्थिक गुन्हेगारीत प्रतिष्ठित असामी गुंतल्या असण्याचे आता लोकांना नवीन नाही पण या क्षेत्रात असं काही घडलं की देशातल्या भोळ्या(!) जनतेला आजही आश्चर्य वाटतं, आणि यावर जनसामान्यांत होणार चर्चा विनोद आणि मीम आणि अर्थातच ट्रोलिंग इथवर मर्यादित राहते. प्रत्यक्षात ही पाळेमुळे किती खोल गेली आहेत आणि कोण कोण लोक यात सहभागी आहेत याचा अंदाजही लावणे अवघड आहे. तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर उठलेल्या धुरळ्यात या क्षेत्राकडे आणि सहभागी व्यक्तींकडे अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निर्देश केला होता. चित्रपट क्षेत्रातील पैसा मोठ्या प्रमाणात पॉर्न आणि त्यानंतर देहविक्रयाच्या क्षेत्रातून येत असल्याचे संबंधित व्यक्तींकडून खाजगी चर्चेत आणि युट्यूबवर असलेल्या मुलाखतींतून अनेकदा कळतं. चित्रपट क्षेत्रात असलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हे सारे नित्यनेमाचं असतं. अचानक राज कुंद्रासारखी मोठी नावे समोर आल्यावर सामान्य वाचक/नागरिकाला धक्का बसतो इतकेच काय ते अप्रूप! आधीपासूनच पॉर्न क्षेत्रात कार्यरत असूनही कुंद्रा प्रकरणात आपल्याला गोवले गेल्याचा आरोप झोया राठोड आणि शर्लिन चोप्रा नामक दोन नट्यानी केला होता ही मोठी गंमतच आहे. कहर म्हणजे गहना वसिष्ठ नामक नटीने तर यात काहीच गैर होत नसल्याची बतावणी केली होती! पॉर्न क्षेत्र हे इंटरनेटच्या आणि कॅमेरा असलेल्या मोबाईलच्या महापुरामुळे आता फार वेगळ्या पातळीवर आणि घराघरांत पोहचलं आहे.
टिकटॉकसारख्या एपवरून जे काही दाखवलं जाऊ लागलं ते अती होऊन पाणी डोक्यावरुन चालल्यामुळेच त्यावर शासनाकडून बंदी आणली गेली, आणि एका जनहित याचिकेचा परिणाम म्हणून २०१५ साली ८५७ पॉर्न वेबसाईट्सवरदेखील बंदी आणायचा निर्णय झाला. आता मोदी सरकारने बंदी घातल्यावर त्याला विरोध हा झालाच पाहीजे हा अलिखित नियम असल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात कडाडून विरोध झाला. अनेक 'वापरकर्ते' तर पूर्वसूचना न देता अशी बंदी घातलीच कशी म्हणून बाह्या सरसावून सरकारला जाब विचारू लागले. एकीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सरकार पुरेशी कारवाई करत नसल्याचं सांगत सरकारला झापणार्या सर्वोच्च न्यायालयाने संविधनाच्या २१व्या अनुच्छेदाकडे (वैय्य्क्तिक स्वातंत्र्याचा हक्क - right to personal liberty) बोट दाखवत बंदी कायम ठेवण्याबाबत अंतरिम आदेश द्यायलाही नकार दिला. पॉर्न साईट्स बघता येणे हा आपला हक्क आहे हे सांगत एका इसमाने या बंदीच्या निर्णयाला चक्क हिटलरशाही, एड्स किंवा कॅन्सर किंवा एखाद्या साथीच्या रोगहून वाईट अशा विशेषणांनी संबोधलं.
अशी बंदी अस्तित्वात जरी आली तरी प्रत्यक्षात मात्र अशी बंदी केवळ कागदोपत्री राहते आणि हे गैरप्रकार सुरूच असतात. पूनम पांडे वा गुंजन अर्स यांसारख्या नट्या त्यांच्या वैयक्तिक एपवरून या प्रकारचे व्हिडीओ शेयर करत असतात. यात कित्येकदा अधिकचे पैसे मोजून 'प्रायव्हेट कॉल'चा पर्याय दिला जातो. आपल्या मेहनतीचे पैसे अशा गोष्टींवर उडवणाऱ्यांची संख्या पाहता पॉर्न हे मोठे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.
वैद्य परीक्षित शेवडे म्हणतात, की "अगदी रोजच्या रुग्णांतही या व्यसनाची चटक लागलेले आणि त्यामुळे एकीकडे मानसिक-शारीरिक आरोग्य हरवत असलेले तरुण हे आमच्यासाठी नित्यअनुभव होऊ लागले आहेत." त्यातच लॉकडाऊनकाळात या क्षेत्राला भरपूर झळाळी आल्याचे चित्र आहे. विशेषतः उत्तर भारतातील गावांतील जोडपी विविध मंचावरून 'Pay per view' तत्वाने आपल्या प्रणयक्रीडेचा बाजार मांडण्याची संख्या या काळात लक्षणीयरीत्या वाढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. कॅमेरा असलेला मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन या मूलभूत सुविधा असल्या की घराघरांतून असे कंटेंट तयार होऊ लागले आहेत. यात थेट पॉर्न यात मोडणारं कंटेन्ट जसं आहे तसंच सॉफ्ट पॉर्न आणि नैतिकतेची ऐशीतैशी करणारे व्हिडिओ देखील आहेत. कित्येकदा पौगंडावस्थेतील किशोर-किशोरीदेखील यात आपला सहभाग नोंदवत असल्याचे चित्र आहे. कंटेन्ट बनवणार्यांना पैसे कमावण्याचे तर बघणार्यांना स्वस्तात 'देशी पॉर्न' बघण्याचे अगदी सहजसोपे साधन सापडल्याची भावना आहे!
कोणत्याही सूज्ञ समाजासाठी हे हितकारक लक्षण नव्हे. या क्षेत्रात बराच काळ काम करून त्यातून बाहेर पडलेल्या जगभरातील कित्येक कलाकारांनी यामागचे भयाण अनुभव कथन केले आहेत. वर्षाला ९७०० कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या पॉर्न इंडस्ट्रीमागचं वास्तव किती भीषण आहे याची आपण कल्पनाही करु शकत नाही. या कलाकारांच्या पॉर्न कारकीर्दीचा कालखंड फक्त सुमारे ३ महिने ते १ वर्ष इतकाच असतो. पौगंडावस्थेतल्या एका वर्षात त्या मुलीचं आयुष्य भकास झालेलं असतं. तिला व्यसनाधीनतेपासून नैराश्यापर्यंत अनेक त्रास सतावत असतात. थोडक्यात, अशा मुली (आणि मुलंही) शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झालेली असतात. औषधे, शस्त्रक्रिया यांचा वारेमाप आणि घातक वापर या क्षेत्रात सर्रास होतो. पडद्यावर पाहत असलेली चित्रे ही सर्वसामान्य असल्याचा गैरसमज डोक्यात भिनल्याने सामान्य तरुण तरुणीदेखील त्याच संकल्पनांना बळी पडून आपल्या आरोग्याचे नुकसान करतात ही वस्तुस्थिती आहे. प्रजननसंस्था वा संबंधित अवयवांबाबतचे गैरसमज, त्यांचा आकार वाढवण्यासाठीची व्यर्थ धडपड इथपासून ते आत्मघातकी व्यसनाधीनता; इतकी की त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही विचार डोक्यात नाही, स्त्रीदेहाला केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे हे प्रकार तरुणांत लक्षणीयरीत्या वाढत आहेत. या विकृतीला वाट मिळवून देण्यासाठी कोणता थर गाठला जाऊ शकतो/जातो याची कल्पनाही न केलेली बरी. केवळ तरुणच नव्हे तर वयस्क व्यक्तींतही हे वेड जोर पकडू लागले आहे. एका डीसीपीने महिला अधिकाऱ्यासोबत तिचा सहा वर्षांचा मुलगाही सोबत असताना केलेले चाळे पुष्कळ गाजले होते. विवाहबाह्य संबंध हाही याच प्रश्नाचा उपप्रश्न झाला आहे. आपल्या पैशांच्या जोरावर वयाने आपल्या
स्वतःच्या मुलीएवढ्या असणाऱ्या मुलींना नादी लावून त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश करण्याचे प्रकारही समाजात वाढलेले दिसतील. विशेष म्हणजे या प्रकारांत नेहमी मुली अगदी निष्पापच असतील असेही नाही! घडत असलेल्या प्रकाराची पूर्ण जाणीव असूनही काहीतरी खूळ डोक्यात भरवून घेऊन त्यादेखील आपले नुकसान आपल्या हातांनी करून घेत असतात. यातील कित्येकजणी अगदी कळत नकळत ड्रग्स आणि वेश्याव्यवसायात खेचल्या जातात. पर्यटन अधिक असलेल्या भारतातील राज्य/ठिकाणांमध्ये अशा बाबी अगदी मध्यमवर्गीयांच्या घरातून घडत असल्याचे चित्र आहे.
जेम्स बाँड चित्रपट मालिकेतल्या ताज्या 'नो टाईम टू डाय' या चित्रपटाचं शीर्षक गीत गाणारी बिली एलिश (Billie Eilish) हिने गेल्याच वर्षी म्हणजे ती फक्त एकोणीस वर्षांची असताना दिलेल्या एका मुलाखतीत वयाच्या अकराव्या वर्षी पॉर्न चित्रफिती बघायची सवय लागल्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगितलं होतं. आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाकडे वळून बघताना बिली म्हणते, "पॉर्न हे स्त्रियांसाठी अत्यंत अपमानास्पद प्रकार आहे. मी तेव्हा खूप पॉर्न बघत असे आणि त्या प्रकाराने माझ्या डोक्यावर बर्यापैकी परिणाम झाला. पॉर्न बघितल्याची आणि त्यात गुंतल्याची मला लाज वाटते." स्त्रियांच्या शरीराचं अवास्तव चित्र उभं करणार्या पॉर्न चित्रपटांवर टीका करताना बिली पुढे म्हणते की "पॉर्नची लोकप्रियता पाहून मला अनेकदा माझा राग आवरणं अवघड होऊन बसतं. पॉर्न बघणं हे ठीक आहे असं मला एकेकाळी वाटायचं हे आठवलं की अनेकदा स्वतःचाच राग येतो. स्त्रीची योनी ज्या प्रकारे या चित्रपटांत दाखवली जाते ते साफ खोटं आहे. कुठल्याही स्त्रीची योनी अशी दिसत नाही. स्त्रीचे शरीर असं दिसत नाही."
आपले अनुभव सांगताना बिली म्हणाली की पॉर्न बघण्याच्या सवयीमुळे तिचं भावविश्व उध्वस्त झालं आणि याचा तिच्या खाजगी संबंधांवरही परिणाम झाला. "संभोग करण्याच्या सुरवातीच्या काही वेळा मी अशा गोष्टींना नाही म्हणू शकले नाही की ज्या मला आतून कळत होतं की अनैसर्गिक आहेत, चूक आहेत, पण पॉर्न बघण्याचा परिणाम म्हणून मला असं वाटत असे की या गोष्टींचं मला खरं तर आकर्षण वाटलं पाहीजे. बराच काळ कुणी आवडणं आणि त्याच्याशी प्रेमाचं नातं जोपासणं हे माझ्यासाठी अवघड होऊन बसलं होतं. यामुळे एकटीनेच आयुष्य काढावं लागतं की काय असंही अनेकदा वाटत असे. पण मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आहे."
घराघरांत अगदी लहान वयापासूनच हातात मोबाईल देण्याची सवय असल्याने नेमके कोणत्या वयात काय पाहिले जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पर्यायस्वरूप हे प्रकार आणखीच खोलवर पसरत राहतात. शृंगाराचे भारतीय संस्कृतीला कधीही वावडे नव्हते. याच देशात कामशास्त्राचा पुरातन इतिहास आहे, हलेबीड-खजुराहो आहे, शृंगार रस हा साहित्यातील नवरसांतील एक असून महाकवी कालिदासाच्या लिखाणात त्याची पुरेपूर पखरण आहे. मात्र हा शृंगार उत्कट आहे; उत्तान नव्हे! त्यालाही स्थल-काळाची बंधने आहेत. विवाहयोग्य झालेल्या स्त्री-पुरुषांनी कामशास्त्र अभ्यासावे असे स्वतः वात्स्यायनांनी लिहून ठेवले आहे. थोडक्यात वयाचा विचारही तेथे आहे. शृंगार आणि बीभत्सपणा यांतील सीमारेषाच पुसून टाकणारे क्षेत्र म्हणजे पॉर्न असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच हा विषय चर्चेला घेण्यापासून टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. मात्र सुरुवातीलाच योग्य लक्ष दिल्यास पिटीकेचा भगंदर होणे टळू शकते. समस्या आणि तिचा विस्तार लक्षात घेतला तरच त्याचे उपचार सापडू शकतात.
ही समस्या मुळात सुरू कुठून होते माहित आहे? उत्तर तुमच्यापैकी अनेकांना आवडणार नाही. आज उद्भवणार्या अनेक लैंगिक समस्यांचे आणि पसरलेल्या विकृतींचे मूळ हे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे हे आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सपवर अनेक जणी आपले फोटो टाकत असतात. अनेक वेळा फिल्टर वापरून मूळ सौंदर्यात भरच पडत असते. नित्यनूतन प्रोफाईल फोटो टाकण्या पुरुषही मागे नाहीत. व्यायामशाळेत जाणारे काही शरीरसौष्ठवपटू आपले सिक्स पॅक्स दाखवत बनियनमधले फोटो टाकत असतातच. याचा पॉर्नशी काय संबंध असं संतापून विचारण्याआधी लक्षात घ्या, की सुरवात वरवर निरुपद्रवी वाटणार्या गोष्टीतून आणि कृतीतूनच होत असते. हे उदाहरण देण्यामागचं कारण पुढच्या काही परिच्छेदात सांगतोच. आज या गोष्टी व्यक्तीस्वातंत्र्यात मोडत असल्या तरी याचे परिणाम अतिशय हळू होत जात पुढे अनेक लहानमोठ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी होण्यापर्यंत जाऊ शकतात. 'अति तिथे माती' ही म्हण आपल्याला काही नवीन नाही. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर टाळा. बदाम खाऊन फायदा आहे, चांगल्या फोटोंवर रेंगाळून ते वाटण्यात नव्हे.
तर, स्त्रीपुरुषांमधला मानसिक व शारीरिक भेद लक्षात घेता आज वैवाहिक जीवनात भेडसावणार्या दोन प्रमुख लैंगिक समस्यांचा विचार करताना इथे फक्त 'स्त्रीदर्शन' याबाबतीत इथे विचार करणार आहोत. आजच्या घडीला वैवाहिक आयुष्यात आढळणार्या दोन प्रमुख लैंगिक समस्या पुढीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे वैवाहिक आयुष्यात 'शरीरसंबंध ठेवताना प्रत्यक्ष मीलन होण्यापूर्वीच वीर्यस्राव होणे (premature ejaculation)'. आणि दुसरी म्हणजे सतत पॉर्नचा वापर केल्याने उदभवणारी पुरुष नपुंसकता!! दोन्ही समस्यांचा एकत्रित विचार करुया.
कारणे अनेक असली तरी विस्तारभयास्तव आज आपण यातील केवळ एका अतिशय महत्त्वाच्या कारणाकडे पाहूया. ते कारण म्हणजे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे. आयुर्वेद वा योगशास्त्रासह कित्येक भारतीय शास्त्रांनी निव्वळ दर्शनच नव्हे तर 'स्त्रीस्मरण' हे देखील शुक्रस्खलन होण्याचे कारण सांगितले आहे. 'शरीराबाहेर पडणे' ही शुक्राची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, मात्र शरीरातील अखेरचा आणि सर्वोत्तम धातू असल्याने असे सतत होत राहणे आरोग्यास हितकर नसल्याचे आयुर्वेदाचे मत आहे. सध्याच्या काळात समयपूर्व वीर्यस्राव ही समस्या वेगाने वाढत असल्याचा वैद्यांचा प्रत्यक्ष उपचार करत असतानाचा अनुभव आहे. सतत शरीरसंबंधांचा विचार करत राहणे या गोष्टीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कामेच्छा चाळवणाऱ्या गोष्टींचे वाढते प्रमाण हे यामागील महत्वाचे कारण. पॉर्न फिल्म्सपासून ते आजकाल साबण वा अगदी चहाच्या जाहिरातींपर्यंत सर्वत्र स्त्रियांचे उपभोग्य वस्तू म्हणून अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने केले जाणारे प्रदर्शन हेदेखील यास कारणीभूत आहे. वैद्यपंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांसारखे ज्येष्ठ वैद्य आपल्या ग्रंथात म्हणतात की "ही परिस्थिती पुढे इतके गंभीर स्वरूप प्राप्त करते की काही रुग्णांत केवळ स्त्रीचा आवाज ऐकून वा अगदी पैंजणांचा आवाज ऐकूनही वीर्यस्राव होऊ लागतो." वैद्यांनी अशा प्रकारच्या कित्येक केसेस हाताळल्यावर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लहानपणापासून कळत नकळत झालेला चुकीच्या जाहिरातींचा मारा आणि ही अडचण सांगण्यासाठी योग्य वेळी कोणीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसणे. प्रसारमाध्यमांतील आक्रमक जाहिरातींबाबत इथे मांडलेले मत ज्यांना मान्य होणार नाही त्यांनी याबाबत मानसशास्त्र या विषयातील नामवंत वैज्ञानिक नियतकालिकांतील संशोधने जरूर अभ्यासावी. 'परदेशात असं काही का होत नाही?' असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यांना बापड्यांना कदाचित परदेशातील एकंदरीत सांस्कृतिक रचना आणि त्यांच्या समस्या यांबद्दल माहितीच नसावी. अर्थात या समस्येकरता केवळ प्रसारमाध्यमे दोषी आहेत असे माझे मत नसून आपले हरवत चाललेले नियंत्रण हे सर्वाधिक कारणीभूत आहे. वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असल्यास, आणि एकंदरच शरीर व मनाचा विचार करताना वैय्यक्तिक आयुष्य आरोग्यपूर्ण ठेवायचं असल्यास आपला सोशल मिडियात असणारा अतिरेकी वावर (आणि वापर), भडक जाहिराती, आणि साहित्य यांपासून दूर राहणे तसेच आवश्यकता भासल्यास वंध्यत्व विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने आयुर्वेदीय उपचार व ध्यान इत्यादींची मदत घेणे हे लाभदायक उपाय आहेत हे कायम लक्षात ठेवावे.
पुरुष नपुंसकतेचा विचार करताना आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार तेरा शारीरिक प्रक्रियांचा उल्लेख 'अधारणीय वेग' यांमध्ये केलेला आहे. अधारणीय वेग म्हणजे अडवू नयेत अशा शारीरिक क्रिया. उदा. लघवी वा शौचाची भावना. शुक्राचा समावेशदेखील या तेरा वेगांत केलेला आहे. थोड्क्यात; शुक्रवेगाची इच्छा झाल्यास ती टाळू नये. मात्र असे सांगतानाच 'वेगान् न उदीरयेत।' म्हणजेच या क्रिया बळजबरीनेदेखील करू नयेत असेही आयुर्वेद बजावतो. खरी गोम इथेच आहे!
बहुतांशी वेळेस उत्तेजना मिळवण्यासाठीच पॉर्नचा वापर होतो. थोडक्यात; इथे शुक्रवेग 'उत्पन्न केला जातो'. स्वाभाविकपणे या क्रियेचे दूरगामी दुष्परिणाम होत असतात. यातील सगळ्यात प्रमुख दुष्परिणाम म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रियाचे कार्य योग्य पद्धतीने न झाल्याने उद्भवणारे नपुंसकत्व. स्त्रियांमध्येही कामेच्छा कमी होण्यासारखे दुष्परिणाम या सवयीमुळे होऊ शकतात. आयुर्वेदाचे मत पटत नसेल तर 'सायकॉलॉजी टुडे' हे नामांकित मनोवैज्ञानिक नियतकालिक काय सांगते पहा. [Robinson, Marnia, and G. Wilson. "Porn induced sexual dysfunction: A growing problem “, í." Psychology Today, July 11 (2011).]. बिनवैद्यकीय संदर्भ म्हणून पॉर्नलँड हे गेल डाईन्स लिखित पुस्तक वाचण्यासरखे आहे.
या संशोधनानुसार आज जगभर या समस्येने गंभीर रुप धारण केलेले असून; वयाच्या २० व्या वर्षांपासूनच पुरुष जननेंद्रियाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याने नैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यास अशा व्यक्तींमध्ये असमर्थता दिसून येते. आयुर्वेदीय सिद्धान्त आज जगभरात आपले महत्व दाखवत आहेत त्याचा आणखी एक पुरावा. याशिवाय आजकाल 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च' आहे का? असं विचारण्याचं फॅड असल्याने हे उदाहरण सहज नमूद करत आहे.
यावर उपाय काय? पॉर्न बघणे या व्यसनापासून दूर जाण्यासाठी पुन्हा आयुर्वेदही फायदेशीर आहे. आयुर्वेद व्यसन सोडवण्याची जी प्रक्रिया सांगतो तीच यासाठी उपयुक्त आहे. ती म्हणजे अपथ्याचा क्रमाक्रमाने त्याग करणे. हा क्रम पादांश अर्थात एक चतुर्थांश असा असतो. १/४ - १/४ या क्रमाने हे व्यसन सोडवावे लागते. (ही संकल्पना शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांकडून नीट समजावून घ्यावी.) सोबत ध्यानधारणा, योग आणि व्यायाम यांचा आधार घ्यावा. एकदम सोडायला गेल्यास चिडचिड, अन्य व्यसनांकडे ओढ अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.
आपल्या आंबटचवीच्या शौकाचा अतिरेक करून आयुष्याची माती करून घेऊ नका इतकीच प्रामाणिक इच्छा.
----------------------------------------------------------------
संदर्भ श्रेयः'या लेखातील वैद्यकीय संदर्भ वैद्य परीक्षित शेवडे यांच्या सौजन्याने' इतकंच श्रेय मर्यादित ठेवू इच्छित नाही. कारण इतक्या संवेदनशील विषयावरचे वैद्यकीय आणि तत्सम संदर्भ गोळा करा, मग ते तपासून घ्या, आणि तदतर ते टंकलिखित करा हे आणि इतके माझे कष्ट वाचवण्याचं मोठं काम डॉ शेवडेंच्या लेखनाने करुन ठेवलंच होतं. मी फक्त ते वेळोवेळी जमवत गेलो आणि ते संदर्भ लेखाच्या प्रवाहीपणाला धक्का लागू न देता योग्य ठिकाणी बसवले इतकंच.
----------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ, १३, शके १९४४