Tuesday, June 21, 2022

मिथुनदांची हास्यजत्रा - जीने की आरझू

एक सपेरा असतो तो राकेश रोशनच्या एरियात ट्रेसपासिंग करत असतो. त्याला राकेश रोशन 'वा' करतो म्हणून तो बीन बजाके त्याच्या पाळीव नागाला राकेश रोशनवर सोडतो. 

मग राकेश रोशन ओरडून त्याच्या ओळखीच्या...दिल करकचून थाम के बैठीये...हत्तीला बोलावतो. इतके इच्छाधारी नाग आहेत म्हणून प्रेक्षकांना बोअर होऊ नये म्हणून एक इच्छाधारी हत्ती आणलाय.

तर तो इच्छाधारी हत्ती नागाला सोंडेने लांsssब फेकून देतो आणि सपेऱ्याला ढिशुम करतो. 

इतकंच नव्हे, मेहेरबान कदरदान, दिल करकचून थाम के बैठीये, तो हत्ती त्या सपेऱ्याच्यात हातातली 'बीन' घेऊन स्वतः वाजवतो आणि आपल्या दोस्तीतल्या नागाला सपेऱ्यावर सोडतो आणि तो नाग त्या सपेऱ्याला चावून खतम करतो. 

मात्र तो सपेरा मरण्याच्या आधी आपल्या मुलाला म्हणजे मिथुन चक्रवर्तीला लांबलचक भाषण देतो. त्यावेळी तिथे त्यांची फॅमिली फ्रेंड रती अग्निहोत्री असते. मिथुन पण नाग असतो म्हणे आणि त्याने कुणा बाईला "प्यार केला" तर त्याच्या विषाने ती मरेल त्यामुळे किसीसे प्यार मत करना असं सांगून तो सपेरा (एकदाचा) मरतो. 

मिथुनला अचानक आठवतं की आपण मघाशी रानात शेण खायला गेलो होतो तेव्हा बिंदीया गोस्वामीला 'प्यार करून' आलोय. तो धावत जातो तेव्हा बिंदीया गोस्वामी काळीनिळी होऊन मरून पडलेली असते.

पुढे ऐका. दिल करकचून थाम के बैठीये. बिंदीया गोस्वामी राकेश रोशनची बहीण असते. आणि रती अग्निहोत्री आणि राकेश रोशनचं लफडं असतं.

आहेकिनै मज्जा.

मग मिथुनने आणखी एकीला प्यार करून निळी केल्यावर राकेश रोशनला संशय येतो आणि दोघांची हाणामारी होते. मिथुन मनुष्यरूपातच राकेश रोशनला चावायला जातो (शी घाणेरडा) तर राकेश रोशन बाजूला झाल्यामुळे चुकून एका केळीच्या झाडाला चावतो आणि ते झाड निळं पडतं. हे पाहून मी उगाचच हातातलं केळं खाली ठेवलं.

नंतर हृतिकचे पप्पा आणि रती अग्निहोत्री यांचं एक द्वंद्वगीत असतं. त्यात हत्तीला कंपनी म्हणून एक साक्षर माकड पण असतं. राकेश रोशनच्या वतीने परस्पर, त्याने काहीही न सांगता ते माकड हत्तीच्या अंगावर "मुझे माफ करो" असं लिहून रतीला दाखवून येतं. मग रती पाघळते. नंतर मिथुनला रती अग्निहोत्रीवर प्यार आता हय तेव्हा रतीचे साक्षर माकड मिथुनवर मुंगूस सोडतं आणि रतीला वाचवतं. 

 इंग्रजीत Arjoo ऐवजी ArZOO का लिहिलंय ते तेव्हा मला कळलं. या स्टेजला मला वाटून गेलं की सिनेमा संपता संपता पेंग्विन पण येऊन जाईल. पण तसा काही चिमित्कार बघायला नाही मिळाला.

शेवटी एकदा शंकराच्या देवळातला नाग मिथुन चक्रवर्तीला चावतो आणि त्याला पूर्णपणे माणसात आणतो आणि सिनेमा संपतो. 

🖋️ मंदार दिलीप जोशी

No comments:

Post a Comment