आज चीनबद्दल बोलताना आपण नेहरूंना दोष देतो आणि त्यावर काँग्रेसी चवताळताना दिसतात.
प्रख्यात लेखक भैरप्पा यांच्या आवरण कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे त्या वाक्याचा उत्तरार्ध आजच्या कोंग्रेसींना बरोब्बर लागू ठरतो. भैरप्पा आवरणच्या प्रस्तावनेत् म्हणतात., "मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्विकारावी लागेल". आवरणमध्ये मांडलेला हा मुद्दा किती यथार्थ आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात सतत जाणवते, विषेशत: राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना. आधी इंग्रजांनी आणि मग नेहरूप्रणित समाजवादाने प्रभावित लोकांनी आपल्या लोकांचे केलेले ब्रेनवॉशींग किती खोलवर भिनले आहे आणि आपले सध्याचे (अ)राजकारणी आणि संभावित निधर्मीवादी, मार्क्सवादी, साम्यवादी, आणि निर्भीड (!) व निष्पक्ष (!!) पत्रकार देखील हेच धोरण कसे राबवत आहेत हेच "आवरण" वाचताना आपल्याला ठायी ठायी आठवत राहतं. इथे पु. ल. देशपांडेही आठवतात. त्यांच्या म्हैस कथेत, "बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी 'होय होय होय होय, नाय नाय नाय नाय', म्हणजे साधारणत: भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं..." हे वाक्य तुम्हाला आठवत असेलच.
या अनुषंगाने नेहरूंच्या चुकांचा पाढा आज वाचला जाणार असेल तर ते योग्यच आहे. भोगविलासी, अप्रामाणिक, व अकार्यक्षम माणूस सर्वोच्च निर्णयस्थानी असल्याचा परिणाम फक्त परराष्ट्र धोरणाचा बट्ट्याबोळ होण्यापुरता एवढाच मर्यादित नसतो. नेहरूंकडे बहुमत होते. सर्व जनतेचा विश्वास होता. देशाची उद्योग धोरणे काय असावीत हे त्यांच्या हातात होते. त्यांनी जाणीवपूर्वक बेंगरूळ समाजवादाचीकास धरली आणि भारतातल्या खाजगी उद्योगांचा गळा घोटायचा अव्यापारेषू व्यापार केला. सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण अवलंबले.
भारतात उद्योजकांची कमतरता कधीच नव्हती. अगदी चाणक्याच्या काळापूर्वीपासून शून्यातून अफाट पैसे मिळवणारे उद्योजक भारताने पाहिले आहेत. जुन्यापद्धतीच्या व्यापारात, औद्योगिक क्रांती झाल्यावर नव्या उत्पादनाच्या व्यापारात भारताने अनेक कल्पक, प्रतिभावान व्यावसायिक घडवले. बिर्ला, टाटा हे पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेले उद्योजक आहेत. पण नेहरूंच्या भोंगळ धोरणाप्रमाणे उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. उलट उद्योगपती मात्र कपाळावर गंध लावणारे, मारवाडी पोषाखातले, स्थूल, सेठ धरमदास वगैरे सूचक नावे असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले जायचे.
पण हे अत्यंत घातक धोरण होते. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे. त्याकरता नेहरू हा एकमेव माणूस आणि त्याचे चमचे जबाबदार आहेत. नेहरु कन्येने हेच धोरण आणखी चार पावले पुढे नेऊन आणखी वाटोळे केले. त्यात चीनने युनियनबाजीला प्रोत्साहन देऊन उद्योगांची जी वाट लावली ती रोखण्याचा कुठलाही प्रयत्न नेहरू संस्कृतीतल्या काँग्रेस कडून झाला नाही.
जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. आज बीएसएनएलच्या पतनावर नक्राश्रू ढाळणार्या लालभाईंना हे सांगा. यामुळेच आपण समस्त जगाच्या कित्येक दशके मागे फेकलो गेलो आहोत.
कितीतरी उद्योजकांना जाचक धोरणांपायी सिंगापूर, थायलंड वा अन्य देशात उद्योग न्यावे लागले. तिथे ते यशस्वीही झाले पण त्यात नुकसान झाले ते भारताचेच .
भारतात अत्यंत अतर्क्य कायदे करून उद्योगांच्या गळ्याला नख लावण्याचे प्रकार झाले आहेत. परकीय चलनावर अतिरेकी निर्बंध, कंपनीने किती फायदा करावा ह्यावर निर्बंध, परकीय गुंतवणूकीवर अत्यंत जाचक निर्बंध - ह्या सगळ्यामुळे आपले अतोनात नुकसान झालेले आहे.
नेहरुच्या समाजवादामुळे पाया भक्कम झाला असे म्हणणे म्हणजे बिन लादेनने विमानाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन बिल्डिंग उडवून नव्या इमारतींचापाया भक्कम केला म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.
होते ते उद्योग नष्ट करुन त्याजागी पांढरे हत्ती बनवून देशाच्या कमकुवत आर्थिक स्थितीला अधिकच खिळखिळी बनवण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.
✒️ © मंदार दिलीप जोशी (🗒️ संपादित)
आषाढ शु. ५/६, शके १९४२