Sunday, December 15, 2019

मोदीजी तुम्ही पडलात?

मोदीजी तुम्ही पडलात?

बरं, चालायचंच. शरीरच पडलं ना, वय होत चाललं आहे, शरीर कधी ना कधी दगा देणारच. ते पडलं तरी चालेल मोदीजी, विचारांत घसरण होता कामा नये. होय तर.

मोदीजी, ऐका. तुम्ही पडलात तर पडलात, पण ज्यांना तुम्ही अमुक करोड देशवासीयो म्हणून संबोधता ना, त्या असंख्य लोकांच्या आशाआकांक्षांना धक्का लागता कामा नये, ज्यांच्या लेखी मोदी हे नाव म्हणजे शेवटची आशा आहे.

१९४७ मधे धार्मिक आधारावर फाळणी झाल्यावर आपले अनेक लोक तेव्हापासून काही हलगर्जी राजकारण्यांमुळे शत्रूभूमीत अत्याचार सहन करत आहेत. सत्तर वर्षांनंतर तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य दिसतंय. तुमच्या शरीराचा तोल गेला तर जाऊदे एक वेळ, पण या लोकांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जाता कामा नये.

एक काळ असा होता की अनेकांनी नैराश्यापोटी काश्मीर आपल्या हातून गेलाय असा समज करून घेतला होता आणि तसं झालंही असतं. कारण तिथे न गवताचं पातं उगवत नाही म्हणून अक्साई चीनवर पाणी सोडायला हरकत नाही असे तारे संसदेत निर्लज्जपणे तोडल्याचे देशाने ऐकले आहेत. त्याच संसदेत तुम्ही ३७० ची तोडमोड करून देशाला विश्वास दिलात की आता खरोखरच देशाची एकही इंच भूमी शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. मोदीजी, तुम्ही घसरून पडलात तर पडलात, तुमच्यावरचा भारताचा हा विश्वास डगमगता कामा नये.

मोदीजी, तुम्ही जेव्हा इंग्लंड, अमेरिका, इस्रायल, वगैरे देशांत फिरता ना, आणि जेव्हा तिथे लोक "मोदी, मोदी" म्हणून ओरडतात ना, तेव्हा आम्हाला "भारत, भारत" ऐकू येतं. आमच्यासारख्या कोट्यवधी लोकांना पूर्ण जगभर हाच "भारत, भारत" चा गजर ऐकायचा आहे. मोदीजी, तुम्ही पडलात तर पडलात, या गजराचा आवाज कमी होता कामा नये.

सभांच्या शेवटी तुम्ही लोकांना 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हणायला लावता ना, शप्पथ सांगतो मनाला इतकं समाधान वाटतं की चला कुणीतरी आपल्या बापजाद्यांचा जयजयकार न करता देशाचा जयजयकार करतो आहे. कारण अमक्या तमक्याचा जय म्हटल्यावर काही लोकांच्या पूर्वजांचा जयजयकार डोळ्यांसमोर येतो,  पण भारत माता की जय म्हटल्यावर देशातल्या दरिद्रातल्या दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांच्या पितरांचा जयजयकार होतो. हा जयजयकार थांबता कामा नये. मोदीजी, तुम्ही पडलात आणि क्षणभर थांबलात तरी चालेल, पण भारत मातेच्या सन्मानार्थ हात उंचावून जयजयकार करण्याची ही परंपरा थांबता कामा नये.
   
राजकारण, वैयक्तिक स्वार्थ, आणि पुचाट धोरणं यांच्यामुळे तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या हिंदूंना महत्प्रयासाने तुमच्या नावामुळे एकत्र येत आहेत मोदीजी.   तेव्हा तुम्ही पडलात तर पडलात, हिंदूंना जोडण्याच्या या प्रयत्नांत खंड पडता कामा नये.

काही लोकांना तुम्ही पडलेलं पाहून मजा येते आहे. भूतपूर्व राष्ट्रपती कैलासवासी श्री शंकर दयाळ शर्मा एकदा राजघाटावर एका कार्यक्रमाला गेले असताना चालता चालता पडले. मला स्पष्ट आठवतं आहे, टाइम्स ऑफ इंडियाने ते वृत्त छापताना कसे पडले याचे तीन टप्प्यातले तीन फोटो छापले होते. राष्ट्रपतींबद्दलचं हे वृत्त आणि तेही या पद्धतीने छापू नये याच तारतम्य इंग्रजांचे पिल्लू असलेल्या या वृत्तपत्राला नव्हते.

त्यावर एका वाचकाने टाईम्सला दिलेलं उत्तर सुद्धा, आमच्या तीर्थरूपांनी मोठ्याने वाचून दाखवल्याने, ठळकपणे लक्षात आहे. त्या वाचकाचे शब्द होते - It is not the President, but the Times of India which has fallen.

ही तीच लोकं आहेत ज्यांना तुमचं न थांबता धावणं आवडत नाही. पण आम्ही सांगतो मोदीजी, जोपर्यंत दुसरा मोदी निर्माण करायची धमक आमच्यात येत नाही तोवर तुम्ही धावत रहा, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

मत दिलंय ना, मग तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही. प्रत्येक मत वसूल करू.

पण एक सांगू का, काँग्रेसला शंभरदा हरवता येऊ शकतं पण वयाला, काळाला नाही ना हरवता येत. म्हणून जरा स्वतःची काळजी घेत चला.

अच्छा आजपुरतं पुरे.

©️ मंदार दिलीप जोशी, पुणे, महाराष्ट्र
©️ Sarvesh Kumar Tiwari, गोपालगंज, बिहार


आय बेग टू

खरं म्हणजे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी उपयोग नाही. पण लाखातला एक जरी समजला, तरी पुरे म्हणून हे.

हे कव्हरिंग लेटर वाचा, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने वीर सावरकरांना लिहिलेलं आहे. पॉलिसी पाठवत आहे, सोबतचा फॉर्म भरून पाठवा अशा आशयाचं हे पत्र. यातले "I beg to enclose" आणि "obliged" हे शब्द पहा. हे beg to याचा अर्थ भीक मागतो असा होत नसून, 'आपणांस विनंती करतो' या अर्थाचा इंग्रजीतून पत्र लिहिताना वापरायचा एक सामान्य शिष्टाचार आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रात माफीची भीक मागितल्याचा समज हा त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे, किंवा ज्ञान मिळवायची इच्छाच नसल्यामुळे करून दिला जातो.

संस्कृत येत नाही म्हणून एखाद्या पुस्तकाचा दु:स्वास करायचा आणि इंग्रजी पत्रलेखनाची शैली झेपत नाही म्हणून सावरकरांवर जळायचं आणि त्यांची बदनामी करू पहायची यात फार अंतर नाही. पण पिवळी पुस्तके वाचायची सवय असल्याने बुद्धीची झेप तेवढीच असणार.  किंबहुना, बुद्धीची झेप तेवढीच असल्याने फक्त पिवळी पुस्तकेच झेपत असणार.

आणि १९४८ पर्यंत सोशल मीडिया नव्हतं म्हणून चाळे खपून जायचे, आता लोक सोडणार नाहीत. तेव्हा पप्पूशेट, तुम्ही आपले थायलंडला जा सुट्टीवर आणि मस्त अंगप्रत्यंगास मसाज करून घ्या, कारण ताण आला की असं काहीतरी बरळत सुटता. हा मानसिक मसाज तुम्हाला झेपणार नाही.

#वीर_सावरकर

टीप: राऊत, ही माझी पोस्ट माझ्या नावासकट एकही शब्द न बदलता किंवा गाळता सामनात छापून दाखवा तर तुम्हाला मानलं.

©️ मंदार दिलीप जोशी

Monday, September 16, 2019

दिग्दर्शन म्हणजे काय

शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"

लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.

कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.

पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.

याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.

तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.

याला दिग्दर्शन म्हणतात.

©️ मंदार दिलीप जोशी

Sunday, June 2, 2019

जेम्स बॉन्ड - शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे काय रे भाऊ?

आपण जेम्स बॉन्डच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलं असेल, की त्याचे आवडते पेय म्हणजे मार्टिनी. तो जिथे कुठे हे पेय घईल, ते देणार्‍याला म्हणजे सर्व करणार्‍याला तो फक्त एवढंच सांगून थांबत नाही. तो पुढे म्हणतो, "शेकन, नॉट स्टर्ड". याचं काहीही बोध न होणारं विनोदी मराठी भाषांतर म्हणजे "हलवून दे, ढवळून नको".

आता हे शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे नेमकं काय? नक्की काय शेकवायचं...आपलं...हलवायचं असतं...आणि ते स्टर्ड म्हणजे ढवळायचं का नसतं? तर ते शेकन म्हणजे काय असतं ते आधी पाहू. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. तर शेकन कॉकटेले एकात दुसरं मिसळून ढवळून चालत नाहीत. ती व्यवस्थित हलवून तयार करण्याकरता बाजारात पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला एक खास 'शेकर' मिळतो. या शेकरचे एकूण तीन भाग असतात. तळाकडचा म्हणजे खालचा स्टीलचा मोठा कप असतो त्यात पेये घातली जातात. या भागाला दोन भागांचे असलेले एक स्टीलचेच झाकण असते. ते दोन भाग म्हणजे एक गाळणी आणि त्यावर असलेला एक स्टीलचा कप. आधी म्हटल्याप्रमाणे हा शेकर संपूर्ण स्टीलचा बनवलेला असल्याकारणाने ही चाळणी आणि कपही स्टीलचेच असतात.



जेम्स बॉन्डला जर त्याची लाडकी मार्टिनी शेकन करुन द्यायची असेल तर त्यात व्होडका आणि व्हर्मूथ (vermouth) अशी दोन पेये वापरावी लागतात. व्हर्मूथ म्हणजे ड्राय अर्थात चवीला कडूसर. व्हर्मूथ हा एक व्हाईट वाईनचा प्रकार असून त्यात साखर अगदी अत्यल्प असते. अशा या कडूसर व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. आपल्याकडे जसं एखादी रेसिपीत "मीठ चवीप्रमाणे" असं लिहीलेलं असतं तसं यातही चवीनुसार जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे च्या अनेक ब्रॅण्डपैकी 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. तर त्याची कृती अशी, की एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकास चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची...अंहं, एकत्र करायची नाही. पण यांचेही प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ आणि ५६ मिली व्होडका असे ठरलेले आहे. आता वर उल्लेख केलेल्या शेकरमधला कप भरून बर्फ घ्यायचा आणि त्यात व्हर्मूथ टाकायची. पण यात बर्फ आणि व्हर्मूथ एकत्र करणे हा उद्देश नसून त्या बर्फाला व्हर्मूथने 'ओले' करणे एवढाच आहे. त्यामुळे ताबडतोब कपावर गाळणी लावली जाते आणि ती व्हर्मूथ लगेच गाळली जाते. मग त्या शेकरमधल्या व्हर्मूथयुक्त बर्फात व्होडका टाकली जाते. आता गाळणीचे झाकण लाऊन मग शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. म्हणजे उरलेले औषध संपवायला आपण त्यात पाणी घालून हलवतो तसे...ख्या ख्या. आता हे शेकलेले अर्थात शेकन अर्थात हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पुन्हा चवीकरता हवे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे.

झाली बॉन्ड साहेबांची 'व्होडका मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार!

'स्टर्ड' मार्टिनी तयार करताना फरक इतकाच की व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळली जाते. ती त्या थंड ग्लासात गाळली की झाली तयार 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन'!

पण जेम्स बॉन्डला शेकनच का लागते? स्टर्ड मार्टिनी तयार करण्याच्या कृतीचा आणि त्या पेयाची मजा घेण्याचा काय संंबंध? तर जेम्स बॉन्ड कोण आहे? तर गुप्तहेर. आता तो गावभर...आपलं....जगभर "बॉन्ड, जेम्स बॉन्ड" अशी ओळख देत बोंबलत फिरतो ते सोडा. तर, गुप्तहेराने नशा केली तर तो त्याचं काम कसं करणार? म्हणजे जिथे मार्टिनी मिळते अशा बारमधे किंवा हॉटेलात स्टाईलीत रुबाबात एन्ट्री तर मारायची असते, आणि तिथे आणखी शायनिंग मारत मद्यपान तर करायचं आहे, शिवाय नशाही हवी आहे, पण इतकीही नाही की झिंगून बेसावधपणा येईल - कारण त्याला त्याची कामगिरीही पार पाडायची आहे. पण मार्टिनी मूळ कशी तयार केली जाते, तर स्टर्ड अर्थात ढवळून. पण तसे केल्याने त्यातले अल्कोहॉलचे प्रमाण तसेच राहते. आता हे एका गुप्तहेराला कसे चालणार? म्हणून जेम्स बॉन्डला मार्टिनी शेकन हवी असते. वर दिलेल्या कृतीप्रमाणे हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने बर्‍यापैकी अल्कोहोल उडून जाते. त्यामुळे जेम्स बॉन्डला अपेक्षित न झिंगता नशा येऊन ताजेतवानेपणा आणणारे पेय तयार होते.

शॉन कॉनरी, रॉजर मूर, जॉर्ज लेझनबी, टिमथी डाल्टन, पिअर्स ब्रोस्नन यांनी ही शेकन नॉट स्टर्डची परंपरा सुरु ठेवली होती. डॅनियल क्रेगचा बॉण्ड मात्र कॅसिनो रॉयॅल (२००६) मधे जुगाराच्या एका टप्प्यात कोट्यावधी डॉलर हरल्यावर जेव्हा वेटर त्याला "सर, शेकन ऑर स्टर्ड?" असं आदबीने विचारतो, तेव्हा सटकून म्हणतो "डू आय लुक लाईक आय गिव्ह अ डॅम?"

असं करु नकोस बाबा, आम्हाला आपलं तू विचारल्यावर "शेकन नॉट स्टर्ड" असंच म्हणत जा रे.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९४१

Friday, May 31, 2019

मी आणि तो

मी गेलो उत्साहाने त्याच्या इफ्ताराला
तो मला संपवण्या ज़कात झोळीत घालत होता

पाहून त्याला क्रूसावरती डोळां आले पाणी
तोच क्रूस घालण्या गळ्यात संधी शोधत होता

मला वाटले इश्काला नसतो मजहब काही
तो शीर माझे धडावेगळे उंच उडवत होता

मी समजलो प्रेमात कसला रिलिजियन बंधू
बंबात घालुनी लव्ह माझे तो हासत होता

पोसले साप ते कसे निघावे शाकाहारी
तो अजगर निधर्मांध मजला गिळत होता

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१

Friday, May 17, 2019

Sunday, May 5, 2019

जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने - टवाळा आवडे विनोद अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि विनोद

समर्थ रामदासस्वामी हे विनोद करण्याच्या विरोधात होते असा अपप्रचार जाणता अजाणता अनेक जण करताना दिसतात. त्याकरता त्यांच्याच "टवाळा आवडे विनोद" या शब्दांचा आधार घेतला जातो.

समर्थांनी समर्थ रामदासस्वामींनी इतकं काही लिहून ठेवलेलं आहे की घरात, समाजात वावरण्याकरता मार्गदर्शनात्मक असं इतर काही वाचलं नाही तरी चालेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते सगळंच्या सगळं फक्त वाचायचं म्हटलं तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अंमळ अवघडच आहे. कदाचित म्हणूनच इतक्या अभ्यासू, दिव्यत्वाची प्रचिती घेतलेला विद्वान संत विनोदासारख्या निर्मळ आणि आनंद देणार्‍या गोष्टीच्या विरोधात कसा असेल अशी शंका बर्‍याच लोकांच्या मनात डोकावलेली दिसत नाही.

समर्थांचे लिखाण पूर्ण न वाचताच दासबोधातील  दशक ७, समास ९ यातील "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य बाजूला काढून जे टवाळ असतात त्यांनाच विनोद आवडतात किंवा विनोद आवडणारे सगळे टवाळ असतात असे अर्थ लावून ते प्रसारित केलं गेलं. अशा लोकांकरता इथे समर्थांनीच लिहून ठेवलेलं आहे शब्दात सांगायचं तर "पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।  तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ।।" अर्थात, अशा विपर्यास करणारे प्रत्येक वेळी मत्सरी दुरात्मे असतीलच असं नव्हे, अनेकदा ते निव्वळ अज्ञानापोटी केलेलं विधान आहे असंही आढळून येतं. इतकं आध्यात्मिक, गंभीर लिखाण करणार्‍या समर्थांना विनोद आवडत नसावा हे आणखी एक गृहतिक हे वाक्य वेगळं काढून प्रसारित करण्यामागे असावं. पण खरंच समर्थ रामदास स्वामींना विनोद आवडत नव्हता का? ते हास्यविनोदाच्या विरोधात होते का?

वास्तविक समर्थांच्या पूर्ण वाङ्मयात त्यांनी कुठेही विनोदाची किंवा विनोदनिर्मितीची किंवा तो करणार्‍याची निंदा केलेली नाही. दासबोधातील दशक सातवा समास नववा यात  कुणाकुणाला काय काय आवडते त्याचे विवेचन समर्थांनी केलेले आहे. समर्थांनी टवाळ नक्की कुणाला म्हटलं आहे आणि कोणत्या संदर्भात म्हटलं आहे ती आणि त्या नंतरची ओवी मुळातून वाचल्यास याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्या दोन ओव्या :

टवाळां आवडे विनोद | उन्मत्तास नाना छंद | तामसास अप्रमाद | गोड वाटे ||५१||
मूर्ख होये नादलुब्धी | निंदक पाहे उणी संधी | पापी पाहे पापबुद्धि | लाऊन आंगीं ||५२||

५१ - उन्मत्त, माजोरड्या माणसांना नाना छंद असतात किंवा आवडतात. इथे छंद याचा अर्थ आजच्या भाषेत येडेचाळे किंवा लहरीमुळे केलेली विचित्र कृते असा घ्यावा. तामसी माणसाला शांत, संयमी राहणे जमत नाही. तो सतत दुष्टकर्माकडेच आकर्षिला जातो. समर्थांना इथे हे सांगायचं आहे की त्याचप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता हलक्या दर्जाचा, विकृत अशा स्वरूपाचा विनोद करायला आणि इतरांना सांगायला आवडतं.

५२ - मूर्ख लोक नादलुब्धी असतात, निंदक नेहमीच दुसर्‍याच्या उणीवा शोधण्याच्या संधी शोधत असतो, त्याला त्यातच रस असतो. तर पापी माणूस दुसर्‍याचीही बुद्धी भ्रष्ट करुन तिचे रूपांतर पापबुद्धीत करण्यात दंग राहतो.

याचा अर्थ याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो, तो टवाळच असतो असा त्याचा अर्थ खचितच होत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य पाहील्यास ते अगदी गंभीर प्रवृत्तीचे असतील असा निष्कर्ष काढणे उथळपणाचे ठरेल. समर्थ अशा प्रकारच्या विनोदाबद्दल काय विवेचन करतात ते मूर्खलक्षणांत अर्थात दुसर्‍या दशकात आपल्याला सापडतं. त्यातल्याही या दोन ओव्या प्रातिनिधिक म्हणाव्या लागतील:

विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन | राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा | हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||

सतत विनोदांत रमावेसे वाटते, विविध रंगाची व रागतालयुक्त श्रृंगारिक गायनाची गोडी वाटत राहते, तो रजोगुण होय (इथे सतत हा शब्द महत्त्वाचा). टिंगल, टवाळी, निंदा करण्यात, वादविवादात जिंकल्याचा किस्सा गर्वाने सांगण्याची आवड असते, हास्य विनोदात रमावेसे वाटते, तो रजोगुण होय.

रामदास स्वामी शिस्तप्रिय आणि बलोपासनेचे भोक्ते असले तरी ते तितकेच आयुष्याचा निर्मळ आनंद घेणारे होते. त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना त्यांच्या चरित्रग्रंथांत नोंदवलेल्या आहेत. पण समर्थांनी विनोदाबद्दल काही लिहिलं आहे का हे पाहूया. पण त्या आधी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहीजे की समर्थांचा कटाक्ष येता जाता सतत टिंगल टवाळकीच्या स्वरुपात केल्या जाणार्‍या विकृत विनोदाकडे होता. निखळ विनोदाला समर्थांनी नेहमीच पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेले दिसेल.

मूर्खांची आणि पढतमूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ एखाद्या गोष्टीच्या खोलात न जाता उथळपणा करणार्‍या मनुष्यांच्या विरोधाभासाने भरलेल्या वागण्याला सणसणीत टोमणे मारायला कमी करत नाहीत. हा ही विनोदाचाच एक प्रकार होय. जाता जाता त्या संदर्भातल्या दशक पाचवा समास तिसरा (६६) यात समर्थ काय म्हणतात ते पाहूया:

काखे घेऊनियां दारा | म्हणे मज संन्यासी करा | तैसा विषई सैरावैरा | ज्ञान बडबडी ||६६||
असो ऐसे पढतमूर्ख | ते काय जाणती अद्वैतसुख | नारकी प्राणी नर्क | भोगिती स्वइच्छा ||६७||

बायकोच्या कमरेला हाताने विळखा घालून मला संन्यासदीक्षा द्या असं एखादा म्हणतो, तसं विषयासक्त अज्ञानी माणूस आत्मज्ञानाची स्वैर बडबड करीत सुटतो. एकूण काय तर या पढतमूर्ख लोकांना अद्वैतानुभवाचं सुख कसं माहित असावे ? नरकातील प्राणी स्वतःच्या इच्छेने नरकाचे दुःख भोगत असतात.

शेवटी समर्थांनी विनोदाबद्दल काय लिहिले आहे, किंबहुना विनोदाचे समर्थन केले आहे का, त्याला स्पष्ट शब्दात प्रोत्साहन कसे दिले आहे ते पाहणे योग्य ठरेल. दासबोध दशक चौथा समास दुसरा (१४) यात समर्थ कीर्तन कसे करावे, कीर्तन नीरस होऊ नये म्हणून त्यात रंग कसे भरावे याचे जे विवेचन करतात ते संदर्भाकरता उपयुक्त असले तरी विस्तारभयास्तव संपूर्ण इथे देत नाही. पण त्यात ते विनोदाबद्दल म्हणतात तेवढं पाहूया:

पदें दोहडें श्लोक प्रबंद | धाटी मुद्रा अनेक छंद |
बीरभाटिव विनोद | प्रसंगें करावे ||१४||

भावभक्तियुक्त पदे, दोहे, श्लोक, धाटी, मुद्रा आणि छंद यांचा समावेश कथेत असावा. प्रसंगानुरुप चेहर्‍यावर वीर, हास्य इत्यादि रसाचा उपयोग करत कथेत विनोदाने रंग भरावा. यात समर्थांनी कीर्तन रंगवण्याकरता म्हणजे रंजक करण्याकरता इतर गोष्टींबरोबरच विनोदाचाही वापर करावा असं थेट आणि स्पष्टपणे म्हटलं आहे. असे समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात कसे असतील बरे? अशा अनेक ओव्यांची उदाहरणे दासबोधात आणि समर्थ साहित्यात अनेक ठिकाणी आढळतील.

प्रत्यक्ष समर्थ साहित्यातून घेतलेल्या वरील उदाहरणांवरुन हे स्पष्ट होईल की समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात तर नव्हतेच, उलट त्यांना विनोद आवडतच होता.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु १, शके १९४१

संदर्भः श्रीमत् ग्रंथराज दासबोध - http://www.dasbodh.com/
विशेष आभारः कीर्तनकार श्री समीर लिमये.

Thursday, March 28, 2019

सबद सबद हर कोई कहे

अधूनमधून कधीतरी ऑनलाईन वैफल्याचा किंवा वैराग्याचा झटका येतो आणि असा विचार येतो की आपण जे फेसबुकवर राजकीय, धार्मिक, विनोदी पोस्ट करत असतो किंवा Meme टाकत असतो, किंवा क्वचित कौटुंबिकही पोस्ट करत असतो, ते टाकू नये, काय फायदा?

अशाच मनस्थितीत असताना एका व्यक्तीच्या वॉलवर काहीतरी विपरीत घडल्याचं वाचलं जातं. इनबॉक्समध्ये चौकशी केल्यावर कळतं त्या व्यक्तीच्या बाबांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ती व्यक्ती म्हणते की माझे बाबा आजारी असताना मी काही वेळा तुझ्या राजकीय आणि विनोदी दोन्ही पोस्ट त्यांना मी वाचून दाखवत असे. तुझ्या विनोदी पोस्ट ऐकून आणि Meme त्यांना दाखवल्यावर ते माझ्याबरोबर खूप हसायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायचं श्रेय तुला जातं. तुझ्याच एका पोस्टमुळे बाबा गेल्यावर आईच्या चेहर्‍यावरचं लोपलेलं हसू परत आलं आणि आई पुन्हा आनंदी दिसू लागली (तिचे शब्द - she became jovial). त्याबद्दल तुझे खरंच आभार आहेत.

गंमत म्हणजे या व्यक्तीला मी कधी भेटलोही नाहीये आणि ऑनलाईन वगळता ओळखही नाही. पण बोलून दाखवणारी ही पहिलीच व्यक्ती भेटली आहे. असा आनंद नकळत किती जणांना वाटला गेला असेल ते त्या गजाननालाच माहीत. तो सुखकर्ता तो दु:खहर्ता. तोच कर्ता तोच करविता.

संत कबीरांचे शब्द आहेत:
सबद हर कोई कहे
सबद के हाथ न पांव
एक सबद औषध करे
एक सबद करे घांव

किती खोल अर्थ भरलेला आहे या दोह्यात!  बाहेरून घरी आलेल्या नवरा, बायको, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, दीर, सासू, सासरे, मित्र, मैत्रीण, किंवा अगदी शेजार्‍यालाही अशा कुणालाही तो एकदम ताजातवाना दिसत असला तरी "कसे आहात? दमलेले दिसता? आराम करा जरा." असं म्हणालात तर ती व्यक्ती आणखी प्रसन्न होईल आणि दमलेली असेल तर खरंच ताजेतवाने वाटू लागेल. अर्थात, "एक सबद औषधि करे". एक शब्द औषधासारखा काम करतो. मात्र हे औषध एकदाच लावून भागत नाही. ते वारंवार लावावं लागतं. हेच मनाचं औषध.

एक सबद करे घाव...पण घाव घालायला मात्र एखादाच शब्द पुरतो. गजाननाकडे प्रार्थना आहे की माझ्याकडून वापरले गेलेले सबद 'एक सबद औषध करे' असे आनंद देणारेच असूदेत.  आणि चुकूनही स्वतःहून 'एक सबद करे घांव' होऊ नये.

आणि अशा रीतीने ऑनलाईन वैफल्य, वैराग्य चुलीत घालून मी परत फेसबुकवर, सोशल मिडीयावर तुम्हाला 'पिडायला' हजर!




© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ ८, शके १९४०

Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.

Thursday, January 17, 2019

वामपंथी भारत विखंडन ४ - कम्युनिस्टांचं आणि पितृसत्ताक पद्धतीचं एवढं काय हो वाकडं?


राजीव मिश्रांची ही पोस्ट वाचल्यावर आधी फारशी पटली नाही, कारण अनुभव त्याच्या बरोबर उलट होते. मात्र ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्यावर आणि बराच विचार केल्यावर त्यातला मतितार्थ लक्षात आला. अर्थात पोस्टमधे काही मुद्द्यांचा राजीवजींनी उल्लेख केलेला नाही, पण एका जुन्या लेखाची आठवण झाल्यावर ट्युब पेटली.


साम्यवादी फ्रैंकफर्ट स्कूलचा विद्वान मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम्म याच्या म्हणण्यानुसार - "आईच्या प्रेमाच्या बरोब्बर विरुद्ध वडिलांचं प्रेम असतं. वडिलांचं प्रेम हे 'अटी आणि नियम लागू' यात मोडतं. यातला सगळ्यात त्रासदायक प्रमार हा की वडिलांचं प्रेम मिळायला मुलांना त्याच्या लायक बनावं लागतं. जर तुम्ही ऐदी आणि नालायक निपजलात तर तुम्हाला वडिलांचं प्रेम मिळत नाही....पण काही झालं तरी आईचं प्रेम मात्र मिळतंच.
हे एक अचानक केलेलं निरीक्षण नव्हे, तर साम्यवादाच्या संपूर्ण विचारसरणीच्या केंद्रस्थानी असलेला हा विचार आहे. फ्रैंकफर्ट स्कूलच्या विचारवंतांचं आयुष्य बघितलं तर एकाचंही आपल्या बापाशी पटलं नाही. जवळजवळ सगळी श्रीमंत बापाची बिघडलेली कार्टी होती. त्यांच्यापैकी एकालाही कामधंदा करायची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळेच्या सगळे बापाच्या पैशावर ऐश करण्यात धन्यता मानत असत. या सगळ्यांच्या तीर्थरुपांना असं वाटत असे की आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा, पण हे मात्र आपल्या कष्टाने यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या बापाचा दुस्वास करत.

यांच्या ऐश करण्याला काही मर्यादाच नव्हत्या. रंडीबाजी, दारूबाजी आणि सर्व प्रकारची व्यसने असलेले, आणि उपजिविकेसाठी काम करणं म्हणजे काहीतरी क्षुद्र प्रकार आहे असं समजणारे हे सम्यवादी विद्वान, आपल्या दैनंदिन खर्चाचे पैसे मात्र त्याच बापाकडून घ्यायचे. जर्मनीने युद्धात पडणे, लढणे, हरणे, आणि त्यानंतर कर्ज, गरीबी आणि मंदीत बुडणे या प्रकारांचा कुठलाही विपरीत परिणाम न झालेल्या गर्भश्रीमंत ज्यूंच्या या नतद्रष्ट अवलादी होत. यांचं आयुष्य म्हणजे ऐषआरामाच्या एका गटारगंगेतून न्हाऊन पुन्हा दुसर्या ऐषारामाच्या गटारगंगेत उडी हेच होतं. यातूनच साम्यवाद्यांच्या क्रिटिकल थिअरीचा जन्म झाला ज्यात pratyek समाजात मान्यता असलेल्या प्रत्येक संस्कार आणि मर्यादा यांना तिलांजली देण्याचा पुरस्कार केला गेलेला आहे.
अशा नालायकांना बापाचं प्रेम कसं मिळणार होतं? वेगळं सांगायला नको की आपापल्या बापांशी यांचे संबंध ताणलेलेच होते.

समाजात विकृत लोकांचं एक वैशिष्ट्य आसतं - जे मला मिळालं नाही ते इतरांनाही मिळू नये. साम्यवाद हा एक प्रकारची विकृती असल्यामुळे त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीचा सर्वनाश हेच आपलं ध्येय मानलं.

अपवाद आहेत, शिस्त हा प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने वडिलांकडूनच येतो. उदाहरणादाखल सातच्या आत घरात आलं नाही तर आई भुवया उंचावून तुमच्याकडे बघेल, दहाच्या आत आलं नाही तर जेवलात का विचारेल, आणि बारा वाजून गेले तर तुमच्या खोलीत येऊन येऊन तुमच्या डोक्यावरुन हात फिरवून झोपल्याची खात्री करेल. पण वडिलांना मात्र या उशिराचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही केलेल्या कृत्यांची कारणं ही वडिलांना पटावी लागतात, अर्थात वडील accountability मागतात. याचा अर्थ वडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटत नाही किंवा त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही, पण वडील त्याही आधी तुमच्या कृत्यांच्या परिणामांचा विचार करत असतात.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, खर्या खोट्या अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्या दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या कुठल्याही व्यक्तीला 'हिटलर' हे संबोधन वापरलं जाऊ लागलं, अगदी आपल्या वडिलांनाही. हीच कल्पना वडील आणि मुलांचे संबंध बिघडवायला उपयोग केली गेली.

म्हणूनच म्हणतो, ज्या मुलांना लहानपणी वडीलांचं प्रेम मिळत नाही, ते पुढे जाऊन साम्यवादी  होतात. शिस्त महत्त्वाचीच, पण आपल्या मुलांवर हातचं न राखता प्रेम करा, धपाटा घालणार्‍या हाताला गोंजारण्याचंही भान असू द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर करु नका, नाहीतर पोरगं कधी टुकडे टुकडे गँगवाल्या कम्युनिस्ट गँगमधे जाईल सांगता येणार नाही.

© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ११, शके १९४०