Thursday, January 17, 2019

वामपंथी भारत विखंडन ४ - कम्युनिस्टांचं आणि पितृसत्ताक पद्धतीचं एवढं काय हो वाकडं?


राजीव मिश्रांची ही पोस्ट वाचल्यावर आधी फारशी पटली नाही, कारण अनुभव त्याच्या बरोबर उलट होते. मात्र ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्यावर आणि बराच विचार केल्यावर त्यातला मतितार्थ लक्षात आला. अर्थात पोस्टमधे काही मुद्द्यांचा राजीवजींनी उल्लेख केलेला नाही, पण एका जुन्या लेखाची आठवण झाल्यावर ट्युब पेटली.


साम्यवादी फ्रैंकफर्ट स्कूलचा विद्वान मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम्म याच्या म्हणण्यानुसार - "आईच्या प्रेमाच्या बरोब्बर विरुद्ध वडिलांचं प्रेम असतं. वडिलांचं प्रेम हे 'अटी आणि नियम लागू' यात मोडतं. यातला सगळ्यात त्रासदायक प्रमार हा की वडिलांचं प्रेम मिळायला मुलांना त्याच्या लायक बनावं लागतं. जर तुम्ही ऐदी आणि नालायक निपजलात तर तुम्हाला वडिलांचं प्रेम मिळत नाही....पण काही झालं तरी आईचं प्रेम मात्र मिळतंच.
हे एक अचानक केलेलं निरीक्षण नव्हे, तर साम्यवादाच्या संपूर्ण विचारसरणीच्या केंद्रस्थानी असलेला हा विचार आहे. फ्रैंकफर्ट स्कूलच्या विचारवंतांचं आयुष्य बघितलं तर एकाचंही आपल्या बापाशी पटलं नाही. जवळजवळ सगळी श्रीमंत बापाची बिघडलेली कार्टी होती. त्यांच्यापैकी एकालाही कामधंदा करायची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळेच्या सगळे बापाच्या पैशावर ऐश करण्यात धन्यता मानत असत. या सगळ्यांच्या तीर्थरुपांना असं वाटत असे की आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा, पण हे मात्र आपल्या कष्टाने यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या बापाचा दुस्वास करत.

यांच्या ऐश करण्याला काही मर्यादाच नव्हत्या. रंडीबाजी, दारूबाजी आणि सर्व प्रकारची व्यसने असलेले, आणि उपजिविकेसाठी काम करणं म्हणजे काहीतरी क्षुद्र प्रकार आहे असं समजणारे हे सम्यवादी विद्वान, आपल्या दैनंदिन खर्चाचे पैसे मात्र त्याच बापाकडून घ्यायचे. जर्मनीने युद्धात पडणे, लढणे, हरणे, आणि त्यानंतर कर्ज, गरीबी आणि मंदीत बुडणे या प्रकारांचा कुठलाही विपरीत परिणाम न झालेल्या गर्भश्रीमंत ज्यूंच्या या नतद्रष्ट अवलादी होत. यांचं आयुष्य म्हणजे ऐषआरामाच्या एका गटारगंगेतून न्हाऊन पुन्हा दुसर्या ऐषारामाच्या गटारगंगेत उडी हेच होतं. यातूनच साम्यवाद्यांच्या क्रिटिकल थिअरीचा जन्म झाला ज्यात pratyek समाजात मान्यता असलेल्या प्रत्येक संस्कार आणि मर्यादा यांना तिलांजली देण्याचा पुरस्कार केला गेलेला आहे.
अशा नालायकांना बापाचं प्रेम कसं मिळणार होतं? वेगळं सांगायला नको की आपापल्या बापांशी यांचे संबंध ताणलेलेच होते.

समाजात विकृत लोकांचं एक वैशिष्ट्य आसतं - जे मला मिळालं नाही ते इतरांनाही मिळू नये. साम्यवाद हा एक प्रकारची विकृती असल्यामुळे त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीचा सर्वनाश हेच आपलं ध्येय मानलं.

अपवाद आहेत, शिस्त हा प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने वडिलांकडूनच येतो. उदाहरणादाखल सातच्या आत घरात आलं नाही तर आई भुवया उंचावून तुमच्याकडे बघेल, दहाच्या आत आलं नाही तर जेवलात का विचारेल, आणि बारा वाजून गेले तर तुमच्या खोलीत येऊन येऊन तुमच्या डोक्यावरुन हात फिरवून झोपल्याची खात्री करेल. पण वडिलांना मात्र या उशिराचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही केलेल्या कृत्यांची कारणं ही वडिलांना पटावी लागतात, अर्थात वडील accountability मागतात. याचा अर्थ वडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटत नाही किंवा त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही, पण वडील त्याही आधी तुमच्या कृत्यांच्या परिणामांचा विचार करत असतात.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, खर्या खोट्या अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्या दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या कुठल्याही व्यक्तीला 'हिटलर' हे संबोधन वापरलं जाऊ लागलं, अगदी आपल्या वडिलांनाही. हीच कल्पना वडील आणि मुलांचे संबंध बिघडवायला उपयोग केली गेली.

म्हणूनच म्हणतो, ज्या मुलांना लहानपणी वडीलांचं प्रेम मिळत नाही, ते पुढे जाऊन साम्यवादी  होतात. शिस्त महत्त्वाचीच, पण आपल्या मुलांवर हातचं न राखता प्रेम करा, धपाटा घालणार्‍या हाताला गोंजारण्याचंही भान असू द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर करु नका, नाहीतर पोरगं कधी टुकडे टुकडे गँगवाल्या कम्युनिस्ट गँगमधे जाईल सांगता येणार नाही.

© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ११, शके १९४०

1 comment: