Monday, January 18, 2016

असा मिडिया मिडीया...

होई कांड दादरीचं, मिडीयाला लागे घोर |   
जवा घडते मालदा, म्हणे भुरटा तो चोर ||

करी दादरी दादरी, त्याले शिक्षा करी कोन |  
उभा जाळला मालदा, डोळे वटारी ना कोन ||

दीदी जेहादी जेहादी, तिचं न्यारं ते तंतर | 
पाकी अतिरेकी बरे, त्याले गोळीचा मंतर ||

दीदी गुलाम गुलाम, अली गातोया गझला |
मालद्यात दंगेखोर, जाळी मजला मजला ||

आले कसाई कसाई, झाला मुर्दाड कायदा |
आमच्या दीदीले हिरव्या, मिळे मतांचा वायदा ||

मारी कोकरू कोकरू, म्हणे भावना धार्मिक |
झुंज बैलांशी करता, मिडीयाले होतो शोक ||

क्रूर मानूस मानूस, मुके बैल झुंजवले |
मुल्ला दयाळू दयाळू, त्याले खाऊन टाकले ||

देवळात नको बाई, तरी आम्ही जानारच |
ब्रह्मचार्‍याच्या कुटीत, गोंधळ होनारच ||

असा कसं हे मिडिया, त्याले डोकं गुडघ्यात | 
पैकं खाऊन इकतो,  इये देशाची इज्जत ||

--------------------------------------------------
...बहिणाबाईंची क्षमा मागून.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ९, शके १९३७
--------------------------------------------------

आशापुरा माईनिंग कंपनीकडून कोकणातल्या पर्यावरणाला धोका


Tuesday, January 12, 2016

माध्यमवेश्यांचा नंगानाच


गालिब अब्दुल गुरू. अर्थात फाशी गेलेला अतिरेकी अफझल गुरूचा मुलगा. त्याला जम्मू-काश्मीर बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळाल्यावर माध्यमवेश्यांना आनंदाच्या उकळ्याच्या उकळ्या फुटल्या आहेत. जणू अफझल गुरूचीच फाशी रद्ध झाली असावी किंवा तो मरणोत्तर निर्दोष सिद्ध झाला असावा. जणू अब्दुल गुरूची गुणपत्रिका ही अफझल गुरूला व त्याच्या कुटुंबियांना मिळालेले देशभक्तीचे सर्टिफिकेटच होय. जणू अफझल गुरू हा कुणीतरी संत महात्मा असावा किंवा किमानपक्षी अतिरेकी नसावाच. टाईम्स ऑफ इंडियाने तर अफझल गुरूचे छायाचित्र आणि भोवती फासाचा दोर अशा फोटोच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मुलाचा अब्दुल गुरूचा फोटो टाकून अफझल गुरूला तर भगत सिंगचा दर्जा देऊन टाकला. जेमतेम आठवडाभरापूर्वी झालेला पंजाबातल्या पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यातल्या अतिरेक्यांनी "आम्ही अफझल गुरूच्या हत्येचा बदला घ्यायला आलो आहोत" अशा आरोळ्या ठोकल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही क्षुल्लक बातमी मोठी करुन दाखवताना माध्यमवेश्यांना फुटलेल्या उकळ्या अधिकच संशय निर्माण करतात.

 


हे लोक स्वतःच्या मुलांचे निकाल पाहूनही इतके आनंदीत होत नसावेत. ज्या संसदीय लोकशाहीचे हे बातमीविक्रेते उठता बसता गोडवे गात असतात, त्याच लोकशाहीचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला जबाबदार असलेल्या एका अतिरेक्याच्या पोराबाळांविषयी इतका पुळका? संसदेचे संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या पोलीसांच्या घरच्यांची चौकशी केली आहे का यांनी कधी? संसदेबाहेर अतिरेक्यांना पहिल्यांदा बघणारी आणि इतर पोलीसांना सावध करणारी हवालदार कमलेशकुमारी यादव या अतिरेक्यांची पहिली बळी ठरली तिच्या घरी बरखा दत्त गेली आहे का कधी? राजदीप सरदेसाईला अफझल गुरूच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे याचं केवढं कौतुक, त्याला बघितलंय कधी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १४ लोकांच्या (त्यातले ६ पोलीस) आणि  २२ जखमी लोकांच्या घरी जाऊन चौकशी करताना? त्यांची मुलंबाळं कुठल्या शाळाकॉलेजात शिकत आहेत, त्यांचे मार्क किती, त्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी काही मदत हवी आहे का हे प्रश्न इतकी वर्ष या पत्रकार मंडळींना का पडले नाहीत? राजदीपपत्नी सागरीकाचाही त्यांच्या कुटुंबियांसाठी जीव का कळवळला नाही?

मुंबई बाँबस्फोट खटल्यात फाशी गेलेला याकुब मेमन हा चार्टर्ड अकाउंटंट होता. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे त्यांच्या सुदैवाने मॉर्निंग वॉकला जे कधीच जात नाहीत, ते लोकसत्ता नामक तथाकथित वृतपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांच्या भाषेत 'सनदी लेखपाल'. अतिरेकी हल्ल्यांच्या मागे असलेल्या, म्हणजे मास्टरमाइंड असलेल्या  अतिरेक्यांची शैक्षणिक पात्रता पहा. आयटी व्यवसायिक, सॉफ्टवेअर अभियंता, डॉक्टर,  रसायन अभियंता, असे बहुतेक लोक उच्चविद्याविभूषित आहेत. राजदीप सरदेसाईंना गालिब अब्दुल गुरूचे उत्तम मार्क ही गोष्ट "अ स्टोरी ऑफ होप" अर्थात "आशादायी गोष्ट" वाटते. त्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या मरहूम अब्बांना म्हणजे अफझल गुरूला किती मार्क होते माहित नाही, पण  एवढं निश्चित, की उत्तम गूण हे देशभक्त असल्याचं लक्षण ठरू शकत नाहीत. लक्षात घ्या, काहीही करा आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही (no matter what you do, we will not break) असं तो म्हणतो, डॉक्टर व्हायचं आहे असं तो म्हणतो, पण मला देशाचा चांगला नागरिक व्हायचं आहे असं काही त्याच्या तोंडून बाहेर पडलेलं नाही. तेव्हा हे बातमीविक्रेते किंवा माध्यमवेश्या काहीही म्हणोत सरकार आणि गुप्तहेर संस्थांनी त्याच्यावर लक्ष ठेवलेलंच बरं. अखंड सावधान असावे, असे श्री स्वामी समर्थ म्हणून गेलेच आहेत. तेव्हा आयसीसमधे सामील झालेल्या एका युवकाने धर्मबुडवी असल्याचा आळ घेऊन आपल्या मातेलाच गोळी घातल्याचे उदाहरण ताजे असताना आपल्या अतिरेकी असलेल्या बापाच्या फाशीचा सूड घ्यायला मातृभूमीला लक्ष्य करायचा हेतू तो बाळगत नाही ना, याची काळजी घेतली पाहीजे.  त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांचा किती फायदा होईल याबाबत साशंकताच आहे, पण शक्य झाल्यास त्याचं समुपदेशन करुन त्याला देशाचा जबाबदार नागरिक व्हायला मदत केली पाहीजे.

अब्दुल गुरूच्या परीक्षेतल्या उत्तम गुणांनी हुरळून गेलेल्या माध्यमवेश्यांचा मूर्खपणा इथेच थांबत नाही. २६/११चा हल्ला लाईव्ह दाखवल्याने व कदाचित मुद्दामून अनेक गोष्टी उघड केल्याने गमावलेले जीव स्मरणात आहेत ना? गालिब अब्दुल गुरूला खरोखरीच देशाचा चांगला नागरिक व्हायचं असेल, प्रामाणिक माणूस व्हायचं असेल, तर त्याच्या या दिशेने होणार्‍या संभाव्य प्रयत्नांना याच खोडसाळ आणि विघ्नसंतोषी बातमीविक्यांनी सुरुंग लावला आहे असे साधार म्हणण्यास वाव आहे. तो सापाचं पिल्लू ठरतो की हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेला भक्त प्रल्हाद, ते काळच ठरवील, मात्र त्याच्या बापाचं कर्तृत्व जगजाहीर असताना अशा प्रकारे त्याचं नाव माध्यमांत झळकावून त्याची ओळख उघड करुन किंवा अगोदरच माहित असल्यास ती आता अधिक व्यापक प्रमाणात पसरवून या बातमीविक्यांनी प्रचंड मोठी घोडचूक केली आहे हे नक्की. आता त्याची प्रत्येक हालचाल, तो कुठल्या महाविद्यालयात जाणार आहे, कुठल्या वर्गात बसणार आहे, त्याचे मित्र कोण याच्याकडेही लोकांचं लक्ष असणार.  उद्या त्याच्या जीवाला काही धोका झाला तर हेच बातमीविके उद्या मोदी सरकार आणि हिंदुत्ववाद्यांवर याचं खापर फोडायला मोकळे.

पण थांबा, तोच तर यांचा डाव कशावरुन नसेल?





--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ३, शके १९३७
--------------------------------------------------

Thursday, January 7, 2016

कोण तू? ते गळेपडू!

सद्ध्या एका विशिष्ठ प्रकारच्या लोकांशी सातत्याने संपर्क होतो आहे. त्या प्रकारच्या लोकांना कोठले विशेषण लावावे हा प्रश्न पडला आहे. संधीसाधू म्हणावे असे एक जण म्हणाला पण हा प्रकार जरासा वेगळा आहे.

सांगतो काय ते. व्यवसाय व नोकरी निमित्ताने कार्यालयात व बाहेर, शेजारीपाजारी, जवळचे व लांबचे नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, आणि इतर परिचित अशा असंख्य लोकांशी आपला संपर्क येत असतो. सोशल नेटवर्किंगवरही अनेकांशी ओळख होत असते.

यातले काही जण अनपेक्षितपणे खूप चांगले मित्र होतात, काहींचे संबंध कामापुरते मर्यादित राहतात, तर काहींशी जेमतेम ओळख राहते. काहींना चॅटिंग आवडत नाही, काहींना व्यक्तिगत फोनवरुन किंवा प्रत्यक्ष संपर्क आवडतो, तर काहींना फक्त ऑनलाईन गप्पा मारायच्या असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यातल्या अनेकांचे व्यवसाय असतात व त्याबद्दल ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून माहितीही देत असतात. अगदी अपरिचित व्यक्तींनीही त्यांच्या व्यवसायाबाबत संपर्क केल्यास माझा अजिबात आक्षेप नाही. माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, तुम्हाला रस असल्यास भेटूया ही सेल्स पीच साधी आणि सरळ आणि म्हणूनच माझी आवडती आहे.

पण काही जण असेही असतात की परिचय असूनही आंतरजालावर हाय केल्यावर प्रतिसाद देणार नाहीत, कार्यालयात समोर भेटल्यावर आपण बोलल्याशिवाय दिवसाच्या वेळेनुसार शुभेच्छांची देवाणघेवाण करणार नाहीत, रस्त्यात दिसल्यावर पुढे जाण्याआधी साधं ओळखीचं हसणार नाहीत, पण काम असेल तर मात्र अचानक सलगी करु लागतील.

कार्यालयात कलीग म्हणून काम करताना अनेकांशी आपला फारसा संपर्क येत नाही. नोकरी सोडल्यावर जो थोडाफार संभाषण असतं ते ही अनेकांच्या बाबतीत नाहीसं होतं. नोकरी सोडल्यावर अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांना आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या सहकारी मंडळींची आठवण येते. अशा वेळी ज्यांच्याशी फारसं बोलणं होत नसेल, त्यांना सरळ माझं अमुक अमुक काम आहे, त्यासाठी तुमच्याशी बोलायचं आहे असं स्पष्ट सांगितलं तर बरं पडतं. आधी फेसबुकवर अनेक वर्षांच्या गॅपनंतर मित्रविनंती पाठवायची, हवापाण्याच्या गप्पा करायच्या, मग कुटुंबियांची चौकशी करायची, मग स्वत:च्या कुटुंबियांची माहिती द्यायची, मग हळूच फोन नंबर मागायचा, पहिल्यांदा फोन  केल्यावर कौटुंबिक आणि कार्यालयीन गप्पा मारायच्या, आणि मग लगेच काही दिवसांनी पुन्हा फोन केल्यावर "आय हॅव अ‍ॅन ऑस्सम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, तुला वेळ असेल तर बोलूया" असं म्हणायचं - या प्रकाराची मला प्रचंड चीड आहे. कामापुरता मामा करायची इच्छा असेल, तर स्पष्ट काम आहे असं सांगावं - मला पटलं तर मी त्यात भाग घेईन आणि आनंदाने मामा होईन, नाही पटलं तर स्पष्ट नाही म्हणून सांगेन. आधी अनेक वर्षांनंतर घनिष्ट मैत्री असल्याच्या थाटात कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं गळ्यात पडायचं आणि मग हळूच काम काढायचं या वृत्तीला कुठलं विशेषण लावावं या विचारात मी आहे.

ही वृत्ती असलेले लोक कार्यालयातच भेटतात असं नाही. लांबचा नातेवाईक आहे असं पाहून फेसबुकवर मित्रविनंती स्वीकारावी, तर आपण नंतर हाय केल्यावर वाचूनही त्या हायकडे दुर्लक्ष करण्यात येतं. संभाषणाचा प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडण्यात येतं. आणि मग काम असेल तेव्हा कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं प्रेमाने गुड मॉर्निंग, कसे आहात होतं. बरं, यांच्या 'बिझनेस ऑपॉर्टुनिटीला' अप्रत्यक्ष भाषेत नकार द्यावा तर ते ही चालत नाही. तुम्ही 'बिझनेस ऑपॉर्ट्युनिटी' आधी ऐकून घ्या, मग बोला; तुमचा आणि वहिनींचा फोन नंबर द्या बरं" अशी वैतागवाणी प्रेमळ दटावणी ऐकून वैताग येतो.

अशा लोकांना एक तर स्पष्ट नकार देणे किंवा साफ दुर्लक्ष करणे या पैकी एक उपाय मी सहज यशस्वीपणे हाताळतो, मात्र अशा लोकांना नक्की काय विशेषण लावावं, या संभ्रमात मी आहे.

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १२, शके १९३७
--------------------------------------------------

Tuesday, January 5, 2016

तो वीर हुतात्मा झाला

हातात घेऊनी बाँब
तो वीर हुतात्मा झाला
वीरपत्नी आणि पोरे
अन् गाव पोरका झाला

सहकारी मित्र जन सारे
अन् हेलावला वारा
पण होता तो सर्वांचा
म्हणूनि देशही रडला सारा

पण किंमत या जीवाची
आम्हांसच होती खास
ज्या शत्रूशी झुंजला तो
त्या अवलादी नकोशाच

इच्छा तुला भरवायाची
आई म्हणाली याची
खाऊन घे मरण्याआधी
म्हणे थोर अम्मी 'त्याची'

थांबवा वृथा नरसंहार
आमच्या वीर पुत्रांचा
आता मारा बिळात घुसूनी
या दहशतवादी उंदरांना

लांबली कविता माझी
रात्रही झाली फार
झोपतो शांत चित्ताने
'तो' आहे सीमेवरती !

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ११, शके १९३७
--------------------------------------------------

Thursday, December 24, 2015

हेराल्डेश्वरी ओव्या

स्वामी करी केस
कलम ४२०
पप्पू तोंडी फेस
आणलासि

पप्पू असे पोर
अमेठीचा मोर
का म्हणता चोर
पुन्हा पुन्हा?

सासू माझी थोर 
लावा किती जोर
मला नाही घोर
मम्मी म्हणे

सुंभ गेला तरी
पीळ तो जाईना
लाज ती वाटेना
मायलेका

जामीन तो ठरे
मौनीबाबा भरे
पन्नास हजार
इतकाचि

मम्मी असे त्राता
भारताची माता
त्वरेने वदला
खुर्शीद तो 

घालती गोंधळ
राडा नित्य घोळ
मधमाशांचे पोळ उधळले

बाहेर ते गुंड
संसदेत झोंड
मवाली ते पुंड
माजलेत

पंचेचाळीस उरले
वेठीस धरले
काम नाही झाले
संसदेत

दिस नको आम्हा
आता सोनियाचे
देश चाले पुढे
प्रगतीत

जन ते जागवा
चोर तो दाखवा
फाडून पुरता
मुखवटा

जिरवा ही खोड
ठेचा ही घमेंड
त्यांच्या बापाची पेंड
देश नसे

-------------------------------------------------------
©  मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष शु. १४, शके १९३७, दत्त जयंती
-------------------------------------------------------