Thursday, March 11, 2021

द डेथ ऑफ स्टालिन (२०१७): साम्यवादी हुकूमशाहीचं विनोदी विच्छेदन

रशियाचे सम्राट झार निकोलस, त्यांची पत्नी, चार मुली, आणि राजकुमार अलेक्सी यांची निघृण हत्या करुन साम्यवादी बोल्शेविक क्रांतीने रशियातली राजेशाही संपवली आणि गरीब, पिडीत, शोषित, कष्टकरी (proletariat) जनतेचा प्रतिनिधी म्हणून गर्भश्रीमंत कॉम्रेड लेनिन सोवियत रशियाचा अध्यक्ष बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर कॉम्रेड स्टालिन. याच स्टालिनच्या मृत्यू आणि त्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट साम्यवादी हुकुमशाही व्यवस्थेची भयानकता आणि दहशत आपल्यापर्यंत चक्क विनोदाच्या माध्यमातून पोहोचवतो.

चित्रपट सुरु होतो तो रेडियो मॉस्कोच्या एका प्रेक्षागृहात सुरु असलेल्या एका वाद्यसंगिताच्या मैफिलीने. या मैफलीचे थेट प्रक्षेपण स्टालिन ऐकतो आणि प्रक्षेपण हाताळणार्‍या कर्मचार्‍याला फोन करुन "मला या मैफिलीचं ध्वनिमुद्रण हवं आहे, ते घ्यायला कुणालातरी पाठवतोय" असा आदेश देतो. हे ऐकल्यावर त्या कर्मचार्‍याचं धाबं दणाणतं. कारण या मैफलीचे फक्त थेट प्रक्षेपण केलेले असतं पण ध्वनिमुद्रण मात्र केलेलेच नसतं, मग स्टालिनला ध्वनिमुद्रण पाठवणार कसं? शिवाय फोन होईस्तोवर नुकतीच मैफल संपलेली असल्याने अर्धेअधिक प्रेक्षक बाहेर पडलेले असतात आणि कलाकारांची आवराआवर सुरु असते. त्याही परिस्थितीत मैफलीच्या थेट प्रक्षेपणासारखी वाटावरणनिर्मिती व्हावी म्हणून कलाकारांना पुन्हा गोळा केलं जातं, बाहेर पडत असलेल्या प्रेक्षकांना दम देऊन पुन्हा बसवलं जातं, आणि प्रेक्षकांच्या उर्वरित रिकाम्या जागा भरायला अक्षरशः रस्त्यावरुन जाणार्‍या आणि सापडलेल्या  कुणालाही आणून प्रेक्षक म्हणून बसवलं जातं. कुणालाही म्हणजे अक्षरशः कुणालाही, मग त्यात एक उलटी दोन सुलटी करुन स्वेटर विणणारी बाई, एक फळं हादडणारी बाई, आपल्या आयुष्यात प्रेक्षागृह न बघितलेलं आणि चेहर्‍यावर 'अजि म्या मार्क्स पाहिला' असे भाव घेऊन वावरणारं एक जोडपं अशी सगळी ध्यानं पाहून आपण फिसकन् हसायला सुरवात करतो. स्टालिनसाठी पुन्हा सगळा पसारा मांडून ध्वनिमुद्रण करायचं इथवर ठीक, पण ऐकलेल्या मैफलीत आणि ध्वनिमुद्रणात स्टालिनला फरक जाणवला तर काय या दहशतीने मैफलीचा मूळ संचालक म्हणजे कंडक्टर झीट येऊन पडतो आणि ध्वनिमुद्रण हाताळणार्‍या कर्मचार्‍यापुढे उपलब्ध वेळात नवा कंडक्टर शोधण्याचं नवीन झेंगट येऊन उभं राहतं. इथेही दुसर्‍या एका म्युझिक कंडक्टरला नाईट गाऊनमधेच उचलून आणतात आणि तसंच मैफल दिग्दर्शित करायला उभं करतात.

तर अशा रितीने मैफल संपते आणि ध्वनिमुद्रण हाताळणारा कर्मचारी स्टॅलिनपर्यंत पोचवण्यासाठी तयार झालेली ध्वनिमुद्रिका घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात ती ठेवत असतानाच संगीत मैफलीतली पियानोवादक ("मी पुन्हा पियानो वाजवायला हवा असेल तर माझा मेहनताना वाढव" असं सांगून ते कबूल करुन घेऊन मगच पुन्हा पियानो वाजवायला तयार झालेली) मारिया त्या ध्वनिमुद्रिकेच्या पाकिटात एक चिठ्ठी सारते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्टॅलिनवर बिनधास्तपणे जहरी टीका केलेली . ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिका लावून स्टॅलिन मैफलीचा आनंद पुन्हा लुटण्यासाठी सज्ज होत असताना त्याला खाली पडलेली ती चिठ्ठी दिसते ती वाचत असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं आणि तो जागीच कोसळतो. सकाळी चहा घेऊन येणार्‍या सेविकेला स्टालिनची अवस्था दिसते आणि मग सुरु होतात अचाट प्रकार. सगळ्यात आधी तिथे पोहोचतो तो गृहमंत्री बेरिया. तिथे पोहोचताच तो स्टालिनच्या त्याही अवस्थेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहतो. मागोमाग तिथे पोहोचतो उपाध्यक्ष मेलेंकॉव्ह आणि त्यानंतर घाईघाईत नाईट ड्रेसवर कोट पँट चढवून धावतपळत आलेला सरचिटणीस निकिता क्रुश्चेव्ह. मागोमाग कामगार मंत्री कगानोविच, व्यापारमंत्री मियोकन, आणि (आपल्या विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या दाढीसाठी जगप्रसिद्ध असलेला) संरक्षणमंत्री बुल्गानिन तिथे हजर होतात. मग परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह, सैन्यप्रमुख फील्ड मार्शल झुकॉव्ह हेही या खेळात सामील होतात आणि जशीजशी 'पात्रांची' संख्या वाढते तसातसा गोंधळ वाढत जातो.


स्टॅलिनच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग, त्यातूनच त्याच्या या सहकार्‍यांना दिसणार्‍या विविध संधी, त्यात एकमेकांचा कल कुठे आणि कुणाकडे आहे याचा अंदाज घेत कुरघोडी करण्याची आणि आघाडी उघडण्याची सतत चालवलेली अगदी पार स्टालिनच्या अंत्यविधीपर्यंत आणि नंतरही चाललेली कटकारस्थानं, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारण्यासाठी चिह्नित केलेल्या लोकांच्या यादीत सतत होणारे बदल, दीर्घकाळ स्टालिनच्या मर्जीने अत्याचार करत अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या आणि जीव अबाधित राखणाऱ्या त्याच्या सहकारी मंत्र्यांनी तो मेल्यावर अचानक आपण उदारमतवादी आहोत हे दाखवायची धडपड करणे आणि दिखाऊपणासाठी का होईना अनेक कैद्यांना सोडणे इत्यादी दयाळू धोरणे आखणे, स्टालिनची मुलगी स्वेतलाना आणि मुलगा वॅसिली यांना 'मॅनेज' करण्याची धडपड, अशा प्रसंगांमुळे परिस्थिती प्रत्येक क्षणाला कूस बदलते आणि आपली  उत्कंठा वाढवत नेत एका अंगावर येणार्‍या प्रसंगाने चित्रपटाचा शेवट होतो.

या रुक्ष घडामोडी घडत असताना यात विनोदनिर्मितीला वाव कुठे मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. पण चित्रपट पाहताना लेखक डेव्हिड स्नायडर व इयान मार्टिन आणि दिग्दर्शक अरमांडो इयानुची (Armando Ianucci) इत्यादींना पहिल्या दृश्यापासून पुन्हा पुन्हा दाद द्यावीशी वाटते. सुरवातीपासून शेवटापर्यंत कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही. उपरोल्लेखित संगीत मैफलीचे उदाहरण घ्या - स्टालिनची दहशत इतकी की सुरवातीला दारावर थाप पडल्यावर प्राण कंठाशी आणून 'आता नाही येणे जाणे' असे भाव चेहर्‍यावर आणत बायकोचा निरोप घेणारा, त्याला का बोलावलं जात आहे हे समजल्यावर बुचकळ्यात पडलेला कंडक्टर शेवटी त्याच्या मनासारखी मैफल पार पडल्याने सुटका झाल्याचे जे भाव चेहर्‍यावर आणतो तो क्षण चित्रपटाच्या त्या भागाचा परमोच्च बिंदू आहे. 


स्टालिन मेला आहे की नाही, नसेल तर पुन्हा कार्यरत होण्याइतका बरा होईल की नाही, हे ठरवायला डॉक्टर बोलवावेत तर मॉस्कोतल्या सगळ्या चांगल्या डॉक्टरांना मारुन टाकल्याने गोची झालेली असते, म्हणून मग मैफल हाताळणारा कर्मचारी जशी वाट्टेल ती माणसे प्रेक्षक म्हणून धरून आणतो तसे अक्षरशः 'ध्यानं' वाटतील अशा डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय स्टाफला धरून आणले जाते ती वेड्यांची मांदियाळी पाहून आपल्याला पोट धरधरून हसणं भाग पाडतं. अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची परिस्थिती असलेले प्रसंग आणि प्रसंगांच्या मालिका विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. अगदी झाडाकडे तोंड करुन लघवी करणारा मेलेंकॉव्ह आणि त्याच्याशी गप्पा मारणारा लेवेरँटी बेरिया हे दृश्य सुद्धा त्याच्या खुसखुशीत संवादांमुळे आपल्याला हसवून जातं. आवश्यक तिथे तिरकस, हवे तिथे बोचरे, आणि जिथे हवे तिथेच असलेले संवाद ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.  

साम्यवादी राजवटीत होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी; संपत्ती, जीव, आणि अब्रू यापैकी कशाचीच शाश्वती नसणे आपलं बूड शाबूत रहावं म्हणून सतत चालणारी नेत्यांची केविलवाणी धडपड आणि जनरल सेक्रेटरी (इथे स्टालिन) यांच्याशी एकनिष्ठ असण्याच्या शपथा घेणे; ठार मारावयाच्या व्यक्तींच्या याद्या स्टालिनच्या कार्यालयवजा निवासस्थानाबाहेर एनकेव्हिडी (NKVD) च्या अधिकार्‍यांच्या हातात ठेवताना बेरिया त्यांना देत असलेल्या सूचना ही दृश्ये प्रथम हसवत असली तरी चित्रपट जसजसा शेवटाकडे जाऊ लागतो तसतसं त्यातला थंड क्रूरपणा ठळकपणे जाणवू लागतो. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर झालेल्या पार्टी मिटींगमधे विविध पदे आणि जबाबदार्‍यांचे वाटप इत्यादी बाबतीत 'एकमताने' घेतलेले निर्णय हे दृश्य साम्यवादी राजवटीत असलेला वास्तविक भंपकपणा दाखवतं., याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात प्रमुख घटना किंवा मुख्य पात्रांच्या मागे पार्श्वभूमीवर सतत हिंसा दिसते. म्हणजे एकट्याने किंवा घोळक्याने लोकांना धरुन नेलं जात आहे, बंद दाराआडून ऐकू येणारा गोळीबार, ढकलून दिल्याने कुणीतरी जिन्यावरुन गडगडत खाली पडतंय, निव्वळ स्टालिन आजारी असल्याची बातमी घेऊन आलेल्या सैनिकाला झालेली अटक, इत्यादी प्रसंग संपूर्ण चित्रपटभर दिसत राहतात, आणि हे असं सतत दिसणारं थंडपणे चालणारं दमन हा कम्युनिस्ट कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा स्थायी भाव सतत चित्रपटभर अधोरेखित होत राहतो. म्हणूनच चित्रपटाच्या पोस्टरवर शेक्स्पिअरच्या 'कॉमेडी ओफ एरर्स'च्या धर्तीवर असलेले 'कॉमेडी ओफ टेरर्स' हे शब्द शोभतात. 

एखाद्या गोष्टीचं गांभीर्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे अनेक मार्ग असले तरी चक्क विनोदाचा वापर करुन सादरीकरण प्रभावीपणे करण्यात यशस्वी ठरणारा कदाचित हा एकमेव सिनेमा असावा. चित्रपटाची लय आणि गती शेवटपर्यंत टिकून राहते याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या आधी हुकूमशाहीवर विनोदी अंगाने टिप्पणी करणारे सिनेमे झाले नाहीत असं नाही, त्यातली चटकन आठवणारी नावे म्हणजे चार्ली चॅप्लिनचा द ग्रेट डिक्टेटर ते हल्ली हल्ली म्हणजे २०१२ साली आलेला साशा बॅरन कोहेनचा द डिक्टेटर हे दोन सिनेमे. मात्र या दोन्ही चित्रपटांत परिस्थितीवर भाष्य करायला विनोदाचा वापर करण्याऐवजी विनोदनिर्मितीकडे कल अधिक दिसून येतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रेक्षकांना हसवणे हा प्रमुख उद्देश आणि त्याला तोंडी लावायला अनुक्रमे हिटलर आणि अरबी लष्करी हुकूमशहा हे हुकमी भावनिक पत्ते घेऊन दोन्ही सिनेमे बनवले आहेत असं वाटून जातं. या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर साम्यवादी हुकूमशाहीची गोष्ट सांगण्याला प्राधान्य देणारा आणि तरीही विनोदनिर्मितीच्या योग्य जागा हेरून आपल्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणारा 'द डेथ ऑफ स्टालिन' ठळकपणे उठून दिसतो. 

पु. ल. देशपांडे आपल्या अंतु बर्वा या व्यक्तिचित्रात म्हणतात, "विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य अस कवच." हा चित्रपट त्याही पलिकडे जाऊन आपल्याला हसवत हसवत अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, आणि म्हणूनच वेगळा ठरतो. नेहमीच्या हेरकथा आणि विनोदपटांनी कंटाळला असाल तर हा चित्रपट नक्कीच एक सुखद धक्का देऊन जाईल हे नक्की. 

म्हणूनच 'द डेथ ऑफ स्टालिन' बघायला विसरू नका!

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. १३, शके १९४२, महाशिवरात्री



Thursday, February 25, 2021

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम - महिला सशक्तीकरण नव्हे तर पुरुष अशक्तीकरण

हिंदू स्त्रिया आणि पुरुषांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तथाकथित स्त्रीवाद हा हिंदू महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी नसून हिंदू पुरुषांचे म्हणजेच त्यांच्या वडील, भाऊ, पती आणि पुत्र असलेल्या पुरुषांचे आणि त्या योगाने संपूर्ण हिंदू समाजाचे अशक्तीकरण करण्याचा डाव्यांचे षडयंत्र आहे.

आज एकच मूल असलेल्या कुटुंबांत (हिंदू हे वेगळं लिहायला नको) एक मुलगी ही वेळप्रसंगी आईचे रूप धारण करु शकणारी कुणाची बहीण उरलेली नाही. मुलांचीही हीच अवस्था आहे; बहिणींचे रक्षण करायला किंवा तिच्याकडे हट्ट करायला आज अनेक घरांत बहिणीच नाहीत. अशी नाती उरलेलीच नसल्यामुळे आजची तरुण पिढी ही या नात्यांसोबत येणारी मजा, अधिकार, आणि जबाबदार्‍यांच्या तसंच त्या नात्यांच्या असण्याने आपसूक मिळणार्‍या शिक्षणापासून आणि सकारात्मक परिणामांच्या कोणत्याही जाणीवांशिवाय मोठी होत आहे. आजच्या पत्नी आणि आई असलेल्या स्त्रियांचा विचार करायचा तर पुरुषांसाठी आज फक्त मातृत्व ही एकच भावना शुद्ध स्वरूपात उरलेली आहे, कारण हल्ली प्रेयसी आणि पत्नीच्या नात्यांबरोबरच प्रेमाचं स्वरूप आज भावनिकदृष्ट्या प्रचंड व्यवहारी आणि कोरडं झालेलं आहे, आणि म्हणूनच वडील नामक व्यक्ती मुलींच्या आयुष्यात त्या नावाच्या अर्थासह असेलच असं नाही. याचं कारण शोधायला गेलं तर आजच्या तरुणींना नवरा आणि वडील या नात्यांना त्यांच्या पूर्णार्थाने अनुभवणं आणि स्वीकारणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे हे निदर्शनास येतं. 

इंग्रजीत एक म्हण आहे, 'Power corrupts, and absolute power corrupts absolutely' अर्थात सत्तेमुळे भ्रष्ट आचार निर्माण होतो आणि अमर्याद सत्तेमुळे अमर्याद भ्रष्ट आचार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे आजचा स्त्रीवाद हा स्त्री आणि पुरुषांना कुठल्याही नात्यात एकमेकांना पूरक असण्याऐवजी स्त्रीला कुटुंबात अमर्याद अधिकार दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे पुरुष स्त्रैण वाटावेत इतके बुळे बनलेले आहेत, किंबहुना बनवलेले गेले आहेत. त्यातही एकच मूल असल्याने त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं हे ओघाने आलंच. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आजच्या तरुणांना नर्ड बनवण्याच्या नादात मर्द बनवायचं बाजूला पडलेलं आहे.

आजच्या स्त्रीला मिळालेल्या अमर्याद अधिकार आणि सत्तेमुळे तिला एक प्रकारची मानसिक नशा अनुभवायला मिळत असली, तरी असा कुठलाही अनुभव तिला जीवशास्त्राशी, जनुकीय प्रेरणांशी, आणि पर्यायाने निसर्गाशी उभा दावा मांडण्याची शक्ती देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी स्त्रैण असलेला मुलगा जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा इतर बाबतीत अनुरूप असलेल्या मुलीला त्याला 'पसंत' करणं अवघड होऊन बसतं (लग्नाचा बाजार म्हणजे इथे जेव्हा प्रथम भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून प्रत्यक्ष विवाह होईपर्यंतचा काळ). कारण कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा स्त्रैण (emasculated) पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटणं शक्यच नसतं असा पुरुष आसपास असताना तिला (शारीरिक) सुरक्षितेची भावनाच निर्माण होत नाही. एक स्त्री म्हणून तिची अंतःप्रेरणा तिला काया, वाचा, मने अशाच पुरुषाकडे खेचूण नेते, अशा पुरुषाला शोधते जो तिचं संरक्षण करु शकेल. असा पुरुष तिला हल्ली कुठे मिळतो हे वेगळं सांगायला नको. 

इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहीजे की स्त्रीमुक्तीचा भारतातला अर्थ हा हिंदू पुरुषांपासून स्त्रियांना मुक्त करुन इतरांसाठी त्यांना उपलब्ध करण्याची संधी निर्माण करणे हा आहे. स्त्रीमुक्ती या गोंडस नावाखाली ही एक निव्वळ वामपंथी चळवळ आहे जिने आपल्या देशात फक्त आणि फक्त हिंदूंचेच नुकसान केले आहे, आणि ह्या नुकसानाचा फायदा कोणाला होतो आहे ते ही दिसतच आहे, त्यामुळे डावे हे कोणाची ढाल बनले आहेत हे समजणे सोपे आहे. हे एकदा लक्षात आलं की या मागचं षडयंत्र लक्षात यायला वेळ लागणार नाही. पर्यायाने भारतातली डावी चळवळ ही हिंदूंच्या दृष्टीने विकत घेतलेले गारदी आणि पाळलेले पेंढारी ठरली आहे. 

द फेमिनिस्ट लाय - इट वॉज नेव्हर अबाऊट इक्वॅलिटी (The Feminist Lie - It Was Never About Equality) या आपल्या पुस्तकात बॉब लुईस सप्रमाण सिद्ध करतो की स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम चळवळ ही समानतेबद्दल कधीच नसून उलट स्त्रीयांचा श्रेष्ठतावाद निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता. हा अमेरिकन संदर्भ झाला, पण एक भारतीय म्हणून आपल्याला समानता नवीन नाही. एक सनातन संस्कृती म्हणून आपण अनेक राण्या पाहिल्या आहेत आणि शक्तिरुपेण संस्थिता अशा देवींचा आपलं रक्षण करावं म्हणून नेहमीच धावा केलेला आहे. आपली समस्या समानतेच्या नावाखाली, महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली होणारे पुरुषांचे अशक्तीकरण, हतवीर्य होणं ही आहे. दुर्दैवाने हे अगदी राजरोस सुरु आहे आणि यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधावाच लागेल.


बॉब लुईसचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून नेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. 

आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा अनेकदा आपण देवींचा धावा केलेला आहे. महिषासुरमर्दिनी, नरकासुरमर्दिनी या देवीच होत्या. बाईचा सत्तांध बुवा आणि बुवाची अधिकारहीन बाई करणार्‍या स्त्रीवादी असुराचा वध करायलाही स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांना जी शस्त्रे लागतील त्याला पुरुषांना धार काढून द्यावी लागेल. फेमिनिझम हा राक्षसांची ढाल आहे, आणि राक्षसांना संपवायचं असेल तर त्यांची स्त्रीवाद ही ढाल आधी नष्ट करावी लागेल. 

🖊 मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९४२

टीपः ही पोस्ट स्त्रीवाद या विषयाकडे फक्त स्त्री नव्हे तर सर्व बाजूंनी विचार करणार्‍या लोकांसाठी आहे. "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की...." छाप वक्तव्य करायची असतील तर कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे.

--------------------------------------------------------------------------
संदर्भः English Version
--------------------------------------------------------------------------



Thursday, February 18, 2021

पेट्रोल

पेट्रोल जरा जास्त आहे, दर वर्षी वाटतं
'भर टाकी' म्हणताना, आभाळ मनात दाटतं

तरी काउंटर चालत राहतो... डोकं चालत नाही...
इतका वेळ विचारांशिवाय कधीच थांबत नाही...

तितक्यात कुठून एक नग पंपावर येतो...
'कर टाकी फुल' म्हणत आपली राख करतो...

आपण मग गपगुमान वर्क फ्रॉम होम करत राहतो ...
पानांफुलाझाडांना खिडकीतूनच बघत राहतो...

जानेवारी सरून फेब्रुवारीचा सुरू होतो पुन्हा खेळ...
फेब्रुवारीमागून चालत येते मार्चची असह्य घामटवेळ...

चक्क लॅपटॉपसमोर डोकं ठेऊन आपण छोटीशी डुलकी घेतो...
मिटिंगआधी टीम्समध्ये... कुठून रिमाईंडर येतो...

🖋️ मंदार दिलीप जोशी

पहिल्या दोन ओळी: Saleel Sahasrabuddhe


Tuesday, February 16, 2021

प्रियांका गांधी वड्रा, दिशा रवी, आणि टूलकिट

१९९१ साली पेरारीवलन नावाचा एक तरुण फक्त १९ वर्षांचा होता. शिवरासन नामक एका मित्राने सांगितलं म्हणून त्याने एका दुकानातून सेल विकत घेऊन त्याला दिले. शिवरासन हा राजीव गांधी हत्या खटल्यातील मुख्य आरोपी होता, आणि तपासात निष्पन्न झाल्यानुसार त्याने त्या बॅटऱ्यांचा उपयोग बॉम्बमध्ये केला होता. 

पेरारीवलन गेली तीस वर्ष तुरुंगात आहे, फक्त आपल्या मित्राने मागितले म्हणून दुकानातून सेल आणून दिले या 'गुन्ह्यात'. त्या मित्राने त्या सेलचा उपयोग बॉम्ब बनवण्यात केला म्हणून. आता पेरारीवलनला त्या सेलचा उपयोग कशात होणार आहे हे खरंच माहीत नव्हतं का या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, पण त्याला संशयाचा फायदा देता आला असता जो दिला गेला नाही हे ही खरंच आहे.

त्याच राजीव गांधींच्या मुलीने आज पर्यावरण कार्यकर्ती म्हणवून घेणाऱ्या दिशा रवीला अटक केली या घटनेचा निषेध केला आहे ― कारण ती 'फक्त' २१ वर्षांची आहे म्हणून. पेरारीवलनला माहीतही नव्हतं की तो दुकानात जाऊन जे सेल विकत घेतो आहे त्यांचा उपयोग बॉम्ब बनवण्यात होणार आहे ते. पण, पण, पण, दिशा रवीला हे पूर्णपणे ठाऊक होतं की ती जे #toolkit संपादित करत आहे, त्यातले दोष दूर करून पुढे पाठवत आहे, त्याचा उपयोग पुढे देशात शांतताभंग करून देश अस्थिर करायला होणार आहे. दिशा रवी आणि ग्रेटाच्या चॅटमध्ये दिशा सरळ म्हणते की त्यांच्यावर यूएपीए लागू शकतो, वकिलांशी बोलून घेते वगैरे! म्हणजे चुकीचं काम करते आहे हे तिला माहिती होतं. 

गांधी परिवाराचं हेच वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कुटुंबाबाबत काही दुर्घटना घडली तर त्यांच्याकडून वापरले जाणारे न्यायाचे मापदंड हे देशाच्या बाबतीत घडलेल्या दुःखद घटनेच्या बाबतीत त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या मापदंडांपेक्षा खूप वेगळे असतात.

आता गांधी परिवराच्या दुटप्पीपणाबाबत आणखी एक गोष्ट सांगतो. दिनांक १८ नोव्हेंबर २००८ रोजी राजीव गांधी हत्या केसमधील आणखी एक प्रमुख आरोपी नलिनीला भेटून वडिलांच्या हत्येच्या आरोपात नलिनीला वैयक्तिक पातळीवर 'माफ करत' प्रियांका गांधींनी त्या वेळी भरपूर फुटेज खाल्लं होतं. प्रियांका गांधी-वड्रांकडे फक्त शोबाजीसाठी का होईना पण नलिनीसारख्या प्रमुख आरोपीला माफ करण्यामागे काय अजेंडा होता तो त्या आणि त्यांची मम्मी जाणे, पण फक्त मित्राला बॅटऱ्या आणून दिल्या म्हणून गेली तीस वर्ष तुरुंगात खितपत पडलेला पेरारीवलन त्यांच्या खिजगणतीतही नव्हता ही बाबही गांधी कुटुंबाच्या स्वभावाच्या टूलकिटचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल.

📖 मंदार दिलीप जोशी


Thursday, February 11, 2021

पालीचं शेपूट आणि साम्यवाद

जगाला सतत उदो उदो करायला नायक हवे असतात आणि सगळ्या नालायकपणाचं खापर फोडायला खलनायक. मनुष्यस्वभावातला हा दुर्गुण हेरून इतिहासात प्रत्येक वेळी डावे आपली कृष्णकृत्ये व्यक्तींच्या माथी मारून नव्या रुपात नवनव्या देशांत आपल्या कारवाया करायला मोकळे झाले. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. पाल आपलं शेपूट तोडून पळून जाते आणि तुम्ही ते वळवळणारं शेपूट बघत बसता, पण पाल केव्हाच निसटलेली असते.

रशिया, चीन आणि कंबोडियात कोट्यवधी लोकांच्या हत्या स्टॅलिन, माओ, आणि पॉल पॉट यांनी नाही केल्या, साम्यवादाने केल्या; वेनेज्युएलाला गरिबीत ह्युगो चॅवेजने नाही, साम्यवादाने ढकललं. 

स्टॅलिन, माओ, पॉल पॉट, आणि ह्युगो चॅवेज ही पालीची शेपटे आहेत. त्यांना टाकून साम्यवाद-समाजवाद नामक पाल कधीच पुढे निघाली आहे. त्यांची जीवनचरित्रे वाचायची ती त्यांनी काय धोरणे राबवली याचा अभ्यास करायला, त्यांनी किती बायका केल्या आणि ठेवल्या हे चवीने चघळायला नव्हे. 

वेनेज्युएला गरीब झाला त्याचं कारण समाजवाद असफल झाला म्हणून नव्हे, तर तो सफल झाला म्हणून. कारण समाजवादाचा परिणाम नेहमीच गरिबी हाच असतो, म्हणूनच वेनेज्युएलाला तो गरिबीत ढकलण्यात यशस्वी ठरला.

समाजवादाचा उद्देश लोकांना गरीब बनवून दास्यत्वात नेणे हा असतो. म्हणूनच आधी तुमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं; बाकीची स्वातंत्र्ये त्यामागोमाग जातातच. आधी तुम्ही गरीब होता, मग गुलाम. 

म्हणून सरकारकडे नोकऱ्या मागू नका. सरकारने तुम्हाला नोकरी दिली की तुम्ही सरकारचे आश्रित होता. किंबहुना नोकऱ्या देणारं फक्त सरकारच उरलं, की तुम्ही सरकारचे गुलाम व्हाल. रशिया, चीन, इत्यादी देशांच्या साम्यवादी हुकूमशहांनी फक्त बंदूक आणि छळछावण्यांत धाडण्याची भीती यावर लोकांना दहशतीत ठेवलं नव्हतं, त्यांच्या धाकाचं माध्यम फक्त पोलीस आणि फौज नव्हते, तर जनतेच्या रोजगाराच्या सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेऊन त्या त्या सरकारांनी लोकांना आपल्या टाचेखाली दाबून ठेवलं होतं. कारण पाठीवर बसणाऱ्या लाथेपेक्षा पोटावर बसणारी लाथ जास्त जोरात आणि निर्णायक ठरते हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. सरकार हवं तेव्हा लोकांना उपाशी मारू शकत होती.

आज अदानी-अंबानी शेतमाल खरेदी करून त्या व्यवसायात एकाधिकारशाही प्रस्थापित करतील आणि शेतकऱ्यांचं शोषण करतील या ज्या थापा मारल्या जात आहेत त्या या आधारावर की कुणी जाऊन त्याची सत्यता तपासणार नाही. मुक्त अर्थव्यवस्थेत अर्थात ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत एकाधिकारशाही (monopoly) निव्वळ अशक्य आहे. एखाद्या कंपनीने एखाद्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ एकाधिकारशाही गाजवल्याचं एक तरी उदाहरण दाखवा बरं! रिलायन्सने अगदी फुकट डेटा देऊनही लोकांच्या एकाच मोबाईलमधे एक जिओ तर दुसरं वोडाफोन-आयडिया किंवा एअरटेलचं कार्ड नांदत होतं आणि बाजारात या कंपन्या सुद्धा. याचाच अर्थ असा की ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत कुणी समजा मोनोपॉली स्थापित करण्याच्या जवळ पोहोचला तरी त्याला स्पर्धा निर्माण होते किंवा असलेली टिकून राहते.

याच्या तुलनेत सगळं काही सरकारचं किंवा सरकारी आशीर्वादाने सुरू असल्यावर एकाधिकारशाही निर्माण होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तस्मात, सरकारकडून शोषण होण्याची शक्यता ही उद्योगपती-व्यापारी यांच्याकडून शोषण होण्याच्या शक्यतेहून कितीतरी पट जास्त असते.

म्हणूनच सरकारकडे कधी रोजगार मागायला जाऊ नका. तुम्ही ज्याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अर्थात पब्लिक सेक्टर समजता ते वास्तविक सरकारी उद्योग अर्थात सरकारी सेक्टर आहे. आणि ज्याला तुम्ही लौकिकार्थाने खाजगी क्षेत्र समजता तेच वास्तविक सार्वजनिक अर्थात पब्लिक सेक्टर आहे. सरकारी क्षेत्रातले फक्त पगार ही एक गोष्ट बघितली तर तुम्हाला हे नक्की पटेल.

म्हणूनच आज खाजगी क्षेत्राला कमकुवत करण्याच्या दिशेने पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे आणि असं करू पाहणाऱ्या प्रत्येक धोरणाला कडाडून विरोध झाला पाहिजे.

समाजवाद गरीबी आणि गुलामीकडे जाणारा गुळगुळीत रस्ता आहे. म्हणून पालीच्या शेपटीकडे नव्हे, पालीकडे लक्ष द्या.

🖋️  मंदार दिलीप जोशी
पौष अमावस्या, शके १९४२

प्रेरणा: डॉ. राजीव मिश्रा

Tuesday, February 2, 2021

समानतेचं मिथक

एका स्वतंत्र समाजात आपण आपल्या क्षमतेच्या आणि योग्यतेच्या बळावर जे मिळवायचं ते मिळवू शकतो. आता हे मात्र खरं की सगळ्यांच्या क्षमता आणि योग्यता वेगवेगळ्या असल्याने सगळ्यांच्या कर्तृत्वाचा परीघही वेगवेगळा असू शकतो.

स्वातंत्र्य आणि असमानता हातात हात घालून येतात. मात्र प्रत्येक गुलाम हा समान असतो. समाजवाद हा तुम्हाला गुलाम बनवतो.

आपल्या पुलंचे अंतु बर्वा म्हणतात त्याप्रमाणे:

"अहो, कसला समाजवाद! समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून... म्हणून काय थोट्या पांडूच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणारेत काय? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय? तो तसाच राहायचा! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं दोंद आत नाही गेलं! हे डावंउजवं राहायचंच समाजात! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं, हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

आणि साम्यवाद हा गुलामी चांगली कशी हे मनावर बिंबवतो. आपण हलाखीच्या जगण्यातून वर आलं पाहिजे हा विचार तुमच्या मनात येऊच न देता आपण हलाखीत आहोत म्हणजे इतरांनाही त्याच पातळीवर आणण्याची वृत्ती तुमच्यात साम्यवाद बाणवतो. 

मग चित्रात दाखवल्याप्रमाणे काम करायची क्षमता नसेल तर कामच नको ही वृत्ती अखेर तुम्हाला भिकेला लावते.

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी