१९९१ साली पेरारीवलन नावाचा एक तरुण फक्त १९ वर्षांचा होता. शिवरासन नामक एका मित्राने सांगितलं म्हणून त्याने एका दुकानातून सेल विकत घेऊन त्याला दिले. शिवरासन हा राजीव गांधी हत्या खटल्यातील मुख्य आरोपी होता, आणि तपासात निष्पन्न झाल्यानुसार त्याने त्या बॅटऱ्यांचा उपयोग बॉम्बमध्ये केला होता.
पेरारीवलन गेली तीस वर्ष तुरुंगात आहे, फक्त आपल्या मित्राने मागितले म्हणून दुकानातून सेल आणून दिले या 'गुन्ह्यात'. त्या मित्राने त्या सेलचा उपयोग बॉम्ब बनवण्यात केला म्हणून. आता पेरारीवलनला त्या सेलचा उपयोग कशात होणार आहे हे खरंच माहीत नव्हतं का या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, पण त्याला संशयाचा फायदा देता आला असता जो दिला गेला नाही हे ही खरंच आहे.
त्याच राजीव गांधींच्या मुलीने आज पर्यावरण कार्यकर्ती म्हणवून घेणाऱ्या दिशा रवीला अटक केली या घटनेचा निषेध केला आहे ― कारण ती 'फक्त' २१ वर्षांची आहे म्हणून. पेरारीवलनला माहीतही नव्हतं की तो दुकानात जाऊन जे सेल विकत घेतो आहे त्यांचा उपयोग बॉम्ब बनवण्यात होणार आहे ते. पण, पण, पण, दिशा रवीला हे पूर्णपणे ठाऊक होतं की ती जे #toolkit संपादित करत आहे, त्यातले दोष दूर करून पुढे पाठवत आहे, त्याचा उपयोग पुढे देशात शांतताभंग करून देश अस्थिर करायला होणार आहे. दिशा रवी आणि ग्रेटाच्या चॅटमध्ये दिशा सरळ म्हणते की त्यांच्यावर यूएपीए लागू शकतो, वकिलांशी बोलून घेते वगैरे! म्हणजे चुकीचं काम करते आहे हे तिला माहिती होतं.
गांधी परिवाराचं हेच वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कुटुंबाबाबत काही दुर्घटना घडली तर त्यांच्याकडून वापरले जाणारे न्यायाचे मापदंड हे देशाच्या बाबतीत घडलेल्या दुःखद घटनेच्या बाबतीत त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या मापदंडांपेक्षा खूप वेगळे असतात.
आता गांधी परिवराच्या दुटप्पीपणाबाबत आणखी एक गोष्ट सांगतो. दिनांक १८ नोव्हेंबर २००८ रोजी राजीव गांधी हत्या केसमधील आणखी एक प्रमुख आरोपी नलिनीला भेटून वडिलांच्या हत्येच्या आरोपात नलिनीला वैयक्तिक पातळीवर 'माफ करत' प्रियांका गांधींनी त्या वेळी भरपूर फुटेज खाल्लं होतं. प्रियांका गांधी-वड्रांकडे फक्त शोबाजीसाठी का होईना पण नलिनीसारख्या प्रमुख आरोपीला माफ करण्यामागे काय अजेंडा होता तो त्या आणि त्यांची मम्मी जाणे, पण फक्त मित्राला बॅटऱ्या आणून दिल्या म्हणून गेली तीस वर्ष तुरुंगात खितपत पडलेला पेरारीवलन त्यांच्या खिजगणतीतही नव्हता ही बाबही गांधी कुटुंबाच्या स्वभावाच्या टूलकिटचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल.
📖 मंदार दिलीप जोशी
No comments:
Post a Comment