Thursday, February 11, 2021

पालीचं शेपूट आणि साम्यवाद

जगाला सतत उदो उदो करायला नायक हवे असतात आणि सगळ्या नालायकपणाचं खापर फोडायला खलनायक. मनुष्यस्वभावातला हा दुर्गुण हेरून इतिहासात प्रत्येक वेळी डावे आपली कृष्णकृत्ये व्यक्तींच्या माथी मारून नव्या रुपात नवनव्या देशांत आपल्या कारवाया करायला मोकळे झाले. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. पाल आपलं शेपूट तोडून पळून जाते आणि तुम्ही ते वळवळणारं शेपूट बघत बसता, पण पाल केव्हाच निसटलेली असते.

रशिया, चीन आणि कंबोडियात कोट्यवधी लोकांच्या हत्या स्टॅलिन, माओ, आणि पॉल पॉट यांनी नाही केल्या, साम्यवादाने केल्या; वेनेज्युएलाला गरिबीत ह्युगो चॅवेजने नाही, साम्यवादाने ढकललं. 

स्टॅलिन, माओ, पॉल पॉट, आणि ह्युगो चॅवेज ही पालीची शेपटे आहेत. त्यांना टाकून साम्यवाद-समाजवाद नामक पाल कधीच पुढे निघाली आहे. त्यांची जीवनचरित्रे वाचायची ती त्यांनी काय धोरणे राबवली याचा अभ्यास करायला, त्यांनी किती बायका केल्या आणि ठेवल्या हे चवीने चघळायला नव्हे. 

वेनेज्युएला गरीब झाला त्याचं कारण समाजवाद असफल झाला म्हणून नव्हे, तर तो सफल झाला म्हणून. कारण समाजवादाचा परिणाम नेहमीच गरिबी हाच असतो, म्हणूनच वेनेज्युएलाला तो गरिबीत ढकलण्यात यशस्वी ठरला.

समाजवादाचा उद्देश लोकांना गरीब बनवून दास्यत्वात नेणे हा असतो. म्हणूनच आधी तुमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं; बाकीची स्वातंत्र्ये त्यामागोमाग जातातच. आधी तुम्ही गरीब होता, मग गुलाम. 

म्हणून सरकारकडे नोकऱ्या मागू नका. सरकारने तुम्हाला नोकरी दिली की तुम्ही सरकारचे आश्रित होता. किंबहुना नोकऱ्या देणारं फक्त सरकारच उरलं, की तुम्ही सरकारचे गुलाम व्हाल. रशिया, चीन, इत्यादी देशांच्या साम्यवादी हुकूमशहांनी फक्त बंदूक आणि छळछावण्यांत धाडण्याची भीती यावर लोकांना दहशतीत ठेवलं नव्हतं, त्यांच्या धाकाचं माध्यम फक्त पोलीस आणि फौज नव्हते, तर जनतेच्या रोजगाराच्या सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेऊन त्या त्या सरकारांनी लोकांना आपल्या टाचेखाली दाबून ठेवलं होतं. कारण पाठीवर बसणाऱ्या लाथेपेक्षा पोटावर बसणारी लाथ जास्त जोरात आणि निर्णायक ठरते हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. सरकार हवं तेव्हा लोकांना उपाशी मारू शकत होती.

आज अदानी-अंबानी शेतमाल खरेदी करून त्या व्यवसायात एकाधिकारशाही प्रस्थापित करतील आणि शेतकऱ्यांचं शोषण करतील या ज्या थापा मारल्या जात आहेत त्या या आधारावर की कुणी जाऊन त्याची सत्यता तपासणार नाही. मुक्त अर्थव्यवस्थेत अर्थात ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत एकाधिकारशाही (monopoly) निव्वळ अशक्य आहे. एखाद्या कंपनीने एखाद्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ एकाधिकारशाही गाजवल्याचं एक तरी उदाहरण दाखवा बरं! रिलायन्सने अगदी फुकट डेटा देऊनही लोकांच्या एकाच मोबाईलमधे एक जिओ तर दुसरं वोडाफोन-आयडिया किंवा एअरटेलचं कार्ड नांदत होतं आणि बाजारात या कंपन्या सुद्धा. याचाच अर्थ असा की ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत कुणी समजा मोनोपॉली स्थापित करण्याच्या जवळ पोहोचला तरी त्याला स्पर्धा निर्माण होते किंवा असलेली टिकून राहते.

याच्या तुलनेत सगळं काही सरकारचं किंवा सरकारी आशीर्वादाने सुरू असल्यावर एकाधिकारशाही निर्माण होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तस्मात, सरकारकडून शोषण होण्याची शक्यता ही उद्योगपती-व्यापारी यांच्याकडून शोषण होण्याच्या शक्यतेहून कितीतरी पट जास्त असते.

म्हणूनच सरकारकडे कधी रोजगार मागायला जाऊ नका. तुम्ही ज्याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अर्थात पब्लिक सेक्टर समजता ते वास्तविक सरकारी उद्योग अर्थात सरकारी सेक्टर आहे. आणि ज्याला तुम्ही लौकिकार्थाने खाजगी क्षेत्र समजता तेच वास्तविक सार्वजनिक अर्थात पब्लिक सेक्टर आहे. सरकारी क्षेत्रातले फक्त पगार ही एक गोष्ट बघितली तर तुम्हाला हे नक्की पटेल.

म्हणूनच आज खाजगी क्षेत्राला कमकुवत करण्याच्या दिशेने पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे आणि असं करू पाहणाऱ्या प्रत्येक धोरणाला कडाडून विरोध झाला पाहिजे.

समाजवाद गरीबी आणि गुलामीकडे जाणारा गुळगुळीत रस्ता आहे. म्हणून पालीच्या शेपटीकडे नव्हे, पालीकडे लक्ष द्या.

🖋️  मंदार दिलीप जोशी
पौष अमावस्या, शके १९४२

प्रेरणा: डॉ. राजीव मिश्रा

No comments:

Post a Comment