काल परवापासून किर्तनकारांवर केलेला एक विनोद फिरतो आहे:
जिवनात एवढी संपत्ती कमवुन काय करणार आहात ?शेवटी मेल्यावर काहीच बरोबर येत नाही..असं सांगणारे महाराज एका किर्तनाचे वीस हजार रुपये घेतात...!!!!
आणि खाली फिदी फिदी फिदी फिदी चे स्मायली
मेल्यावर वर काहीच नेता येत नाही बरोबर आहे. पण जगायला तर पैसे लागतात ना? बाहेर जाऊन टपरीवरचा साधा चहा आता सहा रुपयांच्या खाली मिळत नाही मग निव्वळ जगण्यासाठी आवश्यक दोन वेळचं जेवण, अन्न, वस्त्र, आणि निवार्याची सोय पैसे न घेता कशी करता येईल याचा विचार केला आहे का कधी? मुलांच्या शिक्षणाचा खर्च? इतर नैमित्तिक खर्च? साधी राहणी ठेवायची म्हटली तरी हे खर्च कितीतरी असतात. मग कीर्तनकारांनी पैसे घेतले तर बिघडलं कुठे?
प्रत्येक उत्तम कीर्तनकाराच्या मागे सखोल अभ्यास, अनुभव, व कीर्तनकला जोपासण्यासाठी घेतलेले अपार कष्ट असतात. त्या कष्टाचं मोल त्यांना मिळायलाच हवं. प्रत्येकाला योग्य बिदागी मिळवण्याचा अधिकार आहे. मग ते तुम्ही आम्ही असू की देवळातले पुजारी असोत की कीर्तनकार. अर्थात, सगळेच कीर्तनकार काही विद्वान, अभ्यासू, सदवर्तनी वगैरे नसतात हे ही मान्य. पण म्हणून कीर्तनात जे म्हटलंच जात नाही ते सरसकट सगळ्या कीर्तनकारांच्या तोंडी घालणं कितपत बरोबर आहे? आणि सगळ्यांचा डोळा हिंदू कीर्तनकार आणि पुजारी यांना मिळणार्या पैशावर का?
कीर्तन ही गोष्ट रोज सकाळी नऊ ते पाच करण्याची गोष्ट नाही. म्हणजे ती नोकरी नाही. तेव्हा तीनशे पासष्ट दिवस रोज बुवा कीर्तन करुन वीस वीस हजार कमवत आहेत हे अतिशय चुकीचे गृहतिक आहे. हे खरं आहे की कीर्तनकार वीस हजारा पासून ते पन्नास हजार आणि जास्त अनुभवी माणूस असेल तर लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो. मात्र काही दिवस भरपूर काम तर काही दिवस काहीच नाही हे नेहमीचेच असल्याने इंग्रजीत म्हणतात तसं it evens out.
हे काम प्रचंड बौद्धिक कष्टाचं काम आहे. रामायण, महाभारत, वेद, पुराणं यांचा अभ्यास; संस्कृत भाषेवर प्रभुत्व; आवश्यक तेव्हा योग्य संदर्भ आठवणं; आपल्या मायमराठी व इतर भाषांतल्या संतसाहित्याचा अभ्यास, इतकंच नव्हे तर इतर धर्मातले संदर्भ लक्षात ठेवणं, या व अशा अगणित बाबी तर आहेतच शिवाय कीर्तनाला सगळ्यात आवश्यक म्हणजे चांगल्या आवाजाला जोड म्हणून उत्तम गायनकला असणं आवश्यक असतं. निदान समोरचा श्रोतावर्ग झोपणार नाही अशा प्रकारे कीर्तन रंगवणं हे खायचं काम नाही. समोर शंभर दोनशेच्या घरात आकडा असलेला श्रोतावर्ग बघितल्यावर सभाधीटपणा हा गूण हवा हे वेगळं सांगायला नको. (टीम मीटींगमधे सात-आठ जणांच्या समोर उभं राहून पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन देताना त-त-प-प करत फाफलणार्यांनी तर हे नक्कीच लक्षात ठेवावं.)
मुळात आधी स्वतःच एखादं काल्पनिक गृहतिक मांडायचं आणि स्वतःच त्याची टर उडवायची ही हिंदूद्वेष्ट्यांची सवयच आहे. काय करणार आहात इतकी संपत्ती कमवून असं कुणीच कीर्तनात म्हणणार नाही. आत्तापर्यंत अनेक कीर्तनं ऐकली, त्यात कुणीही असं म्हणाल्याचं आठवत नाही. पैशाची हाव असू नये, कुणाला लुबाडून पैसे मिळवू नयेत असाच पैशाविषयी बोलताना बहुतेक कीर्तनकारांचा सूर असतो. तेव्हा एखादं वाक्य अर्धवट उचलून त्यावर असले विनोद तयार करायचे आणि सोशल मिडीयावर पाठवून हिंदूंचीही अप्रत्यक्ष मानखंडना करायची ही हिंदूद्वेष्ट्यांची एक कार्यपद्धती आहे.
मुळात आधी स्वतःच एखादं काल्पनिक गृहतिक मांडायचं आणि स्वतःच त्याची टर उडवायची ही हिंदूद्वेष्ट्यांची सवयच आहे. काय करणार आहात इतकी संपत्ती कमवून असं कुणीच कीर्तनात म्हणणार नाही. आत्तापर्यंत अनेक कीर्तनं ऐकली, त्यात कुणीही असं म्हणाल्याचं आठवत नाही. पैशाची हाव असू नये, कुणाला लुबाडून पैसे मिळवू नयेत असाच पैशाविषयी बोलताना बहुतेक कीर्तनकारांचा सूर असतो. तेव्हा एखादं वाक्य अर्धवट उचलून त्यावर असले विनोद तयार करायचे आणि सोशल मिडीयावर पाठवून हिंदूंचीही अप्रत्यक्ष मानखंडना करायची ही हिंदूद्वेष्ट्यांची एक कार्यपद्धती आहे.
हिंदूधर्माभिमानी असाल तर असले खोडसाळ जोक पुढे ढकलत जाऊ नका. मी सुद्धा आधी या विनोदावर हसलो होतो पण नंतर मूर्खपणा लक्षात आल्यावर सावध झालो. तेव्हा असले विनोद तुम्हाला आले, तर पटकन हसण्याची उबळ दाबून जरा विचार करा. आणि 'आला मेसेज, केला फॉरवर्ड' असं करत जाऊ नका.
बोला आर्यसनातन वैदिक हिंदू धर्म की जय.
© मंदार दिलीप जोशी