Sunday, July 17, 2016

पंडित नामा - ४: सर्वानंद कौल प्रेमी


सर्वानंद कौल प्रेमी (मृत्यूसमयी वयः ६४), मुलगा विरेन्दर कौल (मृत्यूसमयी वयः २७)
सोफ साली, अनंतनाग, काश्मीर
हत्या: ३० एप्रिल १९९०

गेल्या शतकातला सगळ्यात क्रूर नेता कोण किंवा कुठल्या राजकीय विचारधारेला सगळ्यात क्रूर म्हणता येईल असं तुम्हाला विचारलं तर मला खात्री आहे शंभरपैकी नव्व्याण्णव लोक हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष यांचं नाव घेतील. पण त्यांची माणसं मारण्याची पद्धत बघितली, आणि इस्लामी अतिरेक्यांबरोबर तूलना केली तर हिटलर आणि त्याची नाझी पिलावळ चक्क दयाळू महात्मे वाटायला लागतील याचीही मला खात्री आहे. त्यांचा भर निदान फक्त लवकरात लवकर माणसं मारण्यावर होता. पद्धतीही त्यांनी तशाच शोधल्या. पण काश्मीर मधल्या अतिरेक्यांचा भर मरताना आणि मरणोत्तरही ज्याला मारतो आहोत त्याची आणि त्याच्या नातेवाईक व इतर जवळच्यांची जास्तीत जास्त किती शारिरीक व मानसिक विटंबना करता येईल यावर भर असे. हे आपण आधीच्या एखाद दोन लेखात पाहिलंच आहे. त्याचा प्रत्यय श्री सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा विरेन्दर कौल यांच्या हत्येच्या वेळीही आला.

आपला हिंदू धर्म काय सांगतो? "सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया: | सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात  ||" श्री सर्वानंद कौल हे अक्षरशः जगत होते. ते जितके धर्मिक तितकेच सर्वसमावेशक कश्मीरियतवर मनापासून श्रद्धा असणार्‍या श्री सर्वानंद यांना काश्मीरच्या समभावी समाजमनावर आणि शांतताप्रेमावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच त्यांनी नातेवाईकांच्या अनेक विनंत्यांना धुडकावून लावत नुकत्याच दहशतवादाच्या छायेखाली आलेल्या आपल्या लाडक्या काश्मीरला सोडून इतरत्र स्थलांतरित व्हायला नकार दिला. कुठल्याही समाजाला, मग तो इतर देशापासून वेगळा जरी झाला, तरी कवी, लेखक, विचारवंत, विद्वान इत्यादी मंडळींची गरज असतेच. एका वेगळ्या झालेल्या प्रदेशाला, समाजाला वेगळ्या राजकीय ओळखीबरोबरच आपली अशी वेगळी संस्कृतिक ओळख असावी अशी भावना असतेच, म्हणूनच कदाचित एक सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान म्हणून काश्मीरमधे लोकप्रिय असलेल्या श्री सर्वानंद यांना मुस्लिमबहुल भागात राहूनही आपल्याला धोका होणार नाही असं वाटत असावं. आपल्या देव्हार्‍यात हिंदू धार्मिक ग्रंथांबरोबरच कुराणाची एक अतिशय दुर्मीळ अशी हस्तलिखीताची प्रत बाळगणार्‍या श्री सर्वानंद यांचा आपल्या लोकसंग्रहावर त्यांचा गाढ विश्वास असल्याने ते निर्धास्त होते आणि सोफ साली सोडायला नाखूष. पण त्यांच्या या भाबड्या विश्वासाला लवकरच तडा जाणार होता.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एके रात्री त्यांच्या घरात तीन दहशतवादी घुसले आणि कौल कुटुंबियांना त्यांच्याकडच्या मौलवान वस्तू एके ठिकाणी एकत्र करायला सांगितलं गेलं. सोनंनाणं आणि इतर दागिने, पश्मीना चादरी आणि शाली, भारी साड्या यांचा एके ठिकाणी ढग रचला गेला. घरातल्या स्त्रीपुरुषांच्या अंगावरचं सोनं ओरबाडलं गेलं आणि हा सगळा ऐवज एका बॅगेत भरला गेला. मग त्या तीन दहशतवाद्यांनी सर्वानंद यांना ती बॅग उचलून त्यांच्या सोबत चलण्याची आज्ञा केली. आता कौल यांच्या घरात रडण्याचा भयंकर आवाज घुमू लागला. बायकांचा हा आकांत पाहून त्या दहशतवाद्यांनी विरेन्दरला, "आम्ही सर्वानंद यांना कोणताही धोका पोहोचवू इच्छित नाही, ते परत येतील" असं आश्वासन दिलं आणि वर, "तुला हवं तर तू आमच्या बरोबर येऊ शकतोस" अशी मखलाशीही केली. रात्र फार झाल्याने वडिलांना परत यायला अडचण होईल म्हणून विरेन्दर त्यांच्या बरोबर निघाला. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे आधी समजलं असतं तर, 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः' या श्लोकाप्रमाणे कौल कुटुंबियांनी विरेन्द्रला जाऊ दिलं नसतं. घरातला वडीलधारी माणूस म्हणून सर्वानंद गेले, तरी किमान विरेन्दरचा आधार तरी उरला असता. पण तसं व्हायचं नव्हतं.

या नंतर दोन दिवसांनी श्री सर्वानंद कौल व विरेन्दर कौल यांचे मृतदेह घरापासून बरंच लांब सापडले. दोघांनाही खूप वेदनादायी मृत्यू आला होता हे त्यांच्या मृतदेहाकडे पाहून समजत होतं. माणूस क्रूरतेच्या कुठल्या थराला जाऊ शकतो हे त्यांच्या मृत शरीरांकडे बघितल्यावर लक्षात येत होतं. दोघांच्याही सर्वांगावर सिगारेटचे चटके दिल्याचे डाग होते. दोघांचेही हातपाय मोडलेले होते. इतकंच नव्हे तर दोघांचेही डोळे धारदार शस्त्राने काढलेले होते. हे कमी म्हणून की काय कपाळावर आपण जिथे गंध लावतो तेवढ्याच भागाला अतिरेक्यांनी सोलून काढलं आणि मग मधोमध लोखंडी सळीने भोसकलं होतं. कदाचित अजूनही ते दोघे वाचले तर काय करा म्हणून त्यांना गोळ्याही घातल्या गेल्या. मी सुरवातीला म्हटलं की या दहशतवाद्यांची माणसं मारण्याची पद्धत पाहून हिटलर व त्याचे नाझी सहकारी लाजले असते ते उगाच नाही.

सर्वेपि सुखिनः सन्तु अशी जरी आपली स्तुत्य भूमिका असली आणि सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती असं जरी म्हटलेलं असलं तरी ते एकतर्फी असून चालत नाही. समोरच्याची भूमिका आम्ही म्हणू तेच सत्य, आमचाच धर्म बरोबर आणि आमचाच देव सर्वश्रेष्ठ, आमच्या देवाला तुम्ही मानत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू, तुमच्या पोरीबाळी आमची मालमत्ता आहेत अशी भूमिका असली तर तुमच्या सद्भावनेचा काडीचा उपयोग होत नाही. म्हणूनच म्हणून मग 'माय नेम इज खान अ‍ॅन्ड आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट' अशी सिनेमांची नावं पाहिली की खिक् करुन हसायला येतं आणि बरोबरच येतो तो भयानक संताप.

कुठेही घडणारी दहशतवादी कृत्य ही स्थानिक रसद, मग ती सक्रीय असो वा नैतिक पाठिंबा देणारी, असेल तरच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. फ्लॅट संस्कृतीत राहूनही आपण लक्ष ठेऊ शकतो. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले तसं "अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी ||" हे अखंड लक्षात ठेवून तसं वागणं क्रमप्राप्त आहे. 

पंडित नामा मालिकेतल्या पुढच्या कथेसाठी पुन्हा काही दिवसांनी भेटू.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १३, शके १९३८
१७ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------



1 comment:

  1. फारच भयंकर आहे अविश्वनिय वाटते माती गुंग करणारे��

    ReplyDelete