Sunday, December 23, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग २ - विश्वासघात आणि उपसंहार



पहिला भाग इथे वाचता येईल 

चर्चने केलेला विश्वासघात
पहिल्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे रवांडातील राजकारणात आणि समाजकारणात चर्चची प्रत्यक्ष पण तरीही अनिर्बंध सत्ता होती. आधी जर्मनी आणि मग बेल्जियमला चर्चने त्यांच्या वसाहतवादी सत्तेची पकड मजबूत करायला भरपूर मदत केली. "रिलिजियन हा सामान्य जनतेसाठी अफूसारखा आहे (Religion is the opium of the masses)" या तत्त्वावर चालणार्‍या साम्यवादाचा वारा टुट्सींना लागण्यापूर्वी त्यांचेही चर्चशी उत्तम संबंध होते. टुट्सी अभिजनवर्गाबरोबर संगनमत  करुन रवांडातील सामान्य जनतेच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर चर्चने ताबा मिळवला होता. टुट्सींच्या साम्यवादावरच्या वाढत्या प्रेमामुळे हादरलेल्या चर्चने मग हुटूंशी संधान बांधलं आणि टुट्सी राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचलं.

आता रवांडातील राज्यकर्ते हुटू होते आणि अधिकाधिक सत्ता चर्चच्या ताब्यात जात  होती. आर्चबिशप आंद्रे पेरौदिन यांनी साम्यवादाच्या अनुयायांना सैतान आणि गॉडचे शत्रू घोषित करुन टाकलं. टुट्सींना राक्षस संबोधलं जाऊ लागलं. चर्चमधे पाद्री जी प्रवचनं देत त्यात टुट्सींद्वेष ठासून भरलेला असे. टुट्सी हे गॉडच्या पृथ्वीवरील राज्यस्थापनेच्या मार्गातील अडसर असल्याचे सांगून म्हणूनच त्यांचा नायनाट केला पाहिजे हा त्या प्रवचनांमधे सांगितलं जाऊ लागलं. चर्चच्याच मदतीने सत्तेत आलेल्या हुटूंनी चर्चला सरकारच्या प्रत्येक स्तरावर स्थान देत पाद्री मंडळींची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक केली. आर्चबिशप महाशय तर चक्क केंद्रीय सरकारमध्ये विराजमान होते. चर्चमधे जे सांगितलं जाईल त्याला देवाचा आणि सरकारचा आदेश मानून तो पाळण्याची सक्ती केली गेली. चर्च हे रवांडाच्या सरकरचा एक अविभाज्य अंग बनलं, आणि चर्चच्या विरोधात बोलणं हे सरकारच्या विरोधात बोलण्याइतकाच मोठा गुन्हा मानला गेला. सरकार पातळीवरच हुटू आणि टुट्सी यांच्यात असलेल्या वांशिक फरकावर बोट ठेवत टुट्सींच्या विरोधात जोरदार प्रचार सुरु झाला आणि वर म्हटल्याप्रमाणे चर्चमधे तर टुट्सींना सैतानाची माणसं म्हणून रंगवलं जाऊ लागलं.

हे सगळंं सुरु असताना टुट्सी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. काही स्थानिक आणि परागंदा टुट्सी तरूण मंडळींनी रवांडन पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात आरपीएफची स्थापना करुन रवांडावर आक्रमण करायची तयारी केली. यात आरपीएफला यशही मिळालं पण त्याची किंमत त्यांना त्यांच्या भाइबंदांच्या प्राणांनी चुकवावी लागली. इथे आपल्याला वर उल्लेख झालेल्या अरुशा शांतता कराराकडे पहावं लागेल. राष्ट्राध्यक्ष हबयारीमाना यांनी १९९३ साली आरपीएफचे नेते पॉल कगामे यांच्याशी केलेला हा करार चर्चच्या मर्जीविरुद्ध जाऊन केलेला असल्याने तो अर्थातच चर्चला मान्य नव्हता. साक्षात चर्च या करारावर नाराज असल्याने कधीच नीट पाळला गेला नाही. साम्यवादी  हुटूंना सैतानाची माणसं घोषित केल्यामुळे चर्चच्या मते गॉड आणि सैतान यांच्यात कसलाच करार होऊ शकत नव्हता.

त्यामुळे चर्चने या करारावर सह्या झाल्या झाल्या टूट्सींविरुद्ध विखारी प्रचाराला सुरवात केली. इतकंच नव्हे, तर चर्चमधून उघडपणे टुट्सींचा खातमा करायला लोकांना प्रोत्साहित केलं गेलं. पास्टर इग्नेस यिरिर्वाहन्दी याने तर या नरसंहारात सक्रीय सहभाग घेतला आणि लोकांना टुट्सींना नामशेष कसं केलं जावं याचं चक्क प्रशिक्षण दिलं. प्रचंड प्रमाणावर बुद्धीभेद सुरु होताच. टुट्सींना ठार मारणं न्याय्य ठरवण्याकरता बायबल मधले संदर्भ दिले गेले. लोकांच्या मनावर 'तुम्ही गॉडच्या शत्रूंविरुद्ध लढत असून गॉड तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही विजयी होणार आहात' हे सतत बिंबवलं गेलं. चर्चने रवांडाच्या सरकारला आणि नरसंहार करणार्या  सैन्याला पूर्ण पाठींबा जाहीर केला.

सिनेमातून आणि इतर प्रचारातून पाद्री आणि पास्टर दयाळू आणि नन अतीदयाळू ही प्रतिमा उभी करण्यात ख्रिश्चन जमात यशस्वी झाली आहे. एरवीही तसाच प्रचार सुरु असतो. पण हुटूंच्या तावडीतून जीव वाचवून कॅथलिक चर्चचा आश्रय घेणार्‍या टुट्सींना मात्र चर्च म्हणजे काय याचा अगदी प्रत्यक्ष आणि विपरीत अनुभव आला. हुटूंच्या तावडीतून कॅथलिक चर्चकडे पळणार्‍या टुट्सींची स्थिती एका कसायाच्या तावडीतून दुसर्याक कसायाकडे गेलेल्या थँक्सगिव्हिंगच्या टर्कीसारखी अवस्था झाली. प्रेमाचा धर्म म्हणून आपली जाहीरात करणार्या  आणि दयाळू म्हणवल्या जाणार्यास येशूच्या आश्रयाला गेलेल्या टुट्सींची निर्दयपणे हत्या करण्यात आली.

काही ठिकाणी विश्वासाने आश्रय मागायला गेलेल्या टुट्सींचं पाद्री आणि नन यांनी स्वागत केलं आणि मग विश्वासघात करत त्यांची हत्या केली,तर काही ठिकाणी हे काम चर्चशी संगनमत असलेल्या हुटू सैनिकांवर सोपवलं गेलं. चर्चचे पाद्री आणि नन आपल्या डोळ्यांसमोर होत असलेल्या हत्याकांडाचे मूक साक्षीदार बनून राहिले. त्यांच्या "गॉडचे शत्रू" मारले जात असताना त्यांना मधे पडायचं काहीच कारण दिसलं नाही. लोकांना चर्चमध्ये टुट्सींवर बलात्कार आणि खून करायला प्रोत्साहन देणारा फादर वेन्सेसलास मुनीश्यॅक हा दुर्दैवाने मोकळा फिरतो आहे.

एकट्या न्टारामा (Ntarama) कॅथलिक चर्चमध्ये ५००० टुट्सींचं हत्याकांड केलं गेलं. अशाच हत्या न्यामाटा (Nyamata), न्यारुबुये (Nyarubuye), स्याहिंडा (Cyahinda), न्यान्गे (Nyange)), आणि सेंट फॅमील (Saint Famille) इथे केल्या गेल्या.

यातल्या न्यान्गे पॅरीश (चर्च) येथील हत्याकांडाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. न्यान्गे पॅरीश मध्ये झालेल्या २,००० टुट्सींचे हत्याकांड तिथल्या चर्चमधले फादर अथानासे सिरोम्बा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं. फादर अथानासे याने प्रथम टुट्सींना तुतीस चर्चमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आणि नंतर संपूर्ण इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली. हे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, फादर अथानासे याने हत्यारबंद हुटूंना बोलावून घेऊन इमारतीच्या ढिगार्याहतून बचावलेल्या टूट्सींना गोळ्या घालायला सांगितलं. आर्चबिशप पेरौदिनने हुटू बंडखोरांनी चालवलेल्या हत्याकांडाला चक्क बायबलमधले संदर्भांचे आधार दिले. इतकंच नव्हे पेरौदिनने स्वतः नरसंहारात उत्साहपूर्वक भाग घेतला. फादर वेंसेसलास मुन्येशयाका यांनी  तर लोकांना चक्क टुट्सी स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची हत्या करण्यास प्रोत्साहन दिले.

चर्चला संलग्न असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्याकांडं घडली. आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा चर्चमधल्या फादर आणि नन यांनीच आपला विश्वासघात केला ही भावना जनतेसाठी सगळ्यात वेदनादायी होती.

उपसंहार
या हत्याकांडांच्या नंतर सुरवातीची काही वर्ष चर्चने त्यांच्याकडून काही अपराध घडले होते हेच नाकारलं. शेवटी तब्बल बावीस वर्षांनी चर्चने त्यांचे अपराध स्वीकारत एक माफीनामा प्रसिद्ध केला. या नरसंहारात कधी थेट तर कधी विश्वासघाताने मारल्या गेलेल्या लाखो निरपराध लोकांच्या पदरी चर्चकडून गुन्ह्याची स्वीकारोक्ती आणि एक माफीनामा या स्वरूपात क्रूर थट्टा वाट्याला आली. मालकांनी कोंबड्यांची झुंज लावावी, आणि त्यांनी काहीही विचार न करता कोणत्याही सबळ कारणाशिवाय रक्तबंबाळ होईपर्यंत किंवा अगदी जीव जाईपर्यंत एकमेकांशी झुंझत बसावं तसा हा प्रकार होता. जसं जगभर झालं, तसं इथेही मालकांच्या जागी चर्च होतं आणि झुंजणार्‍या दोन कोंबड्यांच्या जागी टुट्सी आणि हुटू.

चर्चचा हत्याकांडातील प्रत्यक्ष सहभाग रवांडातील शांतताप्रिय नागरिक आणि विशेषतः टुट्सी कधीच विसरले नाहीत. याच कारणास्तव राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांनी अक्षरशः हजारो चर्च आणि मशीदी बंद केल्या. या नरसंहारातून धडा घेतलेल्या रवांडाच्या नागरिकांना फसवून केलेल्या धर्मांतरातून लादल्या गेलेल्या रिलिजियनसचा धोका ध्यानात आलेला आहे. त्यांच्या सुदैवाने त्यांना पॉल कगामे यांच्या रूपात अशा रक्तपिपासू वृत्तीच्या रिलिजियनस पासून आपल्या देशाला वाचवण्यासाठी सातत्याने कार्यशील असणार्‍या व्यक्तीच्या रुपात योग्य नेता मिळालेला आहे.


© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १, शके १९४०

टीपः आपल्याला परिचित असलेला याच विषयावरचा हॉटेल रवांडा हा सिनेमा आपण बघितला असेलच. नसेल तर आवर्जून बघा. याच बरोबर 'समटाईम्स इन एप्रिल' हा चित्रपटही बघण्यासारखा आहे.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH

Saturday, December 22, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग १ - आफ्रिकेतली गोष्ट

लहानपणी घरात मोठी माणसं काही महत्त्वाचं बोलत असली आणि आम्ही लहान मुलांनी मधेच "काय झालं, काय झालं" असा भोचकपण केला, की मोठी माणसं आमची ब्याद टळावी म्हणून "काही नाही, आफ्रिकेतली गोष्ट आहे" असं म्हणत असत आणि आम्ही तिथून सुरक्षित अंतर लांब जाईपर्यंत पुन्हा बोलणं सुरु करत नसत. तेव्हापासून आफ्रिका म्हणजे काहीतरी गूढ, अनाकलनीय असा समज मनात रुजला तो रुजलाच.

हळू हळू मोठं होता होता एक एक गोष्टी समजत गेल्या आणि या खंडाबद्दलचं कुतूहूल वाढतच गेलं. शाळेत असताना जगाचा नकाशा बघताना आफ्रिका खंडाच्या नकाशाने लक्ष वेधून घेतलं. असं काय होतं त्या नकाशात?  अनेक देशांमधली आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही अक्षरशः फुटपट्टीने सरळ रेषा आखावी तशी सरळ आहे आणि अनेक ठिकाणी चक्क नव्वद किंवा पंचेचाळीस अंशाचे कोन दिसून येतात. पाश्चात्य देशांनी चर्चच्या सहाय्याने जगभरात ज्या पाचर मारून ठेवल्या आहेत त्यापैकी सगळ्यात भयानक आपल्याला आफ्रिका खंडात आढळतात.

गेल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी रवांडा देशाला त्यांच्याच गिरिन्का योजने अंतर्गत तिथूनच २०० गायी खरेदी करुन गरीब कुटुंबांना देण्याकरता भेट दिल्या त्याबद्दल लिहीलं होतं. या दौर्याहच्या निमित्ताने रवांडाबद्दलचं कुतुहूल पुन्हा जागृत झालं. या आधी एक हॉटेल रवांडा नामक चित्रपट येऊन गेला होता, पण तेव्हा तो काही ना काही कारणाने बघता आला नव्हता. तो ही या निमित्ताने पाहून घेतला.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे किगाली वंशहत्या स्मारकाला दिलेली भेट. रवांडात झालेला हा वंशविच्छेदाचा प्रयत्न म्हणजे बहुसंख्य हुटू जमातीने अल्पसंख्य टुट्सी जमातीचे केलेले भयानक वांशिक हत्याकांड होय. तब्बल शंभर दिवस चाललेल्या या हत्याकांडात आठ लाख टुट्सी अणि मवाळ हुटूंना आपले प्राण गमवावे लागले होते. हे हत्याकांड म्हणजे बहुसंख्यांना डावलून सातत्याने अल्पसंख्यांकांना लांगूलचालन केले की एक ना एक दिवस बहुसंख्य जनतेचा जो स्फोट होतो त्याचे प्रातिनिधिक उदाहरण मानले पाहीजे. या हत्याकांडाचे बरेचसे तपशील तेव्हा प्रकाशित झालेल्या आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवलेल्या बातम्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचले देखील होते. दुर्दैवाने एक गोष्ट मात्र मुद्दामून पुढे येऊ दिली गेली नाही आणि ती म्हणजे या हत्याकांडात असलेला चर्चचा सक्रीय सहभाग. हो, सक्रीय सहभाग. ही गोष्ट अगदी चर्चने या हत्याकांडातील सहभागाबद्दल २० नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर माफी मागितल्यानंतरही बेमालूमपणे दडपून टाकण्यात माध्यमे यशस्वी झाली.

आफ्रिकेचा इतिहास हा अनेक टोळ्यांचा इतिहास आहे. अनेक लहान लहान राज्य आणि त्यांचे राजे किंवा प्रमुख यांचा इतिहास आहे (जुन्या हिंदी चित्रपटातले 'कबीले के सरदार' डोळ्यापुढे आणा). आफ़्रिकेतील टोळ्या हे प्रकरण आपल्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे. त्यांना अशा प्रकारे देशात विभागून वर उल्लेख केल्याप्रमाणे कृत्रीम आणि विचित्र सीमारेषा आखणं हा पाश्चात्यांचा अमानुषपणा होता. कारण या टोळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृती सामायिक होती. पण आधी जर्मनी आणि मग बेल्जियम या वसाहतवादी राज्यकर्त्यांनी त्यांच्यात हेतूपुरस्सर दुहीचे वीष कालवले. याचाच अर्थ, आपण समजतो तसे ते वीष परंपरागत नाही.

रवांडा हा देश जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पूर्व आफ्रिकेच्या भागातला एक देश. १८९४ ते १९१८ पर्यंत जर्मनीच्या ताब्यात असलेला रवांडा पहिल्या महायुद्धात झालेल्या जर्मनीच्या पराभवानंतर शेजारच्या बुरुंडी सकट बेल्जियमची वसाहत बनला. इथूनच खर्याव अर्थाने या देशाच्या ससेहोलपटीला सुरवात झाली आणि रवांडाच्या इतिहासातल्या सगळ्यात भयानक वंशविच्छेदी दंगलींचा पाया रचला गेला. त्यावेळी रवांडाच्या लोकसंख्येपैकी हुटू जमातीची टक्केवारी ८५% आणि टुट्सी जमातीचे १५% लोक होते. सातत्याने बहुसंख्य हुटू जमातीला डावलून अल्पसंख्य टुट्सी जमातीला सगळीकडे प्राधान्य दिलेले होते. अल्पसंख्य असूनही टुट्सी जमातीचा सरकारमधे दबदबा होता आणि सरकारमधील प्रमुख पदांवर त्यांचीच नेमणूक होत असे. अर्थातच बहुसंख्य हुटू हे विकासाच्या पटलावर फार मागे फेकले गेलेले होते. बेल्जियन मंडळींनी या गोष्टीचा फायदा घेत अल्प्संख्य टुट्सीना हाताशी धरून त्यांच्या मार्फत चर्चच्या माध्यमातून रवांडावर  राज्य करायला सुरवात केली. बेल्जियन राज्यकर्त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात आधीच धगधगत असलेल्या असंतोषाला आणखीच खतपाणी घालून दोघांमधली दरी सांधायच्या ऐवजी आणखी मोठी करण्याकडे भर दिला. याकरता त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात शारीरिक उंची, आकार, आणि नाकाची ठेवण यात असलेल्या नैसर्गिक फरकाच्या आधाराने भेदभाव करायला सुरवात केली.

टूट्सी जमातीत शिक्षणाचं प्रमाण भरपूर असल्याने आपल्या आसपास आणि जगात काय चाललंय याबद्दल चांगलीच जागरुकता होती तसेच नवनवीन कल्पना आणि विचारधारांबद्दल वाचन होते. यापैकी टुट्सींना साम्यवादी विचारसरणी अधिक भावली व अधिकाधिक टूट्सी त्याकडे आकर्षित होऊ लागले. साम्यवादी विचारसरणीत धर्माला स्थान नसल्याने (आठवा: धर्म ही अफूची गोळी वगैरे वगैरे) या गोष्टीमुळे चर्च हादरले आणि त्यांनी साम्यवादाला सैतानी, ख्रिस्ती विरोधी आणि निषिद्ध घोषित केले.

आतापावेतो साम्यवादी विचारसरणीने टुट्सी लोकांत चांगलाच जम बसवला होता. आता रवांडाला एक स्वतंत्र साम्यवादी देश घोषित करावे म्हणून टुट्सी लोकांनी अनेक जोरदार निदर्शने करायला सुरवात केली. आता मात्र बेल्जियन राज्यकर्त्यांचा संयम संपला आणि त्यांनी टुट्सी जमातीबरोबर असलेले संबंध तोडले व बहुसंख्य हुटू जमातीला हाताशी धरले. फार मोठा काळ टुट्सींच्या वर्चस्वाखाली होरपळलेल्या हुटूंनी पलटवार करायला सुरवात केली नसती तरच नवल होतं. आता परिस्थिती उलट झाल्याने टुट्सींची अवस्था बिकट व्हायला सुरवात झाली. अशातच १९५९ साली हुटूंनी मोठा उठाव केला आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक टुट्सींनी देशाबाहेर पलायन केले. मोठ्या प्रमाणावर टुट्सींना निर्वासित व्हावे लागल्यामुळे रवांडात आधीच अल्पसंख्य असलेल्या टुट्सींची संख्या आणखी रोडावली. एकोणिसशे साठच्या सुरवातीला म्हणजेच १९६१ साल येईपर्यंत हुटूंनी रवांडाच्या टुट्सी राजाला पदच्युत करुन रवांडाला प्रजासत्ताक घोषित केलं. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून १९६२ साली बेल्जियमने औपचारिकरित्या रवांडाला स्वातंत्र बहाल केलं.

देश स्वतंत्र झाला असला तरी त्यानंतरही रवांडात वांशिक हिंसा थांबली नाहीच. १९७३ साली हुटू जमातीतले मेजर जनरल जुवेनाल हबयारीमाना (Juvenal Habyarimana) सत्तेवर आले आणि पुढची दोन दशके त्यांनी रवांडावर राज्य केले. १९५९ साली झालेल्या उठावामुळे आणि सातत्याने होणार्याआ वांशिक हिंसाचारामुळे टुट्सी आजूबाजूच्या काही देशात परागंदा झालेले होते. त्यांच्यापैकी युगांडात पळालेल्या काहीनी रवांडीज पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात Rwandan Patriotic Front (RPF) नामक बंडखोरांची सेना स्थापन करुन १९९० साली रवांडावर आक्रमण केले. हे युद्ध तब्बल तीन वर्ष चालले. याचा उद्देश अर्थातच हुटूंची सत्ता उलथून टाकण्याचा होता. १९९३ साली राष्ट्राध्यक्ष जुवेनाल हबयारीमाना यांनी चर्चच्या मर्जीविरुद्ध जात आरपीएफचे नेते पॉल कगामे (Paul Kagame) यांच्याशी शांततेचा करार केला. हा करार अरुशा शांतता करार या नावाने ओळखला जातो. या कराराअंतर्गत एक काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येऊन त्यात टुट्सींचा सहभाग असणार होता. या करारामुळे हुटूंमधला जहाल गट भडकला आणि त्यांनी या कराराविरोधात उठावाची तयारी केली. अध्यक्ष हबयारीमाना यांनीही परिस्थितीचा अंदाज घेऊन Interahamwe नामक एका हुटू बंडखोर गटाच्या स्थापनेत सहकार्य केले. Interahamwe गटाचा एकमेव उद्देश हुटू जमातीला संपवणे हाच आणि इतकाच होता. या गटाची स्थापना केल्याने आफ्रिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगात सगळ्यात क्रूर आणि अमानुष म्हणून ओळखलेल्या गेलेल्या वांशिक नरसंहाराचा पाया रचला गेला होता.


टुट्सींवर सूड उगवायची संधीच शोधणार्‍या हुटू बंडखोरांना आयतं निमित्त मिळालं ते हबयारीमाना प्रवास करत असलेलं विमान पाडलं गेल्याने. हबयारीमाना यांचं विमान विद्यमान अध्यक्ष पॉल कगामे यांच्या आदेशावरुन पाडलं गेलं असा हुटू बंडखोरांनी आरोप केला आणि टुट्सी लोकांवर भयानक अत्याचार सुरु केले. टुट्सींच्या रक्ताला चटावलेल्या हुटूंनी पुढचे शंभरावर दिवस टुट्सींची अक्षरशः कत्तल केली. आरपीएफने प्रतिकार सुरु केलेलाच होता. शेवटी आरपीएफने राजधानी किगालीवर ताबा मिळवल्यावरच परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. या नंतर अध्यक्ष पॉल कगामे यांनी रवांडामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या वांशिक नरसंहाराची पुनरावृत्ती होऊ नये या करता आधीच्या सरकारने केलेल्या चुका टाळून आणि सुधारुन अनेक चांगले निर्णय घेतले. वांशिक संघर्ष टाळण्याकरता घेतलेल्या या निर्णयांपैकी सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे चर्च आणि मशीदींवर धडक कारवाई सुरु करणे.

चर्चचे राज्यकारभारवरील नियंत्रण आपण या भागात वाचलं. पण चर्चचा रवांडातील नरसंहारातील प्रत्यक्ष सहभाग होता तरी कसा? याबद्दल पुढच्या भागात.

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष पौर्णिमा शके १९४०

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH


Tuesday, November 20, 2018

जपानला वाचवणारी तलवार अर्थात माओवादाचा जपानमधे अंत

१९४५ मध्ये दुसरं विश्वयुद्ध संपलं तेव्हा जपानची परिस्थिती अतिशय वाईट होती.

हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणूबाँबनी जणू जपानचं कंबरडं मोडलं होतं. अशा परिस्थितीत जपानमध्ये "एंजिरो असनुमा" (Inejiro Asanuma) नामक नेत्याचा उदय झाला. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या वेळी इनेजीरो असानुमा जपानच्या संसदेचे सदस्य होता आणि त्याने राष्ट्राध्यक्ष तोजो  यांना पाठिंबा दिला होता. मात्र १९४२ नंतर असानुमा साम्यवादाच्या प्रभावाखाली येऊ लागला, आणि जपानच्या राजकीय विश्वातून बाजूला झाला. विश्वयुद्धात जपानने चीनवर आक्रमण केल्यावर त्याने जपानच्या या कृतीचा तीव्र विरोध केला. दुसरं विश्वयुद्ध संपता संपता इनेजीरो असानुमा पूर्णपणे साम्यवादी चीनच्या प्रभावाखाली आला होता आणि युद्धसमाप्ती नंतर वरचेवर चीनचे दौरे करत असे. त्याने जपानमधे सोशलिस्ट पार्टी नामक साम्यवादी पक्ष काढला. जपानच्या प्रत्येक विद्यमान धोरणांचा विरोध आणि साम्यवादाचा स्वीकार करण्याचा पुरस्कार हा पक्ष करत असे. चीनच्या असंख्य वार्‍या करता करता असानुमाचे कॉम्रेड चेअरमन माओ त्से तुंग याच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण नसते झाले तरच नवल होतं.

इनेजीरो असानुमा जपानमध्ये माओवादाच्या प्रसारासाठी झटून कामाला लागला. १९५९मध्ये कॉम्रेड चेअरमन माओला भेटून परत आल्यावर टोकियो विमानतळावर तो उतरला तेव्हा त्याच्या अंगात माओ सूट (Mao suit) म्हणून ओळखला जाणारा गणवेश होता. जपानने या गणवेशाचा स्वीकार करावा, अर्थात माओवादी साम्यवाद स्वीकारावा, अशी इच्छा तो बाळगून होता. पूर्णपणे माओरंगी रंगलेला इनेजीरो असानुमा कष्टकरी वर्गाचा पत्कर घेतल्याचं भासवत जपानमधील प्रत्येक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचा विरोध करत असे. जपान आणि अमेरिकेत झालेल्या "Treaty of Mutual Cooperation and Security between Japan and the U.S." या कराराचा त्याने कडाडून विरोध केला होता. अमेरिका हा देश जपान आणि चीनचा शत्रू आहे असा प्रचार तो करत असे. इतकंच नव्हे, तर जपानच्या ताब्यात असलेल्या सेनकाकू बेटांच्या (Senkaku Islands) बाबतीत चीनशी असलेल्या वादात तो उघडपणे चीनची बाजू घेत ही बेटं जपानने चीनला देऊन टाकायला हवीत अशी भूमिका घेत असे आणि त्याची सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली तर त्याचं सरकार तसं करेलही असंही तो म्हणत असे.

एकोणीसशे साठच्या दशकापर्यंत एव्हाना जपानमध्ये इनेजीरो असानुमा हा एक डोकेदुखी बनला होता. दुर्दैवाने बर्‍याच मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागले होते. १९६० मधे जपानच्या हिबिया पार्क (Hibiya Park) येथे माओवादाचे समर्थन आणि जपानच्या व्यापारवादी/भांडवलशाही धोरणांच्या विरोधात झालेल्या एका सभेत भाषण केल्यानंतर एका वादविवादात इनेजीरो असानुमा सहभागी झाला. त्या वेळी असानुमाच्या विरोधात आणि समर्थनात तुंबळ घोषणाबाजी आणि आरडाओरडा याने सभागृह दणाणून गेले होते.

इनेजीरो असानुमा बोलत असताना अचानक सतरा वर्षांचा मुलगा वायुवेगाने व्यासपीठाकडे झेपावला, आणि कुणाला काही कळायच्या आत आपली सामुराई तलवार पार मुठीपर्यंत इनेजीरो असानुमाच्या पोटात खुपसली. तो दुसरा वार करणार इतक्यात सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्या मुलाला धरलं आणि पोलीसांच्या स्वाधीन केलं. मात्र घटनेच्या एकाच तासाच्या आत असानुमा मृत्यू पावला होता. त्या शूर मुलाचं नाव होतं ओटोया यामागुची (Otoya Yamaguchi).


घटनेनंतर तीनच आठवड्यांत ओटोयाने पोलीस स्टेशनमध्येच चादरीचा वापर करुन फास लावून जीव दिला. मरण्यापूर्वी त्याने दात घासण्याच्या पेस्टमधे थोडं पाणी मिसळून कोठडीच्या भिंतीवर एका देशद्रोह्याला शिक्षा केल्याचा आनंद व्यक्त करत आपला अखेरचा संदेश लिहिला:

"Seven lives for my Country,  Long live His Imperial Majesty, the Emperor Hirohito"  

सामुराई तलवारीने इनेजीरो असानुमा या कम्युनिस्ट नेत्याचा वध करणार्‍या ओटोयाच्या अखेरच्या संदेशात Seven lives for my Country हे शब्द समाविष्ट असणं औचित्यपूर्णच म्हणावं लागेल, कारण हे शब्द चौदाव्या शतकातील सामुराई योद्धा कुसुनोकी मासाशिगे (Kusunoki Masashige) याचे अखेरचे शब्द होत.

ओटाया यामागुची ने असानुमाला संपवताना जी सामुराई तलवार वापरली तिला जपानमधे "The sword that saved Japan" अर्थात "जपानला वाचवणारी तलवार" म्हणून ओळखली जाते. ओटाया यामागुचीने या माओवादी नेत्याला खलास करुन जपानला माओवादाच्या चिखलात रुतण्यापासून वाचवल्याने या तलवारीला हे नाव पडणं संयुक्तिकच म्हणायला हवं.

माओवादी इनेजीरो असानुमाच्या अंताबरोबरच त्याचा सोशलिस्ट पार्टी हा पक्ष जपानमधून अस्तंगत झाला. त्याचे परिणाम एका प्रगत औद्योगिक देशाच्या स्वरूपात आपल्या समोर आहे.



ओटोया यामागुची
ओटोया यामागुचीने पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याआधी त्याला आसानुमाच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी धरला, त्यावेळचा हा फोटो. हा फोटो घेणार्‍या यासुशी नागाओ (Yasushi Nagao) या छायाचित्रकाराला १९६१चा पुलिट्झर पुरस्कार मिळाला होता.

इनेजीरो असानुमाला ठार करुन माओवादाचे संकट फोफावण्याआधीच मुळापासून उपटून जपानला नासवण्यापासून वाचवणार्‍या ओटाया यामागुचीच्या स्मृतीला वंदन करुन हा लेख संपवतो.

...आणि हो, शहरी असो वा ग्रामीण, भारतातला माओवाद लवकरात लवकर संपो अशीही प्रार्थना.




संदर्भः
Rare Historical Photos - https://bit.ly/2A8WNq9
Ranjay Tripathi - https://bit.ly/2DyJO4k

© मंदार दिलीप जोशी