Tuesday, November 20, 2018

जपानला वाचवणारी तलवार अर्थात माओवादाचा जपानमधे अंत

१९४५ मध्ये दुसरं विश्वयुद्ध संपलं तेव्हा जपानची परिस्थिती अतिशय वाईट होती.

हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणूबाँबनी जणू जपानचं कंबरडं मोडलं होतं. अशा परिस्थितीत जपानमध्ये "एंजिरो असनुमा" (Inejiro Asanuma) नामक नेत्याचा उदय झाला. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या वेळी इनेजीरो असानुमा जपानच्या संसदेचे सदस्य होता आणि त्याने राष्ट्राध्यक्ष तोजो  यांना पाठिंबा दिला होता. मात्र १९४२ नंतर असानुमा साम्यवादाच्या प्रभावाखाली येऊ लागला, आणि जपानच्या राजकीय विश्वातून बाजूला झाला. विश्वयुद्धात जपानने चीनवर आक्रमण केल्यावर त्याने जपानच्या या कृतीचा तीव्र विरोध केला. दुसरं विश्वयुद्ध संपता संपता इनेजीरो असानुमा पूर्णपणे साम्यवादी चीनच्या प्रभावाखाली आला होता आणि युद्धसमाप्ती नंतर वरचेवर चीनचे दौरे करत असे. त्याने जपानमधे सोशलिस्ट पार्टी नामक साम्यवादी पक्ष काढला. जपानच्या प्रत्येक विद्यमान धोरणांचा विरोध आणि साम्यवादाचा स्वीकार करण्याचा पुरस्कार हा पक्ष करत असे. चीनच्या असंख्य वार्‍या करता करता असानुमाचे कॉम्रेड चेअरमन माओ त्से तुंग याच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण नसते झाले तरच नवल होतं.

इनेजीरो असानुमा जपानमध्ये माओवादाच्या प्रसारासाठी झटून कामाला लागला. १९५९मध्ये कॉम्रेड चेअरमन माओला भेटून परत आल्यावर टोकियो विमानतळावर तो उतरला तेव्हा त्याच्या अंगात माओ सूट (Mao suit) म्हणून ओळखला जाणारा गणवेश होता. जपानने या गणवेशाचा स्वीकार करावा, अर्थात माओवादी साम्यवाद स्वीकारावा, अशी इच्छा तो बाळगून होता. पूर्णपणे माओरंगी रंगलेला इनेजीरो असानुमा कष्टकरी वर्गाचा पत्कर घेतल्याचं भासवत जपानमधील प्रत्येक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचा विरोध करत असे. जपान आणि अमेरिकेत झालेल्या "Treaty of Mutual Cooperation and Security between Japan and the U.S." या कराराचा त्याने कडाडून विरोध केला होता. अमेरिका हा देश जपान आणि चीनचा शत्रू आहे असा प्रचार तो करत असे. इतकंच नव्हे, तर जपानच्या ताब्यात असलेल्या सेनकाकू बेटांच्या (Senkaku Islands) बाबतीत चीनशी असलेल्या वादात तो उघडपणे चीनची बाजू घेत ही बेटं जपानने चीनला देऊन टाकायला हवीत अशी भूमिका घेत असे आणि त्याची सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली तर त्याचं सरकार तसं करेलही असंही तो म्हणत असे.

एकोणीसशे साठच्या दशकापर्यंत एव्हाना जपानमध्ये इनेजीरो असानुमा हा एक डोकेदुखी बनला होता. दुर्दैवाने बर्‍याच मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागले होते. १९६० मधे जपानच्या हिबिया पार्क (Hibiya Park) येथे माओवादाचे समर्थन आणि जपानच्या व्यापारवादी/भांडवलशाही धोरणांच्या विरोधात झालेल्या एका सभेत भाषण केल्यानंतर एका वादविवादात इनेजीरो असानुमा सहभागी झाला. त्या वेळी असानुमाच्या विरोधात आणि समर्थनात तुंबळ घोषणाबाजी आणि आरडाओरडा याने सभागृह दणाणून गेले होते.

इनेजीरो असानुमा बोलत असताना अचानक सतरा वर्षांचा मुलगा वायुवेगाने व्यासपीठाकडे झेपावला, आणि कुणाला काही कळायच्या आत आपली सामुराई तलवार पार मुठीपर्यंत इनेजीरो असानुमाच्या पोटात खुपसली. तो दुसरा वार करणार इतक्यात सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्या मुलाला धरलं आणि पोलीसांच्या स्वाधीन केलं. मात्र घटनेच्या एकाच तासाच्या आत असानुमा मृत्यू पावला होता. त्या शूर मुलाचं नाव होतं ओटोया यामागुची (Otoya Yamaguchi).


घटनेनंतर तीनच आठवड्यांत ओटोयाने पोलीस स्टेशनमध्येच चादरीचा वापर करुन फास लावून जीव दिला. मरण्यापूर्वी त्याने दात घासण्याच्या पेस्टमधे थोडं पाणी मिसळून कोठडीच्या भिंतीवर एका देशद्रोह्याला शिक्षा केल्याचा आनंद व्यक्त करत आपला अखेरचा संदेश लिहिला:

"Seven lives for my Country,  Long live His Imperial Majesty, the Emperor Hirohito"  

सामुराई तलवारीने इनेजीरो असानुमा या कम्युनिस्ट नेत्याचा वध करणार्‍या ओटोयाच्या अखेरच्या संदेशात Seven lives for my Country हे शब्द समाविष्ट असणं औचित्यपूर्णच म्हणावं लागेल, कारण हे शब्द चौदाव्या शतकातील सामुराई योद्धा कुसुनोकी मासाशिगे (Kusunoki Masashige) याचे अखेरचे शब्द होत.

ओटाया यामागुची ने असानुमाला संपवताना जी सामुराई तलवार वापरली तिला जपानमधे "The sword that saved Japan" अर्थात "जपानला वाचवणारी तलवार" म्हणून ओळखली जाते. ओटाया यामागुचीने या माओवादी नेत्याला खलास करुन जपानला माओवादाच्या चिखलात रुतण्यापासून वाचवल्याने या तलवारीला हे नाव पडणं संयुक्तिकच म्हणायला हवं.

माओवादी इनेजीरो असानुमाच्या अंताबरोबरच त्याचा सोशलिस्ट पार्टी हा पक्ष जपानमधून अस्तंगत झाला. त्याचे परिणाम एका प्रगत औद्योगिक देशाच्या स्वरूपात आपल्या समोर आहे.



ओटोया यामागुची
ओटोया यामागुचीने पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याआधी त्याला आसानुमाच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी धरला, त्यावेळचा हा फोटो. हा फोटो घेणार्‍या यासुशी नागाओ (Yasushi Nagao) या छायाचित्रकाराला १९६१चा पुलिट्झर पुरस्कार मिळाला होता.

इनेजीरो असानुमाला ठार करुन माओवादाचे संकट फोफावण्याआधीच मुळापासून उपटून जपानला नासवण्यापासून वाचवणार्‍या ओटाया यामागुचीच्या स्मृतीला वंदन करुन हा लेख संपवतो.

...आणि हो, शहरी असो वा ग्रामीण, भारतातला माओवाद लवकरात लवकर संपो अशीही प्रार्थना.




संदर्भः
Rare Historical Photos - https://bit.ly/2A8WNq9
Ranjay Tripathi - https://bit.ly/2DyJO4k

© मंदार दिलीप जोशी

1 comment: